Public Program 1985-12-28
28 डिसेंबर 1985
Public Program
Atit (India)
Talk Language: Marathi | Transcript (Marathi) - Draft
सत्याला शोधणाऱ्या सर्व साधक मंडळींना आमचा प्रणिपात असो . अतीत बद्दल मी ऐकल होत कि इथे पुष्कळ साधक आहेत आणि सहजयोग चांगलाच रंगलेला आहे . इथे आल्याशिवाय ते सत्य द्रीष्टी समोर आलं नाही . आणि पाहून मला मोठं आश्चर्य वाटलं कि या ठिकाणी प्रथमच मी आले आणि लोकांचा उत्साह त्यांचं प्रेम किती भव्य आहे किती मोठं आहे . आपण नेहमीच सत्याला शोधत असतो . जाणता जाणता आपण शोधत असतो ते सत्य . कारण सत्य हेच प्रेम आहे . एखाद्या बद्दल आपल्याला जर प्रेम वाटलं तर आपण त्याच्या बदल सगळं काही असेल ते जाणतो ,जे सत्य आहे ते जाणतो . बाह्यतः सुद्धा . आणि ते प्रेम आनंददायक असत . तेव्हा ते सत्यच आनंदाचा स्रोत आहे . आपल्याला असं वाटत कि सत्य म्हणजे काहीतरी कोरड असेल कारण जे सत्यवचनी असतात ते करारी लोक ,बाणेदार लोक आणि हातात नेहमी तलवार धरूनच असतात . त्यांच्या जवळ जायचं म्हणजे अगदी विचार करावा लागतो . त्यांच्या जवळ जायचं तरी कस एखादा तडाखा दिला तर कस होईल आपलं . सत्य हे प्रेममय आहे ,आनंदमय आहे . ,सौन्दर्य शाली आहे . सुखमय आहे . ते आपण सत्य शोधत असतो . पुष्कळसे लोक असं समजतात कि आम्ही जर मोठ्या मोठ्या पदव्या मिळवल्या तर आम्हाला आनंद होईल . पुष्कळसे लोक भौतिकतेत पडतात त्यांना वाटत कि आम्ही जर मोठमोठाले बंगले बांधले किंवा मोठाल्या गाड्या ठेवल्या श्रीमंत झालो म्हणजे आम्हाला आनंद मिळेल . सुख दुःखाचा हा फेरा आहे . हा आनंदाचा सागर नव्हे . सुख तेव्हा होत जेव्हा माणसाचा अहंकार बळावतो . एखाद्या माणसाने उदोउदो केला म्हणजे माणसाला सुख वाटत . आणि त्यांनी मानहानी केली म्हणजे दुःख वाटत . म्हणजे एकाच नाण्याच्या ह्या दोन बाजू आहेत . आज ज्याला सुख वाटेल त्यालाच उद्या दुःख वाटेल . मी बघते पुष्कळसे लोक येऊन मला असं हि म्हणतात माताजी आम्हाला मुलबाळ नाही तेव्हा एक मुल झालं पाहिजे . पण त्याच्याहून जास्त लोक हे सांगतात माताजी आमचा मुलगा आहे तो आम्हाला मारतो .आम्हाला त्रास देतो . तेव्हा ज्या गोष्टी मध्ये आपण असा विचार करतो कि या पासून आपल्याला आनंद मिळेल तो आनंद एकमेव असतो . त्याला अशा दोन बाजू नसतात . कि हे सुख आणि दुःख ,केवळ आनंद असतो . तसा नुसता आनंद आहे ,निव्वळ आनंद ,निरानंद जो आहे तो आनंद जर मिळवायचा असला तर त्याचा स्रोत आत्मा आहे . आणि तो च आत्म्याचा प्रकाश आपल्याला सत्य प्रदर्शित करून देतो . पुष्कळांना सत्य काय आणि असत्य काय याबद्दल पूर्ण पणे जाणीव नसते . धर्म काय आणि अधर्म काय या बद्दल जाणीव नसते . एक गोष्ट घ्यावी आपण कि श्रीरामाने येऊन शबरीची उष्टी बोर खाल्ली . शबरी एक भिल्लीण जातीची होती . ती म्हातारी होती ,तिला थोडेसेच दात होते तिने प्रत्येक बोराला एकेक दात लावून पहिला कि माझ्या रामाला असं नाही वाटलं पाहिजे कि बोर कडवट आहेत किंवा त्यात आंबटपणा आहे . इतक्या प्रेमाने तिने ती बोर वेचून ठेवली होती रामासाठी . श्री राम जे साक्षात मर्यादा पुरषोतम आहेत त्यांना हा विचार सुध्दा आला नाही कि ह्या भिल्लिणीने उष्टी केलेली हि बोर आहेत त्यांनी पटकन घेऊन ती खायला पण सुरवात केली . आणि सीतेला म्हणाले कि अशी बोर मी कधीही खाल्ली नाहीत . ते रामच जाणो ह्या प्रेमाची महिमा . तेच जणू शकतात . दुर्योधना कडचा मेवा सोडून श्री कृष्ण विदुरा कडे जाऊन भाजी पोळी खात असत . ते सत्य ते प्रेम एकच आहे . कर्णाने जेव्हा श्री कृष्णना आव्हाहन केलं किंवा विनंती केली म्हंटल तर चालेल अर्जुनाने त्याच्यावरती बाण रोखले होते आणि कर्णाने म्हंटल कि माझा पाय आता अडकला आहे या वेळी तू माझ्यावर बाण रोखू नकोस जर तू वीर असशील तर मी सुध्दा वीर आहे . आणि वीरांवर वीरांनी अशावेळी बाण रोखला नाही पाहिजे . तेव्हा श्री कृष्णांनी धर्म सांगितला तो असा कि ज्या वेळी द्रौउपदीची तुम्ही लाज लुटताना पहिली तेव्हा तुमचा हा वीरधर्म क्षात्रधर्म कुठे गेला होता . त्या वेळी तुम्ही कुठे होता ?आणि त्यांनी अर्जुनाला सांगितलं कि मार त्याला . मारणच धर्म आहे . तेव्हा आपल्याला जी धर्माची व्याख्या माहित आहे ती तात्पुरती थोडीशी अंधुक . सत्याची सुध्दा आपल्याला माहिती आहे ती सुध्दा अंधूकच आहे .
