Public Program

Public Program 1989-12-31

Location
Talk duration
34'
Category
Public Program
Spoken Language
English, Marathi

Current language: Marathi, list all talks in: Marathi

The post is also available in: English.

31 डिसेंबर 1989

Public Program

Brahmapuri (India)

Talk Language: English, Marathi | Transcript (Marathi) - Draft

पब्लिक प्रोग्राम

ब्रम्हपुरी, (भारत), ३१/१२/१९८९

या शाळेचे आद्यप्रवर्तक जिजाबा मोहिते यांनी हृदयाला पिळवटून टाकणारं असं भाषण केलेयं आणि मला खरोखर माझे अश्रू सुद्धा आवरता आले नाहीत. आपल्या देशातली गरिबी बघून जीवाचा नुसता कोंडमारा होतो आहे आणि बेचाळीस (१९४२) सालामध्ये आम्हीसुद्धा त्या लहानपणी स्वातंत्र्ययुद्धात होतो. माझे वडील आणि आई ह्यांनी गांधीजींना आपलं सर्वस्व वाहिलं होतं. आणि मी सुद्धा गांधीजींच्या बरोबर लहानपणापासून राहिलेली आहे. ती वेळ स्वातंत्र्य मिळविण्याची होती.

कॉलेजमध्ये असताना तेव्हा भारत छोडो चा नारा लागला. ९ ऑगस्ट च्या दिवशी आमच्या कॉलेजच्या समोर उभं राहून मी, प्रदर्शन केले. त्यावेळेला आमच्यावरती तोफा आणि बंदुका घेऊन सगळे उभे होते. त्याबद्दल आमचे त्यावेळचे जे कॉलेजचे मुख्य प्रिन्सिपल होते, त्यांनी या सहजयोग्यांना सांगितलं, की मला तेव्हाच वाटलं, की ही काहीतरी मोठी शक्ती असेल. की अठरा वर्षाच्या वयामध्ये या बंदुका आणि ह्यांच्यासमोर कशी उभी राहिली. एकटी मी उभी होते. मं ते कॉलेज आम्ही बंद पाडलं.

त्यानंतर बेचाळीस (१९४२) सालात मी, आध्यात्माचा विचार केला नाही. फक्त देशाला स्वातंत्र्य करण्याचा आणि त्यावेळेला आम्हाला त्या पोलिसांनी पकडून नेऊन इलेक्ट्रिकचे शॉक दिले, बर्फावर घातलं. आई माझी तिला वाटायचं अठरा वर्षाची मुलगी आहे, हिचे प्राण जाणार आणि जवळ-जवळ नऊ महिने मला भूमिगत व्हाव लागलं.

अशा प्रकारे जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. त्याच्यानंतर हळूहळू लोक कसे वाहवत गेले आणि ज्या कार्यासाठी स्वातंत्र्य मिळवलं होतं, की आपल्या देशातली गरीबी जावी, लोक कार्यशील झाले पाहिजेत, त्यांच्यामध्ये स्वच्छता आली पाहिजे, हे जे गांधीजींच सगळं काही देशाबद्दलच प्रेम होतं, ते कुठेतरी वार्‍यावर उडून गेलं. त्यामुळे अत्यंत ग्लानी आलीये मला, की हे कसलं स्वातंत्र्य मिळवलंय? ह्या स्वातंत्र्याचा काय उपयोग आहे आपल्याला. अशा रीतीने हे लोक स्वार्थी, स्वतःचे पैशे कमवायचे आणि सर्व देशाला बुडवायचे ह्या धंद्यात लागलेले आहेत.

आपल्याकडे देशाविषयी कळकळ असणारे लोक गेले कुठे? कुठेही गेलं, तरी हिच गरीबी बघून माझ्या जीवाला असं होतं, की कसं हे ठीक करायचं, कसं वागायचं. तसं पाहिलं तर आपल्या देशात भरभराट होऊ शकली असती. भरभराट होण्याचं कारण असं की, ज्या-ज्या देशाला बाहेरून मदत आलीये त्यापैकी आपल्या देशाला फारच मदत आलीये. बाहेरच्या देशातून आपल्या देशाला वर्ल्ड बँके (World Bank) ने पुष्कळ पैशे दिले, त्याबद्दल शंका नाही आणि ते पैशे आपल्यात न वापरताना आपण ते परत तिकडे स्वित्झर्लंड (Switzerland) ला पाठवून दिले. इथल्या गरीब लोकांचे पैशे घेऊन आपण स्वित्झर्लंडला सगळे पैशे पाठवले. त्यानंतर ते स्वित्झर्लंड पासनचं पैशे घेऊन वर्ल्ड बँक आपल्याला पैशे देत. म्हणजे.....(अस्पष्ट) आपण काहीही ने होताना आपण त्याच्यासाठी काय म्हटलं पाहिजे, की गरीब झालो, इतकंच नाही पण कर्जबाजारी झालो.

तर सहजयोग आमचा जो आहे, ह्यानी विश्व निर्मला धर्म म्हणून धर्म स्थापन केलेला आहे. म्हणजे जगातले सर्व धर्म आम्ही मानतो, गांधीजींच्या म्हणण्याप्रमाणे आणि सगळ्याच मोठमोठ्या संत-साधूंना आम्ही मानतो, सगळ्याच. गाडगे महाराजांना मी, भेटलेली आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल आणि त्यांनी मला ओळखलं होतं आणि त्यांनी मला म्हटलं होतं, की एकेकाळी असा काळ येईल, कारण ते सुद्धा स्वातंत्र्यवीर होते. तुकडोजी महाराज, गाडगे महाराज सगळे आमच्या घरी आलेलेत आणि त्यांनी सांगितलं, की तुम्ही त्या वेळेला मी, फार लहान होते. तरी सुद्धा त्यांनी मला ओळखलं आणि मला सांगितलं, की एक दिवस असा येईल, की तुम्ही या भारतवर्षाच कल्याण कराल. संतांच्या मागे आम्ही आहोत. एवढचं नव्हे, पण संतांच कार्य पुढे चालवायचे आम्हाला. संतांनी कधीही माणसाला दैववादी केलेले नाही किंवा कधीही त्यांनी त्यांच्या कर्तृत्वावर घाव घातलेला नाही.

