Public Program 1987-01-12
12 जानेवारी 1987
Public Program
Shrirampur (India)
Talk Language: Marathi | Transcript (Marathi) - Draft
श्रीरामपूरच्या सर्व साधकांना आमचा प्रणिपात . ह्या सुंदर स्वागतपर गायना नंतर अगदी गहिवरून आलं . तसच वडाळ्याला इतकी मंडळी एकत्र जमली होती . आणि दोन क्षणात सगळेजण पार झाले हे बघून असं वाटत कि ह्या महाराष्ट्र भूमी मध्ये इतकी शक्ती आहे आणि त्यातून इथे लोकांमध्ये इतकी भक्ती आहे त्याच सार्थक झालं पाहिजे . आणि ते सहजच होत . आजकालच्या काळात देवाचं नाव सुद्धा लोकांना ऐकावंस वाटत नाही . पुष्कळांच असं म्हणणं आहे कि देव नाहीच आहे . पण हि काही शास्त्रीय प्रवृत्ती झाली नाही . जे सायन्टिफिक लोक आहेत त्यांनी जर असं आपलं ठाम मत करून ठेवलं कि हि गोष्ट नाहीच आहे म्हणजे ते सायन्टिफिक नाही . कारण त्यांचं डोकं उघड असलं पाहिजे . मुभा असली पाहिजे . विचारांना मुभा असली पाहिजे . कोणाचाही विचार बांधून आणि त्यावर विश्वास ठेऊन काम करण हे आंधळे पणाचे लक्षण आहे . म्हणूनच संतसाधुनी ह्या महाराष्ट्रात आपलं रक्त ओतलं आहे . काहीतरी विशेष ह्या भूमीत असलं पाहिजे . आणि वारंवार त्यांनी सांगितलं आहे कि परमेश्वर हा आहे फक्त तुमच्यातला परमेश्वर जागृत झाला पाहिजे . ते काही आजकालचे भ्रामक भामटे लोक नव्हते . त्यांनी जे सांगितलं ते सत्य सांगितलं तंतोतंत ते खर आहे . हे सिद्ध करण आज शक्य आहे त्यावेळी शक्य नव्हतं . म्हणून लोकांनी त्यांना छळलं त्यांचं ऐकलं नाही . पण आज ते शक्य आहे .
ह्या धकाधकीच्या काळामध्ये चारीकडे माणसाला जेव्हा वणवा पेटल्या सारखा वाटतो आणि कुठे जाऊ आणि काय करू अशी त्याची स्तिती झालेली आहे . अशा ह्या भ्रमित स्तिती मध्ये तो विचार करू लागतो कि परमेश्वर आहे तर तो आहे तरी कुठे ?. आणि मग तो माझी का मदत करत नाही . पुष्कळशे लोक जे वाईट मार्गाला गेले आहेत ते सुध्दा असे म्हणतात कि माताजी आम्ही काय करणार आम्ही वाईट मार्गाला गेलो कारण आम्हाला दुसरा मार्गच नव्हता . वाईट आणि चांगल्याच ज्ञानच आम्हाला नव्हतं . त्याची जाणीवच नव्हती . संत ज्ञानेश्वरांनी जाणीव ह्या शब्दावर फार भार घातला आहे . परमेश्वराची जाणीव झाली पाहिजे . चैतन्याची जाणीव झाली पाहिजे. चैतन्य हे जडा जडातुन ,चराचरातून पसरलेलं आहे . चैतन्य हे परमेश्वराची ब्राम्हशक्ती ,त्याच हे प्रेम आहे . हे सर्व विश्वात पसरलेलं आहे असं ते सांगतात . मग ते आहे तरी कुठे ?. आणि त्याची जाणीव होणार तरी कशी ?. किंवा ह्या लोकांनी आपल्याला अशाच भूलथापा दिल्या आणि खोट सांगितलं असाही प्रश्न आजकालचे तरुण लोक विचारतील तर त्यांना मी दोष देणार नाही . कारण हे सिद्ध करायला पाहिजे . आपल्या मध्ये सगळं आहे ,तुझं आहे तुझं पाशी असं सांगितलं तरी त्या वर आपण का विश्वास ठेवायचा . असाही कुणी सवाल विचारला कि जर आहे तर गेलं कुठं ते . ?
