Public Program

Public Program 2000-03-07

Location
Talk duration
47'
Category
Public Program
Spoken Language
Hindi, Marathi

Current language: Marathi, list all talks in: Marathi

The post is also available in: English, Hindi.

7 मार्च 2000

Public Program

Pune (India)

Talk Language: Hindi, Marathi | Transcript (Marathi) - VERIFIED

Public Program, Pune, India 7 th March 2000

हिंदी भाषण

आता मराठीत बोलते, कारण अजूनही आपण हिंदी भाषा काही आकलन केलेली नाही. ती करायला पाहिजे. ती आपली राष्ट्रभाषा आहे. ती भाषा अवश्य यायला पाहिजे. साऊथ इंडिया मध्ये सुद्धा लोकांना ती भाषा आली पण महाराष्ट्रात काही येत नाही. मोठ्या आश्चर्याची गोष्ट आहे. दुसरं असं आहे मराठी भाषेसारखी भाषा नाही हे मला कबुल आहे. फारच उत्तम भाषा आहे. त्या बद्दल शंका नाही. पण जी आपली राष्ट्रभाषा आहे त्याच्याशी जर आपण संबंधित झालो तर राष्ट्रभाषेबरोबर आपलीही भाषा वाढेल. आणि लोक समजतील की मराठी भाषा काय आहे. पण जर आपण त्याच्या बरोबर सोवळं पाळलं आणि फक्त आम्ही मराठी शिकणार; मग या देशाचे आपण एक नागरिक आहात, त्यातली जी राष्ट्रभाषा आहे तिला आत्मसात केलं पाहिजे. अहो आम्ही काय मराठी भाषेतच शिकलो, मराठी शाळेत शिकलो आणि मराठी मिडीयम मध्ये शिकलो. पण आमचे वडील मोठे भारी देशभक्त होते. त्यांनी सांगितलं, काही नाही, हिंदी आलीच पाहिजे. आणि मलाही व्यासंगच फार होताना, तेंव्हा आमच्या घरी सगळ्यांना हिंदी आणि मराठी दोन्ही भाषा येतात. तेंव्हा आपल्याकडे सुद्धा एक असं व्रत करावं की आम्ही हिंदी भाषा ही शिकून घेऊ. हि माझी विनंती आहे. आज आपल्या देशाचे अनेक तुकडे झालेले पाहून फार दुःख वाटतं. आणि विशेषतः महाराष्ट्रात, ती देशभक्ती नाही; जशी पाहिजे. आश्चर्याची गोष्ट आहे. शिवाजी महाराजांसारखे झाले जिथे थोर पुरुष तिथे ती देशभक्ती नाही. पैशाकडे लक्ष, कसेही करून पैशाकडे लक्ष घालायचं. पैशाने सुखी झालेला मनुष्य मी आज तरी पाहिलेला नाही. पैसे आले म्हणजे मग सगळे प्रकार सुरू. दारू प्या मग आणखीन करा, हे करा, जेवढे पैसेवाले लोकं आहेत त्यातला एखादाच मी दानवीर पहिला. बाकी सगळे दारुडे, नाहीतर आणखीन काय काय करतात ते करतात. लक्ष्मी ही चंचल असते तिला स्थिरावण्यासाठी तुमच्यामध्ये संतुलन यायला पाहिजे. ते संतुलन जो पर्यंत येणार नाही तोपर्यंत तुम्हाला कितीही पैसे आले आणि काहीही तुम्ही मिळवलं आणि कोणत्याही सत्यावर गेलात तरी तुमच्या मध्ये आनंद येऊ शकणार नाही.

