Public Program 1985-01-24
24 जानेवारी 1985
Public Program
Rahuri (India)
Talk Language: Marathi | Transcript (Marathi) - Draft
श्री पंडित राव जाधव ,गौतम पब्लिक स्कूल चे मुख्य संचालक ,उपसंचालक तसेच शिक्षक वृंद , फॅक्टीरीतले माननीय डिरेक्टर्स तसेच इथे जमलेले इतर ह्या शाळेचे सहाय्यक लोक ,सहजयोगी जे बाहेरून आलेले आहेत आणि इथे आहेत ते पण . सगळ्यात मुख्य म्हणजे इथे जमलेला हा सुंदर बालवृन्द . इतकी सुंदर व्यवस्था आपण केलेली आहे प्रेमाची कि काय बोलावं ते च समजत नाही . प्रेमाला भाषा नसते हे मी जाणते . पण नुसतं इतकं हृदय भरून येतंय कि त्यांना शब्दात घालून कस सांगायचं ते मला समजत नाही . हि अबोध ,निष्पाप मूल इथं बसलेली आहेत हीच उद्या आपल्या या महान देशाची नागरिक सेना आहे . आपल्या देशांनी हजारो वर्षांपासून तपस्या केलेली आहे . आणि त्या तपस्वितेचं फळ म्हणजे अनेक संतसाधु ह्या भारताच्या सुंदर प्रांगणामध्ये आले त्यांनी आशीर्वाद दिला . लोकांना हिताचा उपदेश केलेला आहे . आता आपला देश प्रगतीपर होत आहे . आपण प्रगतीकडे वाढत आहोत . हि फार मोठी गोष्ट आहे कि देश जो कि ३०० वर्ष गुलामीत खितपत पडला होता तो आज स्वातंत्र्याच्या नवीन विचारांनी आज वाढत आहे .
ह्या वेळी मला शिवाजी महाराजांची आठवण येते , त्यांनी सांगितलं होत कि स्व च तंत्र ओळखलं पाहिजे . स्वतंत्र व्हा . तसच ज्ञानेश्वरांनी म्हंटल आहे जेव्हा त्यांनी पसायदानातून परमेश्वराला प्रार्थना केली तेव्हा सांगितलं कि आता विश्वात्मके तोषावे ,तोषोनि दयावे पसायदान . पसायदान म्हणजे काय ?त्यांनी सांगितलं कि सगळ्यांना आत्मबोध झाला पाहिजे . आत्मबोध होताच हातातून ज्या चैतन्याच्या लहरी वाहतात ते पसायदान . त्यांनी तो शब्द वापरला जो शिवाजी महाराजांनी वापरला होता "विश्व स्वधर्म सूर्य पाहो ", स्वधर्म सूर्य पाहो ,स्व म्हणजे आत्मा त्या धर्माचा जो सूर्य आहे तो ह्या विश्वानी पाहो असं एक सुंदर भाकीत ,अशी फार सुंदर इच्छा ,प्रार्थना त्यांनी विश्वात्मकाला केली होती . जे काही त्यांनी त्याच्यात लिहिलेलं आहे ते सगळं घडण्याची वेळ अली आहे . आज जी मूल आपल्या समोर बसलेली आहेत हि अशा एका मोठ्या महत्वाच्या वेळी या देशात जन्माला आलेली आहेत जेव्हा ह्या देशामध्ये हे मोठं क्रांतीच कार्य होणार आहे , इथे मनुष्य आपल्या मानवी स्तितीतून उठून आत्मिक स्तीतीला आहे . परदेशामध्ये जी प्रगती झाली ती एखाद्या झाडाची प्रगती व्हावी बाह्यतः तशी झाली आहे . पण त्याची मूळ मात्र आपल्या देशात आहेत . हि मूळ आपल्याला आता सांभाळावी लागतील . ती जाणली पाहिजेत कि हि मूळ काय आहेत . जर आपण त्या मुळांकडे लक्ष दिल नाही तर परदेशातील जे झाड जे एव्हडं वाढलेलं दिसत आहे आणि ज्याच्या कडे आपली दृष्टी आहे ते सगळं उलथून पडेल . आणि त्याला कारणीभूत आपण होणार आहोत .