परमेश्वराने आपल्याला आज एका अमिबा पासून मानव केलय आणि आता पुढे काय ?मानव झाल्यावरती आपल्याला समाधान नाही . आनंद नाही ,सौख्य नाही . मग हे मानव होऊन तरी काय करायचं . आजची वेळ अशी आहे कि ह्या सर्व प्रश्नांचं उत्तर दिलच पाहिजे . आणि त्या प्रश्ना साठी एकच मार्ग आहे तो म्हणजे आत्मसाक्षात्कार . आत्मसाक्षात्कार झाल्याशिवाय तुमच्या हाताला हे सगळीकडे पसरलेलं चैतन्य लागणार नाही . त्याची जाणीव होणार नाही . आत्मसाक्षात्कार म्हणजे आपल्या हृदयात बसलेल्या आत्म्याचा प्रकाश आपल्या चित्तात येणे . तस जिवाशिवाची भेट वैगेरे पुष्कळ शब्द वापरतात पण ह्या ब्रम्ह चैतन्याशी आपला जो पर्यंत योग घडत नाही ,त्याच्याशी जो पर्यंत आपला संबंध घडत नाही तो पर्यंत हे आहे काय या बद्दल कुतूहल वाटत . पण ते नाही असं म्हणणं अशास्त्रीय आहे . हे चुकीचं आहे . आपल्या मध्ये परमेश्वराने फार सुंदर रचना करून ठेवली आहे . आणि ती रचना अनादी काळापासून ऋषीमुनींनी वापरली पण एकदोन फुलंच झाडाला येत होती . तीच रचना आज आपण सहजयोगात वापरून सामूहिक चेतनेचे कार्य करू शकतो .
या इथे एक चित्र आहे इतक्या दुरून तुम्हाला स्पष्ट दिसणार नाही . या मध्ये दाखवलेले आहे कि त्रिकोणाकार अस्थी मध्ये आपल्या साडेतीन वेटोळे घालून एक कुंडलिनी नावाची शक्ती बसलेली आहे . साडेतीन वेटोळे का ?असा जर प्रश्न विचारला तर एक गणित आहे त्या मध्ये आणि ते गणित नंतर कधीतरी मी समजावून सांगेन . तर साडेतीन वेटोळे घालून बसलेली हि जी शक्ती आपल्यामध्ये बसलेली आहे ती अजून जागृत झालेली नाही . असं आम्ही म्हंटल समजा तरी हि एक धारणा आहे . तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा अथवा नका ठेऊ . पण ते जर आम्ही सिद्ध करून दाखवलं आणि तुम्ही ते मानलं नाही तर याचा अर्थ असा कि तुम्ही खर मानत नाही खोट्याला मानता . हि साडेतीन वेटोळे घातलेली शक्ती जी आहे ती आपल्या प्रत्येकामध्ये निद्रावस्थेत आहे . असं सहाव्या अध्याया मध्ये ज्ञानेश्वरीच्या लिहिलं आहे . पण नंतर लोकांनी सांगितलं कि सहावा अध्याय वाचायचाच नाही . म्हणजे ते कुणाला सांगताच येत नव्हतं ,ते कोड कुणाला उलगडतच नव्हतं . तर सहावा अध्याय वाचू नका बाकीचं सगळं वाचा . तर सहाव्या अध्याया मध्ये स्पष्ट सांगितलं आहे कि कुंडलिनी म्हणून शक्ती आपल्यामध्ये आहे आणि ती जागृत झाली म्हणजे आत्मसाक्षात्कार मिळतो . हि ज्ञानेशाची कमाल आहे . कारण हि गोष्ट श्रीकृष्णाने सुद्धा गीतेत सांगितली नव्हती कि आत्मसाक्षात्कार कुंडलिनी जागृतीने होतो . ती उघडी करून त्यांनी सांगितली कारण त्यांनाही लोकांनी प्रश्न केला असेल कि श्रीकृष्ण म्हणतात गीते मध्ये कि तुम्ही ध्यानधारणा केली कि तुम्हाला आत्मसाक्षात्कार मिळेल तर त्याला कोणची यंत्रणा आहे . म्हणून त्यांनी स्पष्ट उघड करून सांगितलं कि ह्याला कुंडलिनी जागरण होत आणि कुंडलिनी नावाची शक्ती आहे .
