Public Program 1985-01-26
26 जानेवारी 1985
Public Program
Pimpri, Pune (India)
Talk Language: Marathi | Transcript (Marathi) - Draft
आता आपल्या समोर श्रीमती उमाशंशी भालेराव यांनी इतकं सुंदर भजन म्हंटल आहे , कि त्या भजना मध्ये जे काही सांगायचं ते आधीच सांगून टाकलेलं आहे . तुम्हा सगळ्यांच्या तर्फे आणि इथे जमलेल्या सहजयोगांच्या तर्फे ,पिंपरीच्या सर्व सहजयोग केंद्रांच्या तर्फे मी त्यांचे आभार मानते . आणि परत परत असं सुश्राव्य भजन भाषणा ऐवजी ऐकायला मिळेल अशी मला आशा आहे . कारण मी भाषण देऊन देऊन आता कंटाळून गेले आहे . आणि किती भाषण दिली तरी ती डोक्यात केव्हा येणार आहेत असा विचार येतो . सहजयोगा बद्दल अनेकदा पिंपरीला प्रोग्रॅम झाला आणि आपण सर्व मंडळी तिथे आला होतात . त्याच्यावर आपण विचारविनिमय केला आहे .
सहजयोग म्हणजे तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे . सहज म्हणजे तुमच्या बरोबर जन्मलेला ,असा हा योग तुम्हाला प्राप्त करण्यासाठी काहीही करावं लागणार नाही अशी परिस्थिती आता आलेली आहे . सहजच ते घडत सुद्धा म्हणून मराठीत सहजला दोन अर्थ आहेत सहज म्हणजे तुमच्या बरोबर जन्मलेला आणि सहज म्हणजे अगदी सहजगत्या ,विनासायास . आणि जे आपल्या बरोबर जन्मलेलं आहे ते सगळं सहज आहे . आपल्या डोळ्यांनी आपण काही बघतो ते किती सहज बघून आपण जाणतो कि हे काय आहे . कानांनी आपण ऐकतो ते किती सहज जाणतो कि ते किती सुश्राव्य आहे . अशा प्रकारे सहजयोग सुद्धा अत्यंत सहज असून तो तुमच्या बरोबर जन्मलेला एक योग आहे . आता हा सहजयोग प्रत्येकाला उपलब्ध का व्हावा हे पुष्कळांनी विचारलं . कारण पूर्वीच्या काळी कुंडलिनी जागरण म्हणजे काहीतरी बागुलबुवा होता . अशी सगळ्यांनी कल्पना केली होती . कुंडलिनी जागरण म्हणजे काही सोपं काम नाही ,कुंडलिनी जागरण व्हायचं म्हणजे काही काही प्रकार होतात . सहावा अध्याय म्हणजे कोणी वाचू नये . असे बरेच प्रकार आत्ता पर्यंत आपल्या समाजात होते . पण कुंडलिनी जागरण हे सुसाध्य झालं ,ते सुसाध्य कस झालं ,काय झालं ते सांगण्याच्या ऐवजी मला अस सांगायचं आहे कि हि कुंडलिनी तुम्हा सगळ्यांच्या आत मध्ये निवांत बसलेली आहे . अनेक जन्मा पर्यंत हि कुंडलिनी अशीच ह्या ठिकाणी तुमच्या त्रिकोणी अस्तित जन्माला पावते आणि तिथेच परत सुप्त अवस्थेत राहते . कुंडलिनी हि मनातली शुद्ध इच्छा आहे . बाकी सर्व इच्छा आहेत त्या अशुद्ध इच्छा आहेत . म्हणून त्या कितीही पूर्ण झाल्या तरी माणूस तृप्त होत नाही . हि इच्छा जेव्हा जागृत होते तेव्हाच माणूस तृप्त होतो . त्या नंतर च त्याला संतोष मिळतो आणि ह्या इच्छे मध्ये एकच इच्छा असते कि आपला परमेश्वराशी योग्य झाला पाहिजे . आता सांगायचं म्हणजे असं कि प्रत्येका मध्ये हि कुंडलिनी शक्ती आहे ,आणि प्रत्येका मध्ये हृदयामध्ये आत्म्याचं