Public Program

Public Program 1990-12-10

Location
Talk duration
27'
Category
Public Program
Spoken Language
Marathi

Current language: Marathi, list all talks in: Marathi

The post is also available in: English.

10 डिसेंबर 1990

Public Program

Kopargaon (India)

Talk Language: Marathi | Transcript (Marathi) - Draft

सत्याला शोधणाऱ्या आपण सर्व साधकांना आमचा नमस्कार . एक गोष्ट आपण जाणली पाहिजे कि सत्य आहे तिथे आहे . ते आपण बनवू शकत नाही आणि ते आपण बदलू पण शकत नाही . जे आहे ते होत आणि राहील . एक आणखीन दोष आहे तो असा कि मानव चेतने मध्ये तुम्ही सत्य जाणू शकत नाही . त्या साठी एक सूक्ष्म चेतना हवी . आताच आपल्या समोर प्राध्यापकांनी सांगितलं कि परदेशामध्ये असंतुलन वाढलं आहे . त्याची कल्पना आपल्याला इथे येऊ शकत नाही . आम्ही ह्या देशात फिरलेलो आहोत . आम्ही ह्या देशांना जाणलेलं आहे .वास्तव्य बरेच वर्ष तिथे झाल्या मुळे ह्याची दुर्दशा म्हणजे शब्दात सुध्दा सांगता येणार नाही . भौतिकतेत ते वाढले असणार . विज्ञानात वाढलेत कबूल . पण विज्ञान हे एकांगी आहे हे आपल्या लक्षात असलं पाहिजे . त्यांनी मनुष्य एकांगी होतो हे तुम्ही जर बाहेर जाऊन पाहिलं तर लक्षात येईल . वाट्टेल तशी नैतिकता वापरल्या मुळे अनेक तऱ्हेचे रोग त्यांना झालेले आहेत . अशे रोग झालेले आहेत कि त्या रोगाचं निदान सुध्दा त्यांना लागु शकत नाही . ते ठीक होऊ शकत नाहीत . ६५टक्के लोक अमेरिके मध्ये अशा रोगांनी ग्रस्त आहेत आणि बाकीचे सुध्दा सगळे ग्रस्त होतील अशी त्यांना भीती वाटू लागली आहे . रोगाचं सोडा पण हिंसाचार इतका भयंकर आहे कि न्यूयॉर्क ला तुम्ही गेलात तर गळ्यात मंगळसूत्र सुध्दा घालून तुम्ही जाऊ शकत नाही ,कुणी तुमचं ओढून घेईल . इतका हिंसाचार ह्या देशामध्ये ,मी म्हंटल हि डेमोक्रॉसी आहे कि डेव्हनाक्रोसि आहे . आपण अजून इथे बसलेलो आहोत आपल्याला काही कल्पना नाही . आपण जर त्यांच्या सारखे केस केले ,त्यांच्या सारखा वेष केला तरी आपल्याला त्यांची कल्पना येणार नाही कि आतून ते किती पोखरले गेले आहेत. त्याला कारण हेच आहे कि विज्ञान हे एकांगी आहे . त्याच्यात प्रेम नाही ,त्याच्यात कविता नाही ,त्याच्यात कला नाही ,त्याच्यात आदर नाही . सर्वांगीण उन्नती साठी पहिल्यांदा अध्यात्माचा पाया पाहिजे . अध्यात्माची जो पर्यंत सांगड तुम्ही विज्ञाना बरोबर करणार नाही तो पर्यंत सगळ्यांची अशी स्तिती होणार आहे . आणि ती आज होत आहे . आपल्या देशात सुध्दा आमच्या वेळेला आम्ही जेव्हा कॉलेज मध्ये शिकत होतो ,तेव्हा शिकलेलं सायन्स अजून आम्हाला माहित आहे . तेव्हा शिकलेलं मेडिकल सायन्स अजून आम्हाला माहित आहे . पण आज काल च्या शिकलेल्या मुलांना ते माहित नसत . त्याला कारण असं कि विज्ञाना बरोबर जी तिथली संस्कृती आपल्या मध्ये आलेली आहे त्यामुळे चित्त सार बाहेर गेल्या मुळे ,ते चित्तात ठासल जात नाही . आता इथे हि जी मंडळी आपल्याला दिसतात ह्यातली पुष्कळ आज आलेली नाहीत . जवळ जवळ अजून ४०० मंडळी तिथेच आहेत . आणि ती मंडळी येणार होती पण काल फार त्रास झाला सगळा त्यांच्या व्यवस्थेचा त्यामुळे आज तिथेच थांबली आहेत . आणि हि सर्व मंडळी अत्यंत सुशिक्षित आहेत ,यांच्या मध्ये काही डिप्लोमॅट्स आहेत ,काही आर्किटेक्स आहेत ,काही इंजिनिअर्स आहेत ,सगळे अशे आहेत . ह्यांनी यांच्या जीवना मध्ये हा क्षोभ पहिला ,ह्यांना वाटल असं का ,आम्हाला आनंद का होत नाही कोणच्या गोष्टीला पाहून ?आम्हाला झालाय काय ,आम्ही इतके शुष्क का ?. कारण सायन्स हे शुष्क आहे . अगदी जस चिपाड काढावं तस सायन्स ची स्तिती आहे , तेव्हा जे संसारात आहे ते बघूनच आपण सायन्स ओळखतो . पण सहजयोगात आल्या नंतर हे व्यसनमुक्त झाले . व्याधी यांच्या गेल्या त्यात माझं काही देणंघेणं लागत नाही ,हि सगळी शक्ती तुमच्यात आहे . फक्त ती शक्ती जागृत झाली कि हे कार्य घडून येत . आता पुष्कळशी मुल राहुरीला अभ्यासात ढ होती आणि त्यांना जागृती झाल्यावर आता फस्ट येतात ,स्कॉलरशिप्स मिळतात . अशा ह्यांच्या बरोबर पण पुष्कळ झालं मोठमोठ्याल्या नोकऱ्या मिळाल्या ,आणि त्यांनी मनुष्याची सृजनशक्ती ज्याला क्रिएटिव्हिटी म्हणतात इतकी वाढती कि आमच्या इथेच मी बघते कि सहजयोगातले लोक आलेत ते त्यांनी नवीन नवीन धंदे सुरु केलेत ,नवीन तऱ्हेने वागतात . आणि एकंदरीत निर्भयता येऊन मनुष्य आदर्शावर टिकतो . कारण नैतिकमूल्य हि बांधलीच पाहिजेत . नैतिक मूल्य जर एकदा सुटली तर कोणताही कार्य तुम्ही कराल तर ते तुमच्याकडे परत येऊन त्याचा तुम्हाला त्रास होईल . बुमरँगिंग म्हणतात . तस कि एखाद्या माणसाजवळ पैसे आले . पैसे आले तर ते दारूत तर जाणार ,बायकांवर खर्च होणार ,व्यसनात जाणार ,नाहीतर कसल्यातरी धंद्यात जाणार ,नाहीतर आजकाल पुष्कळ तऱ्हेचे जुगार निघालेत त्याच्यात तरी जाणार . त्या पैशाचा आनंद तो उचलूच शकत नाही . ते अशे वहावतच जाणार . लक्ष्मीला वाट फुटणार . त्यासाठी गरज आहे आपल्याला अध्यात्माची . जर आपल्या मध्ये अध्यात्म असेल तर आपल्यात संतुलन येत ,शहाणपण येत आणि जे काही मिळवलं त्याचा आपण उपभोग घेऊ शकतो . आता हे लोक आपण बघता आपल्याला कळलं असेल कि ह्यांनी मराठी भाषा कशी शिकली . आमच्या वेळेला पुष्कळ आमचे इंग्लिश प्रोफेसर असायचे आणि त्यांना जर सांगायचं तुम्हाला एक शब्द कसा शिकवायचा तर म्हणे कि "दरवाजा बंद कर " कस म्हणायचं ?तर म्हणाला त्याला इंग्लिश मध्ये सांगावं लागायचं कि असं म्हणा तुम्ही "देअर वोज अ बॅन कर ". मग त्याच्या डोक्यात शिरायचं ,नाहीतर दरवाजा बंद कर हे सुध्दा म्हणणं त्यांना कठीण जात असे .