हि शक्ती सहा चक्रामधून भेद करीत शेवटी इथे ब्रम्हरंध्रात येते .सातव चक्र इथे कुंडलिनीच्या खाली गणपतीचं चक्र आहे जे कुंडलिनी गौरी आहे जे तीच रक्षण करत असत . आणि हि चक्र आमच्या पाठीच्या कण्यामध्ये तसेच आपल्या मेंदूमध्ये पण आहेत . शेवटी सहस्रार म्हणून जो भाग आहे ज्याला लिम्बिक एरिया म्हणतात त्या भागामध्ये तिचा प्रवेश होतो आणि ब्रम्हरंध्र इथून छेदल्या नंतर ती बाहेर निघाल्या नंतर ह्या चराचरात पसरलेल्या चैतन्याचा आपल्या हातामध्ये आभास होतो . जाणीव येते . बोटांच्या अग्रावर आपल्याला जाणीव येते . ती आल्यानंतर हे बोट किंवा हे बोट कोणत्या चक्राला प्रतीक स्वरूप आहे ते जाणलं पाहिजे . समजा एखाद्या माणसाच्या करंगळीला जाणीव झाली नाही तर त्याचा अर्थ असा कि हा माणूस एक तर आपल्या मुलामुळे पीडित असेल किंवा आपल्या बापामुळे पीडित असेल कारण हे श्रीरामच चक्र आहे . श्रीरामपूर आहे म्हणून सांगते . नंतर ज्याचं हे चक्र धरलं जाईल त्याला अस्थमाचा त्रास होऊ शकतो . फुफुसांमध्ये रोग येऊ शकतो . कारण हे चक्र फुफुसाच चलनवलन करत . अनेक त्याचे गुणधर्म आहेत एका चक्राचे अनेक गुणधर्म आहेत . पण उदाहरणार्थ मी सांगितलं . जस स्वीजरलॅंड मध्ये एक माणूस येऊन मला म्हणाला कि सगळे मला येऊन असं का विचारतात कि तुझा तुझ्या वडिलांशी संबंध कसा आहे ?माझा चांगला नाही आहे पण हे असं का विचारतात ?ह्यांना कस कळलं ?मी म्हंटल मी पण तेच विचारीन तुला . कारण हे बोट धरतेय माझं . हे अनेक कारणामुळे हे बोट धरत . आणि ज्याज्या आम्ही तुम्हाला खुणा सांगू त्या तुम्हाला लक्षात येतील कि त्या तुमच्यात आहेत . प्रत्येक चक्राला गुणधर्म आहेत . आणि प्रत्येकावर एकेक देवता बसलेली आहे . मंत्र म्हणताना सुद्धा ,कुणीही हा मंत्र आम्हाला दिलेला आहे . भोळेपणाची पण कमाल असते . कुणी कसलाही मंत्र दिला तरी लोकांना वाटत वा वा हे गुरुजींनी आम्हाला दिलेला आहे . ते आमचे गुरु . कदाचित जेल मधून सुटून आले असतील . कसलाही भलता सलता मंत्र तुम्हाला देत असतील . झालं मानून घेतलं तो मंत्र म्हणतानाच ते आजारी पडतात . दत्तात्रयांच ज्यांनी व्रत घेतलं आहे ,दत्तात्रयाला जे लोक मानतात त्यांचं नेहमी पोट खराब राहणार .कारण दत्तात्रय हे पोटात आहेत . तर पोट का खराब मग ?कारण अनादिकार चेष्टा आहे . आधी परमेश्वराच्या साम्राज्यात जावं आणि नंतर मग दत्तात्रयाला एकदा तरी बोलावलं तर दत्तात्रय जागृत होतात . पण जर तुम्ही त्यांच्या साम्राज्यातच गेले नाही आणि इथूनच दत्त दत्त म्हणत बसले कि त्यांनाही राग येईल . आणि ते हि म्हणतील याला काही समजत कि नाही . उद्या समजा तुम्हाला तुमच्या पंतप्रधानाला तुम्हाला जाऊन भेटायचं आहे आणि तिथं जाऊन तुम्ही फक्त राजीव राजीव राजीव असं कर बसलात तर पोलीस पकडतील किनई . तशातला हा प्रकार आहे . पण मंत्र दिला मला गुरूंनी , त्याला मंत्र द्यायला गुरु कशाला पाहिजे .
सदगुरु ची लक्षण सांगितलेली असताना सुद्धा आपण सदगुरू ओळखत नाही . रामदास स्वामींनी तर त्यांना शिव्याच दिल्या आहेत . आणखीन तुकारामांनी तर त्याना अगदी काय काय शब्द वापरलेत ,भजनदंबु ,अमके दंबु ,तमके दंबु आणि बडबड करणारे आणि नुसतं लोकांना चकित करणारे लोक . त्या नाणकसाहेबानी स्पष्ट लिहिलं आहे कि सदगुरू वही जो साहिब से मिलावे . जो परमेश्वराशी तुम्हाला एकाकारिता देतो तो सदगुरू बाकी सगळे कुगूरू आहेत . राक्षस आहेत . पण आपण भोळेपणा मध्ये असे जातो आणि मग देवाला नाव ठेवत बसतो . विशेषतः बघा आमचे वडील इथे गेले आणि डोकं फोडून घेऊन आले . म्हणे देव आहे . आता म्हणे कॅन्सर हॉस्पिटल मध्ये पडले आहेत आणि म्हणे देव आहेत . असले कसले गुरु . म्हणून आम्ही देवालाच मानत नाही . अहो जर गुरूच चुकत त्यात देवाचं काय चुकत . तुम्ही चूक माणसाकडे गेलात . पहिली अट तुम्ही साधी लावायची कि जो माणूस तुमच्या कडून पैसे घेईल त्याच्याकडे जायचंच नाही मुळी . सगळे जाऊन नदीत बुडतील बघा ,प्रवरा मध्ये जाऊन . त्याला म्हणायचं बर तुम्हाला जे करायचं ते करा पण आम्ही पैसा एकही देणार नाही तुम्हाला . सगळे निघतील प्रवरा कडे . पण आपणही भोळे आहोत . आणि परमेश्वराला शोधण्याची आतुरता त्यात ह्या अशा यांच्यात आपण पडतो . पण आमचंच सगळं खर असं समजून चालले तर आत्मसाक्षात्कार कसा द्यायचा ?