कारण आपल्या देशामध्ये परंपरागत संतांची सेवा ,संतसंगती ,सज्जन ,सन्मार्गाने जाणे ह्या सर्व गोष्टी लहानपणा पासून मुलांना शिकवण्यात येतात . तरी सुध्दा आज आपली जेव्हा सर्वांची दृष्टी पाश्चिमात्य देशांकडे वळलेली आहे तेव्हा आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे कि ह्यांनी हळूहळू देवाकडचं लक्ष दूर केलं आणि प्रगती करत गेले त्यामुळे आज जस एखाद झाड मुळांच्या कडे लक्ष ना देता भरमसाठ वाढत आणि सुकून जात तशीच ह्या देशाची स्तिती झालेली आहे . हि जी मंडळी आपल्या समोर बसलेली आहेत हि त्याच होरपळलेल्या स्तिती मध्ये त्या देशांमध्ये राहत होती . तेव्हा ज्यांना त्यांना कळलं कि अशी कुणी व्यक्ती आहे जी त्या पाळंमुळं असलेल्या देशांमधून आलेली आहे ,जिला त्या योगाबद्दल माहिती आहे आणि जी योगविद्या जाणते तेव्हा ते माझ्याकडे आले आणि आज तुमच्या देशामध्ये ते आलेले आहेत . भारताबद्दल यांना फारच आदर आहे . कारण आपला भारत देश हा खरोखर हा योगभूमी चा देश आहे . साऱ्या जगामध्ये असा देश कुठंही नाही . पृथ्वी मातेनी सुध्दा या देशावर फार उपकार केलेले आहेत . विशेषतः महाराष्ट्रात जी एक पुण्यभूमी मानतो , इथे नाथपंथीयांनी फार कार्य केलेलं आहे . आपल्याला माहित आहे विशेष करून या आपल्या जिल्ह्यात . नगर जिल्ह्यामध्ये सगळ्या नाथपंथीयांनी येऊन खूप मेहनत केलेली आहे . म्हणजे हे एक विशेष स्थान आहे . तर सगळ्यात शेवटचे नाथ आपण म्हणू ते साईनाथ ते जवळच शिर्डीला झाले . असे हे नाथपंथी लोक त्यांनी त्यांनी जी इथे मेहनत केली त्या शिवाय इथे श्री राम सुध्दा अनवाणी चालून आले . त्यांनी सुध्दा ह्या भूमीचा एव्हडा मान केलेला आहे ,हि एक पुण्य भूमी आहे आणि ह्या पुण्यभूमी मध्ये जे जन्माला येतात त्यांनी फार सुकृत केलं असेल . काहीतरी विशेष पुण्य केलं असेल म्हणून ते इथे जन्माला येतात . आणि त्यांनाच बघायला आणि भेटायला हे साधुसंत इतर देशातून आलेले आहेत . हे तुम्हाला भेटायला आले आहेत . तुम्हाला ओळखायला आले आहेत . आणि त्यांना आश्चर्य वाटत कि आपण लोक किती धार्मिक ,किती सोज्वळ .