प्रत्येक गोष्टीला जो पर्यंत आपण गहनतेने समजून घेणार नाही तो पर्यंत सत्य काय आहे हे आपल्याला कळणार नाही आणि त्याचाच फायदा लोक घेतात . कारण आज कलियुगात आपण भ्रमात बसलेलो आहोत . कोणच्याही भ्रामक गोष्टीला आपण लगेच बळी पडतो कारण कलियुगाची स्तिती अशी आहे . आणि त्या भ्रामकतेला आपण बळी पडून हे विसरतो कि अजून आपल्याला सत्य मिळालेलं नाही . मग सत्य जाणायच कस ?ते बुध्दीने जाणता येत नाही . बुध्दीने जाणता आलं असत तर बुध्दी फार प्रगल्भ आहे लोकांची . एव्हडे बुध्दिमान लोक आहेत कि त्यांनी काय सुरु केलय तर ऍटमबॉम्ब बनवून ठेवले आहेत . अमेरिकेने एक बनवून ठेवला आहे . एक रशियाने बनवून ठेवला आहे . नुसत बटन दाबलं कि सगळेच्या सगळे संपून जाणार . केव्हड शहाणपण आहे . हे बुध्दिच झालं . लोकांना असं वाटत कि मनाच फार प्राबल्य असल म्हणजे आपल्याला प्रेम मिळणार आणि सत्य मिळणार . तसही मुळीच नाही . नाहीतर मग हि रोजची रडगाणी ,सामाजिक प्रश्न हे कुठून उदभवले असते . त्याचा अर्थ असा आहे कि अजून आपल्याला ते अचूक मिळालेलं नाही . ते अचूक आपल्याला जाणलेलं नाही म्हणजे काहीतरी कमी राहिलेलं आहे . आणि ते काय कमी राहिलेलं आहे ते म्हणजे कि जो आत्मा आपल्या मध्ये प्रकाशमय आहे तो अजून आपल्या चित्तात आलेला नाही . हा आत्मा आपल्या चित्तात उतरला पाहिजे असं सर्व संतांनी सांगितलेलं आहे . अनादी काळापासून हे सांगितलेलं आहे कि ,वेदात सुध्दा सांगितलेलं आहे कि जर तुम्हाला विद झालं नाही तर ह्या वेदाला काही अर्थच नाही . विद होणे म्हणजे बोध होणे म्हणजे त्याची जाणीव तुमच्या नसानसात अली पाहिजे . सत्याची जाणीव तुमच्या नसानसात अली पाहिजे . आज तुम्ही म्हणता कि हि लाईट आहे कारण ती डोळ्यांनी दिसत आहे तुमच्या साक्षात डोळ्यांनी दिसत आहे म्हणून . मी बसलेली तुम्हाला दिसत आहे .याची जाणीव तुम्हाला आहे . तशीच जो पर्यंत तुम्हाला सत्याची जाणीव मिळत नाही तो पर्यंत तुम्ही असत्याशीच झगडत आहात .
त्यामुळेच आपण संतांना छळलं ,त्या मुळेच आपण धर्माला मुकलो ,त्या मुळेच आपण असत्याची कास धरून पुष्कळ लोकांना दुखावलं आहे . स्वतःला त्रास करून घेतला आहे . आणि एका तऱ्हेने आपण सगळे सत्यानाशाकडे जात आहोत . तेव्हा घाबरून माणूस जेव्हा विचार करतो कि का बुवा असं झालं ?आम्ही असं काही वाईट केलं नव्हतं मग झालं काय ?कारण एकच आहे कि तुम्हाला अजून आत्म्याची ओळख पटलेली नाही . आत्मा हा दिव्यासारखा आहे . हा दिवा आमच्या चित्तात आल्या बरोबर सत्य लगेच कळत . आता कुणीतरी म्हंटल कि हे देऊळ आहे . आणि हे देऊळ स्वयंभू आहे . तर आम्ही म्हंटल नाही हे काही स्वयंभू नाही . तुम्ही कशावरून म्हणता कि हे स्वयंभू नाही माताजी . तुम्ही पार होऊन बघा मग त्याच्यातून चैतन्यलहरी आल्या पाहिजेत . जर स्वयंभू असेल तर त्यातून चैतन्यलहरी जातात . हि मंडळी परदेशातून अली होती . याना तुकारामा बद्दल वैगेरे काही माहित नव्हतं . त्यांना घेऊन गेले तिथे देहूला . जिथे त्यांची तपश्चर्या होत असे . तिथे गेल्या बरोबर तिथली माती घेतली या लोकांनी आणि डोक्याला लावून घेतली . सगळे म्हणाले झालं काय तर अहो म्हणाले इथे कारंजा सारखं चैतन्य वहात आहे आणि मग काय ह्या मातीच काहीतरी विशेष असलं पाहिजे ना . तर त्यांनी डोक्याला लावून घेतली माती . पण ते सर्वसाधारण माणसाला कळायचं नाही त्याला संत व्हावं लागत . संत निर्माण झाल्याशिवाय आपल्या देशाचं .ह्या विश्वाचं काहीही भल होणार नाही .
संत म्हणजे काय तर काही गळ्याला काहीतरी बांधून ,डोक्याला फासून तो संत नसतो . संत हा आतून संत असतो बाह्यतः नसतो . राज्या जनका च उदाहरण माहित आहे आपल्याला कि ते राजे होते राज्या सारखे रहात होते . आणि तेच जेव्हा रामाला वनवास मिळाला तर अनवाणी चालत होते . जेव्हा राज्यपद मिळाले तेव्हा राजा सारखे मुकुट घालून बसत होते . पण ते कोणत्याही गोष्टीला चिकटलेले नव्हते . त्याच्या साठी हे सगळं म्हणजे काही व्यर्थ आहे . आता नाटक करायचं म्हणून करायचं . आता तुम्ही म्हणाल ते नाटक आम्ही करायला तयार आहोत . पण ते नाटक होत . त्याच त्यांना काहीही महत्व नव्हतं . त्याला कारण ते सगळे संत स्तितीत होते . अवतार होते ते . जे संत स्तितीतले लोक आहेत ते ज्या स्तितीत आहेत तिथेच ते समाधानात राहतात . आणि जे सांगून गेले कि "अवघाचि संसार सुखाचा करिन ",तो कसा करणार बुवा ?पैसे जर कुणाला दिले तर तो दारूच्या गुत्यावर जातो . सुख कुठून येणार ?कुणाला जर मिनिस्टर केलं तर तो पैसे खात बसतो . कुणाला नोकरी धंदा दिला तर तो तिकडे आपलं काहीतरी चालवतो . सन्मार्गाला काही कोणी उतरत नाही . परिवर्तन काही होत नाही . काही विशेष घडतच नाही ह्या गोष्टींनी . म्हणजे काहीतरी असं झालं पाहिजे कि माणूस एकदम परिवर्तनात गेला पाहिजे .