ती कुंडलिनी अशी जाऊन बसते ,तुम्ही जर चुकीच्या ठिकाणी गेलात तर कुंडलिनीच उठायला तयार होत नाही . तुमचं जर डोकंच उलट्या ठिकाणी असेल तर कुंडलिनीच म्हणते याला देऊ नका . ती तुमचीच आई आहे ,प्रत्येकाची वैयक्तिक एकेक आई आहे . आणि ती स्वतःच जागृत होऊन तुम्हाला आत्मसाक्षात्कार देते . हजारो वर्षांपासून ती वाट बघते आहे कि माझ्या मुलाला कधी हि संधी मिळणार . आणि कधी मी त्याला त्याचा पुनर्जन्म देणार आहे . पण तुम्हीच तिला हात घालू देत नाही . काही काही लोक आहेत कि अत्यंत चूक मार्गावर जाऊन सुद्धा ते तिथे चिकटून बसले आहेत . अहो देवाने माणसाचं आयुष्य काही तुम्हाला वाया घालवायला दिलेलं नाही . याच फार मोठं महत्व आहे बर का . करोडो वर्षाची मेहनत आहे त्याच्यात . आणि आज तुम्ही ह्या मानव स्तितीत ह्या महाराष्ट्रात जन्माला आलात ह्याला कारण फार मोठं पूर्व पुण्य असलंच पाहिजे . जरी दारुडे असलात ,जरी काही असलं तरी सुद्धा . काही वाईट काम करत असलात तरी सुद्धा ह्या महाराष्ट्राच्या जन्मभूमीत जन्माला आला नसतात तुम्ही . पण ते सगळं विसरून आणि काहीतरी भलतच करत बसल्यावरती त्या आई कुंडलिनीनी तरी काय करावं ?तरी सुद्धा अशी परमेश्वरी कृपा आहे आणि इतकी परमेश्वरी दांडगी इच्छा आहे कि सगळ्यांना कसतरी करून परमेश्वराच्या साम्राज्यात घेऊन गेलेच पाहिजे ,कुंडलिनी हि जागृत होते आणि तुमच्या वरती आत्मसाक्षात्काराचा प्रकाश पडतो .
आत्मसाक्षात्काराचा प्रकाश पडल्या बरोबर पहिल्यांदा तुमच्या हाताला चैतन्य लागत . आणि आतून अगदी शांत वाटत ,निर्विचार अगदी शांत . शांत वाटल्यावर माणसाला वाटत कि हे काय . चिंता ,जगावरचे सगळे विचार संपून माणूस अगदी निर्विचार होतो . आता पुष्कळ लोकांचे असेही विचार असतात कि माताजी आम्ही ऐकलं कि कुंडलिनी जागरण फार कठीण आहे . याला दहा वर्ष मौन राहा . पंधरा वर्ष उपास करा . म्हणजे मेल्यावरतीच होईल असं वाटतंय .बर कबुल ,आहे कठीण सगळ्यांना जमत नाही कबुल ,जमणार नाही . सोप काम नाही कबुल . पण आम्हाला आहे सोप ते . काहीतरी आमच्यात असल पाहिजे म्हणून ते आम्हाला अगदी ते सोप वाटत . पण तुम्ही जर मला म्हणालात कि एखाद्या बँकेचा चेक लिहून द्या तर मला ते फार कठीण वाटत . मी कुणाला तरी सांगेन तुम्ही लिहा मला ते जमणार नाही . मी नुसती सही करायला तयार आहे पण तुम्ही लिहा . आता एखाद्याला एखाद काम येत त्याला कोण काय करणार . ज्याला येत नाहीत ते कशाला हात घालतात उगीच . ज्या माणसाला हे काम येत नाही अनाधिकार चेष्टा आहे अशा माणसाने यांच्यात हात घालू नये . आणि घातल्यास त्याला जबरदस्त धक्का बसतो . आणि ज्या माणसावर ते प्रयोग करतात त्यालाही पुष्कळ त्रास होतो . ज्याचं त्याच त्यांनी काम केलं पाहिजे . आणि कुंडलिनीच्या नावावर पुष्कळ खडे जरी फोडले किंवा काहीजारी म्हंटल तरी हे सगळं अदयावत काहीतरी दिसतंय मला असं जर असत तर ज्ञानेशांनी सहाव्या अध्याया मध्ये कुंडलिनीच वर्णन केलं नसत . पण त्याला जाणकार पाहिजे . आणि एक सदगुरु पाहिजे त्याला . ज्याच्या हृदयामध्ये प्रेमा शिवाय आणखीन काही नाही . ज्याच्या डोक्यात कपटा सारखे काही दुष्ट विचार नाहीत . फक्त तुमचं कल्याण मात्र झालं पाहिजे हे ज्याच्या हृदयात आहे त्याच्याच हातून हे घडू शकत . परमेश्वर सुद्धा त्यालाच देणार ना हि किमया . पण आश्चर्याची गोष्ट आहे कि तुम्हाला उद्या पार केल्यावर तुम्ही दुसऱ्यांना पार करू शकता . तुम्ही पूर्ण पणे बदलून जाऊ शकता . संबंध तुमचा स्वभाव बदलून जातो . हे पट्टीचे रागावणारे आहेत म्हणे ,फार रागीट आहेत म्हणे ,हे आहेत ते आहेत म्हणे . असं का येऊ द्या ईकडे .