आणि आता बघाआपल्या समोर यांनी मराठीतून गाणी म्हंटली ,संस्कृतचे आदी शंकराचार्यां नि जे सौन्दर्यलहरी लिहिलं ते इतकं स्पष्ट गातात हे ,आपले भारतीय गाऊ शकणार नाहीत इतकं सुंदर ते गातात . हे झालं कस ?. इतक्या भाषा यांच्या तोंडात आल्या कशा ?हा आत्म्याचा प्रकाश ,आत्म्याचा प्रकाश जेव्हा तो चित्तात येतो तेव्हा अनेक गोष्टी घडतात . पण मुख्य गोष्ट हि घडते आपला मेंदू जो आपण थोडासा वापरतो तो अत्यंत प्रकाशमान झाल्यामुळे त्यातून अनेक विचार ,अनेक नवीन गोष्टी ,आणखीन इतकच नव्हे पण एक तऱ्हेची सर्जन कला ,कोणाचंही शिकण्याची कला फार वाढते . आता आपल्याला माहित असेल ज्ञानेश्वरांनी तेविसाव्या वर्षा मध्ये केव्हड सुंदर लिहिलं आहे . इतक्या सुंदर गोष्टी सांगितल्या आहेत . आणि त्यासर्व तेवीस वर्षा मध्ये ,तुमच्या मध्ये सुध्दा पुष्कळ मुल त्या वयाची असतील . तेवीस वर्षात एव्हड्या मोठमोठाल्या गोष्टी सांगणारे ज्ञानदेव ,त्यांना सुध्दा आज आपले उपटसुम्भा सारखे लोक म्हणतात कि ज्ञानेश्वर कोण होते . अहो त्यांच्या सारख्या दोन ओली लिहून दाखवा तुम्ही ,तुकारामा सारख्या दोन ओली लिहून दाखवा तुम्ही . आणि किती सामाजिक रूप होत . तुकाराम केव्हढे मोठे सामाजिक होते . त्यांनी सर्व अंधश्रद्धेवर सगळ्यांवर लिहिलं आहे . रामदास स्वामीं त्यांना काही शिव्या येत नव्हत्या तर काही मनानेच शिव्या लावून सगळ्या खोट्या लोकांना त्यांनी मार केलेला आहे . त्यांनी केव्हडी मेहनत घेतली आहे निस्वार्थ पणाने . पण जगामध्ये स्वार्थ हा इतका विणलेला आहे कि एखादा निस्वार्थी माणूस लोक समजूच शकत नाहीत .