दर्शन आहे . पण हा जो आत्मा आहे तो अजून चित्तात आलेला नाही ,आपल्या चित्ता मध्ये हा आत्मा जेव्हा प्रकाशित होईल तेव्हाच आपल्याला जाणीव होईल कि आपल्या मध्ये आत्मा आहे . त्याच्या आधी हा नुसता साक्षी रूपाने आपण काय करतोय ,काय वागतोय ,कुठे चुकतोय ,कुठे धर्मात आहोत ,कुठे अधर्मात आहोत ते नुसतं बघत राहतो . हा आत्मा म्हणजे धुकधुकणारी एखादी लहानशी ज्योत असावी तसा आहे . आणि हि शक्ती कुंडलिनी जेव्हा जागृत होते ,त्या जागृती मुळे कुंडलिनीचा स्पर्श जेव्हा आत्म्याला होतो तेव्हा त्याचा प्रकाश आपल्या चित्तात पडतो . हि गोष्ट अत्यंत सहज असली पाहिजे . कारण जेव्हड काही जिवंत आहे ते अत्यंत सहज घडत . तुम्हाला जर उद्या एखाद बी पेरायच असल तर नुसत तुम्हाला ह्या आईच्या उदरात घातल कि ते आपोआप उगवत त्याला अंकुर फुटतात . तसच ज्याला ह्या आई सारखी शक्ती असेल तो हे कार्य सहजच करू शकतो . इतकच नव्हे पण एखादा सहजयोगी सुध्दा तुमची कुंडलिनी जागृत करू शकतो . ते काही कठीण काम नाही आहे . त्याच्या साठी उपदव्याप करायला नको ,काहीही विशेष त्रास करायला नको .
आपल्या देशामध्ये भक्तिमार्ग सांगितला तो एव्हड्या साठी कि माणसाने सन्मार्गापासून विचलित नाही झालं पाहिजे . ते मन विचलित नाही होण्यासाठी म्हणून सांगितलं कि तुम्ही देवाचं नाव घेतलं म्हणजे तुमचं लक्ष देवा कडे राहील . तुमच्या मध्ये अधर्म येणार नाही . पण तस काही दिसत नाही. जेव्हा आपण अतिशयतेला गेलो धर्माच्या बाबतीत लोकांनी त्याची एक समोरची बाजू बनवून ठेवली ,दाखवायचे दात ,इकडे भक्ती करायची आणि तिकडे वाट्टेल ते करायचं . हि अशी प्रतारणा आपण आपल्या बरोबर मांडलेली आहे . तेव्हा लोकांना अशी शंका वाटते विशेषतः तरुण मंडळींना कि जे देव देव म्हणून जे ओरडत असतात त्याच्या मध्ये काही राम नाही . इकडे देवाचं नाव घ्यायचं आणि तिकडे लोकांचे गळे कापायचे . तर हे कस शक्य आहे . त्याला कारण असं आहे कि देवाचं नुसत नाव घेणं जे म्हणतात ते भजन नव्हे . ज्याला आपण भजन म्हणतो तो भक्त करू शकतो ,आणि भक्त तो जो विभक्त नाही . जो देवाशी एकाकार झाला असाच भक्त . बाकी जो एकाकार नाही झाला त्याची भक्ती त्याला काही अर्थ नाही आहे . त्याचा संबंध जो पर्यंत देवाशी होत नाही तो पर्यंत त्याच्या भक्तीला काही अर्थ नाही . म्हणजे समजा ह्या माईक बरोबर विजेचं कनेक्शन झालं नाही तर त्याचा काही उपयोग नाही . तसच आपल्या भक्तीच सुध्दा आहे . म्हणून श्री कृष्णांनी सांगितलं आहे कि अनन्य भक्ती केली पाहिजे . ती कशासाठी ?,अनन्य भक्ती केली म्हणजे माणूस संतुलनात राहील ,धर्मात उभा राहील पण अनन्य भक्ती साधायची कशी ?हे उलट गाड झालं . अनन्य म्हणजे तुम्हाला आत्मबोध होईल ,तुम्हाला आत्मसाक्षात्कार होईल जेव्हा तुमचा संबंध देवाशी लागेल तेव्हा च अनन्य भक्ती होणार . मग अनन्य भक्ती कशी करायची ?