Public Program 1984-02-24
Current language: Marathi, list all talks in: Marathi
24 फेब्रुवारी 1984
Public Program
Sangamner (India)
Talk Language: Marathi | Transcript (Marathi) - VERIFIED
Public Program, Kundalini and Bandhan, Sangmaner, India 24-02-1984
ज्ञानमाता विद्यालयाचे मुख्याध्यापक, श्री वटे साहेब तसेच संगमनेरचे सर्व भाविक साधक, सहजयोगी मंडळी सर्वांना आमचा प्रणिपात. आज विशेष्य करून फार क्षमा याचना करायची की इतका उशीर झाला. पण आजच एक प्रश्न उभा झाला आणि मला अहमदनगरला पहिल्यांदा जावं लागल. त्यामुळे इथ यायला इतका उशीर झाला तरी सगळ्यांनी उदार हृदयाने मला क्षमा करावी. इतका वेळ आपण वाट बघत बसलात त्यावरुन हे निश्चित आहे की आपण भाविक मंडळी आहात आणि आपण साधक आहात, परमेश्वराच्या शोधात आहात. आज पर्यंत ह्या भारत भूमीत विशेष्य करून या महाराष्ट्रात अनेक साधु संत झाले. श्रीराम सुद्धा या पवित्र भूमीवर अनवाणी चालले आणि त्यांनी पुष्कळ मेहनत केलेली आहे.
त्या मेहनतीच्या वर्णनाला माझ्याजवळ शब्द नाहीत. त्यांना लोकांनी किती छळल, त्रास दिला त्यांना समजून नाही घेतल, त्यांची कोणत्याच प्रकारे मदत नाही केली तरी सुद्धा त्यांनी आपल कार्य अव्याहत चालवले. त्याला कारण त्यांना माहिती होत की एक दिवस असा येणार आहे की या भूमीवर असे मोठे मोठे लोक जन्माला येतील, जे पुण्यवान आत्मा असतील. मनुष्य पैशांनी मोठा होत नाही, यशाने मोठा होत नाही, सत्तेने मोठा होत नाही. कोणत्याही गोष्टीने मोठा होत नसतो पण ज्या माणसाला परमेश्वराची ओढ आहे, तोच खरा मनुष्य परमेश्वरी दृष्टीमध्ये मोठा असतो. आणि अशी परमेश्वराला शोधणारी अनेक मंडळी आहेत, जी आपल्या महाराष्ट्रात देशात विद्यमान आहेत. परमेश्वर हा आपल्या मध्ये, हृदयामध्ये आत्मा स्वरूप असतो अस सर्व संत साधूंनी सांगितलेले आहेत. ती सर्व साक्षात्कारी मंडळी होती आणि साक्षात्कारी मंडळींचे मुख्य म्हणजे अस असतं कि ते कोणचे चुकीचे काम करत नाहीत. त्यांना सांगावे लागत नाहीत, त्यांच्यामध्ये धर्म जागृत असतो. ते धर्मातच असतात. त्यांना सांगावे लागत नाहीत की तुम्ही धर्म हा करा, असे वागा तसे वागा हे करा ते करा. ते धर्मातच असतात. जे करतात तेच धर्म. जे करतात तेच सत्य. तेव्हा ते साक्षात्कारी होते आणि तुम्ही नव्हता तरी त्यांनी सांगून ठेवल होत की परमेश्वराला आठवण ठेवा. त्यांच्याबद्दल नेहमी लक्ष ठेवल पाहिजे आणि शेवटी तुम्हाला परमेश्वर मिळेल. ही तुम्हाला त्यांनी खूण दिली होती की ज्या वेळेला पसायदान म्हणजे जे वर्णन केलेल आहे, ज्ञानेश्वरांनी स्पष्टपणे त्यांनी सांगितल की ज्या वेळेला ब्रह्माचा एकत्व साधेल, त्यावेळेला लोकांची कशी स्थिती होईल, लोक कोणत्या स्थितीला पोहोचतील, किती उच्च दशेला पोहोचतील. त्यांच्या वर्णना मध्ये अस आहे, चलां कल्पतरूंचे आरव. कल्पतरूंचे आरव, आरव म्हणजे जंगल च्या जंगल, वन च्या वन म्हणजे पुष्कळ जमावाचे जमाव असे कल्पतरू होते. म्हणजे त्या लोकांमध्ये अशी शक्ती होईल की ते कल्पतरू होते. जे लोकांना पाहिजे असेल ते त्यांना देऊ शकतील, कल्पतरू होते. बोलते पियुषांचे आर्णव. बोलते म्हणजे बोलणारे, अमृतांचे आर्णव म्हणजे समुद्र ते असे होतील कि जसे काही त्यांच्या तोंडातून निघालेले शब्द हे अमृताचे असतील आणि ते अमृताचे सागर पण बोलणारे असे लोक होतील, ते तुम्ही आहात, हे तुमचं वर्णन आहेत, पण ते व्हायला पाहिजे ते झाल्याशिवाय होत नाही. तुकारामांनी सांगितलं, आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा, आमचं बी घडलेल आहे आणि आता तुमच बी घडायच आहे. आपण नुसता टाळ कुटत बसलो,आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा, त्या टाळ कुटण्याला आता कुठेतरी थांबविले पाहिजे. आपण जी पायरी चढून आलो त्या पायरीला आता चिकटून नाही राहायच, दार उघडलेल आहे तेव्हा आत मध्ये या, आत मध्ये परमेश्र्वराचे साम्राज्य आहे. जे काही तुम्हाला करायचे होते ते करून झालात. तीर्थयात्रा झाली, सगळी काही पूजा झाली, सगळ्यांच्या आरत्या झाल्या, जे काही करायच होत पूजा, अर्चना उपोषणाधी सगळे षोडशोपचार झाले ते कशासाठी की शेवटी हे मिळाल पाहिजे. तेव्हा ते सोडून आत मध्ये आलं पाहिजे आता आम्ही आलो आहेत मोटारीत तेव्हा आपल्या समोर येतांना मोटार सोडून आत मध्ये आलो. तसंच हे सगळ सोडून परमेश्वराच्या साम्राज्यात आलं पाहिजे. म्हणजे बाहृयातल जेवढ करायच ते केलं. आता आतलं केलं पाहिजे.