परत सांगायचं म्हणजे आपल्या मध्ये हि शक्ती आहे . ह्या कुंडलिनी शक्तीच वर्णन सहाव्या अध्यायात ज्ञानदेवांनी केलेलं आहे . त्याला कारण असं कि नाथपंथीयां मध्ये एक गुरु आणि एक शिष्य अशी परंपरा होती . ती मोडली कुठे तर ज्ञानदेवांनी त्यांचे जे गुरु आणि मोठे भाऊ निवृत्तीनाथ यांना म्हंटल कि दादा मला एव्हडी परवानगी द्या कि जे काही अध्यात्म्याचं ज्ञान आपल्याला मिळालेलं आहे ह्याच्या बद्दल मला लोकांना निदान फक्त सांगू द्या . सगळ्यांना सांगू द्या फक्त . सामाजिकतेचा उतरु द्या फक्त . कारण हे एका माणसा पासून एकाला जातय ,आपण याचा आनंद घेतो आहोत ,आनंदाच्या डोही म्हणून आपण नाचतो पण ह्याच्या काय डोक्यात जातंय का? ,कुणाला समजतय का ?आणि म्हणूनच आपला छळ हे लोक करत आहेत . तर निदान सांगू तरी द्या कि कुंडलिनी काय आहे . तर जेव्हा कुंडलिनीच वर्णन सहाव्या अध्यायात बाराव्या शतकात त्यांनी केल ,तेव्हा धरमार्तंडानी सांगितलं कि ,नाही नाही हे निषिध्द आहे . कारण त्यांना त्यातलं काही गम्यच नव्हतं . त्यातलं काही कळत नसल्या मुळे त्यांनी कुंडलिनी हे निषिध्द आहे असं सांगितल्या मुळे सगळं काही अगदी कळोखात गेलं . कुणी सुध्दा त्याचा विचार केला नाही कि हे काय आहे .