त्याच्या साठी म्हणून आत्मबोध हा घेतला पाहिजे . हा त्याचा अर्थ आहे . आणि कृष्णाने जरी गोल फिरवून सांगितलं तरी त्याचा सरळ अर्थ असा आहे कि तुमचा आत्मबोध झाला पाहिजे . तुम्ही आत्मसाक्षात्कारी झाले पाहिजे . स्थितप्रग्य झाले पाहिजे . त्यासाठी म्हणून ज्ञानेश्वरांनी सहाव्या अध्यायात सांगितलं कि कुंडलिनी म्हणून जी शक्ती आहे ती जागृत झाली पाहिजे . पण त्या वेळेला लोकांनी या अध्ययावर बंदी घातली . कारण जर असं म्हंटल कि तुमची कुंडलिनी जागृत झाली पाहिजे तर मग लोक म्हणतील , मग काय ,कुंडलिनी आधी जागृत करा मग बोलूयात . मग भक्तीच्या गोष्टी करायच्या . तर लोकांनी सांगितलं तस काही करू नका . तुम्ही फक्त दिंड्या घातल्या म्हणजे झालं पण ज्ञानेश्वरीत कुठे दिंड्या घाला असा शब्द नाही आहे . किंवा तुम्ही दिंड्या घालायला पाहिजेत असही कुठे सांगितलेलं नाही . अशा रीतीने आपली दिशाभूल होऊन आपण आपल्या भक्तिमार्गाला दिंड्या घालणे असं समजलेलं आहे . म्हणून पुष्कळ लोक मला असं म्हणतात कि आम्ही वारकरी आहोत ,आम्ही एव्हड्या वाऱ्या केल्या . काही आम्हाला फायदा कसा झाला नाही उलट आम्ही आजारी आहोत ,आम्हाला हा त्रास ,तो त्रास आहे . त्याला कारण असं आहे कि जो पर्यंत अनन्य भक्ती होत नाही तो पर्यंत दिंड्या घालून तुम्ही पंढरीला जाऊ शकत नाही . जर तुमची अनन्य भक्ती झाली तर तुम्हाला पंढरीनाथ कोण ,कृष्ण कोण हे कळत . आता जरी म्हंटल आपण कि हे स्वयंभू स्थान आहे ,पुंडलिकाच स्थान आहे . पण हे कशावरून ?उद्या तुमची मूल विचारतील कशावरून ?हे तर दगड दिसतात मग कशावरून ?हे सिध्द कस करायचं ? त्याच्या साठी तुम्हाला आत्मबोध झाला पाहिजे . आपण त्याच त्याच चाकोरीत फिरत आहोत पण हे लक्षात ठेवलं पाहिजे कि पुढची पिढी आपल्याला विचारणार आहे . तेव्हा आत्मबोध घेतल्यावर आपल्याला आश्चर्य वाटेल कि त्या देवळा मध्ये ,बाहेरूनच तुम्हाला कळेल कि हि एक चैतन्य शक्ती आहे आणि ती त्या देवळातून आपल्याकडे येत आहे आणि त्यामुळे आपल्याला असं थंडथंङ हाताला वाटत आहे आणि हि चैतन्य स्वरूप पुंडलिकाने उभी केलेली हि श्री कृष्णाची आणि रखुमाईची खरोखर मूर्ती आहे . पण ते सिद्ध कस करायचं ?जर आपल्याला डोळेच नसले आणि कुणी सांगितलं इथे निळा पडदा आणि झालर लावलेली आहे . तुम्ही म्हणाल कुठे आहे आम्हाला काही दिसतच नाही . तुम्हाला कस दिसणार, ज्याला डोळे आहेत त्यांनी सांगितलं पण ज्याला डोळे नाहीत त्यांना काही उपयोगाचं नाही . म्हणून सगळ्यात महत्वाचं हे आहे की आधी डोळे उघडले पाहिजेत . एकदा डोळे उघडले आत्म्याचे म्हणजे सगळं काही बरोबर दिसू लागत आणि समजत कि आपण जी भक्ती करतोय त्याला काय अर्थ आहे . श्री कृष्णाने म्हंटल होत कि योगक्षेम वाहामयं , आधी योग म्हंटल हं मग क्षेम म्हंटल आहे . आधी योग घेतल्या शिवाय तुमचं क्षेम होणार नाही .