आजकाल एकेक उपटसुंभ निघालेलेत. त्यांच असं म्हणणं हे, की तुम्ही नुसतं विज्ञानाची कास घ्या. आमच असं म्हणणं आहे, की तुम्ही सत्याची कास घ्या. विज्ञानात आपल्या हिंदुस्थानात कोणी शोध लावलेत, कोण मोठे विज्ञानी इथे बसलेले आहेत. आपला वारसाच मुळी आध्यात्माचा आहे. त्याला काळं फासून, तुम्ही विज्ञान घेऊन बसलात.

आता इथे आमच्याकडे कितीतरी तीन-चार असे लोक आलेलेत, की जे विज्ञानामध्ये फार निष्णात. इथे नसतील अशा त्यांच्या जवळ पदव्या आहेत. त्यात तीन-चार हिंदुस्थानी लोक सुद्धा आहेत. इथे नाही आलेले आणि त्यांनी शोध लावलेलेत अनेक शोध लावलेलेत आणि त्या शोधातून बरंच काढलेलं आहे. त्यात मी त्यांना काय सांगितलेलं आहे, ते सुद्धा त्यांनी मान्य केलं आणि त्याचा शोध लागला आणि त्यांनी सांगितलं, की माताजी तुम्ही सांगताय ते बरोबर आहे.

त्यापैकी एक गोष्ट मी, त्यांना सांगितलेली कार्बन अॅटम (carbon atom) म्हणून जो असतो, तो आपल्या मूलाधारात असतो. कार्बन अॅटमला चार व्हेलेन्सीज (valencies) असतात. आहो, हे तुमच्या अंधश्रद्धेच्या माणसाने माझं तीन तास, तीन तास डोकं खाल्लं. त्याला कार्बन म्हणजे काय? त्याचे व्हेलेन्सीज म्हणजे काय? हे सुद्धा माहीत नाही. हे कसलं विज्ञान करणारेत, गाढव. सांगा तुम्ही. ह्या लोकांना कसलं विज्ञान येणार आहे. हे लोक म्हणतात आम्ही विज्ञानीहोत. एका माणसाला धरून उभं करून ते काय सबंध लोक होताहेत, सगळे काय देश होतो.

आपली प्रगतीच विज्ञानात काही नाही. त्याला कारण असं आहे आपली प्रगती आध्यात्मात झाली ही परमेश्वराची इच्छा आहे. आपली आध्यात्मात एवढ्यासाठी एवढी प्रगती झालेली होती आणि होणार आहे. त्याला कारण असं, की झाडासारखं बाहेर सगळीकडे वाढलेलं आहे. विज्ञान हे झाडासारखं बाहेर वाढलंय पण त्याच्या मूळाची त्याला माहिती नाही. मूळाशिवाय ते झाड कसं राहणार, ते मूळही इथे आपल्या भारतात विशेषतः महाराष्ट्रात आहे. हे आध्यात्म नसल्यामुळे विज्ञानाला संस्कृतीच नाही. विज्ञानाला प्रेम कशाशी खातात ते माहिती आहे का? प्रेमाची व्याख्या करावी त्यांनी किंवा कोणतीही जीवंत वस्तू कशी कार्य करते त्याबद्दल ते काही सांगू शकत नाही. एका “बी” ला, एका “बी” ला जर तुम्ही मातीत घातलं तर ते कसं वर येत, त्याच्यात कोणची क्रिया घडते हे सांगू शकत नाही.

विज्ञानाला आपली मर्यादा आहे आणि आध्यात्माला मर्यादा नाहीत. पण त्याला अभ्यासिले पाहिजे, त्यात उतरलं पाहिजे आणि वाढ करून घेतली पाहिजे. विज्ञानाबद्दल अर्थात माझ असं म्हणणं आहे, की मी परवा मागेच सांगितल होत, की तुमच्याइथल्या मुलांना आम्ही विज्ञान वगैरे शिकवू, सगळं काही शिकवू, पण ते मुख्य नव्हे. विज्ञानाला नेहमी आध्यात्माची जोड पाहिजे. आता आमच्याकडे तीन असे मोठमोठाले होऊन गेलेले आहेत लेखक, आणखीन परत विज्ञानशास्त्री, की ज्यांनी मी, सांगितलेल्या गोष्टीवरती रिसर्च केला आणि तिन्ही गोष्टी त्यांनी सिध्द करून दाखविल्या.

पहिली गोष्ट अशी सांगितली मी, की कार्बन अॅटम मध्ये जर तुम्ही त्याचा जर फोटो घेतला आणि त्याच जर तुम्ही मॉडेल बनवलं, तर तुम्ही जर एकीकडून दुसरीकडे बघाल त्या अॅटमची मांडणी अशी आहे, त्यांच्या व्हेलेन्सीजची अशी मांडणी आहे, की तुम्ही डावीकडून जर तुम्ही बघितलं उजवीकडे तर तुम्हाला “ओंकार” लिहिलेला दिसेल आणि तुम्ही जर उजवीकडून डावीकडे बघितलं तर तुम्हाला “स्वस्तिक” दिसेल आणि जर तुम्ही खालून वर बघितलं तर तुम्हाला “क्रॉस” दिसेल आणि त्यांनी करून बघितलं आणि सिद्ध केलं, की असं झालेलं आहे. हे फार-फार मोठे सायंटिस्ट (Scientist) आहेत दोघजण. एक बेल्जियमचे आणि एक अमेरिकेचे आणि ते दोघेही फार मोठया जागेवर आज आहेत.