ही त्याची खूण आहे ते समजून घेतलं पाहिजे. आपल्याला जे बाहृय दिसत ते म्हणजे झाडा सारखं, आपण एक झाड बघीतल, चांगल फोफावलेल, हिरवंगार तर लक्षात ही गोष्ट येते कि ह्या झाडाला जी मुळे आहेत ती सजग आहेत. जर झाड वाढलं फार आणि त्याची मुळे खोलवर रुतली नाहीत तर ते झाड कोलमडून पडेल, तसंच आज समाजाच होत आहे तसंच आज जे पाश्चिमात्त्य देशात एवढी समृद्धी आली तिथे होत आहे. ते कोलमडून पडत आहेत कारण त्यांनी आपली मुळे शोधून नाही काढली त्यांची मुळे आपल्या भारतात विशेष्य करून महाराष्ट्रात आहेत. त्या मुळांमध्ये आपण उतरलो पाहिजे आणि जर असं झाल तर उद्या सर्व जगाचं आपल्याकडे लक्ष येईल इतकच नव्हे तर आपल्याकडे पुढारीपण येणार आहेत. कारण ही जागतिक जेवढ करायचा आहे त्यामध्ये ते पुढारी जरी असले तरी परमेश्वराच्या बाबतीत आपण पुढारी आहोत आणि आपला तो वारसा आहे, तो वारसा पण आपण मिळवला पाहिजे, तो वारसा जर आपण मिळविला नाही तर आपण फार मोठ गमावलं असं मी म्हणेन. तेव्हा लहान मोठी अशी गोष्ट घेऊन, काहीतरी अस खुळ घेऊन वाद घालत बसायच नाही. त्यावेळेला सगळ्यांनी एक जूटून आत्मसाक्षात्कार घेतला पाहिजे. ब्रह्माच्या एकत्वात उतरले पाहिजे. आणि जे रामदासाने सांगितलं त्याप्रमाणे सर्वांनी, "मिटे वाद-संवाद ऐसा करावा, आणि एक मनाने सगळ्यांनी हा अनुभव घ्यावा”. कारण ही जी कुंडलीनी आहे ती तुमची आई, तुमच्यामध्ये हजारो वर्षांपासून बसलेली आहे. एका क्षणाची वाट बघते कि कधी हीची जागृती होईल. तिची जागृती झाल्याशिवाय आत्मसाक्षात्कार होत नाही. आणि जागृती सुद्धा येड्या गबाळ्याचे काम नव्हे. त्याला सुध्दा अशी कुणीतरी विशेष व्यक्ती लागते जी हे कार्य करू शकते. त्या आज हजारोनी घटत आहे, हा महायोगच आहे. सहजयोग आज महा योगाला पोहोचलेला आहे. तेव्हा या पावन गंगेत तुम्हीसुद्धा हात धुवून घ्या. हे सगळ तुझ आहे तुझपाशी तेव्हा ते तुम्ही तुमचं घ्याव, आम्ही मध्ये उगीचच बसलेलो आहोत खर म्हणजे आमचं काहीच नाही एखादा पेटलेला दिवा जर दुसऱ्या दिव्याला पेटवतो तर त्याचं त्यात काय वैशिष्ट्य, काहीच नाही तसेच तुम्ही आता नुसते तयार आहात तुमचा दिवा फक्त पेटवायची वेळ आलेली आहे. तो पेटवून घेणे. पण सहजयोगात माणस पार होतात. त्या़ंच्या डोक्यातुन म्हणजे ब्रह्मरंध्रातून थंड थंड असे गार वारे येतात. हातात सुद्धा सगळीकडे गार गार वाटू लागतं आणि ही जी चैतन्यशक्ती, ब्रह्म शक्ती, जी सर्व जिवंत कार्य करते, जी परमेश्वराची जिवंत शक्ती आहे, जिवंत परमेश्वराची जी जिवंत शक्ती आहे ती हाती जरी लागली तरी थोडीशी त्याच्याकडे खबरदारी घ्यावी लागते. जसे एखाद लहानस अंकुर फुटत, पण ते सांभाळाव लागत, जपाव लागत. सुरुवातीला फार जपाव लागत आणि ते जपल्या नंतरच त्याचे मोठे वृक्ष होतात. म्हणून सुरुवातीला थोडी मेहनत घ्यावी लागते.
आज संगमनेरला बरेच दिवसात माझ येण झाल. पण तशी मी इकडून पुष्कळदा गेलेली आहे आणि पुष्कळदा वाटत असेल की एकदा संगमनेरला सुद्धा प्रोग्राम केला तर बर होईल कारण साईनाथांच जवळच वास्तव्य राहिलेला आहे तेव्हा त्यांच्या कृपेने येथे पुष्कळ कार्य होण्यासारख आहे आणि ते आपण सर्वांनी आत्मसात कराव, त्याच्यामध्ये आरूढ व्हाव आणि आपल्या प्रतिष्ठेला प्राप्त व्हाव अशी माझी सगळयांना कळकळीची विनंती आहे. श्रीकृष्णाने सांगितलेला आहे की जेव्हा योग घडेल तेव्हा मी तुमचा क्षेम बघेन. योग घडला पाहिजे. पुष्कळ लोक म्हणतात तुमच्या देशात एवढा देवाच्या गोष्टी करतात आणि एवढं देशामध्ये अक्षेम काय आहे, लोकांना क्षेम नाही. त्यांच्यात गरिबी, दारिद्रय दैन्य हे सगळ कशाला, कारण योग घडलेला आहे आधी योगक्षेमं वहाम्यहम्, पण त्याच्यात आणखी एक अट आहे नित्य अभियुक्ता जे सातत्याने माझ्याशी चिकटून राहतील त्यांचच मी योगक्षेम वहन करेल. नुसत तोंडाने चर्पटपंजरी करून होणार नाही.ते आतून घटित झालं पाहिजे आणि ते घटित झाल्यानंतर त्याचा प्रादुर्भाव झाल्यानंतर, सातत्याने तो संबंध परमेश्वराशी घटित झालेला हा संबंध आपण जपून ठेवला पाहिजे.
कुंडलीनीच जागरण करणे सोपे आहे आणि विशेष्य करून या भूमीत फार सोप आहे. हे साध्य झालेले आहे. पण त्यांची जोपासना मात्र तुमच्यावर अवलंबून आहे. त्या बाबतीत लोक हलके पडतात. ह्याचं मला मोठा आश्चर्य वाटत कि जर त्यांना पारायण करायला सांगितले तर रोज सकाळी चार वाजता आंघोळ करून पारायण करत बसतील. पण जर ध्यान करायला सांगितले तर लोक ध्यान करत नाहीत आणि ध्यानाशिवाय मनुष्यामध्ये गहराई येऊ शकत नाही. त्याच्यामध्ये ती गहनता येऊ शकत नाही. त्याची फार गरज आहे. गहन झाल्या शिवाय सातत्य राहणार नाही. तेव्हा तिकडे मात्र लोकांच लक्ष नसतं आणि ते करत नाही आणि त्यामुळे सहजयोगामध्ये लोक येतात पार होतात. पण त्यांची वाढ खुंटते आणि जिथल्या तिथे राहून जातात . तस करायला नको. तेव्हा आज असा निश्चय करायचा की जर माताजी नी आम्हाला जागृती दिली तर आम्ही स्वतःला जोपासून पुढे वाढवून आणखी त्याची वृक्ष तयार करू म्हणजे पुढच्या वेळेला माताजी येतील तर त्यांना अस दिसेल की आमच्या वृक्षाखाली हजारो लोक पावन झालेत. पार झाल्यानंतर तुम्हीसुद्धा लोकांना पार करू शकता. इथ अशी मंडळी आहेत काही तुमच्याच