पुष्कळशे लोक मला परदेशात विचारतात कि का तुमचा एव्हडा योग पूर्ण देश आहे इतकी मोठी पुण्यभूमी आहे ,तुमच्या कडे इतके पुण्यवान आत्मे झाले ,इतके अवतार झाले मग अशी स्तिती का ?कारण आम्ही अजून योग कुठे घेतलेला आहे . जे श्री कृष्णांनी सहा हजार वर्षा पूर्वी सांगितलं कि तुम्ही आधी योग घ्या मग क्षेम होईल . आधी योग न घेताच आपण टाळ कुटत बसलो तर श्री कृष्ण कसा पावन होणार . आधी आपण आपल्या आत्म्याला जाणलं पाहिजे . ते झाल्या बरोबरच क्षेम घडत . क्षेम घडत म्हणजे आपल्या तब्बेती ठीक होतात ,आपली मानसिक स्तिती सुधारते ,आपली आर्थिक स्तिती सुधारते त्याशिवाय सगळ्यात महत्वाचं आपली जी आत्मिक स्तिती जी आहे ती सुधारते आणि त्यामध्ये धर्म जागृत होतो . धर्म जागृत झाला म्हणजे सांगावं लागत नाही असं करा ,तस करा . आपोआप माणूस धर्मात चालतो . जे अधर्म आहे ते सुटत ,ज्या वाईट सवयी त्या सुटतात . जे वाईट मार्गाला आपण लागलेलो आहोत ते परत फिरून सन्मार्गाला लागतो . आपोआपच हे घडत म्हणजे आपणच स्वतःचे गुरु होऊन जातो . आता बघा ज्ञानेश्वरांना किंवा तुकारामांना किंवा कोणत्याही अशा मोठ्या सातसाधुना किंवा अवतरण ना सांगावं लागत नव्हतं कि तुम्ही सन्मार्गाने जा . कारण ते सन्मार्गात उभे होते . त्याच्या मध्ये सन्मार्ग बाणलेला होता . त्यांच्या रोमारोमात सन्मार्ग होता . कारण त्याच्या मध्ये आत्म्याची जागृती झाली होती त्याच्यामध्ये सन्मार्ग होता . तसच जेव्हा तुमच्या मध्ये आत्म्याची जागृती होईल तेव्हा तुमच्या मध्ये सुध्दा त्या साधुसंतान प्रमाणेच धर्म जागृत होईल . अशी धर्म जागृती करण्याचे कार्य आज सहजयोग सगळीकडे करत आहे . ह्याच्यात एकदा जागृत झाल्यावर माणूस गुणातीत होतो . म्हणजे त्याला जाती ,धर्म हे असले लहान लहान नुसते आपल्या मध्ये वेगवेगळे संघ स्थापन झाले आहेत ज्याला काहीही अर्थ नाही ,ज्याच्या मुळे आपण भांडतो आणि एकदुसऱ्यांचे आपण गळे कापतो आणि धर्माच्या विरुध्द कार्य करतो हे सगळं सुटून माणूस खऱ्या धर्मात उभे राहतो आणि त्याच्या मध्ये एक प्रकारची अशी शान्ति येते कि तो कोणत्याही अशा वाईट मार्गाला जात नाहीच उलट स्वतः प्रकाश बनून सगळ्यांना प्रकाश देतो त्यांचं जीवन सुखावतो आणि त्याना आनंद देतो .