आता जेव्हा नवीन प्रगतीकडे आपली द्रीष्टी जाते तेव्हा हे लक्षात ठेवलं पाहिजे कि आपलं लक्ष परमेश्वराकडे असलं पाहिजे . नामदेवांनी एक फार सुंदर कविता लिहिलेली आहे आणि ती कविता गुरुनानकांनी आपल्या ग्रंथसाहेब मध्ये घेतली . नानक पण फार मोठे गुरु होऊन गेले ,फार मोठे म्हणजे ते दत्तात्रयांचच अवतरण होत . त्यांनी नामदेवांचा फार मान केला आणि मराठी भाषेतच त्यांनी त्यांच्या सर्व कविता ग्रंथसाहेब मध्ये घेतलेल्या आहेत . त्यातलीच एक कविता त्याच्या मी अर्थ तुम्हाला सांगते ,फार सुंदर आहे तो मुलांनी पण ऐकावा . एक मुलगा पतंग उडवत आहे ती आकाशात भरारी मारते आहे ,भरारी हाच शब्द ग्रंथसाहेब मध्ये पण वापरला आहे अगदी मराठी तंतोतंत . आणि तो इतरांशी बोलतोय ,खेळतोय धावतो आहे इकडे तिकडे पण लक्ष त्याच सगळं त्या पतंगा कडे आहे . दुसऱ्या कवितेत त्यांनी असं म्हंटल आहे कि पुष्कळशा बायका आहेत आपल्या विहिरीवर गेल्या पाणी भरून घागरी एकावर एक ठेऊन येत आहेत . आणि भरभर चालल्या आहेत घरी काम आहेत त्यांना त्यावेळेला इतरांशी बोलतात हसतात पण लक्ष त्यांचं घागरी कडे सगळं . मग एका आईच वर्णन आहे लहान मुलाला कडेवर घेऊन ती घरातलं सगळं काम करते आहे . आणि काम करताना ती वाकते आहे ,तिला काहीतरी उचलावं लागत आहे ,सगळंच काम करती आहे ती पण लक्ष तीच सगळं आपल्या मुलाकडे कडेवर असत . तस जो पर्यंत आपलं देशाचं भवितव्य राहणार नाही ,जो पर्यंत आपलं लक्ष परमेश्वराकडे राहणार नाही तो पर्यंत आपल्याला कधीही मार्गदर्शन होणार नाही . मार्गदर्शन होण्यासाठी लक्ष परमेश्वराकडे असायला पाहिजे . हे लक्ष जरी आपण म्हंटलो कि आम्ही देवाकडे लावतो तरी त्याचा अर्थ काय हेही समजलं पाहिजे .
हिंदू धर्मात काय किंवा बुध्द धर्मात काय किंवा ख्रिश्चन धर्मात काय किंवा त्याच्याही पलीकडे तुम्ही जाऊन बघितलं तर आजकालचे जे अद्यावत असे आपण म्हणू शंकराचार्य झाले त्या सर्वानी एकच गोष्ट सांगितली आहे कि आपला आत्मबोध झाला पाहिजे ,आपला पुनर्जन्म झाला पाहिजे . ते झाल्या शिवाय हे आपल्याला समजायचं नाही . आता आपण रोज बघतो कि या पृथ्वी मातेत आपण जर बी पेरलं तर ते आपोआप उगवत . कस उगवत ते आपण सांगू शकत नाही . पण ते आपोआप उगवत . सहजच उगवत तसच आपण बघतो हि सृष्टी वारंवार जशे ऋतू येतात त्या प्रमाणे तिचा संबंध वेष बदलत जातो . पण आपण हे लक्षात घेत नाही कि हे होत कस ?. हि सृष्टी अशी बदलते कशी ?, ह्या फुलांपासून फळ कशी होतात ?, त्याला कारणीभूत काहीतरी अशी एक जिवंत शक्ती असली पाहिजे . आणि तीच शक्ती जी आहे ती आदिशक्तीची शक्ती आहे . आणि त्या शक्तींनी सर्व जिवंत कार्य होत असत . आज पर्यंत आपण एक लहानशा अमिबा पासून मानस झालो असं सायन्स म्हणत . पण तुम्ही कसे झालात ?झालात हे सांगणं हे सायन्स च काम आहे पण कस झालं ?याच उत्तर त्यांच्या जवळ नाही . त्याच उत्तर असं आहे कि आपल्यामध्ये हि धर्मशक्ती आहे ,प्रत्येक गोष्टींमध्ये त्याचा धर्म असतो . सोन्यामध्ये त्याचा धर्म आहे ,चांदी मध्ये त्याचा धर्म आहे . तसाच मनुषामध्ये हि त्याचा धर्म आहे आणि ते दहा धर्म आपल्यामध्ये बसलेले आहेत . जेव्हा माणूस ह्या दहा धर्माचं अवलंब करतो तेव्हा त्याच्यामध्ये संतुलन येत . ते संतुलन आल्यावर तरीसुद्धा लोक असा प्रश्न विचारटिलकी हे संतुलन का करायचं ?याचा काय उपयोग आहे . जर तुम्हाला उत्थान करायचं आहे ,जर तुम्हाला याच्यावर उड्डाण करायचं आहे ,जर तुम्हाला याच्या पेक्षा उच्च स्तीतीला जायचं आहे तर त्याच्यासाठी पहिल्यांदा संतुलन यायला पाहिजे . आणि ते संतुलन ह्या आपल्या शाळांमधून ,आपल्या गुरुवर्यांकडून होत . मला हे ऐकून फार आनंद झाला कि इथले संचालक ध्येयनिष्ठ आहेत . मोठं ध्येय ज्यांचं आहे असे लोक कधीही मुलांना सन्मार्गापासून विचलित होऊ देणार नाहीत .