दुसरी गोष्ट मी, त्यांना अशी सांगितली, की माणसाच्या पुष्कळ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. जेव्हा आपल्याला चैतन्य येता हातामध्ये. खरं म्हणजे गाडगे महाराज त्या वेळेला एवढ्या स्वातंत्र्य युद्धात आणि ह्या सर्व कार्यात फसलेले होते, नाहीतर तर त्यांनी हेच कार्य केलं असतं. गांधीजींनी सुद्धा हेच कार्य केलं असतं. पण ती वेळ नव्हती, स्वातंत्र्याची वेळ होती. नाहीतर माझं जे कार्य आहे, ते त्यांच्यापासूनच आलय. त्यांनीच हे कार्य पुढे करायचं, स्वातंत्र्य मिळाल्यावर असं ठरवलेलं होत. पण करणार कसं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते किती दिवस राहिले, फारच कमी दिवस, ते सगळेच वैकुंठवासी झाले.

बरं मग दुसरी गोष्ट मी सांगितली, की आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये जीवात्मा असतो आणि तो आपल्या पाठीच्या कण्यावरती सात असे लूप्स करून बसलेला आहे. लूप्स म्हणजे, असे त्याला आपण म्हणू, की मराठीमध्ये (श्री माताजी बातचीत करताना – ह्याला काय म्हणतात त्रिज्या, त्रिज्या नाही, त्रिज्या म्हणतात. वर्तुळ, अर्ध वर्तुळ, अर्ध वर्तुळ) अर्ध वर्तुळांनी असे सात अर्ध वर्तुळ आहेत. ती अर्ध वर्तुळे पाठीवर बसलेली आहेत आणि तोच त्याने सगळी चालना होते आणि आत्मा आपल्या ह्रदयात आहे. तर आकाशात ते म्हणायला लागले की आम्हाला असे चैतन्य दिसतं.

आपल्या हिंदुस्थानात फार दिसतं असं लहान, लहान, लहान, लहान. असे पांढरे-पांढरे असे जसे काही अनुस्वरा सारखे. अनुस्वरा सारखे असे दिसतात आकाशात. कारण हे आत्मसाक्षात्कारी लोकांना दिसू शकतं, नाहीतर दिसू शकतं नाही. कारण दृष्टी तुमची सूक्ष्म व्हायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर ते म्हणाले असे आम्हाला लूप्स, लूप्स, लूप्स, लूप्स, फार दिसतात. हे असे अर्ध वर्तुळे एकात-एक घुसलेले हे आहे काय? माताजी. मी म्हटलं हे मेलेले जीव आहेत. हे अजून इथचं रेंगाळत आहेत. आणखीन हे आपली जी जीवात्मा आहे, त्याच प्रतिबिंब प्रत्येक आपल्या पेशीवरती आपल्या सेल (Cell) वर आहे. तर तुम्ही पत्ता काढा. शेवटी एक डॉक्टर मिश्रा म्हणून इथे आलेले आहेत ते फार मोठे सायंटिस्ट (Scientist) आहेत. त्यांनी सांगितलं, की त्यांनी सायन्स (Science) नी शोधून काढलं, की प्रत्येक सेल (Cell) वर असे आहेत, रीसेप्टर (Receptor) मध्ये असे अर्ध वर्तुळ सात-सात आहेत. म्हणजे आम्ही जे म्हटलेलं आहे त्याच्यावर त्यांनी शोध केला.

तिसरे एक गृहस्थ होते. त्यांनी सांगितलं, की शेवटला झिरो म्हणजे, झिरो पॉईंट ज्याला म्हणतो. आपण तो माइनस टू सेवन्टी थ्री डिग्रीज सेंटिग्रेड (minus two seventy-three degrees centigrade) आहे. म्हणजे तापमानाचा, सगळ्यात खालचा, माइनस टू सेवन्टी थ्री डिग्रीज [minus two seventy-three (-273) degrees]. तर एकाचा याच्यावरती रिसर्च चालला होता, की माइनस टू सेवन्टी थ्री डिग्रीज [minus two seventy-three (-273) degrees] ला च कसं जायचं. तर मी म्हटलं, की ते एकमेव आहे. एकमेव गोष्टीला तुम्ही पोहचू शकत नाही. कारण तुम्ही एकमेव नाही. तेव्हा सायन्स (Science) च्या सर्व प्रकार त्यांनी करून पाहिले. हीलियम (Helium) चा त्यांनी, मी हीलियम (Helium) वर म्हटलं होतं, तू प्रयोग कर आणि हीलियम (Helium) वर प्रयोग केल्यावरती त्यांनी पाहिलं, की जेव्हा हीलियम (Helium) थंड होतो, तर त्याच्यातले अणू-रेणू जे आहेत, ते अगदी व्यवस्थित सामूहिकतेने वागतात. अगदी सामूहिक वागतात. जसे काय पक्षी एकत्र चालले आहेत, असे वागायला लागतात. ते झालं पण मी, म्हटलं जर तुम्हाला एकमेव ह्या परिस्थितीत जायचंय तिथे, की त्याच टेम्परेचर (Temperature) तुम्हाला माइनस टू सेवन्टी थ्री डिग्रीज [minus two seventy-three (-273) degrees] आणायचं असलं, तर त्या ठिकाणी पोहोचताना तुम्हाला फक्त तुम्हाला चैतन्य वापरावं लागेल. नाहीतर जाणारच नाही आणि शेवटी चैतन्य वापरून त्यांनी ते साधून घेतलं.