आता मानवाची हि स्तिती होणार . मानव स्तिती झाली तेव्हडी पूर्ण झाली , पुष्कळ लोक म्हणतात कि माकडा पासून मनुष्य झाला . पण आता मनुष्य झाला म्हणजे त्याचा शेवट आलेला नाही . ह्याच्यावर एक आणखीन आपल्याला पायरी चढायची आहे ती अत्यंत सूक्ष्म आहे . आणि अत्यंत सहज आहे . आणि ती म्हणजे आपल्याला आत्म्याचा अनुभव झाला पाहिजे . पण जस मी म्हंटल कि जिवंत क्रिया आहे आणि जरी एक लहानस बी अंकुरले तरी त्याला फार जपावं लागत तसच सहजयोगात आल्यावर आत्मानुभूती मिळाल्या नंतर त्याला जपावं लागत ,ते जवळ जवळ एक दोन महिने तुम्ही जपलं तर तुमच्यात मोठे वृक्ष तयार होतात आणि तुम्ही स्वतःच फार मोठे गुरु होता . तुम्हाला काही सांगावं लागत नाही तुम्ही स्वतः समजता कि काय करायला पाहिजे आणि नाही ते . आज हि स्तिती अली आहे कि जे साधुसंत सांगून गेले ,जे मोठं मोठ्या अवतारां नि सांगितलं आहे ते सिध्द झालं पाहिजे . ती सिध्द करण्याची आज स्तिती अली आहे . आणि ते आता तुम्हाला मिळालं पाहिजे . आणि त्या साठी मी आज तुमच्याकडे आलेली आहे . आता तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर विचारा . मी सारखी लेक्चर देते आहे तरी सुध्दा सहजयोग पुष्कळ लोकांना लाभला ,हजारोनी लोक पार होतात पण किती लोक जमून त्याचे वृक्ष होतील हे बघायला पाहिजे . विशेषतः तरुण मंडळींनी समजून घेतलं पाहजे . त्यांच्यावर हि फार मोठी जबाबदारी आहे . हा तुमचा वारसा आहे . आणि हा वारसा तुम्ही वाढवला पाहिजे . तो मिळवला पाहिजे . कारण बाकी देशांमध्ये नुसतं झाडा सारखं वाढलं आहे म्हणजे झाड जस बाहेरून वाढावं आणि आतील पाळंमुळं अगदी सुकून जावीत अशी त्याची स्तिती आहे . त्याची पाळंमुळं आपल्या देशात आहेत . ती आपल्याला जपून वाढवली पाहिजेत . म्हणून आपण सर्वानी एक लक्षात घेतलं पाहिजे कि जे आपल्याला करायचं आहे ते आपण केलं पाहिजे जे त्याना करायचं ते त्यांनी केलं पाहिजे . आपल्याला आपली आत्म्याची जी ठेवणं घेऊन दिलेली आहे ती आपण जर वाढवली तर साऱ्या जगातले देश इथे येऊन आपल्या पायावर नामतील आणि आपल्या पासून दीक्षा घेतील . तरी आपण सर्वानी पहिल्यांदा आत्मबोध घ्यावा त्याच्यानंतर तुम्हाला मग काय करायचं ते पुढे करावं त्याच्या आधी अजून आपली स्तिती पूर्णत्वाला गेलेली नाही . आत्मबोध घेऊन तुम्ही जेव्हा पूर्णत्वाला जाल तेव्हाच प्रत्येक कार्य व्यवस्तिति ,प्रत्येक कार्याला देवाचा आशीर्वाद ,अनेक चमत्कार तुम्हाला दिसतील आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल कि देवाच्या साम्राज्यात तुम्हाला किती आनंदात आणि किती सुखात राहायला मिळेल . तेव्हा जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा . त्याच्या नंतर आपण हि क्रिया करूयात .
प्रश्न - आत्मबोध आणि आत्मसाक्षात्कार आणि ईश्वरी साक्षात्कार यात फरक काय ?
आत्मबोध ,आत्मसाक्षात्कार आणि ईश्वरी साक्षात्कार हे सगळं एकच आहे . तिन्ही गोष्टी एकच आहेत . यात काहीच फरक नाही . तेव्हा कस सांगायचं ? साक्षात्कार होतो त्याला काही प्रक्रिया लागत नाही . हे अक्रिय आहे अक्रिय मध्ये बसायचं . फक्त काय आहे कि आपल्या मध्ये दोन शक्त्या फार प्रबळ आहेत . एकतर आपल्यामध्ये हि तामसिक प्रवृत्ती आहे दुसरी राजसिक प्रवृत्ती आहे . आणि दोन्ही च्या मध्ये सात्विक प्रवृत्ती आहे . ती सात्विक प्रवृत्ती आधी गाठावी लागते . त्यासाठी फारतर आपल्याला एकवेळ असा हात ठेवावा लागेल आणि एक वेळ असा ठेवावा लागेल . याला काही क्रिया म्हणू शकत नाही . कारण आपल्या हातावर हि सगळी चक्र आहेत . हे झाल्या नंतर एकदा तुमच्यात आत्मसाक्षात्कार आल्यानंतर फार वेळ लागत नाही म्हणजे बी रोपायच त्याला तुम्हाला काही करावं लागत नाही ते उगवून येईल पण ते बी नीट घालावं लागत ना . तर ते बी नीट घातल्यावर ते आपोआप रोपून येईल . पण त्याच्यानंतर त्याला जपावं लागत . हि दुसरी गोष्ट आहे . त्याला जपावं लागत बरोबर ते वाढलं पाहिजे नीट म्हणून .