मुलांनी हे समजून घेतलं पाहिजे कि आमचे जे गुरुजन आहेत ते आम्हाला जे शिकवतात ते आमच्या भल्यासाठी आणि हितासाठी . पुष्कळदा त्यांचं शिकवलेलं ,सांगितलेलं कडू लागत असेल पण अंतिम ते जाऊन तुम्हाला वाटेल कि त्या वेळेला मला माझ्या गुरूंनी सांगितलं ते बर झालं नाहीतर मी आता कसा असतो बर ?असा विचार मनात नंतर येऊन तुम्हाला वाटेल कि बर झालं सांगितलं त्यांनी . आणि त्या गुरुची नेहमी तुम्ही स्तुती कराल . माझ्या यजमानांच मी सांगते त्यांचं अक्षर फार खराब होत आणि त्यांच्या गुरूंनी त्यांना सांगितलं कि तुमचं अक्षर फार खराब आहे ,तसे तुम्ही फार हुशार आहात पण तुमचं अक्षर खराब आहे . मग यांनी त्यांना विचारलं कि मी अक्षर कस ठीक करून घेऊ ?मग त्याचे गुरु म्हणाले मी काही लिहून ठेवलं आहे तू त्याची कॉपी कर फक्त . तर हे ते आपल्या बरोबर घेऊन गेले आणि त्यांनी त्याची कॉपी करायला लागले . ते कॉपी करताना त्यांनी पाहिलं कि त्यांचे गुरु म्हणजे किती विद्वान आहेत . त्यांनी जे काय लिहिलं होत ते किती मोठं होत ते वाचून त्यांना आश्चर्य वाटलं . आणि त्याच्या मनात आलं कि माझ्या डोक्यात हे कधी विचार येणार ,किती उच्च विचार आहेत . आणि त्या नंतर त्यांनी इतका अभ्यास केला ,विचार केला आणि त्यांचं अक्षर आता अगदी मोत्या सारखं आहे . पण त्या शिवाय त्यांच्या मध्ये एक त्यांचा बुध्दीला एक नवीन प्रेरणा मिळाली त्या मुळे त्यांचं जीवन फार सुधारलं आणि ते कुठल्या कुठे पोहोचले . अशी हि जी गुरूंची तुमच्या समोर ,ध्येयनिष्ठ गुरूंची तुमच्या समोर प्रतिमा आहे हीच खरोखर असं समजलं पाहिजे कि देवीची प्रतिमा आहे .