तसचं तिसऱ्या एका माणसाने दारूचा परिणाम लिव्हर (Liver) वर काय होतोय? ह्याच्यावरती थीसिस (Thesis) लिहलं होत. त्याला मी, एक त्याच्यात पॉईंट सांगितला, तो लिहिल्या बरोबर तो नऊ वर्षांपासून तो थीसिस (Thesis) लिहित होता, ते पॉईंट सांगितल्या बरोबरच आणि ते सिद्ध झाल्या बरोबर, त्याला पी.एच्.डी. (Ph. D.) ची डिग्री मिळाली. त्याशिवाय तीन डॉक्टरांना आपल्या लंडनच्या, दिल्लीच्या तीन डॉक्टरांना एम्.डी. (M.D.) ची पदवी मिळाली. ती शास्त्रज्ञांनी दिलीये. ती काय, एम्.डी. (M.D.) ची पदवी तुम्हाला असा-तसा मनुष्य देऊ शकत नाही. शास्रज्ञ जे असतील तेच, एम्.डी. (M.D.) ची एवढी मोठी पदवी मिळते. त्यांनी एम्.बी.बी.एस्. (M.B.,B.S.) केलेलं होतं, त्यांना एम्.डी. (M.D.) ची पदवी मिळाली, ती शास्त्रज्ञाने. त्यातले एक डॉक्टर इथे आलेले आहेत. ह्यानी रोग कसे बरे होतात, त्यांनी सगळ्याचा पडताळा घेतला आणि हे लिहिलेलं आहे.

पण कुणी ह्या महाराष्ट्रात ऐकायला तयार नाही. आहो ही संतांची भूमी आहे, की भुतांची भूमी इथे, असं मला समजत नाही. इथे असे उपटसुंभ इतके निघालेलेत, की या लोकांना तुम्ही हाणून पाडलं पाहिजे. आपला स्वाध्याय करायचा नाही आणि आध्यात्माला मानायचा नाही आणि एक एकतर्फी जे काही जीवन ह्यांच चालेलं आहे. त्या जीवनामधून आता आपण जे परवा पाहिले नमुने, की खुनशीपणा जो झाला. या लोकांना मारलं, अठरा लोकांना जखमी केलं बाहेरच्या लोकांना, ह्यांनी काय यांच बिघडवलं होतं. यांना मारायची काय गरज होती. हा खुनशीपणा हे शिकवत आहे, हे कसले काय लोकांना चांगले बनवताहेत, सदृढ बनवताहेत, उलट अत्यंत निर्बल होतील आणि पुष्कळशा तिथल्या मुलांनी लहान, लहान मुलं घेऊन गेले होते. सोळा वर्षापासूनचे खालची मुलं, त्यांना नेऊन दगड मारायला शिकवलं. तर त्यांचे जे आई-वडील होते ते मला येऊन म्हणायला लागले, माताजी आमच्या मुलांच आता काय होणार? यांच तर भूत करून टाकलयं ह्यांनी. आता सगळ्यांना दगड मारत फिरणार उद्या आम्हालाही....(अस्पष्ट) आणि ह्या विज्ञानाचा इतका वाईट परिणाम परदेशात झालेला आहे, ते मी विज्ञान, मी फिरलेली आहे. जे लोक इथेच बसून....(अस्पष्ट) सारख्या पुण्याला बसून लिहित बसतात, त्यांना रजनीशच फार मोठा मनुष्य वाटतो. म्हणजे काय म्हणावं आता. त्याला तुम्ही बोलवाल का? या शाळेत कधी. खेडेगावातं त मार पडेल त्याला गेला तो तर. तर ह्या न्यूज पेपरवाल्यांना सुध्दा तुम्ही पत्र लिहिलं पाहिजे, की असल्या घाणेरड्या गोष्टी तुम्ही छापू नका. माताजी हे कार्य करतायत, तुम्हाला काही दिसत नाही, जे चांगलं कार्य करतायत त्यांच्याबद्दल काही लिहायला तुम्हाला नाही आणि अशा घाणेरड्या माणसाचे तुम्ही माउथपिस (mouthpiece) झालेले आहात.

तुम्ही सगळ्यांनी मिळून अशी चळवळ करायला पाहिजे, की ही भूमी संतांची आहे. सगळे संत खोटे असं ह्याचं म्हणणं आहे. ज्ञानेश्वरापासून जर सगळेच संत खोटे आहेत आणि हे अतिशहाणे निघाले. मी, त्यांना असं आव्हान दिलं, की तुम्ही मला आव्हान देण्यापेक्षा मी, तुम्हाला आव्हान देते, दोन ओळी तुम्ही संतज्ञानेश्वरांसारख्या लिहून....(अस्पष्ट). तर त्यांच म्हणणं असं आहे, की त्यांनी गीतेवरती टिका लिहिली. कबूल, पण त्यांचा अमृतानुभव बघा. आहो, रोज मी, त्याच्यातल्या चार ओळी वाचते. इतकं आनंददायी आहे ते, इतकं आनंददायी पण त्याला आत्मसाक्षात्कार पाहिजे ना, सूक्ष्म दृष्टी पाहिजे. या बोथट लोकांना काय समजणार आहे त्यातली महती. विज्ञानाने काय कविता होतात काय? कोण्या विज्ञानाने कविता केलेल्या मी तरी ऐकलेल्या नाहीत. हे जे आपल्या इथे एवढं मोठं परंपरेने दिलेलं धन आहे. केवढं धन दिलेलं आहे आणि हे संतांच कार्य आहे. काय काव्य आपल्याकडे केलेले आहे. रोज वाचावं, म्हणावं.

आता ही मंडळी तुम्हाला त्या काव्यातले एकनाथांच वगैरे भारूड सुद्धा म्हणून दाखवतिलं, आणि आनंद....(अस्पष्ट) आणि फक्त संतानीच हे कार्य केलेले आहे. संतांनी अंधश्रद्धा निर्मूलनात इतकं कार्य केलेलं आहे, की ते कोणीही केलेलं नाही. दासगणू काय म्हणतात, की,