आत्मसाक्षात्काराचा अनुभव म्हणजे हातामध्ये अशे थंडथंङ असे गर हवा यायला लागते . म्हणजे चारीकडे हि जी देवाची ऋतुंभरा प्रज्ञा आहे जीनी संबंध जिवंत क्रिया होतात त्या सूक्ष्म संवेदना आपण सूक्ष्म झाल्यामुळे आपल्याला मिळतात . दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या डोक्यातून गारगार असे वारे कुंडलिनी जागृत झाल्यामुळे असे येऊ लागतात . हि सर्व प्रथम क्रिया होते . तिसरं म्हणजे डोळ्यामध्ये एक तऱ्हेची चमक येते . आणि नंतर म्हणजे तुम्ही सामूहिक चेतनेत जागृत होता . म्हणजे तुमच्या मध्ये सामूहिक चेतना येते . म्हणजे तुमची सगळी चक्र जागृत झाली म्हणजे तुम्हाला हे कळत कि तुमच्या कोणत्या चक्रा मध्ये त्रास आहे . ध्यान करताना जर एखाद्या बोटाला जर गरमी अली तर समजायचं कि त्या चक्राला त्रास आहे . हे सर्व चक्र काय आहेत ते सहजयोगात आम्ही समजावून सांगतो . ते अगदी लहान मुलांनाही समजत . आणि जर तुम्हाला जर कळलं कि याला ठीक कस करायचं तर तुम्ही स्वतःची आणि दुसऱ्यांची पण सगळी चक्र ठीक करू शकता . म्हणजे तुम्ही सामूहिक चेतने मध्ये जागृत होता तुमच्या ज्या नसा किंवा तुमची जी सेंट्रल नर्व्हस सिस्टीम आहे त्याला एक नवी दिशा मिळते . एक नवं डायमेन्शन मिळत . कि त्या डायमेन्शन मध्ये तुम्हाला हे कळत कि तुम्हाला काय त्रास आहे ,म्हणजे आत्मबोध होतो आणि दुसऱ्यांना काय त्रास आहे कारण तुम्ही सामूहिक चेतनेत तुम्ही जागृत होता . त्याच्या नंतर तुम्ही माहित करून घेतलं कि हे कस ठीक करायचं तर तुम्ही स्वतः ला आणि दुसऱ्यांना हि ठीक करू शकता . दुसऱ्यांना जागृती देऊ शकता आणि त्यां ना सगळा सहजयोग समजावून सांगू शकता . पण त्याच्यात अनेक दुसरे लाभ होतात ते लाभ काय होतात हे सांगायला बसलं तर एक पुस्तक लिहावं लागेल . सगळ्यात मुख्य म्हणजे माणसाला शारीरिक संपत्ती मिळते ,आपल्या जर तब्बेती खराब असल्या तर त्या ठीक होतात ,जे रोग ठीक होऊ शकत नाहीत ते ठोक होतात . असे अनेक प्रकार घटीत होतात . आणि हे जेव्हा घटीत होत तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटत कि हे कस घटीत झालं . अपघात झाले तर लोक त्याच्यात मरत नाहीत ,वाचतात . काहीही त्रास असेल तर ते परमेश्वराकडे ठेवले तर ते संपून जातात . कर्ज आहे ते फिटून जात . म्हणजे असं आहे कि कोणताही कारण आणि परिणाम याचा परस्पर संबंध असतो . आणि माणूस परिणामाशी किंवा कर्णाशी झगडत असतो . आता त्याला कारण तरी कमी करावं वाटत किंवा परिणाम तरी कमी करावा वाटतो . याच्या मध्ये तुम्ही दोन्ही गोष्टींशी भांडता पण एकही गोष्टीवर समाधान निघत नाही . कारण असं आहे कि एक गोष्ट दुसऱ्यावर अवलंबून असल्यामुळे त्याचा तुम्ही विच्छेद करू शकत नाही . पण समजा तुम्ही त्या कारणाच्याच पलीकडे गेलात तर ते कारणही नष्ट पावत आणि त्याचा परिणामही नष्ट होतो . हे कारणांच्या पलीकडे जण म्हणजेच ह्या कुंडलिनीवर येन आहे . कारण हेच तुमचं तत्व आहे . ह्या तत्वावर तुम्ही आल्यावरती बाकी जे काही कारण आहेत त्या कारणामुळे झालेले परिणाम ,दुष्परिणाम सगळे नष्ट होऊन तुम्ही त्याच्या वर उठून उभे राहता . आता सर्वानी जागृती घ्यावी .