हि शक्ती आहे . आणि हि शक्ती तुम्ही स्वीकारावी आणि प्रेमाने आपल्यामध्ये घ्यावी ,हे संतुलन तुमच्यामध्ये आलं म्हणजे आत्मबोध तुम्हाला होईल त्याचा सुद्धा फायदा होऊ शकतो . आत्मबोध हा झालाच पाहिजे . आजच्या आधुनिक काळात आत्मबोध होणार नाही तर कधी होणार ,हि वेळच अशी आलेली आहे कि ह्यावेळेला आत्मबोध हा झालाच पाहिजे . म्हणजे पूर्वी समजा एखाद्या झाडाला दोनचार च फुल येत असतील ,जनक राजाच्या वेळेला एकाच नचिकेतला आत्मबोध झाला होता . पण आता तशी वेळ नाही आता मी याला असं म्हणते कि या वेळेला बहरलंय सगळी कडे . इंग्लिश मध्ये ब्लॉसम टाइम आलेला आहे . आणि ह्या वेळेला अनेक फुलांची फळ होणार आहेत , हि वेळ आलेली आहे ,हवा आलेली आहे . आणि ते सर्वानी करून घेतलं पाहिजे आणि ते झालं पाहिजे . हे आमचं कार्य आहे आत्मबोध देण्याचं ते देणं काय म्हणायचं जे तुमचं आहे ,तुमच्या जवळच आहे ,तुझं आहे तुझं पाशी . ते फक्त मी तुम्हाला द्यायला आले आहे . त्या पलीकडे आमचं काही देणंघेणं लागत नाही ,एक पेटलेला दिवा जर दुसऱ्या दिव्याला पेटवतो तर त्यांनी काही विशेष कार्य केलं अशातली गोष्ट नाही . हि अगदी सोपी गोष्ट आहे ,ते घडण अगदी सोपं आहे ,तुम्ही अगदी तयार आहात . ज्या भूमीवर तुम्ही बसला आहात ती भूमी साक्षात पुण्यवान असल्यामुळे तुम्ही यज्ञ भूमीवरच बसलेले आहात तेव्हा हे कार्य अत्यंत सोपं आहे आणि क्षणात होण्यासारखं आहे . पण त्याच्या नंतरच मग थोडी मेहनत करावी लागते कि हे जे अंकुरलेलं आपल्या मध्ये बी आहे ते जरा जपावं लागत .
याचे अनेक फायदे आहेत ,म्हणजे जी आपल्या मध्ये शक्ती कार्यान्वित आहे ज्याच्या मुळे आपले प्राण चालतात ,प्राणशक्ती असं म्हणू ती शक्ती ,नंतर ज्याला मन असे आपण म्हणू ज्याच्या मुले आपल्या मध्ये भावना आहेत ,ते मन त्याची जी मनशक्ती आहे ती त्यात धर्मशक्ती ह्या तिन्ही शक्त्या मिळून जी एक शक्ती झालेली आहे ती चैतन्यशक्ती हि चैतन्यशक्ती तुमच्या आतून वाहू लागते . ती तुमच्या मध्ये आत्म्याच जागरण झाल्या बरोबर तुमच्या हातातून म्हणजे जस काही तुमच्या नसानसातून वाहू लागत आणि हीच आपल्या उत्क्रांतीची पहिली ओळख आहे . माणूस किती म्हणाला कि मी मोठा माणूस आहे किंवा मी साधुसंत आहे किंवा असा म्हणाला कि मी अत्यंत उच्च प्रतीचा आहे तरी सुध्दा आत्मबोध झाला कि नाही हि गोष्ट पहिल्यांदा पहिली पाहिजे . जर आत्मबोध झाला तर अशा माणसाच्या नसानसातून ते चैतन्य वाहू लागत . आणि जेव्हा ते चैतन्य तुमच्यातून वाहू लागेल तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल कि ह्या चैतन्या मुळे तुम्ही स्वतःचा किती लाभ करू शकता . तुमची मानसिक ,आर्थिक ,बौध्दिक परिस्थिती एकदम ठीक होते . आमच्याकडे अशी पुष्कळ मुल अली कि ज्यांना मास्तरांनी सांगितलं कि अगदी ढ आहेतं त्यांना वर्गातून काढून टाकायचं आहे . बुध्दिच चालत नव्हती त्यांची . आणि आता हे क्रय लागल्यावर ते पहिल्या नम्बरानी ते पास झाले . आणि आता त्यातला एक मुलगा तीन हजार रुपयांवर नोकरीला आहे . आणि त्याच्या आईवडिलानी सांगितलं कि ह्याला तर आम्ही असाच सोडून टाकणार होतो ,काही कामाचा नाही ,काही शिकत नाही . तर ह्याच्या मध्ये तीन शक्त्या ज्याला सहजयोगात आम्ही महाकाली ,महालक्षीमी ,आणि महा सरस्वती अशा तीन शक्त्या म्हणतो ती एक आदिशक्तीची जी शक्ती तुमच्या मधून वाहू लागली म्हणजे तुम्ही अशी कार्य करून दाखवू शकता कि लोकांना वाटेल हे कस काय घडलं . आता हे कस घडत ते समजून घेतलं पाहिजे . .