आता आपण जर अशा संतांचे उदाहरण घेतलं तर त्यांना नामदेवांना काही सांगावं लागत नव्हतं कि तुम्ही दारू पिऊ नका . किंवा एकनाथांना असं जाऊन सांगावं लागायचं का कि तुम्ही हे असं वाईट काम करू नका .त्यांच्या ते मनातच यायचं नाही . तो विचारच यायचा नाही . ते मन इतकं निर्मळ इतकं शुध्द कि त्याच्यात ह्या गोष्टी डोकावायच्याच नाहीत . तिकडे लक्षच जायचं नाही . ते कस ?ती पण आमच्या सारखीच माणस ,दोन हात दोन पाय . सगळं आमच्या सारखाच असताना त्यांच्यात असं काय होत कि ते राजे होते ?ते ज्या मस्तीत राहिले . त्यांना कोणत्याच गोष्टींनी झुकवलं नाही ,न राज्यांनी झुकवलं . कोणीच त्यांना झुकवलं नाही . मग ते कोण होते ?ते आत्मज ,ज्यांनी स्व चा धर्म जाणला अशे ते स्वधर्मी .
आता आपण असे फार ओरडतो जातीवाद नको ,जातीवादानी हे होत ,दहशतवाद नको ,अमुक नको तमुक नको . अरे पण कस करणार ?कस करणार तुम्ही ?अजून सुध्दा जर एखादा मराठा बोलायला लागला तर रामदासांचं नाव घेणार नाही आणि एखादा ब्राम्हण बोलायला लागला तर तुकारामाला तुकोबा च म्हणणार . अजून पण म्हणजे आजकाल अजून जास्तच झालेलं आहे . पूर्वी इतकं नव्हतं . आता जातीवाद जास्तच झालेला आहे . त्याला कारण हेच आहे कि आपण त्या विश्वातल्या आत्म्याचेच एक आहोत हि जाणीव ,परत मी म्हणते हि जाणीव आपल्यात नाही . नुसतं लेक्चर देऊन काय होणार आहे . म्हणे हिंदी चिनी भाई भाई . मग आपापसात कशाला भाण्डन झाली हो भाईभाई तर . त्याला कारण हे कि त्यांच्यातला आत्मा जो आहे तो जागृत नव्हता . एकदा आत्मा जागृत झाला म्हणजे तुमच्या संवेदनात ,तुमच्या ह्या हातामध्ये कळत कि दुसरा कोण आहे बुवा ?दुसरा कोणीच नाही . आमच्या समोरच उभे आहेत आमच्या हातातूनच कळतंय ना यांचं हे चक्र धरतेय ,हे धरतेय आणि हे असं असं केलं म्हणजे ठीक होतंय . म्हणजे दुसरा कोण आहे हि जाणीव डोक्याची नसते ,हृदयाची नसते तर आत्म्याची असते . आणि ती एकदा आपल्यामध्ये प्रकाशली म्हणजे हे सगळे प्रश्न एकजात मिटून जातात .
आता अर्थातच याला विरोध लोक करणारच आम्हाला . मला असं ऐकायला आलं होत कि अतितला सुध्दा कंड्या पोहोचल्या होत्या कि आमच्यावरती बॉम्बगोळे घातले वैगेरे . पण अजून तरी असा कोणी पैदा नाही झाला बॉम्बगोळे तर सोडा म्हणा सुऱ्या सुध्दा कुणी चालवू शकणार नाही . सोपं काम नाही आमच्या बरोबर च . संतांची गोष्ट वेगळी होती . पण अशा कंड्या पेटवणारच कारण आजकाल काही पोथ्या तुम्ही इंद्रायणीत जाऊन घालत नाही . घालू शकत नाही आमच्या . किंवा आम्हाला ज्ञानेशा सारखा त्रास देऊ शकत नाही ,आदिशंकराचार्यां न सारखं छळू शकत नाही आम्हाला . मग वर्तमान पत्रातून अशा कंड्या उठवायचा ज्यांनी तुम्ही सन्मार्गाला नाही लागलं पाहिजे . जस सर्व संतांचं केलं तसच सहजयोगाचं करण्याच्या मार्गावर आहेत . सुज्ञपणा धरावा . माताजींना काही पैसे नको आहेत ,हे पैसे खाऊ लोक आहेत . हे काय बोलतात . माताजींना तुमच्यापासून काही हि नको ,सहजयोगाला तुमच्यापासून काहीहि लाभ होणार नाही . तुम्हीच सहजयोगाकडून फायदा करून घ्या . जस गंगेचं आहे ती वाहते आहे . त्या गंगेत न्हाऊन स्वतःला पवित्र करून घ्यायाच . त्यात गंगेचे तुमच्यावर उपकार आहेत का तुमचे गंगेवर उपकार आहेत ?.
हि कुंडलिनी आपल्यामध्ये आहे सहाव्या अध्यायात आहे पण सगळ्यांनी सांगितलं ,भटजींनी विशेष करून कि सहावा अध्याय वाचायचा नाही कारण त्यांना काही जमत नाही त्यातलं . तेव्हा आधीच सांगून ठेवलं कि सहावा अध्याय वाचू नका . आणि कुंडलिनी जागृत झाली कि बेडका सारखे तुम्ही उडता वैगेरे बऱ्याच गोष्टी अशी मी पुस्तक लिहिलेली वाचली . आश्चर्य वाटलं मला . आता काय आपण बेडूक होणार आहोत का ?का काय साप ,विंचू होणार आहोत ?पण लिहून ठेवलं आहे असं . आणि एक गृहस्थ माझ्या समोर दोन्ही पाय समोर करून बसले ,म्हंटल असे का बसलात तुम्ही ?म्हणे माताजी माझी कुंडलिनी जागृत झाली आणि मी बेडका सारखा उडतो . अरे तुम्ही बेडका सारखे उडायला झालं काय ?त्यांनी मला पुस्तक आणून दाखवलं मला आश्चर्य वाटलं ते पाहून . असल्या तऱ्हेच्या गोष्टी एव्हड्या साठी लिहायच्या कि सन्मार्गाकडे लोकांनी जाऊ नये . कुंडलिनी तुमच्या मध्ये शुद्ध इच्छा आहे ती परमेश्वराने तुमच्या मध्ये ठेवलेली आहे . आणि आता जे शेवट गाठायचं आहे ते कुंडलिनी जागृतीनेच होणार आहे दुसरं कशानेच होणार नाही . जस प्रत्येक बी मध्ये त्याच्यातला अंकुर स्तीत असतो सुप्त अवस्थेत तो मातीच्या उदरात जाताच अंकुरित होतो तसाच तुमच्या मध्ये असलेला हा अंकुर म्हणजे हि तुमची कुंडलिनी आहे ती जागृत झाल्याशिवाय तुम्हाला आत्म ज्ञान होऊ शकत नाही . कबूल ,देवाचं नाव घेतलं ,स्थिरावले ,तुम्ही स्वतःमध्ये चांगुलपणा आणला ,संतुलन आणलं कबूल पण ते कशासाठी आणलं तुमची मुल उद्या विचारतील काहो तुम्ही एव्हडा धर्म धर्म म्हणता तो कशासाठी करायचा . त्यांनी काय फायदा होतो . जर हे गाठायचं आहे ,आत्म्याला जर गाठायचं आहे तर पहिले संतुलन पाहिजे म्हणून संतुलन करायचं आहे . पण उगीचच संतुलन करत बसले तर उद्या तुमची मुल म्हणायची हे बेकारच काय काढलंय तुम्ही हे संतुलन वैगेरे . ह्या धर्माला काही अर्थ आहे का ?खोट बोलायचं नाही ,का?खर का बोलायचं ?चांगुलपणाने का वागायचं ?नैतिकतेने का वागायचं . त्यांनी काय फायदे होतात . जे लोक अनैतिक आहेत त्याना तर खूप पैसे मिळतात आणि तुम्ही आम्हाला काय शिकवता . जर तुम्हाला आत्म्याला गाठायचं आहे तर संतुलनात यायला पाहिजे . पण पुढे त्याची पायरी आत्म्याला गाठणे आहे . ज्यांनी गाठलं नाही तो मानवतच राहून जाईल . उच्च स्तीतीला जाणार नाही . आपण अशी म्हणू शकतो कि नरक गतीला हि जाऊ शकतो . कारण हि मधली पायरी आहे . एक तर वर तरी जा नाहीतर खाली तरी जा . जर तुम्ही आत्म्याला गाठलं नाही तर तुम्ही भ्रांतीत जाणार . भ्रांतीत गेले तर म्हंटलंच आहे क्रोधा मोहात जायते . सगळं एकानंतर एक सुरु होईल . आणि गेले कामातून .