आजच एक फार मोठे ऑफिसर मला भेटले आणि सहजच पार झाले आणि म्हणाले मला काही सांगताच येत नाही कि मला झालाय काय आता . सगळा राग ते विसरून गेले . माणसाचा स्वभावच बदलून जातो इतकच नव्हे तर तो समर्थ बनून जातो . इथे आलेले बरेच परदेशी पाहुणे आहेत त्यातले पुष्कळ दारू प्यायचे ,ड्रग घ्यायचे ,हे करायचे ते करायचे . पण आपल्या भारतात मात्र एकदा का सुरवात केली कि त्याला काही अर्थच रहात नाही . म्हणजे जो पर्यंत रस्त्यावर जाऊन पडणार नाही तो पर्यंत आपण दारूचं प्यायली नाही . पण तरी सुद्धा एका रात्रीत सगळं सोडून दुसऱ्या दिवशी सगळे मोकळे झाले . सुटले . कारण समर्थ होतात . कुणाचीही गुलामगिरी करत नाहीत . सवयीची नाही ,कोणत्या वाईट गोष्टीची नाही काही नाही . समर्थ होऊन तुम्ही आपल्या शक्तीवर उभे राहता . कारण हि तुमची स्वतःची शक्तीच आहे . जी मुले वर्गात पास होत नव्हती ती आता फस्टक्लास फस्ट येऊन कुठल्या कुठे पोहोचली . ज्या लोकांना खायला अन्न नव्हतं ते व्यवस्थित रहायला लागले . सगळ्यांची परिस्थिती सुधारली लोक म्हणतात माताजी पैशाचा आणि सहजयोगाचा काय संबंध आहे ?पैशाशी संबंध नाही लक्ष्मीतत्वाशी संबंध आहे . लक्ष्मीतत्व जागृत झालं कि लक्ष्मी घरात येणार . आणि लक्ष्मी आणि पैशात फार फरक असतो . ज्या माणसाजवळ लक्ष्मी असते त्याला विवेक ,समज ,समाधान सगळ असत . आणि ज्याच्या जवळ नुसता पैसा असतो त्याच्याजवळ नुसता मूर्खपणा असतो . ह्या सर्व गोष्टी घटीत होतात आणि माणूस स्वतःच्या आत्म्याला प्राप्त होतो . सगळी काम करत असताना सुद्धा एक निःसंगात राहून सगळ्या गोष्टींना एक साक्षीरूपाने बघत असतो . हि गोष्ट फार दूरची नाही आहे . रामदास स्वामींना विचारलं कि कुंडलिनी जागृतीला किती वेळ लागतो ?त्यांनी सांगितलं वेळ अली कि तत्क्षण . तत्क्षण हा शब्द त्यांनी वापरला . फक्त वेळ अली पाहिजे . आणि आज ती वेळ अली आहे . म्हणूनच आपण सर्व इथे जमला आहात . तेव्हा जागृती सगळ्यांनी करून घ्यायची . पण परवा एक पुस्तक वाचताना एक जोग महाराज म्हणून फार मोठे झाले ते त्यांनी अमृतानुभव वर फार सुंदर टीका लिहिली आहे .त्यात त्यांनी मला मानवांबद्दल अदमास दिला कि मानवा मध्ये चिदाभास म्हणजे प्रकाशित झालेल्या चित्ताचा आभास हा क्षणभंगुर प्रवृत्तीचा असतो . तो क्षणभर टिकतो परत जातो परत येतो . ह्यांनी माझ्या डोक्यात एकदम प्रकाश पडला कि म्हणूनच पार झाल्यावर सुद्धा लोक भटकू शकतात . कुंडलिनीच जागरण करण हे फार सोपं काम आहे . म्हणजे एखाद्या बीला रोपण हे ह्या पृथ्वीला कठीण काम नाही . पण तिला जोपासाव लागत . ते फक्त कुंडलिनी रोप जो पर्यंत जागृत होणं ,किंवा बीजारोपण आहे तो पर्यंतच जोपासाव लागत . त्याच्या पुढे मात्र साधकांना जोपासाव लागत स्वतःच्या आत्मसाक्षात्काराने . तर जस माताजींच्या भाषणाला आपण जातो तसच आणखी दुसऱ्या लोकांच्या भाषणाला जातो अशे पुष्कळशे लोक येतात . त्यातून काही पार झालेच अर्थात सहज पडले प्रवाही तर झाली मोक्षप्राप्ती . पण तिथे चिकटून रहात नाहीत . मग माताजी तरी आमच्याकडे हा त्रास आहे तो त्रास आहे . झाडून सर्व लोक जाणार झाडून सर्व त्रास जाणार . पण जे आपल्या भल्यासाठी आहे जे आपल्या हितासाठी आहे त्या साठी थोडातरी वेळ आपण दिला पाहिजे . मला वेळ नाही म्हणे ,हो का ,करता काय तुम्ही ?नाही म्हणे थोडस मित्रमंडळीत फिरावं लागत भेटावं लागत . अहो परमेश्वरा बद्दल काय विचार आहे तुमचा ?थोडा तरी वेळ त्याला दिलेला बरा . तो सगळाच वेळ तुम्हाला देतो आहे .