आनंद याची परिभाषा करता येत नाही कारण आनंद याला उपमाच नाही. आनंदात सुख आणि दुःख अशा दोन बाजू नसतात. निव्वळ आनंद, केवळ आनंद आणि जे ज्ञानेश्वरांनी सांगितलं होतं कि सोनियाचा दिन आहे, ते आलेलं आहे, ते घडलेलं आहे. फक्त ते जाणलं पाहिजे आणि मिळवलं पाहिजे. पण तुम्ही सुक्ष्मातच नाही. तुमचं लक्ष सुक्ष्मात नाही आहे. मग करायच कसं काय? तुम्हाला आश्चर्य वाटेल या महाराष्ट्रात अनेक साधूसंत झाले आणि कार्य करून गेले; त्यांनी आपले इथे प्राण सोडले. रक्त सांडलं. इतकं काही उत्तर हिंदुस्थानात झालेलं नाही. पण अहो आमचा सहजयोग तिथे असा पसरलेला आहे, घरोघर दारोदार सगळे, म्हटलं हे आले, ही कुणाची कृपा आहे. एव्हढे आम्हंचे साधूसंत; त्यांनाही छळलच म्हणा, त्यांचीही काय विशेष आवभगत केलेली नाही. त्यांनाही छळून काढलं आणि आता असं वाटतं की त्यांचं एवढं कार्य गेलं कुठे?

आता ही गोष्ट समजून घेण्यासारखी आहे की काय आपल्यामध्ये असे दोष आहेत? मुख्य म्हणजे कर्मकांडी लोक. खंडीभर देव ठेवायचे घरात. सकाळी चार वाजेपासून आंघोळ करायची, कारण सहाला स्वयंपाक करायचा असतो. तर चार वाजता उठून देव देव करत बसायचं. खंडीभर देव, आमच्या सहजयोग्यांच्या घरातनं निघाले मला माहित आहे. ते खंडीभर देव पूजत बसा, मग या देवळात जा आणि त्या देवळात जा आणि त्या देवळात जा. आता हे देवळातलं खरं काय आहे किंवा कोणचं देऊळ खरं आहे? कोणचं दैवत खरंच जागृत आहे? हे तरी तुम्ही कसं ओळखणार? कोणी म्हटलं कि निघाले. मी बघते ना रांगेच्या रांगेत लोक चाललेत. आता आळंदीला सुद्धा मी एकदा पाहिलं कि सबंध ही कुंडी डोक्यावर ठेऊन बायका निघाल्या आळंदीला. एक बाई तर बेशुद्धही झाली, हे काय आहे? हा सगळा वेडेपणा कशाला? नाहीतर टाळ कुटत चाललेत तिकडे पंढरीला, त्याचं काय होणार आहे? अहो पंढरीच्या माणसांना बघाव, काय मिळालं त्यांना? हि पद्धत घातली कुणी? त्यांना काही मिळालेलं आहे का? काही लाभलय का? त्यांचं बघायला पाहिजे ना? नुसता कसातरी वेळ घालवायचा. मग ज्ञानेशांची पालखी काढली. अहो ज्यांच्या पायात चपला नव्हत्या म्हणजे आपण विसरलो तरी कसं? त्यांची पालखी काढली आणि घरोघर जाऊन जेवायचं. प्रत्येक, प्रत्येक गावात जाऊन जेवायचं. म्हणजे पालखी काढली ना आम्ही, त्याच्यात कसल्यातरी पादुका ठेवल्या; झालं आम्हाला अधिकार आहे, कोणच्याही गावात गेले कि आम्हाला वाढा जेवायला. मुलांना हसायला येतं पण असं करणारे पुष्कळ लोक आहेत. हे सगळं सोडा आता मेहरबानी करून.

मी तेवढ्यासाठी तुमच्या पुण्यात आले. एक गृहस्थ मला म्हणाले माताजी तुम्ही पुण्यात कशाला आला? मी म्हटलं अहो हे पुण्य पठणम लिहिलेलं आहे. म्हणून मी आले इथे. दुसरं काही नातं नाही माझं, पुंण्याचं नातं. ते म्हणाले वाह रे वाह, तुम्हाला माहित नाही का? भामटा शब्द हा फक्त पुणेकरांना लागतो. आं... मी तर चक्कच पडले. भामटा म्हटलं कि तो पुणेकरच असला पाहिजे. अरे हा काय प्रकार? अहो माताजी तुम्ही बघा हे प्रसिद्ध आहे. मी तर अगदी चक्क पडले अहो अशी प्रसिद्धी कशी झाली या पुण्यं पठणमची? सगळं शहाणपण कुठे गेलं? आणि इथली सात्विकता कुठे गेली? पुण्याई सात्विकतेशिवाय मिळत नाही.