आम्हांसी म्हणती ब्राम्हणं,

आम्ही जाणिले नाही ब्रम्हं,

आम्ही कसले ब्राम्हणं ।

नृसिंहसरस्वती होते, ते तर एखादा मनुष्य असा शेंदूरबिंदूर फासून बसला, त्याला जाऊन ठोकायाचे आणि त्याच्यावर नेऊन घाण करायचे, त्या मूर्तीवर, हे असलं काही करू नकोस. पैसे उकळत बसलात की त्याला हे....(अस्पष्ट). आता आम्ही हे सांगितलेलं, की देवाच्या कार्याला कोणी पैसे घेऊ शकत नाही आणि तुम्हाला माहिती आहे, मी, कोणाकडूनही एकही पैसा कधी घेतलेला नाही. ही इथे इतकी मंडळी बसलेली आहेत, त्यांना विचारा मी, कोणाकडूनही एकही पैसा घेतलेला आहे का? कार्य कसं होत आहे, देवकृपेनी लक्ष्मीचा हात आहे माझ्या हातात आणि पैशाची कधीच कमतरता झालेली नाही. ह्या शाळेला सुद्धा मी स्वतःचे पैसे दिले होते आणि या शाळेला मी देईल. पण ही मंडळी सुद्धा द्यायला तयार आहेत. पण त्यात एक अडचण आहे, की ह्यांना रिझर्व्ह बँकेकडे (Reserve Bank) जावं लागेल, त्यांची परवानगी घ्यावी लागेल. असं,तसं म्हणून मी स्वतःचेच तुम्हाला पैसे दिलेलेत. पण तुम्ही जर बरोबर तुमच्या शाळेचा आराखडा करून दिला तर, ह्यांना तुमच्या मुलांबद्दल भयंकर प्रेम आहे आणि भटक्या जातीची मुलं आहेत. काय हो, माझं ह्रदय नुसतं पिळवटून निघतं गरीबी बघून, माझं खरं सांगते....(अस्पष्ट) भटक्या जातीची मुलं आहेत. यांच्यासाठी काय करू नी काय नाही करू. पण माझे हात असे बांधलेले गेले आहेत, की आता इतके मी, पैसे तुम्हाला देऊ शकत नाही. माझी अशी इच्छा आहे ह्या लोकांनी तुम्हाला द्यावेत, त्यांचीही इच्छा आहे, पण मध्ये आता रिझर्व्ह बँकेची (Reserve Bank) आधी पर्मिशन (Permission) वगैरे घेऊन आम्ही व्यवस्थित तुम्हाला देऊ. आधी तुम्ही ह्याचा आराखडा काढून द्या आणि ही शाळा नाही, अशा अनेक शाळा आम्ही आपल्या हाताखाली घेतल्या, त्यांची लिस्ट (list) बनवलेली आहे आणि सगळ्यांना आम्ही मदत करणार आहोत.

जे लोक एकेकाळी या देशात राज्य करत होते, त्यांनी आम्हाला सुध्दा इतका छळ केला. माझी आई सुध्दा पाचदा जेल मध्ये गेलीये. तुमच्या फर्ग्युसन कॉलेजची (Fergusson College) ती ऑनर्स (Honours) होती. मॅथेमॅटिक्स (Mathematics) ची रँग्लर (Wrangler) परांजपे शिष्या होती. वडील माझे चौदा भाषेत निष्णात होते. आणि ते पूर्वीच्या काळाच्या असेम्ब्लीचे, सेंटर असेम्ब्ली (Assembly) चे, नंतर कॉन्स्टिट्यूट असेम्ब्ली (Constitute Assembly) चे, नंतर पार्लमेंटचे मेंबर (Parliament Member) राहिलेले आहेत.

सगळं काही त्यांनी देशासाठी त्यागलेलं आहे. आज असते गाडगे महाराज, तर त्यांनी आमच्या वडीलांना सांगितलेलं, हे संत सुद्धा त्यांना मानत असतं, की ह्यांनी माझे वडील सुद्धा फार मोठे संत होते आणि त्यांनी सांगितलं, की गृहस्थाश्रमात राहूनच त्यांनी संतपणा केलेला आहे. सगळं काही देशासाठी त्यांनी वाहून टाकलं आणि मुलांना कर्तबगार व्हायला सांगितलं. मी तुमच्यासाठी एकही पैसा ठेवणार नाही. तुम्ही कर्तबगार आहात आणि आमच्या सर्व भावंडांना त्यांनी अत्यंत चांगली शिकवण दिली. आता त्यात कितीजण ह्याच्यात उतरले किंवा नाही तो दुसरा प्रश्न आहे. पण सगळ्यांना कर्तबगार होण्याबद्दल त्यांनी शिकवलं आणि सांगितलं, आधी तुम्ही हिंदी आणि मराठी भाषा शिका. इंग्लिश भाषा इतकी सोपी आहे, की कोणालाही येईल. पहिल्यांदा आपली मातृभाषा शिकली पाहिजे, आणखीन आपली राष्ट्रभाषा यायला पाहिजे.