गावच्या जवळची की ज्यांनी हजारो लोकांना पार केलेले आहे. तेव्हा हे कार्य झालं पाहिजे. आताची जी नैतिक पातळी घसरलेली आहे. जगामध्ये जे सगळीकडे युद्ध पसरलेला आहे, हे सगळं वरवरच्या बोलण्याने आणि राजकारणाने बदलणार नाहीत. मानवाला बदललं पाहिजे आणि त्याला बदलण्याची विशेष वेळ आलेली आहे या वेळेबद्दल भृगु मुनींनी सुद्धा 14 हजार वर्षांपूर्वी लिहून ठेवलेलं होत, 1970 साली असा सहजयोग स्थापित होणार आहेत आणि हे कार्य होणार आहेत. तसच एक ब्लेक म्हणून विल्यम ब्लेक म्हणून एक फार मोठा कवी शंभर वर्षापूर्वी इंग्लंडमध्ये झाला. त्याने तर इथंभूत सगळ सांगितलेल आहे की हे कस होईल. आणखी त्याने इंग्लिश मध्ये व्यवस्थित सगळं लिहून ठेवलेलं आहे की कशाप्रकारे घडणार आहेत. तेव्हा ही घडण्याची वेळ आलेली आहे. आणि ह्या काळाला तुम्ही समजलं पाहिजे की हा काळ काय आपण कुठे, कोणत्या वेळेला जन्माला आलो किती महत्त्वाची वेळ आहे, ही वेळ टाळली नाही पाहिजे. जेव्हा संत साधू आले तेव्हा तुम्ही त्यांना ओळखलं नाहीत, त्यांना जाणल नाहीत. ते मेल्यावरती त्यांचे मोठमोठाले तुम्ही मंदिर बांधली, घर बांधली त्यांच्या नावावरती पुष्कळ मोठमोठाले, मोठमोठाल्या संस्था तुम्ही उत्पन्न केल्या. पण त्यांनी काय फायदा होणार. आज ह्या वेळेला वर्तमान काळामध्ये तुम्ही हे मिळवलं पाहिजे, त्यात वाढल पाहिजे, ही मेहनत करायला पाहिजे. आम्ही तुमच्या आई आहोत, तुम्हाला जे लागेल ते द्यायला तयार आहोत जे म्हणाल ते करायला आम्ही तयार आहोत.मेहनतीला आम्ही भीत नाहीत पण तुम्ही सुद्धा थोडस काहीतरी करायला पाहिजे. परमेश्वराने तुमच्यासाठी एवढ केले आहे तुम्हीसुद्धा परमेश्वरासाठी काहीतरी करायला पाहिजे. अस आई म्हणून मी तुम्हाला सांगते. मी तुमची कैवारी आहे. तुमच्यासाठी वाटेल ते मी करायला तयार आहे मी म्हटलेले आहे. पण तुम्हीसुद्धा थोडस शहाणपण दाखवायला पाहिजे. आणि ते जर शहाणपण आणि ती जरा मेहनत घेतली तर इथे या संगमनेर मध्ये अनेक साधू संत उभे राहतील आणि फार मोठे मोठे जीव इथे निर्माण होतील. तेव्हा अशी व्यवस्था सर्वांनी करावी आणि आजपर्यंत जी काही तुम्ही तपस्या केलेली आहे त्याच जे फळ आहे ते मात्र स्वतःला प्राप्त करून घ्याव. ते तुमचा आहे सहज, सहज 'स' म्हणजे तुमच्याबरोबर आणि 'ज' म्हणजे जन्मलेला असा योगाचा जन्मसिद्ध हक्क तुम्ही स्वतःला मिळवून घ्या. बाकी वेळ फार झालेली आहे म्हणून मी तुमचा वेळ जास्त घेणार नाही पण एक दोन प्रश्न असले तर विचारा तुम्ही. आणि प्रश्न विचारल्यानंतर आपण कुंडलिनी जागृतीचा कार्यक्रम करूया. इथे येऊन प्रश्न विचारा. म्हणजे ऐकायला येईल मला. आहेत का प्रश्न? असला तर विचारा. तर प्रश्न नसला तर मग तोच कार्यक्रम करू या ज्याच्यासाठी तुम्ही इतका वेळ थांबलेले आहेत. प्रश्न नाही म्हणजे लोक किती उत्सुक आहेत आणि अधीर आहेत हे ऐकून फार आनंद झाला. आहेत का प्रश्न?
इकडे पुढे येऊन सांगा मला, वरती. उपासना आणि कुंडलिनी जागृती यातल श्रेष्ठ काय आहे? उपासनेमध्ये लवकर काय मिळत? आणि कुंडलिनी जागृती मध्ये लवकर काय मिळत? हो सांगते बसा. उपासना दोन तऱ्हेच्या असतात एक म्हणजे अपरा आणि एक परा. एक अपराभक्ती असते आणि एक पराभक्ती असते. अपरा भक्तीमध्ये आपण जेव्हा माझी वाट बघत बसले तिथे तेव्हा ती अपरा, आपण मला भेटले नाहीत. माझ्या सम्मुख आले नाहीत ते अपरा झाली. पण जेव्हा साक्षात झाला तेव्हा पराभक्तीला सुरुवात झाली. अपरेनंतर पराभक्ती सुरु होते. आधी अपरा भक्ती तुम्ही केली ती उपासना झाली आणि त्याच्यापुढे जी झाली त्याला कृष्णाने अनन्य भक्ती अस म्हटलेल आहे. ती भक्ती मिळवली पाहिजे. ही अनन्य भक्ती आत्मसाक्षात्कारा नंतर सुरू होते. म्हणजे साक्षात्कारी लोकांना सुद्धा भक्ती केली आणि आपणही करतो. पण त्यांच्या भक्तीत आणि आपल्या भक्तीत फरक होता. ती जी गोष्ट आहे त्यांची जी भक्ती होती ती आपण मिळविली पाहिजे. तेव्हा आता सन्मुख आल्यावर आता साक्षात झाल्यावर, आपल्या आत्म्याचा संबंध झाल्यावर, हा योग घटित झाल्यावर मग जी भक्ती, ती खरी भक्ती. कारण त्याच्या पूर्वी आपण नुसता विश्वास धरुन करत होतो. त्याच्या मध्ये एक प्रकारचा आंधळेपणा होता. पण आता डोळस भक्ती आहे. ती डोळस भक्ती केल्यावर, ती परमेश्वर खरोखर किती मोठा आहे, तो किती सामर्थ्यवान आहे, किती प्रेमळ आहे. सगळ्यांची इतकी सुंदर जाणीव होते आणि इतक सगळ लक्षात येत की मनुष्याला आश्चर्य वाटतं की खरोखर इतका परमेश्वर मोठा आहे आणि तुम्ही स्वतः किती मोठे आहेत ते लक्षात येत. आता समजा ही एक समोर तुमच्या समोर वस्तू आहे, इन्स्ट्रुमेंट आहे पण ह्याला काही अर्थ नाही जोपर्यंत त्याला मेन्सला लावलेले नाही तोपर्यंत काही अर्थ आहे का? नुसती एक वस्तू समोर दिसते आहे हे असा आहे माईक आहे वगैरे ते कळतं पण याचा काही उपयोग होईल का, ह्याला काही अर्थ नाही. पण मेन्सला लावल्यावर याला अर्थ येतो. म्हणजे हे निरर्थक नाही आहे पण मेन्सला लावल्याशिवाय अर्थ लागत नाही म्हणून मेन्सला लावयाचे जे काम आहे ते कुंडलीनीने होते. झाल्यानंतर मग तुमच्या याला अर्थ लागतो. तुमच्या जीवनाला अर्थ लागतो. कळलं का? एकदम नवीन विषय असल्यामुळे कुंडलिनी जागृती