तेंव्हा आता लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही इथल्या महाराष्ट्राला खरोखर महाराष्ट्र जर करायचा असला तर कुंडलिनी जागरणाला तयार व्हावं. स्वतःचं करूनच घ्यायचं पण इतरांचं करायचं. सगळ्या महाराष्ट्रात मी वीस वर्षं झगडत होते. खेडेगावात जा, कुठे जा, अहो कुणाच्या डोक्यातच घुसत नव्हतं. आता कुणी आणलंय मला एक रुपया दिला. कुणी सांगितलं माताजी एक रुपया घेत नाहीत. बरं दहा रुपये देऊ का? म्हणजे काहीतरी दुसरंच घुसलेलं आहे डोक्यात. ते आधी काढायला पाहिजे. ते काढल्यावर मग आपल्या लक्षात येईल की अजून आम्ही काही मिळवलेलं नाही. आम्हाला काय मिळवायचंय? "आत्मसाक्षात्कार” आणि त्याची अनुभूती मिळाली पाहिजे. उगीचच कुणी म्हटलं मी देतो आत्मसाक्षात्कार, होऊ शकत नाही. त्याची अनुभूती आहे. आदिशंकराचार्यांनी वर्णन केलंय आणि त्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं कि तुमच्या मध्ये हे स्पंद व्हायला पाहिजे. स्पंद शब्द वापरला. ज्याला आम्ही इंग्लिश मध्ये व्हायब्रेशन्स म्हणतो. ते स्पंद यायला पाहिजेत; त्या स्पंदावर तुम्हाला कळलं पाहिजे तुमची कोणची चक्र धरलेली आहेत आणि दुसऱ्याची चक्र कोणची धरलेली आहेत आणि तुम्ही ती चक्र ठीक करू शकला पाहिजे.

आता ते सांगून गेले त्याला बरीच वर्ष झाली. ते सगळं काहीतरी बंद करून ठेवलेलं आहे. नुसती त्याची पारायणं करत बसा म्हणजे झालं. पारायणं केलं म्हणजे... दुसरे आपल्याकडे लोक आहेत त्यांचं काय म्हणावं साम्यवादी का काहीतरी बुद्धिवादी वगैरे काहीतरी वादी आहेत. त्यांच्यात तर सुक्ष्मता येणं शक्यच नाही. कारण बुद्धी सारखी चक्रातच फिरते. त्यांच्या पलिकडे जायला सांगितलं आहे. आइन्स्टीनने सांगितलं, पुष्कळांनी सांगितलं, हयूम म्हणून होता एक, आणि बाहेर सुद्धा, कि ह्या बुद्धीच्या पलिकडे गेल्याशिवाय तुम्हाला सत्य मिळणारच नाही. बुद्धीने मिळणार नाही. आता मी कितीही लेक्चर दिलं तरी तुमची जागृती होईल असं सांगता येत नाही. ती जागृतीच झाली पाहिजे. तेच घटित झालं पाहिजे. तेव्हाच तुम्ही आत्मसाक्षात्कारी व्हाल.

एक गृहस्थांनी मला म्हटलं मी आपल्याला एक लाख रुपये देतो माझी कुंडलिनी जागृत करून द्या. अहो म्हटलं दोन लाख दिले तरी नाही होणार. तिला काय समजतं, एक लाख कि दोन लाख. तिला फक्त हे समजतं की तुमची शुद्ध इच्छा काय आहे? कारण कुंडलिनी ही शुद्ध इच्छा आहे. तुमची शुद्धच इच्छा जर तुम्हाला केवळ सत्य मिळवायचं असलं तरच ती जागृत होते.