हे अगदी सोपं काम आहे . समजायला लहान मुलांना पण कठीण जाणार नाही . एखादी गोष्ट घडली म्हणजे हा परिणाम कोणच्या तरी कारणामुळे होतो . समजा जर गाडीचा ब्रेक खराब झाला तर गाडी थांबते . म्हणजे एक कारण झालं एक त्याचा परिणाम झाला . ह्या कारण आणि परिणामाशी झगडून काहीही लाभ होत नाही . तर त्या कारणाच्या पलीकडे गेलं पाहिजे म्हणजे जो ब्रेकचा कंट्रोल आहे त्याचा पलीकडे जर तुम्ही गेलात तर ब्रेकही ठीक होणार आणि त्यांचा परिणामही ठीक होणार . तर त्या प्रमाणे आपल्या मध्ये सुध्दा हि जी शक्ती आहे हि कारणाच्या पलीकडे आहे . जर ह्या शक्तीला तुम्ही शरणागत गेले किंवा ह्या शक्तीला तुम्ही पूर्णपणे वाव दिला आणि त्यांनी तुम्ही पूर्णपणे समर्थ झालात तर मग तुम्ही कारणांच्या पलीकडे जाता . आणि मग अचाट काम होत . साईनाथांनी अनेक रोग्यांना बर केलं हि गोष्ट खरी आहे तशीच आम्हीही अनेक रोगांना बर केलं आहे . सहजयोग्यानी बर केलंय पण ते काय आम्ही बर केलेलं नाही हि शक्ती ज वाहते ती आपोआपच लोकांना ठीक करते . कितीतरी काम यांनी अगदी सहज होऊ शकतात . तेव्हा हि शक्ती प्राप्त झाली पाहिजे अशी देवाचीच इच्छा आहे . त्याच्या साम्राज्यात तुम्ही यावं हि देवाचीच इच्छा आहे . तो आतुर आहे कि हि माझी मुलं ज्यांना मी जन्माला घातलं आता ह्या स्तीतीला आलेले आहेत आणि आता याना माझ्या साम्राज्यात आलं पाहिजे आणि त्यांचं जे काही आहे ते त्यांना मी दिल पाहिजे . जस एखादा बाप मुलांसाठी सगळं कमवतो त्यांना शिकवतो ,मोठा झाला म्हणजे त्या मुलाला आपलं सर्व काही दयायला तो आतुर असतो तसाच हा परमेश्वर तुम्हाला सगळं काही द्यायला आतुर आहे . तो दयेचा सागर आहे ,आनंदाचा ,प्रेमाचा सागर आहे आणि सगळ्यात मुख्य म्हणजे क्षमेचा सागर आहे . तुमचं काही चुकलं तुम्ही काही वाईट वागले वगैरे त्याच्या काही लक्षात रहात नाही . तुम्ही त्याची मूल आहात तुम्हाला हे दान दिल पाहिजे ,पसायदान दिल पाहिजे याच्या पलीकडे परमेश्वर काहीही विचार करत नाही . तेव्हा ह्या परमेश्वराच्या दरबारात तुम्ही सर्वानी यावं आणि स्वतःला प्राप्त व्हावं . स्व च तंत्र जाणून घ्यावं ,जे शिवाजी महाराजांनी सांगितलं होत कारण शिवाजी महाराज स्वतः आत्मसाक्षात्कारी होते . नसते तर त्यांनी रामदास स्वामींना ओळखलं नसत . रामदास स्वामी सुध्दा हनुमानाचा अवतार होते . आता हि अवतरण कोण होती काय होती ?कशी होती ?ते समजण्यासाठी सखोल व्हायला पाहिजे . आधी जो पर्यंत तुम्हाला आत्मबोध होत नाही तो पर्यंत तुम्हाला असं वाटेल कि माताजी हे सांगतात ते खरं आहे कि नाही .