म्हणजे याचा संबंध काय परमेश्वराशीआहे असं लोकांना वाटतं पण जस अगदी सरळ म्हणजे समजायच की हा कसा हे सगळे इन्स्ट्रुमेंट तयार झालेला आहे. हे क्वॉईल ठेवलेली आहे तस आपल्यामध्ये साडेतीन वेटोळयांच क्वॉईल म्हणजे कुंडलिनी आहे आणि ती उठून जेव्हा आपला संबंध परमेश्वराशी लावून देतो तेव्हा आपल्याला खरा अर्थ लागतो. त्याच्यानंतर मग आपली जी चेतना आहे ती मनुष्याची चेतनाआहे. ती एकदम सामूहिक चेतना होते. म्हणजे चेतना म्हणजे जाणीव होते म्हणजे काही डोक्याने नाही पण आपल्या हातामध्ये थंड थंड असे गार गार परमेश्वराच्या शक्तीचे वारे वाहू लागतात डोक्यातन अस वारं निघत आणि मग आपल्याला कोण्या माणसाला जरा आपण बघितल तर आपल्याला लगेच लक्षात येईल की त्याला काय त्रास आहे, त्याची कोणती चक्र धरली. मग ते कस नीट करायच ते जर समजल तर तुम्ही ते नीट करू शकता. तुमची चक्र कोणती धरली ते लक्षात येईल. म्हणजे मनुष्याला साक्षी स्वरुपत्व प्राप्त होत. आणि तो आपल्या ह्या साक्षी स्वरूपामध्ये एकदम सगळ्या गोष्टींना सम्यक रूपाने बघू लागतो आणि ज्ञानाच सुद्धा आपल अस आहे की जे काही आपल ज्ञान आहे ते बाह्यातलं आहे. अजून परमेश्वर आहे की नाही हे तरी तुम्ही कसे सिद्ध करून दाखवाल. पण एकदा आत्मसाक्षात्कार झाल्यावर तुमच्या हातामधून ज्या थंड थंड अशा लहरी येतात, म्हणजे तुम्ही कॉम्प्युटर सारखे होऊन जातात. मग जर तुम्ही प्रश्न विचारला परमेश्वर आहे का? तर थंड थंड हातात येईल, आणि जर एखादी गोष्ट असेल ती खोटी असेल तर तुमच्या हातामध्ये गरम गरम येईल नाहीतर हे वाइब्रेशन वर थांबतील. इतकंच नव्हे पण कधीकधी लोकांना थोडेसे फोड सुद्धा असे आल्यासारखे वाटतील क्षणभर. म्हणजे खोट काय आणि खरं काय, ज्याला आपण अबसोल्यूट म्हणतो. ते आपण होऊन जातो. कळल?
इथे देव नाही आहेत असं म्हणतात सगळेजणं, तेव्हा ह्या गोष्टी सर्व शास्राने सिद्ध होतात तर ह्या देवाचा आकार कोणी निर्माण केला?
देवाला कोण निर्माण करणार? जो सर्वांचा निर्माण करणारा आहे. आणि देव नाही असे म्हणणारे लोक सुद्धा आंधळे आहेत. त्यांचा काही आपण वाईट नाही वाटून घेतल पाहिजे. देव आहेत म्हणणारे तेही तसेच वागतात, देव नाहीत म्हणणारे तसेच वागतात. त्यावर कोणाचही आपण वाईट नाही वाटून घेतल पाहिजे. कारण देवाला सिद्ध केल्याशिवाय सुद्धा लोक मानत नाहीत म्हणून देवाला सिद्ध केले पाहिजेत. आणि देवाला निर्माण करणारा कोण आहे तो सर्वांचा निर्माण करता आहे त्याला कोण निर्माण करणार. हळूहळू सहजयोगात तुमच्या सर्व लक्षात येईल देव म्हणजे काय, देवाचे किती अंग आहेत. त्यांचे जसे आपल्या मनुष्याच्या शरीरात सुद्धा नाक, डोळे सर्व आहेत नंतर एखादा मनुष्याच समजा तो जर टीचर असला तर तो वडीलही असतो, तो कुणाचा मुलगा ही असतो. कुणाचा पतीही असतो. तसे देवाचे अनेक रंग आहेत आणि ती अंग काय आहेत आणि आपल्या मध्ये कस त्यांचा वास वगैरे आहेत, कुठे देवी-देवता बसलेले आहेत. ते सगळं तुम्हाला अगदी व्यवस्थित आम्ही सांगणार आहोत. आणि ते सांगितल्यानंतर ते आहेत किंवा नाही त्याचा पडताळा सुद्धा तुम्ही घ्यावा. आणि घेतल्यानंतर मग ते सिद्ध कसे करायचे ते फक्त शिकायच, ते झालं म्हणजे तुम्ही सिद्धपुरुष झालात. सगळं काही फुकट. परमेश्वराला पैसा कशाशी खातात ते माहीत नाही. जे लोक देवाच्या नावावर पैसे कमवतात पोट भरून, ते वाईट लोक आहेत. तसं करायला नको पण आता करतात त्याला काय करा. तुम्ही त्याला कारणीभूत आहात, तुम्ही देऊ नये पैसे अशा लोकांना.
तुम्ही देतात म्हणून ते लोक आपले पोट भरतात. म्हणून मग लोक म्हणतात देव नाहीयेत कारण जर देव असता तर असे वाईट लोक कशाला देवाचे नाव घेतात. पण कोणी चांगल्या वस्तूचा नेहमी लोक वाईट गोष्टीसाठी उपयोग करत असतात. एकदा आमच्या मुंबईला दारूच स्मगलिंग चालल होत तर त्यांनी काय केल गीतेची पुस्तके केली. आणि त्या पुस्तकांमध्ये आत मध्ये जागा पोकळ ठेवून त्याच्यामध्ये असे ते त्या दारूच्या बाटल्या ठेवल्या. म्हणजे गीतेला कोण प्रश्न करेल? म्हणून तस देवाचा झालेल आहे. देवाचं नाव घेऊन वाटेल ते करायच. देव वाईट आहे असं नाही काही. आता आणखीन काय!. तो आहे किंवा नाही हे सिद्ध फक्त कुंडलिनी जागृतीने होत. नाहीतर होत नाही. ते करून घ्याव. त्याच्या नंतर आपण बोलूया. बर का, ह. आता तुमच्यामध्येच हे आहे कुंडलीनी तुमच्यामध्येच आहे आणि जागृती तुमच्यामध्ये होणार आहे. तर मी जस सांगते तस थोडस ऐकून घ्याव आणि ते जर घटित झाल तर उत्तम नाहीतर पुढे बघूया. आता काय करायच सर्वप्रथम मी म्हटल आहे की ही भूमी फार पुण्यभूमी आहे. तेव्हा तिला नमस्कार त्रिवार करायचा आहे या भूमीला की ह्या वेळेला मोक्षाचा आमचा क्षण आलेला आहे, तेव्हा तुमचा आशीर्वाद आई आमच्यावर असावा म्हणून आधी तिला तीन वेळा नमस्कार करावा. आता तुम्ही जमिनीवर बसला, श्रद्धेने केला जमीन फार पुण्यवान आहे. फार श्रद्धेने तिला तीन वेळा नमस्कार केल्यानंतर, हात जोडून श्रीगणेशाला अस म्हणायच की हे गणराया हा माझ्या मोक्षाचा क्षण आहे. या क्षणी तू कृपा करून माझे रक्षण कर, अस तीनदा त्यालाही म्हणायच. डोळे मिटून श्रद्धेने म्हणायच. श्रद्धाही धरायला पाहिजे, शिक्षणामध्ये जर तुम्हाला श्रद्धा