तेव्हा आपण जेव्हा सायन्स शिकतो तेव्हा लक्षात ठेवल पाहिजे ,जर आपल्यात इथं सायन्स शिकणारी मुल असतील तर त्यांनी केमेस्ट्री वाचली असेल तर जर तुम्ही पिरॉडिक्लेम टेबल पहिला तर आश्चर्य वाटेल कि किती सुसंगत सगळ्या वस्तू बनवल्या आहेत . ,फिजिक्स मध्ये एकेक जर तुम्ही पाहिलं तर हे बनवलं कुणी ?,एक साधी गोष्ट आहे हि फुल बघा पसरलेली इथे ,हि फुल बघा ,एका बी पासून हि तयार होतात कशी होतात ?. कोण करत हे ?,हि कोणची शक्ती आहे जी सर्व हे कार्य करते ,सगळं हिरवंगार झालं आहे हे कशा मुळे ?. हि पृथ्वी अशी दिसते ,हे बी असं दिसत ,हे कशामुळे ?. आपण विचार सुध्दा करत नाही कारण हि जिवंत क्रिया आहे . आपण जिवंत क्रिया करू शकत नाही म्हणून आपलं लक्ष जिवंत क्रिये कड नसतंच . आपण म्हणतो राहूदे ,जिवंत क्रिया आपल्याला जमत नाही ना मग ते सोडा . आता डॉक्टर्स सुध्दा ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम म्हणतात म्हणजे स्वयंचलित ,पण हा स्वयम कोण आहे ?. अहो ,जर आपण आटोमोबीन म्हंटल तर त्याच्या मध्ये मोटार चालवणारा एक ड्राइव्हर असतो . मग आपल्या मध्ये हे सगळं चालवणारा हा कोण आहे ?. हा प्रश्न जर आपण विचारला तर त्यांना ते माहित नाही ,पण कुणीतरी आहे तो म्हणजे आत्मा .

आता आत्म्या बद्दल त्या संतसाधुनी सांगितलं . आपण संतसाधून वर विश्वास ठेवायचा नाही तर कुणावर ठेवायचा . त्यांचं आयुष्य बघा किती स्वच्छ ,निर्मळ ,त्यांचं चरित्र बघा ,त्यांचं कार्य बघा . अशी माणस आहेत का कुठेतरी ,आजकाल सगळे ,मी पुण्याला पहिल्यांदा आले ,मला आश्चर्य वाटलं मी घर बांधत होते तर म्हणे हा पैसे खातो ,तो पैसे खातो म्हंटल अहो जेवतो कि नाही का नेहमी पैसाच खात राहतो . हे असले प्रकार आपल्या देशात इतके भयंकर वाढलेले आहेत . आम्ही यंग असताना ,माझे यजमान कलेक्टर होते तर कधी कानावर पण गोष्ट अली नाही कि ,कुणी कलेक्टर ,कमिशनर पैसे खातात म्हणजे अशक्य गोष्ट . आणि त्यावेळचे राजकारणी ,आमचे वडील त्यावेळच्या पार्लमेंट चे मेम्बर होते ,अहो कसलं पैसे खाण ,कुणाच्या डोक्यात सुद्धा हे विचार आले नाहीत . कधी ऐकलं सुध्दा नाही नुसतं देशासाठी झटायचं ,लोकांचं भलं करायचं ,ती करणारी मंडळी कुठे आणि आजकालच हे लोक पहिले म्हणजे मला आश्चर्य वाटत कि हि निघाली कुठून जात नवीन .

तेव्हा आता तुमच्या वरती अवलंबून आहे ,तुमच्या तरुण मुलानं वर अवलंबून आहे कि एक आदर्श घेऊन तुम्ही हे कार्य केलं पाहिजे . पण त्यासाठी अध्यात्माचा पाया पाहिजे . अध्यात्माच्या पाया शिवाय तुमचं चालणार नाही . तुम्हीही तशेच होणार तुम्हीही तशेच बेकार होणार . जर तुम्हाला खरोखर आपल्या देशा बद्दल कळकळ असेल ,समजा बद्दल कळकळ असेल तर तुम्ही हा अध्यात्माचा पाया मिळवलाच पाहिजे आणि हि तुमचीच आई आहे, ,तुमचीच कुंडलिनी तुमचीच आई आहे . प्रत्येकाची वेगवेगळी व्यक्तिगत आई आहे तिला मिळवलं पाहिजे . आणि तिला मिळवल्या नंतर जे काही तुम्हाला लाभ होईल ,तुम्हाला आश्चर्य वाटेल कि किती तुमच्या मध्ये शक्त्या लपलेल्या आहेत .