इतके तेजस्वी त्यावेळेला लोक होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल. मी बेचाळीस सालामध्ये माझ्यावरती खूप संकट आली. तर सांगायाच म्हणजे, की तुम्हाला आश्चर्य वाटेल अठरा वर्षाचं माझ वय होतं आणि पोलिसांनी भयंकर मला त्रास दिला. तेव्हा आईनी एक पत्र माझ्या वडिलांना पाठवलं, तर त्या वेळेला विनोबाजी आले होते. त्यांना आईची जरा दया आली. तर त्यांनी बोलावून मला सांगितले, विनोबाजींनी, हे बघा तुम्ही काही करू नका. तुमच्या आईला एवढी काळजी वाटते वगैरे, तर माझे वडील पण तिथे होते. तर असं झालं होतं, की ह्यांना वेल्लोर जेलला सगळ्यांना नेत होते, तर....(अस्पष्ट) नेऊन उभं केलं होतं, तर माझ्या वडिलांना मोठा राग आला. ते म्हणे, ह्या म्हाताऱ्याच काही ऐकू नकोस. तू काय, माझी सर्व मुले जरी मेली तरी मला चालेल. पण असलं काही करायचं नाही. अगदी स्पष्ट त्यांनी मला सांगितलं. असे तेजस्वी लोक होते ते. मला फार तुझा गर्व वाटतो आणि असेच माझ्या मुलांनी व्हाव असं मला वाटतं. ते आता तुम्हाला अजून ते दिसतंच आहे, की मी, तुमच्यासाठी म्हणजे, मी, सामूहिकच आहे. मला एकटीला राहता येत नाही, मला एकटीला राहता येत नाही. तुमच्याशिवाय माझ चालणारचं नाही. मी, तुमच्याकडे येते, त्यात तुमच्यावर काही उपकार नाहीयेत. ते माझ्यावरच उपकार होत आहेत. कारण माझा जीव तुमच्यासाठी तुटतोय. आईवर का कधी उपकार होतात. आईचं तुम्ही काही म्हटलं तरी तुझे उपकार म्हटलं, काय म्हटलं तरी हे आईचं प्रेम आहे. त्या प्रेमाला काही, काही पारावर नाही, ते देणारच तुम्ही काही केलं तरी देणार. आता त्याही लोकांना मी, म्हटलं त्यांना दोन, एका माणसाला त्यांनी पकडून आणलं आणि ह्यांनी दगड फेकला. मी, पाहिलं पण म्हटलं मारायच नाही, तुम्ही त्याला मारायच नाही, कुणीही मारायच नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, किती संत-साधू मंडळी आहेत. इतके मार बसल्यावर नुसत कपाळ फोडून टाकलं, हाडं तोडून टाकली, सगळं काही केलं. पण मी, म्हटलं, की कोणीही कोणाला मारायच नाही. आता हे इतके सुदृढ माणसं आहेत, की त्या सगळ्यांना ठोकून, पिटून त्यांच्या सगळ्या हाडं मोडून टाकतील. कारण ही किती प्रकृतीने किती तुमच्यापेक्षा बरेत, खाऊनपिऊन. पण मी, त्यांना म्हटलं कोणलाही, कोणी मारायचं नाही आणि अगदी हात लावायचा नाही. पण इंडियन (Indian) लोकांनी सुद्धा कोणाला मारलं नाही.

आमचे हिंदुस्थानातले जे सहजयोगी आहेत त्यांनी कोणाला मारलं नाही. म्हणजे हे अगदी शांतीचे द्योतक आहेत, खरंच. हे गांधीजींनी नॉन-व्हायलन्स (Non-violence) शिकवलं, त्यातले हे द्योतक आहेत आणि एवढं सहन करणं ह्या लोकांना, म्हणजे मला आश्चर्य वाटलं काल. खरोखर मी, म्हटलं हे खरे संत-साधू आलेत. खरोखर ह्यांच्या येण्यानीच तुमच्या देशाच केवढं कल्याण होणार आहे. कारण इतकं सहन केलं काल त्यांनी अठरा माणसांना इतक मारलं, की दगड नुसते कपाळ फोडलं, वरून इथे डोकं फोडलं, कुणाचं इथे फोडलं, कोणा एकाला तर पॅरालिसिस (Paralysis) झाला. नंतर मी, म्हणा ट्रीटमेंट (treatment) केली वगैरे जरा बरं वाटलं, हॉस्पिटल (hospital) ला गेले. आणि खोटारडे इतके खोटारडे लोकहेत, की आमची मिरवणूक पुढे गेल्यावर, एक गृहस्थ तिथे आले आणि काय म्हणाले, तुम्हाला आश्चर्य वाटेल, की उलट सांगायला आले ह्या माताजी, ह्या लोकांना घेऊन आल्या इथे, यांची घाणेरडी संस्कृती इथे घेऊन आलेत. अगदी घाणेरडे लोक आहेत. आता सहा वर्षांपासून तुम्ही ह्यांना बघता, हे लोक विडी सुध्दा म्हणजे, यांच्याजवळ माचिस सुध्दा मिळणार नाही, किती संत-साधू आहेत. तुम्ही सांगा, हे लोक कशी मंडळी आहेत ही यांच वागणं कसं आहे आणि ह्यांच्याविरुद्ध इतके बोलले आणि गाववाल्यांना....(अस्पष्ट). सरपंच म्हणाले की माताजी खूप हे झालेलं आहे आणि किती मारलं लोकांना, किती मारलं. हिंदुस्थानी लोकांना तर पुष्कळचं मारलेलं आहे. पण पोलीस ठाण्यावर सुद्धा जायला लोक तयार नाहीत. त्या गावातल्या लोकांनीच सांगितलं आम्ही जात नाही, आम्हाला परत येऊन मारतील. म्हणजे हे काय हे, खुनशीपणा आणि म्हणे हे, अंधश्रद्धा निर्मूलन ह्याने होणार आहे का?

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी पहिल्यांदा आत्मसाक्षात्कारी पाहिजे. आहो, तुकारामांनी तर शिव्या घातल्यात ह्यांना, त्यांना विशेष शिव्या येत नव्हत्या. मला तर फारच कमी येतात. पण त्यांना विशेषकरून ते, जे दिसेल ते, इतकच नाही, रामदास स्वामींनी तर इतक्या शिव्या घातल्यात, ह्या लोकांना की तुम्ही असे अंधश्रद्धा करतात. धर्माच्या नावाखाली पैसे खाता, धर्माच्या नावाखाली सगळं हे चालतं. सगळ्यांनीच सांगितलयं ह्यांना, हे सांगायला हे कशाला पाहिजेत? शहाणे. आणि संतांच्या अंगावरती आलेले आहेत. म्हणजे आपल्या देशाचा सबंध वारसाच फिरवायच्या मागे आहेत. अशा लोकांना मुळीच तुम्ही पुढे वाव येऊ देऊ नका आणि चांगल इथून पत्र पाठवा की, हे तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य करताहात का?