नसली तुम्हाला शिक्षण येणार नाही. शाळेत आल्याबरोबर जर तुम्ही भांडायला सुरुवात केली तर तुम्हाला शिक्षण कस येणार. तेव्हा श्रद्धे पूर्वक गणरायाला म्हणायच की “हे गणराया तू माझे रक्षण कर”. अशी प्रार्थना झाल्यानंतर सगळ्यांनी डोक्यावरच्या टोप्या वगैरे काढून ठेवायच्या कारण ब्रह्मरंध्र हे डोक्याच्या इथे आहे. दुसर अस कि आम्ही आई आहोत तर आम्ही काही आमलदार नाही आहोत आमच्यासमोर टोप्या कशाला काढायच्या, आम्ही आपल्याच आहोत न. आईजवळ आपण कस खूल बसतो, तिच्याशी आडपडदा नसतो. तस अगदी खूल बसायच विश्वास ठेऊन, आरामाने स्वतःवरही विश्वास ठेवला पाहिजे कि हे आम्हाला होईल, नक्की होईल, अशी आशा धरून बसायच. आता चष्मे सुद्धा काढून ठेवले बरे कारण ह्यांनी डोळे सुद्धा बरे होतात आणि दोन्ही हात माझ्याकडे असे ठेवायचे. मांडीवर आरामात अगदी आरामात बसा आणि डोळे मिटून घ्यायचे. डोळे उघडू नका. डोळे अगदी उघडायचे नाहीत काही असले तरी. आणि डोळे मिटून घ्या व्यवस्थित मी जेव्हा म्हणेल तेव्हाच डोळे उघडायचे. फक्त एवढ केल की झाल मग मी सांगते पुढच काय ते. आता मी आपल्याला सांगितल आपल्या मध्ये जो आत्मा आहे तो आपल्याला मिळवला पाहिजे आणि आत्मा हे परमेश्वराच आपल्या मध्ये पडलेले प्रतिबिंब आहे. तो साक्षी स्वरूप सगळे बघत असतो. पण आपल्यात अजून चित्तात आलेला नाही. म्हणून डावा हात माझ्याकडे करायचा आहे. डावा हात हि इच्छाशक्ती आहे. म्हणून माझ्याकडे डावा हात सारखा ठेवायचा म्हणजे तुमच्या मध्ये इच्छा आहे की तुम्हाला आत्मज्ञान मिळाला पाहिजे. हा आपला वारसा आहे आणि तो मिळणार तर त्याबद्दल शंका करायची नाही. डावा हात असा मांडीवर व्यवस्थित ठेवायचा आरामात आणि उजवा हात त्याच्यामध्ये क्रिया शक्ती आहे. म्हणून तो उजवा हात हृदयावर ठेवायचा आहे. प्लीज कीप यूअर लेफ्ट हॅन्ड टोवर्डस मी अँड राईट हॅन्ड ऑन यूअर हार्ट. कारण हृदयामध्ये आत्म्याचे स्वरूप आहे. म्हणून हृदयातून मनापासून मला एक प्रश्न विचारायचा आहे. जोराने हृदयातच विचारला तर बर होईल कि श्री माताजी मी आत्मा आहे का? असा प्रश्न विचारा अगदी खरोखर म्हणजे त्याला म्हणतात बुनियादी, दि फंडामेंटल असा प्रश्न आहे, की मी आत्मा आहे का? असा तीनदा प्रश्न विचारा. नम्रतेने विचारला पाहिजे. कारण तुम्ही आहात पण आधी प्रश्न विचारा. आता तुम्ही जर आत्मा आहात तर आत्मा तुमचा गुरु सुद्धा आहे आणि म्हणून हा उजवा हात खाली पोटावर ठेवायचा आहे. डावीकडे सगळ काम डावीकडे. डावा हात सारखा माझ्याकडे सतत ठेवायचा आणि उजवा हात डावीकडे पोटावर ठेवून परत प्रश्न विचारायचा आहे जर मी माताजी आत्मा आहे तर मीच माझा गुरु आहे का? श्री माताजी मीच माझा गुरु आहे का? असा तीनदा प्रश्न विचारा. आता हे सर्व चक्रच आहे आणि या चक्रांवर मी तुमचा हात ठेवून तुमच्याकडून तुमची कुंडलिनी उठवणार आहे. आता हा उजवा हात खाली ओटीपोटावर ठेवायचा आहे. ह्या ओटीपोटामध्ये शुद्ध विद्या आहे. ज्या विद्द्येने आपण परमेश्वराला जाणतो, त्याचे कायदेकानून जाणतो. त्याच्या सर्व शक्त्यांना जाणतो.ही ती विद्या तिला शुद्ध विद्या असे म्हणतात. म्हणून या ठिकाणी उजवा हात धरायचा आहे जोरानी. आता एक गोष्ट आहे की तुम्ही मनुष्याला परमेश्वराने स्वतंत्र केल. तेव्हा जर त्याला जर पूर्णपणे स्वतंत्र करायच असेल तर त्याला पहिल्यांदा त्याची स्वतंत्रता वापरता आली पाहिजे. म्हणून परमेश्वराने तुम्हाला अगदी स्वतंत्र केलेल होत. तुम्ही चुका केल्या असतील किंवा ठीक केले असेल, पुण्य केले असेल ,पाप केले असेल, काय असेल तरी ह्या वेळेला ते विसरून जायच आणि ह्या वेळेला मात्र मी तुमच्या स्वतंत्रतेला घाला घालू शकत नाही. तेव्हा तुम्हाला मागून घ्यावे लागेल आणि म्हणाव लागेल की माताजी तुम्ही मला कृपा करून शुद्ध विद्या द्या. म्हटल्याशिवाय मी जबरदस्ती करू शकत नाही. तिथे माझी मर्यादा आहे, म्हणून आपण अस म्हटल पाहिजे माताजी तुम्ही मला शुद्ध विद्या अस सहादा म्हणा. ह्या चक्रामध्ये सहा पाकळ्या आहेत. म्हणून तुम्हाला म्हणायचं माताजी मला तुम्ही शुद्ध विद्या द्या. कृपा करून तुम्ही मला शुद्ध विद्या द्या. प्लीज पुट युअर हॅन्ड ऑन स्टमक ऑन द स्वाधिष्ठाना अँड प्लीज आस्क फॉर द शुद्ध विद्या.
आता हा उजवा हात परत पोटावर वरच्या बाजूला ठेवायचा आहे. इथे गुरुच चक्र आहे. आता तुम्ही शुद्ध विद्या मागितल्यावर तुम्ही आता पूर्ण उत्साहाने आणि विश्वासानेअस म्हणायच की श्री माताजी मीच माझा गुरु आहे अस म्हणायच. पूर्ण विश्वासाने. अस दहादा म्हणायच. श्री माताजी मीच माझा गुरु आहे. प्लीज से टेन टाइम्स, मदर आय एम माय ओन मास्टर.
आता हा हात वरती परत हृदयावर ठेवायचा आहे. ह्रिदयावर परत हा हात ठेवायचा आहे. प्लीज कीप युअर हॅन्ड ऑन युअर हार्ट. या ठिकाणी आता परत तुम्ही पूर्ण विश्वासाने म्हणायचे कि मी माताजी मी आत्मा आहे. अस पूर्ण विश्वासाने म्हणायच. माताजी मी आत्मा आहे. प्लीज से हिअर विथ फुल कॉन्फिडन्स मदर आय एम द स्पिरिट. कृपया पूर्ण विश्वास से हृदय पे हाथ रख के बारा मर्तबा कहिये कि मैं आत्मा हूं. बारंदा म्हणायच, प्लीज से ट्वेल्व्ह टाइम्स. मी आत्मा आहे, माताजी मी आत्मा आहे अस हृदयापासून म्हणायच.