आता परमेश्वराला सिध्द करण्याची वेळ अली आहे . परमेश्वर हा सिध्द झाला पाहिजे . जर तो सिध्द झाला नाही तर आपली मूल सुध्दा उद्या परमेश्वराला विसरतील . त्याला सिध्द करण्याची वेळ अली आहे आणि ते सिध्द करून दाखवणं फार सोपं काम आहे . परमेश्वरी कृपेने हे कार्य इतक्या जोरात होईल असं मला वाटत नव्हतं . आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर होईल अशी वाटत नव्हतं . म्हणजे सहा सहा हजार जरी मानस अली प्रोग्रॅमला तरी ते सगळेच्या सगळे पार होतात हे बघून आश्चर्य वाटत . विशेष करून महाराष्ट्रात आणि त्यातही करून तुमच्या नगर जिल्ह्यात ,कदाचित नगर जिल्हा फार च पवित्र जिल्हा असेल असं मला वाटत . कारण या जिल्यामध्ये मच्छिन्द्रनाथ ,गोरखनाथ नंतर साईनाथ ह्या सर्व लोकांनी एव्हडी मेहनत केली त्या शिवाय जवळच पंचवटी आहे ,इथे अनेक अशी देवळ आहेत . मला पाहून आश्चर्य वाटत कि अगदी जागृत देवळ आहेत . त्या देवळातून इतकी थंड थंड गारगार अशी वाऱ्याची झुळूक येत असते म्हणजे मला आश्चर्य वाटलं कि हे सर्व पृथ्वी तत्वांनी इथे करून ठेवलं आहे हि केव्हडी मोठी पृथ्वी आहे . आता आपण म्हंटल कि इथे भूमीच पूजन करायचं हि भूमी म्हणजे आईच आहे आमची . तीच पूजन कितीदा केलं तरी कमीच होईल . पण त्या ठिकाणी मी आपल्याला सांगते कि मी कुदळ मारल्या बरोबर आतून इतकं चैतन्य निघालं म्हणजे हि सगळी पुण्यभूमी तुम्हाला मिळालेली आहे . इथे तुम्ही पुण्यकर्म करत आहात . आणि त्यातून तुम्ही हे पुण्यवान आत्मे तुम्ही तयार करा म्हणजे ह्या देशाचं जेव्हड काही आहे ,जेव्हड दुःख ,दारिद्रय जे आहे ते नष्ट पावेल . परमेश्वर आपल्या सर्वाना अनंत आशीर्वाद देवो ,अनंत आशीर्वाद आपल्या सर्वाना मिळो हीच माझी विनंती आहे .