बुध्दी विभ्रम हा सांगितलेला आहे . आता अमेरिकेत पासष्ट टक्के लोक पागल सारखे वागतात . असं नवीनच निघालं आहे . त्याच्या पासून आपल्याला काय शिकायचं आहे वेड्यापासून . भ्रमिता सारखे वागतात . ते होणारच . कारण जर तुम्ही आपल्या आत्म्याला जर नाही गाठलं तर खाली घसरणारच . मधल्या स्तितीत तुम्ही आला त ,समजा एखाद्या पहाडावर तुम्ही चढता आहात आणि लोम्बकळले कुठेतरी जाऊन तर वर नाही गेले तर खाली येणारच . लोम्बकळलेली स्तिती आहे मानवाची . आज तो लोम्बकळलेल्या स्तितीत आहे म्हणून इकडे तिकडे फिरतो आहे वेड्या सारखा . कुठेतरी एकदा पोहोचायला पाहिजे . आणि त्याची सर्व व्यवस्था देवाने आपल्यामध्ये अगदी सुंदररित्या करून ठेवली आहे .
आता पुष्कळ लोक असे म्हणतात कि देवच नाही . अहो जर तुम्ही बघितलंच नाही तर कशाला असं बोलता . तुम्ही काही जाणलं नाही तर कशाला असं बोलता . हे सगळे साधू झाले एव्हडे मोठमोठाले संत झाले एव्हडे अवतार झाले हे सगळे खोटेच का . आणि तुम्ही एक मोठे शहाणे आजकाल च्या जगात निघाले कि आमचा देवावर विश्वाचंच नाही . अशा महामूर्खाना एकीकडे करूयात . पण बाकीचे जे लोक आहेत ज्यांचा देवावर विश्वास आहे ,त्यांचा सुध्दा विश्वास कसा आहे ,देवाजवळ मागायचं तरी काय एकच मागितलं पाहिजे कि मला योग घडला पाहिजे . सदासर्वदा योग तुझा घडावा . तुझा योग झाला पाहिजे हे देवा माझा तुझा योग झाला पाहिजे . जीवाची शिवाची गाठ पडली पाहिजे . त्यासाठी आपण आपलं चित्त सुध्दा रोखून धरतो . त्यासाठी आपण सर्व धर्म करतो . त्यासाठी आपण चांगुलपणा पत्करतो . आता तुझी आणि माझी गाठ घालून दे . ती कशी होणार ?तर त्याची व्यवस्था आपल्या मध्ये देवाने अत्यंत सुंदररित्या करून ठेवली आहे . ती म्हणजे त्रिकोणाकार अस्थी मध्ये आपल्या कुंडलिनी नावाची शक्ती बसवलेली आहे हि आपली शुध्द इच्छा आहे . एकदा हि जागृत झाली कि बाकीच्या सगळ्या इच्छा तिच्या पुढे नमुन जातात . जसा पौर्णिमेचा चंद्र आकाशात आला म्हणजे सगळे तारे कसे लपून जातात तसच ह्या क्षुद्र इच्छा सगळ्या संपून माणूस आनंदाच्या सागरात पोहायला लागतो . आणि ह्या इच्छा आपोआपच पूर्ण होतात . योगक्षेम वाहामयं जे श्री कृष्णांनी सांगितलेलं आहे त्याला आधी त्याने योग म्हंटल आहे क्षेम म्हंटल नाही योग झाल्याबरोबर तुमचं क्षेम होत . तुमच्या तब्बेती ठीक होतात ,तुमचे सारे प्रश्न सुटतात . तुम्ही देवाच्या साम्राज्यात आला . ते काय आपलं भारत सरकार नाही किंवा लंडनच सरकार नाही ते देवाचं सरकार आहे . अचूक आहे सगळं अचूक . प्रत्येक कार्य अगदी अचूक होत असत . काहीही चुकत नाही . तुम्ही मागूनच बघा . पण आधी त्याचे नागरिक तर व्हा . तुम्ही तर बसले इथे मग देवाला कस सांगणार तू माझं हे कर ते कर . पण तुम्ही प्रतिष्ठित त्या स्तिथीत जर झालात ,परमेश्वराच्या दरबारात जर जाऊन तुम्ही बसलात तर कोणत्याच गोष्टीची कमतरता राहणार नाही . जे पाहिजे ते ,जे जो वांच्छिल ते तो लाहो . जे जे ज्ञानेश्वरांनी म्हंटल आहे तेते आज पूर्ण करायचं आहे . आणि जे कल्पतरूंचे आर्णव ,ते आलेत तुमच्याकडे परदेशातून आणि आता तुम्ही जायचं तिकडे . ते अशे चाललेत वन चे वन कल्पतरूंचे वन चे वन चाललेत ते हे आहेत . ते कोण ते संतसाधु ,त्यांनी एकदा तोंडातून म्हंटल कि झालच . हे अशे लोक आज पुष्कळ व्हायला पाहिजेत . दोनचार लोक हुन चालणार नाहीत . हि व्यवस्था झाली पाहिजे हाच एक विचार लहानपणा पासून माझ्या डोक्यात होता . जो पर्यंत हि व्यवस्था सामूहिक होत नाही , जो पर्यंत समाजाला हे मिळत नाही तो पर्यंत ते वाऱ्यावर उडून जाणार . आणि म्हणूनच अत्यंत प्रयत्नशील होऊन हि व्यवस्था जमली आणि आता सामूहिक रित्या कुंडलिनी जागृती होत आहे . तेव्हा आपण सर्वानी त्याचा पूर्ण फायदा घ्या . लोकांचं ऐकू नये अशा गोष्टी लोक करतात कारण त्यांच्या पोटावर पाय येतो . सरळ गोष्ट सांगायची म्हणजे हि आहे . पण तुम्ही लोकांनी पुष्कळ पूर्वजन्मी सुद्धा सुकृत केलेलं आहे त्याची फळ आता मिळणार आहेत . जे सुकृत केलत जे तुम्ही परमेश्वराला शोधत फिरत होतात ते ह्या कलियुगातच तुम्हाला मिळणार आहे आणि ते मिळालायलाच पाहिजे . ते सर्वसाधारण ग्रहस्थित राहणाऱ्या लोकांना मिळणार आहे . जर एखादा साधूबाबा आमच्या कडे भगवे कपडे घालून आला तर त्याला सांगावं लागेल कि साधे कपडे घालून ये हे काही चालायचं नाही इथे ढोगसोग . त्याला ढोंग करायला नको सोंग करायला नको . जो खरा असेल त्याला ढोंग कशाला करायला पाहिजे . त्याची प्रचिती पाहिली पाहिजे . आणि प्रचिती पाहिल्या वरती आपण त्याच्यात किती आहोत नम्रपणे स्वतःची वाढ करून घ्यायची आहे . आणि मोठमोठाले वृक्ष ह्या देशात आपल्याला उभे करायचे आहेत .