बरं एकंदरीत जे झालं त्याबद्दल सांगायचं असं, की आपण क्षमा केली पाहिजे. क्षमा केल्यावरच त्यांची डोकी ठिक होतील आणि ते सर्व लोक ठिक होतील. पण पोलीसांच तसं नाहीये, पोलिसांनी त्यांना धरलेलं आहे. तेव्हा मी, त्या बाबतीत काही बोलू शकत नाही, की एस्. पी. साहेबांनी सांगितलय, की तुमचा संतपणा वेगळीकडे ठेवा तुम्ही, ह्या बाबतीत तुम्ही मला काही म्हणू शकत नाही. मी त्यांना धरून चांगलाच ठिक करणार आहे. त्यांचा बंदोबस्त करणार आहे. तेव्हा पोलिसांच्या बाबतीत आम्ही काही करू शकत नाही. पण तरी सुद्धा माझी अशीच प्रार्थना आहे, की तुम्ही अशी प्रार्थना करावी, की प्रभु तू ह्यांना सुमति दे. हे कोणच्या रस्त्यात चाललेत, हे असं म्हटल्यावर तुम्हाला आनंद वाटेल. आतून क्षमा करून टाका.

कारण सगळ्यांना फार राग आलेला आहे. मला माहिती आहे, की गावातले लोक आणि बाहेरचे, इकडचे, तिकडचे सगळे फार चिडलेत. इतकंच नव्हे, पण महाराष्ट्रात आमचं फार कार्य झालेलं आहे. तुम्हाला माहिती आहे मी खेडोपाडी जाते. कोण जातो खेडोपाडी? कोण बघतं कुणाला? आजकाल, आणि त्यामुळे सगळ्यांना इतका राग आलेला आहे, की मला ही भीती वाटते, की आता विस्फोट नाही झाला पाहिजे. तुम्ही माझं नाव कायम ठेवलं पाहिजे. आणखी शांतीपूर्वक सगळं काही झालं पाहिजे. झालं यांच चुकलं, मूर्खपणा आहे. जाईल ते सुद्धा, इंग्लिश सुद्धा निघून गेले आणि त्यांनी आपल्याला एवढं छळलं. आज इथे किती तुम्हाला आश्चर्य वाटेल, की ह्याच्यातले कमीत कमी नाहीतरी साठ मंडळी अंग्रेजी, इंग्लिश आहेत आणि माझ्या चरणावर आहेत आश्चर्य वाटेल आणि तुमच्या गळ्याला गळे घालून भेटतात आणि तुमच्याशी बोलतात. खेडेगावात जाऊन ह्यांनी कसं शिकलेलं आहे, ते मी, आता आपल्याला दाखवणार आहे यांच....(अस्पष्ट). तर ह्यांचा प्रोग्राम (program) होऊ द्या थोडासा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही चहापाणी म्हणाल तर ते, त्यांच ते म्हणतायेत आमची फिल्म पण घ्या. चालेल ना आपल्याला.

तर ह्यांनी एकनाथांची गाणी, तुकारामांची गाणी कशी म्हटलेली आहेत आणि ते कस आपल्या सहजयोगाला वळवून घेतलेलं आहे. ते बघा तुम्ही आणि ह्यांच्या संस्कृतात सबंध आदिशंकराचार्यचं सौंदर्य लहरी मधलं सबंध ह्यांना पाठ आहे ते आपल्याला सुद्धा नाही. तर एकदा तुम्ही ऐका तुम्हाला आश्चर्य वाटेल, की हे संत कसे आहेत आणि तुम्ही म्हणता ते खरं, कदाचित माझ्या सहवासातचं म्हणा पण इतका, इतकी, इतकं हे बहरेल मला माहिती नव्हतं. अगदी बहरून गेलयं आणि याच्यात ३६ देशातले आम्ही निवडक लोक आणलेले आहेत. ३६ देशातले लोक आहेत.

परवा रशिया (Russia) ला गेलो होतो. तर रशिया (Russia) ला एका-एका ह्याला, चार-चार हजार माणसं यायची आणि नुसते, नुसते मी बसले होते त्या जागेला शिवण्यासाठी त्यांचे नुसतं हे....(अस्पष्ट). तिथल्या गव्हरमेंट (Government) ने आम्हाला मान्यता दिलीये. अमेरिकेच्या गव्हरमेंट (Government) नी आमचा “विश्व निर्मल धर्म” जो झालेला आहे तो स्थापन झालेला, त्याला मान्यता दिलीये. इटली (Italy) मध्ये आम्हाला तिथल्या गव्हरमेंट (Government) ने मान्यताच दिली नाही, पण माझ्याबद्दल एक पुस्तक छापलय, की ह्या वर्षी जे सगळ्यात मोठे पुरूष झाले किंवा मोठे लोक झालेत आणि ज्यांनी फार मोठं कार्य केलेलं आहे, त्यात मी आहे. म्हणून माझ्यावर एक पुस्तक लिहिलेलं आहे. आणि त्याशिवाय टर्की (Turkey) हा मुसलमानांचा देश आहे, तिथेसुध्दा आमच्यासाठी त्यांनी सरकारी मान्यता देऊन, कधीही या, कधीही जा अशी व्यवस्था केलेली आहे. इंग्लंड (England) मध्ये सुध्दा माझ्यासाठी, तुम्ही कधीही आलात आणि कधीही गेलात, अशी व्यवस्था केलेली आहे. माझी तुलना ह्या रजनीशबरोबर करतात, त्याला सर्व देशांतून हकालपट्टी करून इथे घातलेलं आहे आणि सगळे न्यूज पेपर (News paper) त्याच्याच तोंडातलं बोलत असतात. जसा काय तो संजय उवाचचं आहे.