आता सगळ्यांनी आत्मबोधाचा प्रयोग करूयात . आता डावा हात माझ्याकडे करायचा ,ती आपली इच्छाशक्ती आहे . मांडीवर व्यवस्तिथ ठेऊन सहज आरामात बसायचं . पाठ सरळ ठेवायची . आणि उजवा हात जमिनीवर ठेवायचा . हि आपली पुण्यभूमी जी आहे तिला नमस्कार करून हा हात असा जमिनीवर ठेवायचा . जे लोक खुर्चीवर बसले आहेत त्यांनी डावा हात माझ्याकडे करायचा आणि उजवा हात असा जमिनीकडे करायचा . आणि दोन्ही पाय जमिनीवर असे रोवून ठेवायचे . वेगळे करून . आता डोळे मिटा डोळे उघडायचे नाहीत . आता शांतपणाने बघा डाव्या हातातून अशा काहीतरी थंडथंङ लहरी येत आहेत ,त्याच वर्णन शंकराचार्यांनी करून ठेवलं आहे सलीलामसलीलाम . थंडथंङ अशा चैतन्याच्या लहरी येतात . आता हि सूक्ष्मा मध्ये सगळीकडे शक्ती पसरलेली आहे . ती पहिल्यांदा आपल्याला डाव्या हातावर लागेल . लक्ष सगळं टाळूकडे ठेवायचं . गणेशाचं स्मरण करून बसायचं . येतंय का . मनामध्ये एकच इच्छा ठेवायची कि मला आत्मबोध झाला पाहिजे . आता उजवा हात माझ्याकडे करा . आता उजव्या हातात येतंय का बघा . डोळे बंद ठेवा . आता हळूहळू डोळे उघडा पण विचार करायचा नाही . माझ्याकडे बघा . आता उजवा हात असा टाळूवर धरायचा आणि येतंय का गार बघायचं ,आता डावा हात धरून बघा येतंय का .दोन्ही हाताला जाणवतंय का बघा . आता दोन्ही हात वर करून आकाशाकडे विचारायचं हीच परमेश्वराची प्रेमशक्ती आहे का ? हीच ब्राम्हशक्ती आहे का ?. हिनेच सगळी जिवंत कार्य होतात का ? हाताला आता गार वाटेल बघा . हात खाली करा आणि बघा हातावर जाणवतंय का . आता हे कार्य असं झालं कि तुमच्यामध्ये कुंडलिनी म्हणून शक्ती आहे ती जागृत झाली आणि ती सहा चक्रांना भेदून इथं जे ब्रम्हरंध्र आहे ते भेदून ती बाहेर पडली आणि तिने तुमचा पुनर्जन्म केला आहे . आता कोणाचाही विचार करायचा नाही . हि निर्विचार समाधीची स्तिती इतक्या लवकर झाली ,त्याला कारण मी नाही तुम्ही आहात कारण तुम्ही जन्मजन्मांतराच जे सुकृत केलेलं आहे ते आज तुम्हाला मिळालेलं आहे . तुम्ही विशेष लोक आहात म्हणून इतक्या लवकर मिळालं . परदेशात तर मला हात तोडावे लागतात ,तासंतास महिना महिना मेहनत करावी लागते पण तुमच्या साठी काही मेहनत करावी लागत नाही . सहजच घडतंय एकदम . सुपीक जागा आहे ना . येतंय आता गारगार ,येतंय ना . लक्ष टाळू कडे ठेवा . आता असा प्रश्न विचारा आपलं स्थान आमच्या टाळूमधे आहे का ?,याला सहस्रार ,ब्रम्हरंध्र असं म्हणतात . हे जे स्थान आहे तिथे हृदयाचं पण स्थान आहे ,तेव्हा अजून एक मागायचं माताजी तुम्ही आमच्या हृदयात या . हीच अनन्य भक्ती आहे . जिथे आपण सगळे एक झालो ,कृष्णाने याचंच वर्णन केलं आहे . एकदम शांत वाटलं ना . आता डोळे हळू हळू उघडा .
आपण सगळ्यांनी मला इतक्या प्रेमानी बोलावलं त्याचा मला इतका आनंद झालेला आहे कि मी कुणाकुणाला धन्यवाद देऊ तेच समजत नाही आहे . परत पुढल्या वर्षी आले तर अवश्य येईन . तो पर्यंत आपल्या बिल्डिंग ची इमारत बांधून तयार होईल अशी मला आशा आहे . नमस्कार सगळ्यांना .