पण आजकल तर तऱ्हेचे लोक बोलतात. परवा एका साधू बाबाचं मी भाषण ऐकलं. तर मला मोठं आश्चर्य वाटलं, हे कसे लोकांना आकलन करतात? कसे लोकांना समजतात? तर त्यांनी स्पष्ट सांगितलं कि तुम्ही निवृत्तीमार्गी नाही आहात. नाही, तुम्ही प्रवृत्तीमार्गी आहात. म्हणजे शिवीच आहे की नाही ती. तुम्ही प्रवृत्तीमार्गी म्हणजे प्रत्येक ह्याच्या मागे धावत असतात तुम्ही. तुम्ही प्रवृत्ती मार्गी. तर तुम्ही ज्ञानमार्ग घ्यायचा नाही. सहजयोग हा ज्ञानमार्ग आहे. तो घ्यायचा नाही. तो कृष्णानी उत्कृष्ट असं सांगितलं आहे; की ज्ञानमार्ग घ्या. तर ज्ञानमार्ग घायचा नाही; मग? तुम्ही आमच्या सेवेत राहा. गुरूंची सेवा करा. व्यवस्थीत त्यांना भरपूर सगळं काही करा. म्हणजे तुमची कमीत कमी तुम्ही पुढल्या जन्मी निवृत्ती मार्गी व्हाल. पण महाराष्ट्रीयन त्याची जी अस्मिता आहे महाराष्ट्राची, ती निवृत्ती मार्गी आहे, काही म्हणा. लहानपणापासून रामदासांचे श्लोक म्हणता तुम्ही. सर्व संतांचे तुम्ही वाचन करता. आणि तुम्ही कसे निवृत्ती मार्गी व्हाल हो?..ना ... तुम्ही कसे, हे म्हणजे .... निवृत्ती मार्गी व्हायलाच पाहिजे. कारण सगळं निवृत्तीचं आहे. कोण म्हणतं, तुम्ही नाही होत निवृत्ती मार्गी? प्रवृत्तीत तुम्ही फसायचं हे चुकीचं आहे. हे काय बरोबर नाही. हे तुम्हाला माहिती आहे. कारण ज्या देशात तुमचा जन्म झाला, हा महाराष्ट्र आहे. तेंव्हा त्याची लाज राखा. कसंही मुर्खा सारखं वागून तुम्ही जरी दिल्लीला गेलात किंवा कुठेही गेलात तरी काय मिळवलात तुम्ही? उद्या लोक थुंकणार नाहीत तुमच्यावर अशी स्थिती असते. तेंव्हा लक्षात घ्या तुम्ही या महाराष्ट्राचे आहात आणि महाराष्ट्रात मनुष्य कसा? माझ्या मते, तर निवृत्ती मार्गी, निवृत्ती मार्गी, पण त्यालाही फाटे फुटले. फाटे फुटले म्हणजे बसले तासनतास, उपासात बसले, तर कुणी बसले भजनातच बसले. तर कुणी त्याच्यातच बसले. हे नाही तर आज हि वेळ आलेली आहे. सर्व अशा लोकांना जागृती हि मिळणारच. जर तुमची शुद्ध इच्छा असली तर ही तुम्हाला जागृती मिळेल. त्याच्यात मुळीच कमी पडणार नाही. पण ते वाढवलं पाहिजे. ते दुसऱ्यांना दिलं पाहिजे. इथे सुद्धा इतके सहजयोगी बसलेत मला माहिती आहेत. पण तुम्ही प्रत्येकाने जर शंभर, शंभर माणसं ठीक केली तर गावोगाव हे लोण पसरेल.

बरं ह्याची गरज काय? गरज अशी आहे. की माणसाचे जे सूक्ष्म असे धागेदोरे आहेत ते बांधलेले आहेत. सगळे हे षडरिपू आहेत ना, त्यांनी बांधून ठेवले आहे. त्यातनं सुटका करण्याचा हाच एक मार्ग आहे कि तुम्ही आत्म्याला प्राप्त व्हा. नाहीतर ह्या लहान लहान गोष्टी सुद्धा तुम्हाला पतनाकडे घेऊन जाणार. आम्ही काहिही तुम्हाला म्हणणार नाही हे करू नका कि ते करू नका. काहिही म्हणणार नाही. खुशाल करा. पण पार झाल्यावर तुम्ही स्वतःच करणार नाही. कारण स्वतःच तुम्ही आत्मा आहात. ज्याच्या प्रकाशात तुम्ही कसे कराल. तुम्हाला स्वतःलाच कळेल हे चुकीचे आहे. करायचं नाही. कशाचाही बंध तुमच्यावर नाही. फक्त इथे या. जागृती घ्या मग बोला मला. लोकांच्या दारू सुटल्या, हे सुटले, ते सुटले. आणि चांगली मुलं झाली, सत्कर्माला लागली. त्यांच्या वाईट सवयी सुटल्या. आता पुण्याला म्हणे फारच अनैतीकता आलीय, ती सगळी समूळ नष्ट होईल. तुम्ही सहजयोगाला सुरुवात करा. कोणच्याही स्थितीत असलात तुम्ही. काहीही असलं तरी सहजयोग हा पसरवला पाहिजे. मी आज इतक्या वर्षा पासून पुण्यात भाषण देत आहे. वाढलाय. असं नाही मी म्हणत, सहजयोग. पण खेडोपाडी गेला पाहिजे. अहो हा महाराष्ट्र आहे. संबंध हिंदुस्थानात महाराष्ट्रासारखा देश नाही. पण आता मात्र हे म्हणता येणार नाही. प्रत्येक ह्याला संतुलनात घातलं. तर आश्चर्य वाटतं, आम्ही लहानपणी गाणं म्हणायचो प्रिय आमुचा महाराष्ट्र देश हा आणि त्यात त्याचेच वर्णन होते. ते कुठे गेले माहित नाही. काहीतरी दुसरीच जमीन दिसते.