आता या मुलांच्याबद्दल सांगायचं म्हणजे असं, की माझी फार इच्छा आहे, की ह्यांनी पुढे प्रगती करावी. तेव्हा ह्यांचा तपशीलवार तुम्ही....(अस्पष्ट) मुलं कोण आहेत? काय आहेत? त्यांच्यावरती लक्ष ठेवावं आणि इथून शिक्षण झाल्यावर आम्ही त्यांची व्यवस्था पुढेही करू शकतो. त्यांना नोकऱ्या देणं वगैरे ह्या सर्व गोष्टी म्हणजे, आम्ही ह्याची जबाबदारी घेतली आहे. हेच मला सांगायचेय. तेव्हा आपण सर्वांनी आणखी विशेषकरून आपण, मोहिते साहेबांनी लक्षात घ्यावं, की उतार वयाच्या गोष्टी करूच नये. उतार वय येणारच नाही. आम्ही आहोत सगळं सांभाळायला. तेव्हा काळजी करू नये. बरं आणि मी, त्यांना विशेषकरून म्हणते. त्यांच्यासाठी विशेषकरून बोलतेय. त्यावेळेला होती अशी मंडळी मला माहितेय. अशी मंडळी होती. सगळा त्याग करून देशासाठी मेहनत करणे, झटणे ह्यासाठी अशी मंडळी होती. पण ती गेली सगळी कुठे? अशी रानावनात शिरले की काय? तेव्हा ही मंडळी परत जागृत होऊ देत.

आपल्या देशामध्ये आणि जो खरा आपला आतमधला धर्म आहे तो जागृत झाला. त्याला आम्ही “विश्व निर्मल धर्म” असं म्हंटलेल आहे, की विश्वात जो स्वच्छ धर्म आहे. ज्याच्यामध्ये पैसे घेणं, लुबाडणं, भोंदूगिरी, अंधश्रद्धा हे काही राहणार नाही. सर्व धर्माचा सार, असा हा आम्ही धर्म स्थापन केलेला आहे आणि त्या धर्माचे हे सगळे अनुयायी झालेत. म्हणजे कोणचाही ह्यांनी धर्म सोडला अशातली गोष्ट नाही. पण प्रत्येकातलं जे चांगलं आहे ते घेतलेलं आहे, वाईट आहे ते सोडलेलं आहे. म्हणजे प्रत्येक देवळात जायचं आणि तिथे आता म्हणजे तिथे पैशाचाचं व्यवहार चाललेला असतो. तुम्हाला माहितीच आहे, मला सांगायला नको. तर अशा देवळात जाऊन उपयोगाच काय, त्याचा उध्दार केला पाहिजे, किंवा हे लोक चर्च (Church) ला जातात, पोप (Pope) वगैरे लोक, हे सुद्धा तसाच प्रकार करतायत. मुसलमानांचहि तसचं. प्रत्येक धर्माला एक व्यावसायिक रुप आलेलं आहे. कमर्शियल (commercial) रुप आलेलं आहे. ते जाऊन ते स्वच्छ झालं पाहिजे आणि हे कार्य सगळ्या संतांनी केलंय आणि आम्ही तेच करतोय. फरक एवढाच आहे, की मी, आता सगळ्यांनाच संतच करून टाकते. त्यांनी ते संत करायचं त्या वेळेला जमलं नाही. कारण आपण खरोखरच....(अस्पष्ट) होतो, त्या....(अस्पष्ट) काही करता आलं नाही. पण आज मी, हेच कार्य करते, की सगळ्यांना तुम्हाला संत करून टाकते आणि हे कार्य मला जमलं. कारण त्याच्यावर मी मेहनत केली, आणखीन मी, सिध्द करून दिलं, की सामुहिकतेत हे कार्य होऊ शकत. कुंडलिनीच जागरण होऊ शकतं. त्यांनी लोकांना फायदा होऊ शकतो आणि कुंडलिनीच जागरण झालं पाहिजे, सगळ्यांनी सांगितलेलं आहे तर मी, काही नवीन सांगते अशातली गोष्ट नाही, पण कुणी केलेलं नाही. रामदास स्वामींनी, त्यांना विचारलं कुंडलिनीच जागरण किती दिवसात होईल....(अस्पष्ट) आहो तक्ष्ण होत, पण अधिकारी पाहिजे करणारा. कदाचित मला हा अधिकार दिलेला आहे आणि त्यामुळेच हे कार्य होत आहे. तेव्हा आपण सर्वांनी सम्मिलित होऊन कुंडलिनीचं कार्य पुढे वाढवावं. ही लहान-लहान मुलं सुध्दा जागृती देऊ शकतात. तुम्ही जागृती देऊ शकता. म्हणजे ह्यांनी जे कार्य करुन त्याचा जो पाया मांडला आहे, त्याची आज इमारत आपल्याला उभी करायची आहे आणि सगळ्यांनी मला जर मदत केली, तर हे कार्य होऊ शकतं. तुमची हिच मदत मला पाहिजे. पैशाबिशाची नको. देवकृपेने ते सगळं आहे आणि हे लोक करायला ही तयार आहेत. फक्त तुम्ही ह्या कार्याला पुढे चालवावं, लोकांची जागृती करावी. लोकांना बरं करावं, त्यांची मदत करावी. गोरगरिबांची फार मदत होईल. ते मी, सगळं तुम्हाला शिकवणार आहे आणि त्यांनी तुम्ही स्वतः एक फार मोठे गुरू होणार. तुम्ही स्वतःचेच गुरू होणार आहेत आणि तुम्ही मं लोकांची मदत करू शकता, ह्या लहानशा जागेतून. बरं सगळ्यांना माझा अनंत आशिर्वाद आहे. झालं गेलं विसरुन जायचं आणि आज “आनंदाच्या डोही, आनंद तरंगी” असे आपण बसलेले आहोत. तेव्हा त्या आनंदातच सगळ्यांनी ह्यांचा कार्यक्रम बघायचाय. ह्यांनी मुद्दामून तुमच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलाय. मुलांना....(अस्पष्ट) तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, की मराठी भाषेचं किती ह्यांनी अध्ययन केलं असणार आणि कसे हे गावात, खेड्यातनं फिरून हे सगळे एकत्र करून इथे आलेले आहेत. तर तुम्ही बघा ह्यांना किती माहिती आहे. आपण एक सुध्दा यांच गाणं म्हणू शकत नाही आणि संतांच यांनी केवढं केलेलं आहे ते बघण्यासारखं आहे.

Brahmapuri (India)

Loading map...