तर सहजयोगामध्ये जर आपली वाढ करून घ्यायची असेल ,जर वृक्षा सारखं उभं रहायच असेल तर त्याच्या मध्ये आपल्याला वागवून घ्यायचं असत . ज्याला इंग्रजी मध्ये कमिटमेंट म्हणतात . काही तुम्हाला त्यागायचं नाही काही सोडायचं नाही काही नाही . अहो जेव्हा गांधीजींनी युद्ध सुरु केलं होत माझे आईवडील काँग्रेस मध्ये होते . आमचं घर दार मोटारी सगळं जाऊन आम्ही महालात राहणारे लोक असून झोपडीत रहात होतो . आई आमची पाचदा जेल मध्ये गेली होती . केव्हडा त्याग केला त्या लोकांनी . सहजयोगात काही त्याग नको काही नको फक्त बुद्धी चा त्याग करू नये सुबुध्दीचा त्याग करू नये . दिवसानुदिवस वाढतच जाणार सर्व तऱ्हेचा आनंद . तेव्हा तो प्राप्त करावा आणि स्वतःला सार्थ करून घ्यावं . आजपर्यंत काही साध्य झालं नाही हे मानलं पाहिजे . आणि नम्रपणाने ,व्रत घेऊन हे मिळवलं पाहिजे . आणि हे मिळणार हमखास मिळणार . या बद्दल मला शन्का वाटत नाही . आता आपण हा प्रयोग करूयात . त्याच्या आधी काही प्रश्न असतील तर विचारा . पण उगीचच कसलेही प्रश स्वतःच अपुरे ज्ञान दाखवणारे काही विचारू नये . दोनचार पुस्तक वाचली कि लोकांना असं वाटत कि आपण काहीही प्रश्न विचारायचे चर्पटपंजरी सारखे , पढत मूर्खांसारखे प्रश्न विचारू नयेत . कारण इतर लोक उत्सुकतेने बसलेले आहेत पार होण्या साठी . पण तरीही आपल्या मनात काही शन्का असेल तर कृपा करून विचारा . काही शंका नाहीत हे फारच आनंदाची गोष्ट आहे . फक्त एक विनन्ती आहे कि सहजयोगात पार झाल्यावर ज्या गोष्टी आपल्या वाढीला उपयुक्त नाहीत आणि त्रासदायक आहेत त्या सोडल्या पाहिजेत . कारण आमचे पूर्वज करत होते म्हणून आम्ही हे करतोय असं म्हणून चालणार नाही . डोळस श्रद्धा झाली पाहिजे ,चैतन्याने तुम्ही जाणून घ्या कि हे ठीक आहे कि नाही ते . कारण केवल ते सत्य ,अब्सुलूट ज्याला म्हणतात ते तुमच्या हाती लागत . डोळस श्रद्धा ठेवायला पाहिजे . जे आम्ही अनादी काळापासून करत आलो तेच खर आहे असं समजून जे वागतील त्यांनी मग त्याच मार्गावर जावं . पण इथे जे बदलायचं आहे ते बदलू आणि जे नाही बदलायचं आहे जे चांगल आहे ते ठेऊ अशा एका अत्यंत नम्र भावनेने हे कार्य होण्या सारखं आहे .
प्रश्न - नियती हि श्रेष्ठ आहे का ?