आता हा उजवा हात खांद्यावर ठेवायचा आहे मानेच्या जवळ,मानेच्या जवळ, खांद्यावर ठेवायचा आहे. हे चक्र फार धरतं. आपल्या महाराष्ट्रात, म्हणजे मी फार वाईट. मी पती, मी अमुक, मी तमुक. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण आपल्याला कमी लेखत असतो. जर तुम्ही आत्मा आहात तर तुम्ही निष्पाप आहात, शुद्ध आहात, निर्दोष आहात. त्या ठिकाणी हा हात ठेवून म्हणायच, श्री माताजी मी आत्मा आहे आणि मी निर्दोष आहे, अस सोळादा म्हणा. श्री माताजी मी आत्मा आहे आणि मी पूर्णपणे निर्दोष आहेत, अस म्हणा. पूर्ण विश्वासाने म्हणायचआहे. त्याबद्दल शंका करायची नाही. तसे पहिला तर परमेश्वर हा आनंदाचा सागर आहे, सुखाचा सागर आहे. दयेचा सागर आहे. पण सर्वात मुख्य म्हणजे क्षमेचा सागर आहे. म्हणून तुमची अशी कोणचीही चूक होऊ शकत नाही की त्याच्या क्षमेच्या सागरामध्ये क्षमस्व होणार नाही. हे सोळादा म्हणायला पाहिजे. या चक्राला सोळा पाकळ्या आहेत म्हणून सोळादा म्हणायच आहे. कि मी आत्मा आहे आणि मी निर्दोष आहे. प्लीज पुट युअर हॅन्ड ऑन युअर नेक ऑन द विशुद्धी चक्रा अँड से सिक्सटीन टाइम्स मदर आय एम नॉट गिल्टी. सोलह मर्तबा अपने गर्दन के पास हात रख कर के आप कहीये की माँ मैं निर्दोष हूं.सोलह मर्तबा कहीये.
आता उजवा हात आपल्या कपाळावरती आडवा धरायचा आहे. प्लीज होल्ड युअरहॅन्ड ऑन टॉप ऑफ युअर फोर हेड अक्रॉस. अपने माथे पर हात आडा रख लिजिये. और कहीए, कृपा करून म्हणायचआहे इथे, हे क्षमेचे स्थान आहे, श्री माताजी की मी सर्वांना क्षमा केली, मी हृदयापासन सर्वांना क्षमा केली. कारण जर आपण दुसऱ्यांना क्षमा करू शकत नाही तर परमेश्वर सुद्धा आपल्याला क्षमा करणार नाही. म्हणून मी सर्वांना क्षमा केली अस म्हणा फार हलक वाटेल तुम्हाला. प्लीज से मदर आय फॉर्गिव्ह एव्हरीवन. यहा पर हाथ रख कर कहिये की माँ मैंने सबको माफ कर दिया. ये बहुत आसान है कहना, हे म्हणणे फार सोपे आहे. कठीण नाही आहे, पुष्कळ लोक असे म्हणतात की आम्हाला नाही अस म्हणता येत की आम्ही क्षमा नाही करू शकत. पण जर तुम्ही क्षमा नाही करत तर करता काय? तुम्ही स्वतःला त्रास देऊन राहिलेत त्या माणसाला क्षमा नाही केली त्याला तर त्रास होत नाही ना,मग कशाला अस म्हणायच नाही की माताजी मी सर्वांना क्षमा केली. पूर्ण हृदयाने म्हणायच.
हा उजवा हात आपल्या टाळूवर ठेवायचा. तळहात दाबून धरायचा टाळूवर आणि घड्याळ्याच्या काट्यासारखा फिरवायचा दाबून धरायचा. टाळूवर आणि घड्याळ्याच्या काट्यासारखा फिरवायचा. आपली जी टाळू आहे तेच ब्रह्मरंध्र आहे. त्याच्यातून कुंडलिनी निघाल्यावरच आपण सूक्ष्मतेला प्राप्त होतो. तेव्हा जरा हळूहळू त्याला अस फिरवायचं . आता या ठिकाणी परत आपली स्वतंत्रता मी घेऊ शकत नाही. म्हणून आपण म्हणायला पाहिजे की माताजी मला आत्मसाक्षात्कार पाहिजे, मला तो आपण कृपा करून द्यावा. माताजी आपण कृपा करून मला आत्मसाक्षात्कार द्यावा. अस सातदा म्हणायला पाहिजे. हळूहळू तुम्ही हात असा फिरवा.
ॲट धिस पॉईंट आय कॅनॉट टेक युअर फ्रीडम यु ह्याव टू से मदर प्लीज गीव मी माय सेल्फ रीयलाझेशन. ट्राय टू प्रेस युअर हॅन्ड ऑन टॉप ऑफ युअर फॉंन्टिनेल बोंन एरिया अँड मूव्ह इट क्लॉकवाईज. अपने टालू भाग में अपना हाथ रखकर के उसे जोरसे दबा कर उसे आप घडी के काटे जैसें घुमाए और उस वक्त आप कहिए की माँ आप मुझे आत्मसाक्षात्कार दिजीये क्यूँ की मे आपकी स्वतंत्रता छीन नही सकती. आप खुद कहाना पडेगा आप मुझे दीजिए. सात मर्तबा कहीए गा. प्लीज से सेव्हन टाइम्स. आता हात खाली ठेवायचा डोळे उघडू नका. हात खाली, डावा हात ठेवला होता तसाच उजवा हात ठेवायचा आहे. आणखीन डावा हात आता डोक्यावर ठेवायचा, टाळू ठिकाणी आणि तसाच फिरवायचा आहे. आता बघा की उजव्या हातामध्ये थंड येत आहे का?
प्लीज पुट युअर राईट हॅन्ड ऑन लॅप, अँड लेफ्ट हॅन्ड ऑन हेड अँड जस्ट ट्राय टू प्रेस द वे यु हॅव डन बिफोर अँड सी इफ देअर इज कूल कमिंग इन युअर राईट हॅन्ड. नाऊ पुट युअर लेफ्ट हॅन्ड अगेन बॅक, परत डावा हात जिथे होता तिथेच ठेवायचा आहे आणि उजवा हात टाळूवर अधांतरी धरायचा आहे जवळजवळ चार-पाच इंच आणि बघायच आहे की येत आहे का थंड. प्लीज लिफ्ट युअर हॅन्ड अबाउट फाईव्ह इंचेस अबाव्ह फॉंन्टिनेन्ल बोंन एरिया अँड सी देअर इज कूल ब्रिज कमिंग आऊट विथ राईट हॅन्ड, लेफ्ट हॅन्ड टोवर्डस मी. बघा येत आहे का? येत आहे? छान, आता हीच कुंडलिनी आहे. हीच तुमच्यातली कुंडलिनी जागृत होऊन तुमच्या ब्रह्मरंध्रातून निघत आहे. आता उजवा हात माझ्याकडे करून डाव्या हाताने बघा.