असं समजा कि आता एखाद्या अशा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असलेल्या खेडेगावात आपण गेलो आणि तिथे जाऊन आपण म्हंटल कि आम्ही एक आणलेलं आहे डब्बा याला टेलिव्हिजन म्हणतात . आणि यामध्ये सगळ्या जगातल्या बातम्या येऊ शकतात ,यांच्यात तुम्ही नाटक बघू शकता ,तुम्ही संगीत ऐकू ,बघू शकता . तर म्हणतील हे काय डबडं घेऊन आलात तुम्ही ,खोट बोलता आहात . तसच आपल्याला असं वाटत कि आपण पण सगळे दबडे आहोत . पण याच एकदा कनेक्शन लागू द्या ,याचा योग घटीत होऊ द्या म्हणजे हि जी सगळी कडे पसरलेली सूक्ष्म शक्ती आहे जिने हे जिवंत कार्य होतंय त्या शक्तीशी एकदा संबंध झाल्यावर तुम्हीही जिवंत कार्य करू शकता . आता याने लोक बरे झाले त्यावर सुध्दा लोकांचं म्हणणं आहे कि हे सिध्द करून दाखवा . सिध्द काय करून दाखवायचं ?,तीन डॉक्टर्स ना यावर संशोधन केल्या मुळे एम डी च्या पदव्या मिळाल्या दिल्लीला . ज्यांना एम डी च्या पदव्या मिळाल्या त्यांनी मेडिकल च परिमाण घेऊ तर संशोधन केलं असेल कि नाही . त्याच्या नंतर दोन डाँक्टर्स लंडन ला आहेत त्यांना सायन्स मध्ये phd मिळाली . हे कस शक्य आहे ?आणि बाहेर सगळं कार्य होतय ,रशिया मध्ये तर ४०० डॉक्टर्स सहजयोग करत आहेत आणि २०० वैज्ञानिक फार अगदी गंभीर पणाने . पण आपल्या देशात अजून काय झालंय माहित नाही कसला पडदा पडलेला आहे . संतांनी कार्य केलं ते दिसत नाही . त्यांनी मुळात कार्य केलं ,त्यांनी सगळं मुळात कार्य केलं आहे एव्हडं मोठं विश्व जरी वाढलं आणि त्याची मूळच जर त्याला सापडली नाहीत तर कधीही हे उलथून पडेल . आणि तसच झालेलं आहे . याची मूळ आपल्या देशात आहेत ,ह्या आपल्या महाराष्ट्रात आहेत ,हा आपला वारसा आहे . तो आपण मिळवला पाहिजे . हि आपली सत्ता आहे . तुम्ही सायन्स मध्ये कुठवर जाणार ?त्यांच्या पुढे तुम्ही काय आहेत ?पण तुम्ही अध्यात्मात मात्र प्रगती करू शकता . अध्यात्मात प्रगती केल्यावर सार जग तुमच्या पायाशी येईल . कारण त्यांना याची गरज आहे . त्यांचं सगळं हरवलं आहे . आता नकोरे बाबा ते ,फार झालं सायन्स . मी सायन्स च्या कॉन्फरन्स मध्ये बोलत होते तर ते म्हणाले माताजी आता सायन्स नको आम्हाला ,आम्हाला आत्मसाक्षात्कार द्या फार झालं . कंटाळ आला आम्हाला त्या सायन्स चा . कारण जे समोर आहे द्रीष्टीगोचर आहे तेच तुम्ही सायन्स मध्ये बघता . त्याच्या पलीकडचं जे अध्यात्म म्हणजे विज्ञानाच्या पलीकडची गोष्ट आहे . ती मानवेच्या चेतनेच्या पलीकडची गोष्ट आहे ,आणि ती तुमच्या हातात असताना तुम्ही का मिळवू नये ?हा तुमचा वारसा असताना ,आणि हे फुकट आहे ह्याला पैसे किती देणार तुम्ही . अहो ह्या पृथ्वीतून एव्हडं काढतो हिला काय पैसे देतो आपण ?हिला पैसे समजतात तरी का ?हे सगळं फुकट आहे .