तेंव्हा आपल्याला परत कळकळीची हीच विनंती आहे की आज जागृती घ्या तुम्ही. तुम्हाला सगळं काही माहिती आहे सहजयोगा बद्दल. काही सांगायला नको की कुंडलिनीचं जागरण होतं त्यांनी तुमची चक्र स्वच्छ होतात. त्यानी तुमच्या हातामध्ये स्पंद येतात, त्यानी तुम्हाला एक नवीन स्थिती स्थापन होते. आणि ती स्थिती मी म्हणते कि सहजावस्था. तुम्ही सहजावस्थेत येता, बस मजेत येता. हे व्हायला हवे. मग बघा. मग त्याच्या नंतर तुमची किती प्रगती होते? काय काय तुम्हाला मिळतं? काय काय लाभ मिळतो? ते बघा. पण सहजात यायलाच तयार नाहीत. बुद्धीवाद्यांचे तर सोडूनच द्या. ते आपल्या बुद्धी सहित राहू देत त्यांना. त्यांच्याशी कुणी वाद घालायचा. अहो एवढं ज्ञानेश्वरांनी एवढं ह्यांनी लिहिलंय, “अमृतानुभव” , ते तर वाचून बघा म्हणा निदान. अहो बुद्धी कसली ही, अहो बुद्धी ठीक असती तर आज अशी दशा झाली असती का आपल्या देशाची. तेंव्हा ह्या बुद्धीला खरोखर चमत्कारपूर्ण करायचं असलं ह्याच्यात हि चमक जर यायची असली तर आत्म्याचा प्रकाश ह्या बुद्धीवर पडला पाहिजे. आणि तुमच्यात सगळं आहे. म्हणजे एखादं मशीन आहे आता ज्याच्यात सगळं व्यवस्थित लावलेलं आहे. सगळं काही केलेलं आहे. आणि ते एकदा चालू तूम्ही केलं तर ते कार्यान्वीत होईल ना. पण तुम्ही जर आपलं मशीन आहे चालूच करायला तयार नाही तर मग काय म्हणायचे? रात्रंदिवस रडगाणं. कोणचा पेपर वाचावासा वाटत नाही. रात्रंदिवस हीच तुमची सारखी गाऱ्हाणी. आणि आता एकदा पार झाल्यावर बघू काय होते? मग बोला. मग पैलतिरी उभे राहून तुम्ही काय म्हणणार. पण जे बुडताहेत त्यांना वाचवलं पाहिजे कि नाही. ह्याची फार गरज आहे. वारंवार मी आपल्याला सांगितलं आहे कि ह्या महाराष्ट्रातूनच कार्य होणार आहे.