आता आणखीन एक संतुलनासाठी करायला पाहिजे. की सगळ्यांनी डोळे उघडायचे, पण विचार नाही करताना ते केलं पाहिजे. डावा हात माझ्याकडे करा, विचार नाही करायचा, माझ्याकडे बघा विचार न करताना. डावा हात माझ्याकडे आणि उजवा हात जमिनीवर ठेवायचा आहे. जमिनीवर, म्हणजे ही जमीन जी आहे पृथ्वी तत्व तुमच्यातील जे काही तमोगुणी असेल ते ओढून घेईल. डावा हात माझ्याकडे आणि उजवा हात जमिनीवर ठेवायचा आहे. हे तमोगुणाला ओढण्यासाठी. आता उजव्या हात माझ्याकडे. पुट युअर राईट हॅन्ड टोवर्डस मी अँड लेफ्ट हॅन्ड टोवर्डस द स्काय. आणि डावा हात असा वरती आकाशाकडे मागे कसा करायचा. असा समोर नाही असा मागे. ऍट द बॅक, पुट युअर हॅन्ड ऍट द बॅक. आता हे रजो गुणाला, जे काही रजोगुणाचे दोष आहेत ते आकाश तत्वात घालण्यासाठी. हळूहळू हातात थंड थंड वाटू लागेल. पण विचार नाही करायचा, माझ्याकडे बघताना विचार नाही करायचा.निर्विचारिता तुमच्यात आलेली आहे. तेव्हा विचार नाही करायचा. पुष्कळांच डोकं भारी आहे त्यांनी अस म्हणायच माताजी माझ्या डोक्यात या. कारण डोकं सुद्धा भारी अशाने होत थोडासा विश्वास पाहिजे न माझ्या वर तरी. तुम्ही एवढी मोठी गोष्ट मागायला आलात तर समजा तुम्हाला तुमच्या प्रोफेशनमध्ये विश्वास नसला तर तुम्हाला कशी विद्या येणार. काही मला तुमच्याकडून नको आहे. तर विश्वास करायला हरकत नाही. तर माताजी माझ्या डोक्यात या असा म्हणायच. म्हणजे डोकं हलक होईल. आता दोन्ही हात माझ्याकडे घ्या. दुसरी गोष्ट अशी कि तुमची पुष्कळ सगळ्यांची कुलदेवता आहे, देवता आहे. त्यांना तुम्ही मान्य करता. पण ते तुमच्या समोर साक्षात आले तर तुम्ही ओळखू शकत नाही आणि तिथेच रुकावट होऊन जाते. तर आता शक्ती एकच असते. आम्ही असो किंवा साईनाथ असो किंवा राम असो, कृष्ण असो शक्ती एकच असते. म्हणून प्रश्न असा विचारायचा कि जी तुमची कुलदेवता असेल, ज्याला मानत असाल. समजा दत्तात्रयाला म्हणतात किंवा कोणालाही. तर असा प्रश्न विचारायचा मनामध्ये कि “श्री माताजी तुम्ही दत्तात्रय आहात का?" किंवा श्री माताजी तुम्ही साक्षात भवानी आहात? कोणताही असा प्रश्न विचारा जर गोष्ट खरी असेल तर तुमच्या हातामध्ये थंड थंड असा गार वारा येईल.
सरळ विचारायच मनामध्ये, याबाबतीत मला भीती वाटत नाही, आणि तुम्ही विचारायला कचरायचे नाही. पुष्कळांच आणि सुटेल. ज्यांची तुम्ही उपासना केली ते तुम्ही साक्षात आहात का अस विचारायच. येते आहे का गार हातात? येते आहे का? बर, आता दोन हात असे वर करा आणि आता असा प्रश्न करायचा की ही जी आम्हाला हातात गारगार शक्ती लागली, ब्रह्म शक्ती आहे का? हि परमेश्वराची जिवंत शक्ती आहे का असे विचारायचा प्रश्न. तीनदा विचारायच. ही परमेश्वराची जिवंत ब्रह्म शक्ती आहे का? अस तीनदा प्रश्न विचारायचा. येते का गार?. बर बर ओरडायचं नाही. शांतपणे ऐका.झाले तुम्ही पार झाले.तुम्ही पार झाले. ज्यांच्या हातात आल ते पार झालेत. आता पार झाले म्हणजे हातातली शक्ती जर आपण वापरली नाही तर कस कळणार. समजा जर तुम्हाला उद्या आम्ही लंडनचे पैसे दिले तर तुम्हाला त्याची किंमत काय करणार जोपर्यंत तुम्ही बाजारात जाणार नाही. त्या बाजारात जाऊन बघायच म्हणजे लोकांच बघायच लोकांच याच्यावरती. आता आपापसात तुम्ही बघा गार येताय का? आपापसात बघा एक-दुसर्याच. बघा दुसऱ्यांच्या डोक्यावरती गार येताय का? स्वतःचा तर येत आहे पण दुसऱ्यांच्या येते की नाही बघा आपापसात.
कळेल तुम्हाला येते की नाही? नाही वरती वरती बघा वरती हा वर बघा, दुसऱ्यांच ही बघा स्वतःचं बघता येत तस दुसऱ्यांच बघता येत. बोलू नका. शांत राहिलं पाहिजे. आता ही वापरायची कशी शक्ती ते शिकलं पाहिजे आणि ती कशी वापरायची त्यासाठी आमच्याकडे पुस्तक वगैरे आहेत. ती तुम्हाला पाठवू आम्ही, तसंच माझ्या फोटोवर सुद्धा चैतन्न्याच्या लहरी आहेत. हे आश्चर्याची गोष्ट आहे कि फोटोमध्ये सगळ्या चैतन्न्याच्या लहरी आलेल्याआहेत. तेव्हा मी तुम्हाला फोटो सुद्धा देऊ आणि त्या फोटोचा उपयोग कसा करायचा ते तुम्ही जरा शिकून घेतला पाहिजे आणि त्या फोटोकडे ध्यान लावायच्या वेळेला आता जस तुम्ही डावा हात ठेवला आधी, तसा डावा हात ठेवून जमिनीवर ठेवायचा, एक दिवा ठेवायचा. उजवा हात ठेवतांना दिवा नको. त्यावेळेला पाणी ठेवायच. जर तुमच्या डाव्या हातात जास्त येत असल उजवा हात ठेवायचा. ज्या हातात येत नाही तो हात फोटो कडे करायचा. आणखीन त्याच्यासमोर ज्यावेळेला तुम्ही आकाश तत्व लावाल तेव्हा दिवा ठेवायचा नाही. पण ज्या वेळेला तुम्हाला पृथ्वी तत्त्वाची तुम्हाला मदत लागेल. म्हणजे डाव्या हातात कमी होईल तेव्हा दिवा ठेवायचा आणि जेव्हा आकाश तत्वात असेल पायाखाली पाणी ठेवून त्यात थोडे मीठ घालून, पाच मिनिट बसल एकदम स्वच्छ वाटेल झोपायच्या आधी. तर आपण कोण आहोत ते पाहिल पाहिजे आधी. आपण रजोगुणी आहोत की तमोगुणी आहोत. जर आपल्या हातामध्ये डाव्या हातामध्ये येत नसल तर आपण तमोगुणी आणि जर उजव्या हातामध्ये येत नसल तर आपण रजोगुणी आहोत अस धरल पाहिजे. आणि तसंच आपलं जो हात आपला ज्याच्यात येत नाही तो हात फोटोकडे करायचा.