परदेशाची स्तिती आहे ते म्हणजे उलट झाड आहे . श्री कृष्णांनी सांगितलं कि हे जे चेतनेच झाड आहे ते उलटीकडे वाढत . ते ह्या डोक्याकडे ,मेंदूकडे सर्व पाळेमुळे आहेत . आणि त्याच्या फांद्या उलटीकडे वहात आहेत . ते लोक झाडाचं ज्ञान जाणतात . आणि आपण त्याची पाळंमुळं आहोत .आज ते घाबरून इथे आलेत अरे बापरे आम्ही कुठे पोहोचलो ,आम्ही काय शोधायला गेलो आणि निघालं काय ?असे कसे आम्ही झालो . इतके बेशिस्त कसे झालो ?आम्हाला काहीच मिळालं नाही तर आज ते आपल्याकडे आलेत बघायला . पण आपण त्यांच्या मागे लागलो आहोत . त्यांचं अंधानुकरण करत आहोत . अहो ते खड्डयात गेले तरी दोन मिनिट थांबून तर बघा . ते तुमच्याकडे चढत वर येत आहेत तर तुम्ही तरी स्वतःकडे लक्ष द्या . कि आमची पाळंमुळं काय आहेत ,आमच्यातलं ज्ञान काय आहे ?हे ज्ञान ह्या सर्व सायन्स वैगेरेच्या किती वरच आहे . ते मी तुम्हाला सांगू नाही शकत . मी स्वतःच डॉक्टरी पास केलेली आहे . आणि मला हसायला यायचं कि काय मूर्खां सारखे बसलेत तिथे ,डॉक्टर लोकांना काही समजत तरी का ?स्वयंचलित संस्था ते म्हणतात तर यातला स्वयं कोण आहे ?असं विचारलं तर ते सांगू नाही शकणार .
स्वयं म्हणजे जे शिवाजींनी स्वचा धर्म म्हणून सांगितलं जो स्व म्हणजे आपल्या मध्ये बसलेला जो आत्मा आहे त्याची ती स्वयंचलित संस्था आहे . आणि याना काहीही त्याबद्दल माहिती नाही . आता पुष्कळशे डॉक्टर आपल्या बरोबर आलेले आहेत आपल्याला माहिती आहे आणि पुष्कळशा लोकांना सहजयोगाने अत्यंत आराम झालेला आहे . पुष्कळशे आजारी लोक जे ह्यूस्टन ला निघाले होते तेव्हा त्यांना ते ह्यूस्टन ला पोहोचले तेव्हा डॉक्टर म्हणाले कि काय तुमच्या हिंदुस्थानात लोकांना काही समजत नाही का तुम्ही अगदी नीट आहात . काय झालं ?काही झालं नाही . ते आले परत . मी म्हंटल जाता कशाला ?तुम्हाला आधीच सांगितलं तुम्ही बरे झाले आहात तुम्ही गेले ,पैसे घेऊन जा . असे पुष्कळशे लोक सहजयोगाने बरे झाले आहेत . याचा अर्थ असा नाही कि आम्ही दवाखाना काढला आहे . जे का रांजले गांजले त्यांची आम्ही सेवा करणारच . पण मुख्य म्हणजे तुम्हाला डॉक्टर करायचं आहे . तुम्हाला बलशाली करायचं आहे . यातले जे चांगले आहेत ,जे सबल आहेत त्यांना हि शक्ती पहिल्यांदा दिली पाहिजे . नाहीतर गावचे सगळे भिकारी घेऊन माझ्याकडे येऊ नका . तुम्ही आधी शक्तिशाली व्हा . तुमच्या मध्ये आधी ती संपन्नता येऊ द्या . मग तुम्ही यांचं भलं करू शकता . त्यांचं भलं करण्यासाठी देवाने तुम्हाला जे काही दिल आहे ते वाढवून त्याच्यामध्ये शक्ती भरून तुम्ही स्वतः सामर्थ्यवान झाल्यावर हे कार्य होणार आहे . पण त्याला पाहिजे जातीचे . येऱ्या गबाळ्याचे काम नोहे . अशी तशी लेची पेची माणस , जे पैशासाठी कधीकधी येतात सहजयोगात किंवा नावासाठी येतात ,त्यांचं हृदय त्याच्यात . त्यांना शक्ती तरी कशी दयायची . ज्यांचं थोर हृदय आहे थोर मन आहे त्याच्यातच शक्ती घालता येते . मी एक आई आहे आणि आईला असं वाटत नेहमी कि सर्व माझ्या शक्त्या ज्या काही संपन्नता आहे ते सर्व माझ्या मुलांना देऊन टाकावं . आहे त्याला काय करायचं आहे मला धरून तरी . सगळं काही तुमचंच आहे ते तुम्हाला द्यायचं आहे . पण ते झेलण्याची शक्ती पाहिजे ना . ती उचलायची शक्ती पाहिजे . ती समज पाहिजे . तर हळू हळू हे तुमचं नावीन्यातलं जीवन ,हे नवीन योगाच जीवन ,हे परमेश्वरी साम्राज्यातल जीवन जे एखाद्या लहानशा अंकुरा सारखं वाढत आहे ते जपून वाढवून घ्यायचं ,प्रेमान वाढवून घ्यायचं . आणि मग झाडाचं रूप आलं म्हणजे संबंध शक्त्या त्याच्यातून वाहू लागतात . सगळ्यांना माझी हात जोडून हि विनन्ती आहे कि नसत्या कंड्या वर विश्वास ठेऊन हा जो सुगम मार्ग आहे जो आज तुमच्या समोर उभा आहे जो आजचा युगधर्म आहे तो चुकवू नका .