आपल्या पाठीमागे संतांचे आशीर्वाद आहेत. महान संत होऊन गेले. पण तिकडे जातील त्यांच्या समाधीवर आणि रडत राहतील. पण ते कोण होते, त्यांना काय मिळालं, कसं मिळालं ते तर आधी समजून घ्या. आता हि मंडळी मराठीत छान गाणं म्हणतात आणि याना काही नाही, एक दोन महिन्यात हे शिकतात. हे असं कसं झालं हो? ह्या लोकांना तर साधं म्हणजे मराठी तर सोडा हिंदी बोलता येत नव्हतं. तर हे कसं घटित झालं? हे कसं झालं? लक्षात घ्या. तर ह्यांचं काय आहे. तुकारामांच्या ह्याच्यावर गेले चढून वर आणि जमिनीला मुके घेत होते. तर ते लोक जे बरोबर होते त्यांनी सांगितलं माताजी ह्यांना काय झालं हो? हे जमिनीचेच मुके घेत होते. तर म्हटलं तुम्ही जमिनीचे मुके कशाला घेतले. अहो माताजी आतून व्हायब्रेशन्स निघत होते म्हणे तिथे फवारेच्या फवारे जमिनीतून निघत होते. तुम्ही तुकारामांनाही ओळखलं नाही, ते यांनी ओळखलं.

तेंव्हा आपल्याला हा समाज आणि हा देश, सगळं जग जर सुखी करायचे असले आणि त्याच्या मध्ये सगळीकडे शांती, आनंद याचं साम्राज्यं जर आणायचं असलं तर सगळ्यांनी जागृती करून घ्यायची. इथे फक्त जागृती करून नाही, जागृती करून दुसऱ्यांची जागृती करायची. हा अर्धवटपणा आहे. माताजींच्या प्रोग्रॅमला यायचं जागृती करून घ्यायची त्याच्या नंतर पत्ताच नाही कुठे गेले. प्रोग्रॅम झाल्यानंतर विचारते बाबा किती आले होते? आले होते पुष्कळ प्रोग्रॅमला पण दहाच लोक आले. असं का? म्हणजे अगदी वेचक लोक येतात. तर परत परत सांगायचं म्हणजे मी पुष्कळ तुम्हाला सांगितलेल आहे आधी कुंडलिनी बद्दल. पण आता सांगायचं म्हणजे असं कि हि वेळ आलेली आहे. आता कधी तुम्ही लोक जागृत होऊन लोकांना जागृती द्याल. आणि जागृती देणं हे महत कार्य आहे. ह्याच्यापेक्षा पुण्याचं कार्यच नव्हे बाकी सगळं बेकार आहे. ह्या बद्दल तुम्ही ज्या लोकांनी जागृती दिली, ज्या लोकांना सांभाळलं आणि वरती आणलेलं आहे त्यांना विचारा.

आता पर्वा एक गृहस्थ आले होते मुंबईहून त्यांची शाळा होती मुक्यांची. तर एक मुलगा त्यातला घेऊन आले होते. बहुतेक ते थोडे थोडे बोलू लागले ऐकू लागले वगैरे होतं पण हा चांगला आहे तरी अजून एवढं नाही. पण तरी त्याला बारा हजार रुपयाची नोकरी मिळाली. अहो कमाल आहे म्हटलं. म्हणे माताजी हा इतका एकनिष्ठ आहे कि त्याला त्यांनी ठेऊनच घेतलं. त्याला इतकं बोलता येत नव्हतं, साधारण बोलायला लागला होता सहजयोगाने आणि कानांनी थोडं कमी ऐकायला येत होतं पण तरी काय हरकत नाही मनुष्य चांगला आहे ना. मनुष्य पक्का आहे ना त्याला व्यक्तित्व आहे ना मग त्याची किंमत करतात.

ते करण्यासाठी आपण आपल्याला ओळखलं पाहिजे. आपल्याला स्वतःला जाणलं पाहिजे. स्वतः बद्दल इतका अभिमान वाटेल तुम्हाला. कारण कधी कधी पुष्कळ लोक म्हणतात माताजी आम्ही असं काय केलं आम्हाला हे कसं मिळालं हे इतकं महत्वाचं. अरे तुम्ही मानव आहात. हे मानवांसाठी आहे. सगळ्या जगातल्या मानवांसाठी आहे मग तुमच्यासाठी का नको? परत या महाराष्ट्रात एवढे संत साधू झाले. ते नुसते, त्याचं हृदय नुसतं कळवळत असेल कि या महाराष्ट्रात का लोकांना एवढं नाही समजत? का वाढवत नाही? तेंव्हा वाढवायला पाहिजे सहजयोग. . हि मुख्य गोष्ट आज सांगायची आहे मला. माझं प्रत्येक वर्षी भाषण होतं, कुंडलिनी बद्दल इत्थंभूत माहिती देते. सगळं काही असून सुद्धा,.. आणि या महाराष्ट्रात रहाते मी आणि बोलते मराठी भाषा. या मराठी भाषेत अध्यात्माला केवढा वाव आहे.