देवाच्या नावावर पैसे कमवले ,भोंदूपणा करतात ,सगळं कबूल आहे . पण सगळ्याच गोष्टीत करतात . आणि देवाच्या नावावर बरा धंदा होतो म्हणून करत असतील . त्याचा अर्थ असा नाही कि देव नाही . परत देव नाही असं म्हणणं सुध्दा अशास्त्रीय आहे . तुम्ही आदी पत्ता काढा आधी देव आहे कि नाही याचा . मग फारतर असं म्हणा कि आम्हाला माहित नाही देव आहे कि नाही ते . आईन्स्टाईन सारख्या माणसाने सांगितलं आहे कि मी जेव्हा "थेरी ऑफ रिलेटिव्हिटी" शोधत होतो तेव्हा शोधता शोधता मी थकून गेलो . मला काही कळलं नाही आणि मी थकून जाऊन आमच्या बगिच्यात पडलो ,आणि साबणाचे अशे फुगे काढत होतो . तेव्हा कुठूनतरी अशा अज्ञात स्थानातून "थेरी ऑफ रिलेटिव्हिटी " माझ्या समोर अली . ह्या लोकांनी देव नाही असं कोणी म्हंटल नाही आहे . न्यूटन नि असं म्हंटलेलं नाही ,कोणत्याही मोठ्या सायण्टिस्ट नि असं म्हण्टलेलं नाही कि देव नाही . हे काहीतरी उपटसुम्भ लोक बसून देव नाही म्हणायचं . कशाला ?देव असला म्हणजे दारू पिता येत नाही ,पैसे खाता येत नाही ,आणखीन घाणेरडे धंदे करता येत नाहीत . म्हणून आधी देवाला उचलून कोनाड्यात ठेवणार . मग आम्हाला जे करायचं ते आम्ही करू शकतो . राजकारण आजकाल च जस झालं आहे ,ते दिसतच आहे तुम्हाला . मग त्याला देव असला कि लोक म्हणतील कि काहो तुम्ही देवावर विश्वास ठेवता मग हे असं कशाला करता ?. परवा आम्ही केसरी ला जरा असं एक लिहून पाठवलं ,कि मी संबंध गीता रहस्य लहानपणी तुमच्या केसरी तुन वाचल कारण लोकमान्यांनी सुरु केलं होत आणि आता थोडं सहजयोग रहस्य लिहा ,तर त्यांना ते झोंबलं . म्हणजे आम्ही काय करत नाही कि काय . जे करतात ते माहित आहे आजकाल ,कुठे ते लोकमान्य टिळक आणि कुठले आजचे केसरी . हि जी पतन स्तिती झाली आहे त्यातून वर उठायचं कार्य तुम्ही तरुण मुलांनी केली पाहिजे . आणि लक्षात घेतलं पाहिजे कि हे कार्य वाया नाही गेलं पाहिजे ,हे संतांचं कार्य आहे आणि तुम्ही संत होऊ शकता . त्यात काही सोडायला नको ,काही दाखवायला नको ,काही उपास तापस नको . ह्याच्या मध्ये जातीभेद ,अंधश्रध्दा सगळं जाऊन आज सगळे देश एक झाले आहेत . एक देश नाही अनेक देश एक झाले आहेत . तुम्हाला आश्चर्य वाटेल जेव्हा सुरवातीला मी रशियाला गेले तेव्हा २५ जर्मन लोक तिथे त्यांना आत्मसाक्षात्कार द्यायला पोहोचले होते . माझा जीव भरून आला . कुठे ते जर्मन ज्यांनी हजारो रशियन मारले आणि आज हे जर्मन गेले त्या रशियन ना आत्मसाक्षात्कार द्यायला . काय प्रेमाचा महिमा म्हणायचा . काय स्तिती म्हणावी . किती कमालीची गोष्ट आहे ,जे आपलं असून आपण मिळवायचं नाही तर काय मिळवायचं ?. हि आपली संपदा आहे . हि साऱ्या जगाला देण्याची आपल्यात तयारी असायला पाहिजे . नाहीतर ह्याची जबाबदारी आपल्या तरुण पिढीवर येणार आहे . बाकीच्यांचं सोडून टाका पण तरुण पिढीने घ्यायला पाहिजे . तरुण पिढीच्या हातात हि गोष्ट करण्याची आहे . तेव्हा तरुण पिढीने सहजयोग शिकला पाहिजे ,आणि त्यांनी सामाजिक स्तिती ,तसच आपली राजकीय स्तिती आणि आपलं इकनॉमिक सुध्दा याने ठीक होईल . कारण याने मनुष्याला इतकं संतुलन येत कि सगळेच प्रश्न एकसाथ ठीक होतात . तेव्हा कृपा करून हे लक्षात घेतलं पाहिजे त्यांच्या संस्कृतीतला जे चांगलं आहे ते हे कि सगळे गावचे पाणी पिऊन शेवटी इथे आले .