नियतीच काय महत्व आहे ?कि आज तुम्ही श्रीरामपूरला पार होण्या साठी आला आहात . हा महत्वाचा क्षण ,हि नियती . बाकी सगळं व्यर्थ आहे . मी अगदी साध्या आणि सोप्या मराठी भाषेत आपल्याला समजावून सांगितलं आहे . पण तरीसुध्दा पार झाल्यानंतर आपण आमच्या केंद्रावर जा ,तिथे पुस्तक आहेत . ती घ्या . कारण यंत्रणा आहे याच्यामागे त्या शिवाय होत नाही . हि जरी आज तुम्हाला लाईट दिसत असली तरी ह्या लाईटच्या मागे पुष्कळ यंत्रणा आहे . इतिहास आहे त्याला . हि वीज कशी अली त्याचा इतिहास आहे . शोध कसा लागला त्याचा इतिहास आहे . हे बनवण्यात कस आलं याचा इतिहास आहे . म्हणजे हि यंत्रणा जी मागची आहे ती आहे . पण जर आपल्याला प्रकाश करायचा असला तर आपण नुसता एक बटन दाबतो आणि प्रकाश येतो . तेव्हा ती सगळी यंत्रणा आपल्यामध्ये बरोबर बसलेली आहे . तर आधी हा प्रकाश आला पाहिजे . तो जरी अगदी थोडासा आला तरी सुध्दा त्या प्रकाशा मध्ये तुम्हाला स्वतःचे सत्य दिसेल . तुम्हीच स्वतःचे गुरु होऊन जाल . आणि तुमच्या लक्षात येईल कि काय ठीक आहे आणि काय चूक आहे . म्हणजे तुमच्या हातात एखादा साप असला आणि तुम्ही अंधारात उभे आहेत कुणी सांगितलं अरे बाबा तुझ्या हातात साप आहे . सोडून टाक . पण तो म्हणेल नाही माझ्या हता मध्ये दोरच आहे . पण जरा जरी प्रकाश आला आणि त्यांनी पाहिलं कि दोर वळवळतो आहे तर लगेच सोडून टाकेल तो . तसच कि हि जी शक्ती आहे ,हि शक्ती कशी बनवली गेली ती कशी आपल्या मध्ये अली ,ती कशी आपल्या मध्ये यंत्रणा आहे ,ती कशी जागृत होते वैगेरे . हे सगळं आहेच . पण हे सगळं जाणण्याच्या आधी तुम्ही स्वतःचा प्रकाश मिळवून घ्यावा मग त्या प्रकाशात सगळं जाणलं तर बर होईल . नाहीतर नुसती डोकेदुखी होणार सगळं सांगत बसले तर . तेव्हा सहावा अध्याय जो बंद केला होता तो संबंध उघडा केला असं समजायचं . फक्त जरा सगळ्यांनी टोप्या काढाव्यात म्हणजे बर होईल .
कारण ब्रम्हरंध्र उघडायचं आहे मला . आणि मी आई आहे ,आई समोर टोप्या नाही घातल्या तरी चालतात . आणि प्रसन्नचित्त होऊन बसायचं . स्वतःबद्दल काहीही वाईट भावना ठेवायच्या नाहीत . काही असं समजायचं नाही कि मी एव्हडा पतित आहे ,मी एव्हडं पाप केल . काही नाही . मी आधीच सांगितलं ह्या महाराष्ट्राच्या भूमीत तुमचा जन्म झाला हेच तुमच्या पूर्व पुण्य आहे . तेव्हा माझं हे असं झालय माझं हे तस झालय हे काही मोजत बसायची गरज नाही . सगळा तो आता पंचनामा काढायचा नाही . मी आधीच सांगितलं कि नियती मोठी आहे कि आज तुम्ही इथे स्वतःच्या आत्मसाक्षात्काराला आलात हीच मोठी नियती आहे . तेव्हा स्वतःबद्दल सुद्धा प्रसन्नचित्त असलं पाहिजे . आणि स्वतःकडे सुध्दा आदराने आणि प्रेमाने बघितलं पाहजे . कारण तुम्ही मानव आहात आणि आता योगिजन होणार . तेव्हा माझं हे चुकलं माझं ते चुकलं असला विचार करायचा नाही .