सहजयोगामध्ये आम्ही कोणतीही जातीपाती ,देश वैगेरे अशे जे माणसाने केलेले जे विभाग आहेत ते मानत नाही . फक्त परमेश्वराचे विभाग आहेत एक तर तो दुष्ट माणूस आणि एक सुष्ट . एक तर धार्मिक आणि दुसरा अधार्मिक . हेच विभाग आम्ही मानतो . बाकी कोणतेही बेकारचे विभाग आम्ही मानतच नाही . कारण ते नाहीतच . ते माणसाने केलेले आहेत . परमेश्वराने सुध्दा सृष्टी रचली आम्हीच आपलं हे इथून सातारा जिल्हा आणि हे इथून मुंबई जिल्हा आणि मग मुंबईत सुध्दा आळी पर्यंत जायचं . हे आमच्या आळीतले ते तमक्याचे हे काय आहे . हि संकुचित वृत्ती माणसाने आपल्याबद्दल निर्माण केलेली आहे . तरी तो किती लहान मनाचा झाला हे लक्षात येत . हे सर्व विश्व एक आहे एका नजरेत तुमच्या येईल . एका मिनटात नजरेत तुमच्या यायला पाहिजे कि सर्व विश्व एकच आहे . एकाच परमेश्वराच्या एकाच विराटाच्या अंगातले आम्ही अंगप्रत्यंग आहोत . जो वाईट आहे तो वाईट आहे जो चांगला आहे तो चांगला आहे . या पलीकडे जगामध्ये भेद नाही . पण जो वाईट आहे त्याला पण जर क्षमा केली तर कदाचित तो सुध्दा परिवर्तनात येऊ शकतो . आणि ज्याचं चुकलमाकल आहे त्याच चुकणारच ,मानव हा चुकणारच त्याला परमेश्वराने क्षमा केली पाहिजे त्या शिवाय तो वर तरी कसा येणार ?तर चुकलं असेल तर चुकलं असेल ते विसरून जायचं . माझं हे चुकलं ,मी पतित आहे ,मी अमुक आहे असं माझ्या समोर रडगाणं गायचं नाही . तुम्ही आमची मुल आहात . काय चूक करणार तुम्ही ?आणि कोणती चूक करणार तुम्ही कि परमेश्वर तुम्हाला क्षमा करू शकत नाही . स्वतः बद्दल कमी पणाची भावना घेऊन बसायची कि आमची कशी कुंडलिनी जागृत होणार माताजी आम्ही तर कामातून गेलेलो आहोत . अहो ते मला बघुद्या . असा पण एक वर्ग आहे . तेव्हा कृपा करून स्वतः बद्दल तसा विचार ठेवायचा नाही . मी आत्मा आहे आणि मी आत्मा होणार . माझं चित्त जे आहे ते आत्म्यांनीच मी प्रकाशित करून घेणार . असा हिय्या मनाचा ठेवला पाहिजे . हि जिद्द जर धरली तर बघा कस कार्य होणार आहे ते . आणि झालच पाहिजे . महाराष्ट्राच्या ह्या पवित्र भूमीवर तुम्ही बसलेले आहात
आणिहे कार्य झालच पाहिजे .
अतीत शब्दच फार मोठा आहे . अतीत संस्कृतात म्हणजे पार होणे जस धर्मातीत म्हणजे धर्माच्या पलीकडे जाणे . अतीत शब्द फार मोठा आहे जस गुणातीत . गुणांच्या पलीकडे जाणे . धर्मांच्या पलीकडे जाणे हा अतीत शब्द आहे . म्हणजे इथे काहीतरी विशेष असल्यामुळे याला अतीत म्हंटले असेल संतसाधुनी . इथे माणूस पार होऊन जातो . एक ब्रम्ह झालं आणि परब्रम्ह ,एक शक्ती झाली आणि एक पराशक्ती . तसेच एक गुण झाले त्याचे गुणातीत . धर्मातीत ,त्याच्या पलीकडे जाणे ,पार होणे . असं ह्या गावाचं इतकं सुंदर नाव अतीत . ऐकून मला मोठं आश्चर्य वाटलं . आणि ह्या गावामध्ये पुष्कळ सज्जन लोक आहेत हे ऐकून त्याहून जास्त आनंद झाला . म्हणजे जस नाव तशीच त्याची करणी बघून मला असं वाटलं कि या ठिकाणी मोठं कार्य होऊ शकत . तेव्हा आपण सर्वानी आपल्या आत्म्याला आपण प्राप्त व्हावं त्या बद्दल जास्त उहापोह करू नये . विचारांच्या पलीकडे परमेश्वर आहे ,विचारातीत . हा परमेश्वर विचारांच्या पलीकडे आहे . ,बुध्दिच्या पलीकडे आहे . सगळ्यांच्या पलीकडे हा परमेश्वर आहे ते हे अतीत करांनी जाणून घेतलं पाहजे . बाकी एव्हडा आपण सगळं उत्साह दाखवला इतकं मला प्रेम दिल त्या बद्दल किती आभार मानावे तेव्हडे थोडेच आहेत . परमेश्वर आपल्या सर्वाना सुबुद्धी देवो . आता प्रश्न असतील तर विचारून घ्या . मी गेल्यावरती नसते प्रश्न विचारायचे नाहीत . आणि आपापसात दुही करायची नाही . आपल्याकडे एक असत तोंडासमोर एक आणि मागे एक . तस करायचं नाही . मग त्याच्या नंतर त्रास झाला तर मला सांगायचं नाही कि माताजी हे असं झालं म्हणून . मी आधीच सांगते दुटप्पी पणा चालणार नाही सहजयोगात ,दुटप्पी मानस नुकसानीत पडतील . तो स्वभाव सोडला पाहिजे . सरळ मार्गानी जर काही प्रश्न विचारायचे असतील तर माझ्यासमोर विचारा हिम्मत करून . मी त्याच उत्तर द्यायला तयार आहे . पाठीमागे निंदा करायची नाही . सहजयोग गंगेच्या ओघासारखा वाढत चालला आहे . महाराष्ट्रात खूप जमत चालला आहे आणि अतीत मध्ये पहिल्यांदाच एव्हडी जनसंख्या बघून मला फारच आनंद झाला आहे .