अहो नाथ पंथीयांनी सगळं इथेच कार्य केलेलं, ते जाऊन नंतर रशियाला आले तिकडे, बरेच देशांमध्ये गेले. बोलिव्हियाला, कुठल्या कुठे ती बोलिव्हिया. तिथे गेले मच्छिन्द्रनाथ आणि गोरखनाथ आणि तुम्ही इथे बसून काय करता? दोघांनी जाऊन सहजयोग सांगितला. जेंव्हा तिथे आमचे लोक पोहोचले तेंव्हा त्यांनी सांगितलं हे बघा आम्हाला चक्र माहिती आहेत, आम्हाला सगळं काही माहिती आहे. कुणी सांगितलं? दोन आले होते बैरागी म्हणे. मान्य, मग त्यांनी काय केलं? त्यांनी आम्हाला सांगितलं, सगळी काही माहिती दिली पण आम्हाला जागृती देता येत नाही. आता म्हटलं पाठवा महाराष्ट्रात. लोकांना जागृती करायला आता पाठवा आणि तशी सोय होतेय. तेंव्हा इथल्या लोकांनी जाऊन सगळ्यांना जागृती द्यायची. हे तुमचं लक्षण आहे. त्यासाठी तुम्ही या महाराष्ट्रात जन्माला आला हे समजलं पाहिजे. ह्याची उमज असायला पाहिजे. आज ज्या भूमी वर तुम्ही बसले आहेत त्याच्याच पुण्याईने मी तुम्हाला जागृती देते. तिकडे इंग्लंड बिंग्लंडला तर माझे हात तुटायचे बाबा पण इथे ही भूमी इतकी चांगली आहे पण आता करायचं काय मला आता समजत नाही. आता सगळ्यांनी आज मनात ज्यांनी प्रतिज्ञा करतील कि आम्ही सहजयोग वाढवू आणि सगळ्यांना जागृती देऊ त्यांचीच कुंडलिनी जागृत होईल. थोडासा हट्टही करावा लागतो. तर आता आपल्याकडे प्रेमाने बघा दुसरं रडगाणं नको. आपल्याबद्दल निष्ठा असायला पाहिजे. आपल्याबद्दल हा विचार असला पाहिजे कि आम्हाला हे मिळतंय हे काहीतरी कारण असल्याशिवाय मिळतं का? सगळ्या जगाला बदलण्याचं आमच्या खांद्यावर कार्य आहे. हे समजलं पाहिजे. आणि ते तुम्ही करू शकता. मला माहिती आहे, की एकदा जर महाराष्ट्रात एक भेट दिली तर तो वाचणार नाही आणि कदाचित लोक असं म्हणतात कि माताजी तुमच्या गोडव्याने लोक भारावून जातात, तर शिवाजी सारखी तलवार काढायला पाहिजे. म्हटलं राहू द्या, कसलं काय? तशी काय तलवार वगैरे नको. पण एवढं समजावून मी सांगते कि आता मला महाराष्ट्रीयन आहे असं म्हणण्याची सुद्धा सोय राहिलेली नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल. कारण काय होत आहे ते थोडं समजून घ्या. आता जितके तुम्ही बसलेले आहेत हे लोक जर जाऊन शंभर शंभर माणसांना जरी देतील तर सबंध महाराष्ट्र धरला तुम्ही. सबंध महाराष्ट्रात कार्य केलं तुम्ही, समजलं पाहिजे. हि शक्ती हि जन शक्ती आहे. ते केल्याशिवाय काहीही होणार नाही.