आता सगळ्यांनी एकच काम करायचं ,फक्त डावा हात माझ्याकडे करायचा आणि उजवा हात गणपतीला नमस्कार करून ह्या पृथ्वी तत्वावर ठेवायचा . हि पुण्यभूमी आहे म्हणून . टोप्या काढून घ्या कारण ब्रम्हरंध्र छेदायचं आहे . ,बायकांनी पदर ठेवले तरी चालतील . आता डोळे मिटायचे . मी म्हंटल्या शिवाय डोळे उघडायचे नाहीत . चष्मे काढून ठेवा . लक्ष टाळूकडे ठेवायचं . आणि म्हणायचं कि माताजी आम्हाला साक्षात्कार हवा . तुम्ही मागितल्या शिवाय आम्ही देऊ शकत नाही कारण तुम्हाला स्वतंत्रता आहे . म्हणून आम्हाला साक्षात्कार द्यावा असं नम्र पणाने म्हणायचं . आता हातात येतंय का गार बघा . लहान मुलांच्या हातात लगेच येईल . सूक्ष्म आहे ते ,येतंय का बघा . आता हा चमत्कार आहे बघत राहायचं . आता हळूच डोळे उघडा पण विचार करायचा नाही . आता उजवा हात माझ्याकडे करा आणि डावा हात असा आकाशा कडे असा करा . म्हणजे आपलं जे राजसिक तत्व आहे ते ठीक होईल . आता परत डोळे मिटा . लक्ष टाळू कडे ठेवा . उजव्या हातात येतंय का गार बघा . आता परत डावा हात माझ्याकडे आणि उजवा हात टाळूवर ठेवा . आत उजवा हात खाली आणि डावा हात डोक्यावर धरा . आता दोन्ही हात आकाशाकडे करून विचारायचं कि हीच परमेश्वराची प्रेमशक्ती आहे का ?,हीच ऋतंभरा प्रज्ञा आहे का ?आता हात खाली करा . आणि बघा दोन्ही हातामध्ये येतंय का . डोक्यातही थंड झालं ,आणि निर्विचारता अली . आता पहिली निर्विचार समाधी तुम्हाला प्राप्त झाली आता निर्विकल्पात उतरायचं आहे . पण लोक लक्ष घालत नाहीत . कारण अंकुर फुटल्यावरती बी तसच सोडलं तर ते बरोबर नसत . म्हणून सगळ्या मुलांनी ,स्त्रियांनी ,पुरुषांनी ,आबालवृद्धांनी सर्वानी जराशी मेहनत केली तर हा वृक्ष पूर्णपणे पूर्णत्वाला पोहोचून तुम्ही स्वतः अत्यंत उच्च प्रतीचे लोक व्हाल . तुमच्या हातून हि साक्षात ब्राम्हशक्ती वाहते आहे . इतकं सहज घडलं म्हणून ते वाया घालवू नये . सहज मिळालं म्हणून ते बेकार करू नये . तुम्ही भाग्यवान म्हणून तुम्हाला मिळालं आहे , याच्या मुळे अनेक रोग ,व्याधी ,चिंता ,दुःखे दारिद्रये सगळे नष्ट होऊन तुम्ही स्वतः एक साधू पुरुष व्हाल . त्यासाठी घर सोडायला नको ,संसारातून पळायला नको ,संसारात राहूनच कमळासारखे सुरभीत व्हाल आणि संबंध जगाला तुमचा सुगंध मिळेल . परमेश्वर तुम्हा सर्वाना आशीर्वादित करो .