आता आपण जागृतीचा कार्यक्रम करूयात , मी जस सांगेन तस करा . त्या बद्दल प्रश्न विचारायचे नाहीत . हा नवीन मार्ग असा आहे ,अजून आपण वरवरचेच होतो आता आपल्याला गहनात आतमध्ये अंतर्योग साधायचा आहे . त्यासाठी जे करण योग्य आहे ते आपण केलं पाहिजे . कारण आपण परमेश्वराला इतक्या दिवसापासून शोधतो आहे . आणि ते जर मिळवायचं आहे तर जस माताजी म्हणतील ते आम्ही करू . त्यात तुम्हाला मी काही असं विशेष करायला सांगत नाही अगदी सोप्या दोनचार गोष्टी आहेत . आता चपला काढून ठेवा . दुसरं टोप्या काढून ठेवा कारण हे ब्रम्हरंध्र छेदाय च आहे . आणि आई समोर काही टोपी घालायची गरज नाही फक्त .
आता डावाहात आणि उजवाहात असे दोन्ही हात माझ्याकडे करायचे . डावाहात हा तुमचा इच्छाशक्तीचा आहे आणि उजवा हात तुमचा क्रिया शक्तीचा आहे . म्हून डावाहात माझ्याकडे करायचा आणि उजवा हात जमिनीवर ठेवायचा . ह्या वेळी श्री गणेशाचं स्तवन करून मनामध्ये ,महाराष्ट्र भूमीला ,पृथ्वी मातेला नमन करून असा हात जमिनीवर ठेवायचा . आता आपण काय करतोय आधी तर संतुलन साधतो आहे . डावी बाजू . डावीबाजू आपल्याकडे जास्त थकते . कारण आपल्यात जे संस्कार आहेत त्यातले चांगले जसे आहेत तसेच कुसंस्कार पण आहेत . पुष्कळ असे विचार आहेत ज्यांनी आपण गांजलेले आहोत . मागचे विचार मागच्या गोष्टी अशा आपल्या मध्ये जुनाट गोष्टी आहेत . जून आहे ते सोन आहे पण जुनाट नको . ते सगळं काढून टाकण्या साठी म्हणून डावा हात माझ्याकडे आणि उजवा आहेत जमिनीवर ठेवायचा .डोळे मिटून घ्या . आणि ह्या पृथ्वीला म्हणायचं कि माझ्यातलं जे काही जडतत्व आहे ते तू काढून घे . आता उजवाहात माझ्याकडे आणि आणि डावाहात असा आकाश कडे करायचा . आता हे तत्व आपल्या ,क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे . आपण जी क्रिया करतो आणि त्याची वाचाळता करतो त्यामुळे जो अहंकार आपल्या मध्ये निर्माण होतो त्याचे जे दोष आपल्या मध्ये येतात ते काढण्यासाठी ,ते आकाशतत्वात गेले पाहिजेत . उजवाहात माझ्याकडे आणि डावाहात असा आकाशतत्वा कडे करायचा . आता डोळे मिटून घ्या . आता डावा हात डोक्यावर टाळूवर धरा . आता बघा टाळूतून काही गारगार वाटतंय का ?आता डावाहात माझ्याकडे आणि उजवाहात टाळूवर धरा . वरती खाली करा थोडं . बघा गारगार काही जाणवतंय का ते . हात फिरवून बघा येतंय ?लहान मुलांना फार लवकर येत . आता दोन्ही हात अशे आकाशाकडे करायचे आणि आपली मान अशी मागे घ्यायची . आणि प्रश्न करायचा कि श्री माताजी हि परमेश्वराची ब्राम्हशक्ती आहे का ?हि परमेश्वराची प्रेम शक्ती आहे का ?हीच चैतन्य शक्ती आहे का . असा प्रश्न करायचा तीनवेळा . आता हात खाली करा . दोन्ही हातात गार येतंय का बघा . डोक्यात पण गार येतंय का बघा ?पुष्कळ लोकांना गरमगरम येईल . ज्यांची कुंडलिनी जागृत होऊन ब्रम्हरंध्रातून बाहेर पडली असेल त्यांना गारगार येईल . ज्यांना येत नाही किंवा ज्यांना येत आहे त्यांनी कुंडलिनी कशी जागृत करून घ्यायची ते आता मी तुम्हाला सांगते . सगळे जण आपापली कुंडलिनी जागृत करून घेऊ शकता . त्याला आपल्या डावीकडची जी चक्र आहेत त्यांना आपण चालना दयावी लागते . पैकी एक चक्र हृदया वरती जिथे आत्म्याचं स्थान आहे . त्याच्या खाली पोटावरती डावीकडे वरच्या बाजूला एक खाली . परत वर जायचं असं नंतर मानेच्या इथे एक चक्र आम्ही त्याला डावी विशुद्धी म्हणतो हे धरत . जे लोक स्वतःला फार कमी लेखतात ,माझं फार चुकलं असं म्हणतात त्या लोकांची डावी विशुद्धी धरते . त्याच्या नंतर मग इथे कपाळावर ,त्याच्या पाठीमागे आणि डोक्यावर म्हणजे टाळूवर . आणि डोक्यावर ठेवताना मात्र हा असा तळावा बरोबर इथे असा ठेवायचा आणि सात वेळा फिरवायचा . तर एकेक मी सांगीन आपल्याला . फक्त एक लक्षात ठेवा मानेच असं समोरून हात घालून असा ठेवायचा . आता डोळे मिटून घ्या . डावाहात माझ्याकडे . आणि उजवा हात हृदयावर ठेवायचा . आणि एक प्रश्न विचारायचा श्री माताजी मी आत्मा आहे का ?तीनदा प्रश्न विचारायचा मला . मनात विचारा . आता उजवा हात खाली पोटावर डावीकडे ठेवायचा . हे गुरूच तत्व आहे . जर तुम्ही आत्मा आहात तर स्वतःचे गुरु पण आहात आणि आत्मा हाच तुमचा गुरु पण आहे . आता आणखीन एक प्रश्न विचारायचा माताजी मी स्वतःचा गुरु आहे का . ?