लोकशाही ...लोकशाही, लोक कोण आहेत ते तर बघा. लोकशाही कसली आली? पाच रुपये दिले कि वोट देतात, या लोकशाही मध्ये काय होणार आहे? ही खरी लोकशाही आहे का? कुणालाही पाच रुपये दिले कि चालला तो वोट द्यायला. अहो हि काय लोकशाही झाली. तेंव्हा तुम्ही खरोखर आधी ते व्यक्तिमत्व बघा. विशेष स्वरूप प्राप्त करा. प्रत्येकातून एक एक महान व्यक्ती तयार होऊ शकते. हि मला खात्री आहे. पण ह्या दोन गोष्टी सोडयायला पाहिजेत. एक म्हणजे खंडीभर देव आणि दुसरं म्हणजे बुद्धी, वादविवाद. ते बसले आज पंडित महाराज, ते तिकडे बसले. काही ओळख आहे का, म्हटलं त्यांना कुणाची. वादायला बसले आपापसात. वादायचे, आज इथलं डिस्कशन, आज तिथे डिस्कशन, त्याचा काही फायदा नाही. जे एकमेव आहे त्याचं डिस्कशन कसं करणार? तेंव्हा ते एकमेव आधी मिळवून घ्या. आणि ते मिळवणं काही कठीण नाही तुम्हाला. तुमची परंपरा इतकी मोठी आहे. एवढी मोठी परंपरा आहे त्यात ते मिळवलंच पाहिजे. आणि गाठलंच पाहिजे आणि ते मिळू शकतं. तेंव्हा तुम्हा सर्वांना अत्यंत प्रेमाने मी कुंडलिनी जागरणाच्या प्रोग्रामसाठी आमंत्रण करते.

आता करूया. त्याला काही वेळ लागत नाही तुम्ही लोक ज्या भूमीवर बसला आहात ती भूमीच माझी मदत करते आणि तुमची स्वतःची परंपरा आहे ती, त्याला काही वेळ लागणार नाही. तरी आरामात बसा. दहा मिनिटात तुम्ही सगळे पार व्हाल.

आता माझ्याकडे दोन्ही हात असे करा, पायातले जोडे काढले पाहिजेत. पैर के जूते निकाल दीजिए कृपया। और दोनो हाथ मेरी ओर इस तरह से करें। सरळ जरा वर. थोडे वर. झाले पार. आता उजवा हात माझ्याकडे करा आणि डाव्या हातानी, डोक्यावर असं, इथे टाळू आहे, त्या टाळूवर हा डावा हात असा धरा. वर, वरती. ऊपर, ऊपर में, सटा कर नहीं, ऊपर रखिए। ठीक है। आता डावा हात माझ्याकडे. लेफ्ट हैण्ड मेरे ओर करे। और राइट हैण्ड सर पे रखिए तालू के उपर। डावा हात माझ्याकडे आणि उजवा हात टाळूवर. आता डोळे मिटून बघा कि हातामध्ये डोक्यातून काहीतरी थंड थंड नाहीतर गरम येतंय का? वर खाली फिरवून हात बघा. गरमही येत असेल. आता परत उजवा हात माझ्याकडे. फिरसे राईट हैण्ड मेरी ओर और लेफ्ट हैण्ड सर के उपर। फिरसे सर पे रखिए तिसरी बार और हाथ घुमाके देखिए की तालु भाग से ठंडी या गरम ऐसी हवा जैसी, जिसे स्पंद कहते है, आ रही है क्या? हा .. आता, आता परत दोन्ही हात माझ्याकडे करा. हमारी तरफ मुह करके बैठिए। हा दोन्ही हात आमच्याकडे, थंड वारा येऊन राहिला तुमच्याकडून माझ्याकडे. आता ज्या लोकांच्या हातामध्ये किंवा बोटांमध्ये तळव्या मध्ये किंवा डोक्यातून थंड नाहीतर गरम अशा वाऱ्याच्या लहरी येत असतील त्यांनी दोन्ही हात वर करावे. जिन लोगोंके उंगलिओ में और तल हाथ में और तालु के अंदरसे ठंडी या गरम हवा आई ऐसे लोगोने दोनों हाथ ऊपर करे। अब देखिए सब लोग हो गए। सब पार हो गए। विश्वास करो आप पार हो गए। आपको आत्मसाक्षात्कार का अनुभव आ गया। सब लोग विश्वास करें। विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा. अहो किती झाले तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार. आप सबको मेरा नमस्कार। सबको नमस्कार। सगळे झाले कमाल आहे.

Pune (India)

Loading map...