आता दोन्ही हात आपण माझ्याकडे असे करून तुम्ही बसले आहात आता डावा हात माझ्याकडे आणि दुसरा हात धरणी कडे ठेवायचा . आणि हि जमीन परत ह्या महाराष्ट्राची आहे तेव्हा गणेशाचे स्मरण करून उजवा हात जमिनीवर ठेवायचा . त्यानंतर आता उजवा हात माझ्याकडे आणि डावाहात असा आकाशाकडे करायचा . आता सगळ्यांनी डोळे मिटून घ्यायचे कुणीही डोळे उघडे ठेवायचे नाहीत . आणि लक्ष वरती टाळूकडे ब्रम्हरंध्राकडे ठेवायचं . आता डावाहात माझ्याकडे आणि उजवा हात जमिनीकडे परत करा . आता डावाहात म्हणजे तुमची इच्छाशक्ती आहे . तुमची इच्छा आहे कि तुम्हाला आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे . हि इच्छा तुम्ही प्रदर्शित करत आहात . आता उजवा हात माझ्याकडे आणि डावाहात वर आकाशाकडे करायचा . लक्ष वरती टाळूकडे ठेवायचं . विचारांशी काही करायचं नाही ,झगडायच नाही काही करायचं नाही . शांतपणे आपोआप कुंडलिनी आपला मार्ग शोधून वर येते . आता परत डावाहात माझ्याकडे करा . हळूहळू डोळे उघडायचे . आणि उजवा हात आपल्या टाळूवर धरून बघायचं काही थंड हवा लागते का हाताला . डावाहात माझ्याकडेच ठेवा . आता उजवाहात माझ्याकडे करा . परत मन खाली करून डावाहात आता टाळूवर धरून बघा काही हाताला थंड जाणवत का . डोळे उघडेच ठेवा . हात वरखाली करून बघा . तुमच्या डोक्यातून थंडथंङ येतंय का बघा . आता दोन्ही हात अशे आकाशाकडे करायचे मान मागे करून प्रश्न करायचा श्री माताजी हि परमेश्वराची ब्रम्हशक्ती आहे का ? हि त्याची चैतन्यशक्ती आहे का ?हे परमेश्वराचं प्रेम आहे का ?असा प्रश्न तीनदा विचारायचा मागे असा हात करून . आता हात खाली करा . आता बघा हातामध्ये थंडथंङ काही येताय का . गार गार वाटतंय का . डोक्यावर हात ठेऊन बघा गार गार येतंय का . कुणाकुणाचे फार वर येत . सुकृत जास्त असत त्यांचं . एक आणखी प्रश्न विचारा माताजी तुम्ही आमची कुलस्वामिनी आहात का ? हा प्रश्न तीनदा विचारा . दोन्ही हात माझ्याकडे करून बघा निर्विचरिता आली तुम्हाला . हेच परामचैतन्य आहे . आता हे आहे काय हे जाणलं पाहिजे . ज्या लोकांच्या दोन्ही हातात किंवा डोक्यात गार आलय त्यांनी दोन्ही हात वर करायचे . संबंध श्रीरामपूरला नमस्कार असो माझा .
काही लोकांच्या हातात नसेल आलं कबुल आहे . काही हरकत नाही . आपण अवश्य आमच्या सेंटर वर यावं आणि पार होऊन जावं . आता स्वतःला बंधन कस द्यायचं मी सांगते तुम्हाला . हे कवच असत . देवीचं कवच आपण ऐकतो . ते शिकले पाहिजे . म्हणजे आपली कुंडलिनी रोज तुम्ही जागृत करू शकता . बाहेर जायच्या आधी ,झोपायच्या आधी स्वतःला कवच्यांत घालायचं . जे लोक पार झालेत त्यांनी फोटो वैगेरे घ्या . तर डावाहात माझ्याकडे ,फोटोकडे हात ठेवायचा . उजवाहात इकडे डाव्याहातावरून घेऊन डोक्यावरून पूर्ण फिरवून परत उजवीकडे घ्यायचा . म्हणजे एक बंधन झाले . परत तसच करायचं सातवेळा . म्हणजे साडेतीन वर्तुळात गेले तुम्ही . आता कुंडलिनी कशी स्वतःची जागृत करायची ते बघा . तुम्ही करू शकता कारण ती पडणार मधे मधे . हे फार सोपं काम आहे . डावाहात पोटच्या असा खाली समोर धरायचा आणि उजवाहात त्याच्या भोवती चारीकडे फिरवायचा . आणि कुंडलिनी उचलायची अशी वर आणि डोक्यावर नेऊन मागे अशी त्याला एक जोरात गाठ बांधायची . परत तसच करायचं आणि यावेळी डोक्यावर दोन गाठी बांधायच्या . नंतर परत तिसऱ्यांदा करून यावेळी डोक्यावर तीन गाठी बांधायच्या . सगळ्यांनी करा . सगळ्यांना फायदा होईल . आता बघा किती जोरात गार येतंय हातातून . आलं ना . वाटतंय जोरात . शांत वाटतंय अगदी . आता डोळे मिटून शांत बसा थॊडावेळ . चित्त वरती ठेवा टाळूवर . प्रयत्न करायचा नाही काही . आता काय मागायचं ते मागून घ्या . झाले सगळे योगिजन . श्रीरामपूरच नाव सार्थक झालं . परत पुढल्या वर्षी मी येणार आहे . राहुरीला आणि आस्थे गावाला प्रोग्रॅम आहे . ज्या लोकांना जमेल त्यांनी अवश्य यावं . सगळ्यांना नमस्कार .
आपल्या महाराष्ट्रात दर्शनाचे फार वेड असत . दर्शन हे झालच पाहिजे . देवळात देव आहेत बसलेले दर्शनासाठी . तिथे काय दर्शन आहे इथे काय आत्मसाक्षात्कार आहे . तुम्हाला तुमचंच दर्शन घडलेलं आहे . तेव्हा आपल्याला रीतसर दर्शन झालं नाही असा विचार ठेवायचा नाही . तरीही वाटलं तर इथे समोर येऊन आपण दर्शन घ्यावं . आणि मग आम्ही आपला नमस्कार सांगतो .