तीनदा प्रश्न विचारा . आता ओटीपोटात खाली डावीकडे उजवा हात दाबून धरायचा . इथे स्वाधिष्ठान चक्र जे आहे ते शुद्ध विद्येचं चक्र आहे . त्यांनी संबंध शुध्द विद्या तुम्हाला हस्तगत होते . पण मी तुमच्यावर जबरदस्ती करू शकत नाही . तुम्ही म्हणायला पाहिजे कि माताजी आम्हाला शुध्द विद्या द्या . असं सहावेळा म्हणा कि माताजी कृपा करून आम्हाला शुध्द विद्या द्यावी . म्हणजे कुंडलिनी जोरात सुरु होईल . आता हा हात परत पोटावर डावीकडे दाबून धरायचा . आता कुंडलिनीच चलनवलन सुरु झाल्यावर तुम्ही कुण्डलिनीची मदत कशी करणार तर इथे पूर्ण आत्मविश्वासाने म्हणायचं माताजी मीच माझा गुरु आहे . असं तुम्ही दहादा म्हणा . आता हाच उजवा हात परत उचलून हृद्यावर धरायचा . आणि पूर्ण आत्मविश्वासाने बारा वेळा म्हणायचं माताजी मी आत्मा आहे . या चक्राला बारा कळ्या आहेत . तुम्ही आहात हे सत्य आहे . आता परमेश्वर हा प्रेमाचा ,करुणेचा सागर तर आहेच पण सगळ्यात म्यूख्य म्हणजे तो क्षमेचा सागर आहे . ते व्हा आपण हि चूक केली ती चूक केली असं मानून घ्यायचं नाही . हा उजवाहात मानेच्या आणि खांद्याच्या मध्ये ठेवायचा . आणि इथे मी दोषी नाही असं सोळा वेळा म्हणायचं . हे कृष्णाचं चक्र आहे याला सोळा कळ्या आहेत . आता हा उजवाहात कपाळावर आडवा ठेवा . दाबून धरा . आता तुम्ही सगळ्यांना क्षमा करा . आम्ही सर्वाना एकसाथ क्षमा केली असं म्हणा . पुष्कळ म्हणतील कि हे शक्य नाही पण तुम्हाला माहित नाही तुम्ही क्षमा करा अथवा नका करू तुम्ही काहीही करत नाही . हा नुसता भ्रम आहे . पण जर तुम्ही क्षमा नाही केली मात्र तर तुम्ही दुसऱ्यांच्या हातात खेळता . तेव्हा खर सगळ्यांना क्षमा केली म्हणायचं . खूप हलकं वाटेल तुम्हाला बघा . आता हाच हात मागे डोक्याला घ्यायचा जोरात डोकं धरून मान मागे घ्यायची . आता या ठिकाणी आपल्या समाधानासाठी म्हणायचं कि देवा माझं काही चुकलं असेल तर मला क्षमा कर . आता हा तळहात पूर्णपणे ताणून घ्यायचा आणि आपल्या डोक्यावर टाळूवर ठेवायचा . सात वेळा फिरवायचा . तुम्ही मनापासून मागा माताजी आम्हाला आत्मसाक्षात्कार हवा आहे . हे ब्रम्हरंध्र आहे ते आता भेदायचा आहे . आता हात खाली घ्या . डोळे उघडा हळूहळू . उजवा हात माझ्याकडे असा आणि डावाहात डोक्यावर ठेऊन बघा थंड थंड येतंय का ?आता डाव्याहाताने बघा . हे थंड येन म्हणजे तुमच्या टाळूला जी ब्रम्हरंध्र म्हणून जी संस्था आहे तिथे तीच भेदन झालं आहे . त्यातून कुंडलिनी वाहते आहे . आता दोन्ही हात समोर करून बघा हातात थंड येतंय का ?जर तुमची कुठली कुलस्वामिनी असेल तर तीच नाव घेऊन विचारा कि श्री माताजी साक्षात तुम्हीच आमची कुलस्वामिनी आहात का? हा प्रश्न विचारायचा उत्तर आम्ही देणार . वाढला किनई जोर थंड येण्याचा . आता माझ्याकडे तुम्ही विचार न करता बघू शकता का बघा . आपण एक क्षण सुध्दा विचार थांबवू शकत नाही . कुंडलिनी जेव्हा आज्ञा चक्राला छेदून जाते तेव्हा माणूस निर्विचार होतो . पण तो क्षणभर . हि स्तिती वाढवायला पाहिजे . म्हणजे तुम्ही वर्तमान काळात येत . जे भूतकाळ आहे ते संपून गेलं आहे आणि भविष्य समोर काही नाही आहे . ह्या वर्तमान काळातच एकेक क्षण महत्वाचा आहे . आणि त्यात तुम्हाला राहता आलं पाहिजे आत्ता या वेळी . ते निर्विचारतेतच साध्य होईल आणि काहीही विचार न करताना जर तुम्ही बसू शकता तर तुम्ही विचारातीत झाले . गुणातीत ,धर्मातीत झाले . आता धर्म तुम्हाला करावा लागणार नाही धर्म तुमच्यातून वाहणार आहे . तुम्हीच धर्म होऊन जाता . धर्माची जी व्याख्या आहे तीच बदलून जाणार आणि तुम्हाला स्वतःलाच हि जी नवीन चेतना आहे जिला सामूहिक चेतना म्हणतात ती मिळेल ह्या पाच बोटातून तुम्हला कळेल कि ह्या चक्रातून तुम्हाला कळेल कि कुणाला काय त्रास आहे ,तुम्हाला काय त्रास आहे . डावीकडे त्रास असेल तर मानसिक त्रास आहे आणि उजवीकडे त्रास असला तर शारीरिक किंवा बौध्दिक त्रास आहे . आणि तुम्हीच याच निदान काढू शकाल . पण थोडस शिकावं लागत . रोपाला आधी फार जपावं लागत ,सांभाळावं लागत . आमचं तुमच्यावर जितकं प्रेम आहे तेव्हड जर तुम्ही स्वतःवर करू शकाल तर तुमचं फार भलं होऊ शकेल . परमेश्वर तुम्हा सर्वाना अनंत आशीर्वाद देवो . आता जायची वेळ आलेली आहे . पण माझं हृदय इथेच आहे . नंतर गणपतीपुळ्याला प्रोग्रॅम आहे ज्या मंडळींना येत येईल त्यांनी एकतीस ,एक ,आणि दोन अशा तीन दिवसाच्या प्रोग्रॅमला तरी आलं पाहिजे . इथून जवळच आहे गणपतीपुळे काही दूर नाही . आणि तिथे लग्न वैगेरे होणार आहेत ज्यांची इच्छा असेल त्यांनी यावं जे तुमचे संचालक आहेत सहजयोगाचे त्यांच्याकडे नाव द्यावीत . आणि अवश्य तिथे येऊन सगळ्या विश्वातल्या लोकांना येऊन भेटावं . आपण सगळे एकाच जातीचे आहोत . आपले सगळे भाऊबंद संबंध देशनमध्ये आहेत . प्रत्येक देशामध्ये तुमचे भाऊबंद आहेत . एकाच आईचे सगळे आपण मुल आहोत . तेव्हा सगळ्यांचा मेळावा आहे . सगळ्यांनी आलं तर मला फार आनंद होईल . जितके लोक येऊ शकतील त्यांनी अवश्य यावं . आता सातारा जिल्हा सोडून आम्ही पुढे चाललो कोयना नगरला तिथे एक दिवस रात्री राहणार आहोत .