आता पुढे त्याच बंधन कसे द्यायची ते सुद्धा शिकवल पाहिजे तुम्हाला आत्ताच कारण परत मी ह्या वर्षी काही येणार नाही. तेव्हा फार सोप काम आहे. स्वतःला बंधन कस द्यायचा आणि कुंडलिनी जागृत कशी करायची स्वतःची. स्वतःची आता तुमची जी कुंडलिनी आहे ती आता वर आली पण परत ती खाली पडण्याची संभावना असते. कारण जर तुमच्यात दोष असले, तुम्हाला काही आजार असला, काही असला तर तिथे कुंडलीनी परत जाते आणि तिथे ती बघते कारण ती तुमची आई आहे न. ती सगळ ठीक करायच्या मागे असते तेव्हा तिची मदत केली पाहिजे. तर जिथे तुम्ही बसला तिथे समोरच अशी कुंडलिनी असा हात ठेवायचा. समोरचा असा डावा हात. असा ठेवायचा आणि उजवा हात त्याला असा असा हळूहळू असा लपेटत जायचा. असा वर पर्यंत आणायचा. म्हणजे आधी वर समोर आणि खाली. बघा आता सर्वांनी करायच. लक्षपूर्वक या हाताकडे बघायच, लक्षपूर्वक केल पाहिजे. बघा आता हा हात असा मग असा पुढे असा खाली असा तीनदा फक्त करायला लागणार आता इथे आल्यावरती आपले जे खांदे आहे ते मोकळे सोडायचे आणि डोक्यावर घेऊन डोक अस मागे टाकून आणि याला अशी वेटोळे घालायचे दोन-चार जोरात आणि मग त्याला एक गाठ मारायची . परत हात कसा ठेवायचा हा हात असा - असा फिरवत जायचा असा, असा फिरवत फिरवत असा परत वर आणायचा आणि परत खांदे मोकळे सोडायचे डोक वर घ्यायच परत एकदा अशी गाठ बांधायची आणि सोडायची तिसऱ्यांदा तीन गाठी म्हणजे नीट गाठ होतील. परत मागे अस खांदा सोडून एक गाठ परत वेटोळे घालायचे, दोन गाठ परत वेटोळे घालायचे तीन गाठ.
आताही झाल्यानंतर स्वतःच्या स्वतः जे काही प्रकाश बाहेर आहे आपण बंधन घेतल पाहिजे. त्याला कवच अस म्हणतात. देवीच कवच किंवा आईच कवच असत ते. ह्या हातात हा हात असा ठेवायचा आणि उजव्या हाताने इकडून सुरू करून असा आणून एक इकडे घालायच. परत सुरु करू आपण. आता इकडून एक व्यवस्थित डोक्यावरन घ्या. परत 2. परत 3, परत 4 डोक्यावरून,परत 5, परत 6 आणि शेवटल ते 7. सात चक्रांना आपण हे दिलेला आहे. आता बघा हातात जास्त येईल तुमच्या. आता बघा हातात, हात असे ठेवा. हातात बघा आता येतं का?. हात बांधून नाही ठेवायचे. यावेळेला घ्यायची वेळ आहे
येताय? बंधन घेतली का तुम्ही? म्हणजे बाहेरची कोणतीही वाईट शक्ती तुम्हाला नाश करू शकत नाही. याचा अर्थ असा तुम्ही स्वतःच्याच हाताने स्वतःला बंधन घेतलेली आहेत. आता मी पुढच्या वर्षी परत येईल आपल्याला भेटायला. तेव्हा काय झाल ते सांगा मला. परत इथे काही मंडळी आहेत ते आपल्याला भेटतील. इथे आहेत का? रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजता. गायत्री मंदिर मध्ये, गायत्री मंदिराशेजारी, सेंटर सुरू होणार आहे, सुतार गल्ली मध्ये तिथे, ह्यांच्याकडे त्यांनी विनामूल्य हॉल दिलेला आहे. आणि त्यांच्याकडे ह्याच सेंटर सुरू होणार आहे.
आता सांगायच, सांगायच म्हणजे सहज योगा मध्ये तुम्हाला सेंटरमध्ये याव लागत. अमृतनगर, साखर कारखाना, मुलांच्या शाळेमध्ये गुरुवारी संध्याकाळी साडेसहा वाजता.अमृतनगर साखर कारखाना गुरुवारी संध्याकाळी साडेसहा वाजता.तिथे सुद्धा मुलांच्या शाळेमध्ये केंद्र सुरू केलेल आहे. तेव्हा आपण तिथे येऊ शकतात. आता केंद्रात हे आलंच पाहिजे. जर तुम्ही म्हणाल माताजी फोटो नेला, घरी ध्यान करतो. तस चालत नाही. कारण सहज योग आज सामूहिक झालेला आहे.
म्हणजे तुम्ही परमेश्वराचे अंग प्रत्यंग आहात आणि ते अंग प्रत्यंग जागृत झालेले आहेत. आणि त्यांनी सर्व आपापसात भेटीगाठी केल्या च पाहिजे. म्हणजे तर जर भेटीगाठी झाल्या नाहीत तर कार्य पुढे होत नाही प्रगती होत नाही. त्याला मी एक साधारण घरातल हे सांगते कि आपल्याकडे आपण ताक घुसळून घेतो आणि त्याच्यातला जे लोणी मिळत त्याच्यात थोडासा लोण्याचा असा आपण तुकडा घालतो किंवा लोणी असा गोळा घालतो, त्या गोळ्याला मग लोणी चिकटत जात.
ते लोणी चिकटता चिकटता जेवढ चिकटलं तेवढे आपण उचलून घेतो आणि बाकीचे जे काही असेल लहान लहान कण, इकडे तिकडे ते आपण फेकून देतो. त्याला आपण लोणी मानत नाही.तसच आहे जी मंडळी चिकटून सगळयांना एकमेकाला दुसऱ्याला धरून चालली त्यांचीच खूप छान प्रगती, ती पण जी मंडळी अशी चालत नाही, आपल्या घरी आपला फोटो नेतील, ठेवतील पूजा करतील त्यांची प्रगती फार हलकी होते . म्हणून कृपा करून हे केंद्र सगळ अगदी फ्री आहे . तुम्हाला काही आजार असले, त्रास असले, प्रश्न असले काही असल तरी त्या केंद्रावर तुम्ही जाऊन विचारावं, तिथे तुम्हाला आमचे फोटो, नंतर त्याच्या शिवाय इतर पुस्तक वगैरे सगळं काही मिळेल. तेव्हा तुम्ही कृपा करून तीथे जाव, तसंच तुम्हाला काही आजार वगैरे असले तर आम्ही त्याला आपण व्हायब्रेटेड साखर म्हणतो , किंवा काही आता पुषकळांना लिव्हर चे फार त्रास इकडे मी बघितलं, त्याच्या इलाजासाठी कशाहीसाठी तुम्ही जाव ,आपली चक्र तपासून घ्यावी, कस ठीक करायचं ते शिकावं सगळं ज्ञान त्या सेंटर वर तुम्हाला मिळणार आहे. आज जर पार झाले तर अस नाही कि सगळं झालं. आणखीन जे लोक झाले नाहीत ते सुध्दा सेंटर वर जाव आणि हे कार्य करून घ्यावं.