आता तुम्ही लांबलचक फिरू नका . इथे सगळं आहे तर का घ्यायचं नाही ?. असा विचार करा आणि हे मिळवलं पाहिजे . ह्याच्या मध्ये कोणत्या तऱ्हेचा पैसा किंवा काही चालू शकत नाही . फक्त हे आपल्या सगळ्यांना मिळवायचं आहे ते आपण सगळ्यांनी मिळवून घ्यावं अशी मला आशा आहे ,ह्याच्या बद्दल सांगायला पुष्कळ आहे कारण माझी लेक्चर्स च इंग्लिश मध्ये कमीतकमी पाच ते सहा हजार झाले असतील . मराठीत आणि हिंदीत सुध्दा कितीतरी असतील तेव्हा ते एका भाषणात सांगता येत नाहीत फक्त एव्हडं सांगायचं आहे कि ,तुम्ही काय आहे ,तुमचा गौरव काय आहे ,तुमची शक्ती काय आहे फक्त एकदा तेव्हड जाणून घ्या . सगळं तुमच्यात आहे ते मिळवून घ्या . आणि मिळवल्या नंतर बघा कि तुमच्यात काय बदल होतो आणि तुम्ही कसे होता .

आधी आज मी तुमची कुंडलिनी जागृत करण्याचा प्रयत्न करते . पण ती जागृत झाल्यावर जस एखाद कोंब फुटलं जरी ते वाढवलं पाहिजे त्याचा वृक्ष झाला पाहिजे .या कडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे . मला फार आनंद झाला आज आपण आपल्या कॉलेज मध्ये मला बोलावलं आहे . आणि त्याच्या बद्दल मी आपल्या सगळ्यांची फार आभारी आहे . कारण ह्या लोकं मध्ये आम्ही कधीच लक्ष घातलं नाही . तरुणानं कडे आमच्या देशात मुळीच लक्ष घातलं गेलं नाही . एक गृहस्थ आले आणि मला म्हणाय लागले कि आम्ही अमुक ह्या पार्टीचे युवक नेते आहोत . असं का म्हंटल . तुमचं धोरण काय मग ,धोरण ,बसले विचार करत . आम्हाला धोरण काही नाही . जे मोठे सांगतील तस आम्ही करतो . म्हणजे ते जे शहाणपण करतील ते तुम्ही करणार का ?तुम्हाला आपला विचार नाही आहे ,तुम्हाला आपलं व्यक्तित्व नाही . ते म्हणतील तस वागायचं ,कुणी म्हणेल तस चालायचं . तुम्ही काय ?तुम्ही त्यांच्या हातातल्या कळसूत्री बाहुल्या आहेत ?तेव्हा त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला . म्हंटल तुम्ही स्वतः ची संघटना करा . आणि ती अध्यात्मावर करा . बघा किती शक्तिशाली होता तुम्ही . सगळी शक्ती तुमचीच आहे आणि तुम्हाला ती मिळवायची आहे आणि तुम्ही ती घ्यावी अशी माझी विनंती आहे .

आता वाईट वाटतंय कि सगळे उन्हात बसलेत ,पण जेव्हा कुंडलिनीच जागरण होत तेव्हा आपल्या आतूनच इतकं थंड थंड ब्रम्हरंध्रातून निघायला लागत ,आणि हातात पण इतकं थंड वाटत कि आश्चर्य वाटत . म्हणजे पडताळा करण्यासाठी सांगते आहे . जे लोक चिक्कीसक आहेत त्यांच्या साठी विशेष करून चागलं . कि उन्हात एकदम आपल्याच डोक्यातून थंड आल्यावर त्यांना वाटत हे कस काय झालं . त्याची प्रचती असायला पाहिजे . आणि आपणच आपलं सर्टिफिकीट दिल पाहिजे . दुसरी स्पष्ट गोष्ट अशी आहे कि हे महान कार्य असलं तरी सुध्दा त्यात जबरदस्ती नाही करता येत . जोर जोरजबरदस्ती चालू शकत नाही . कोणाचीच दडपशाही चालू शकत नाही . तुम्हाला जे स्वातंत्र्य परमेश्वराने दिलेलं आहे त्या स्वातंत्र्याचा पूर्ण मान ठेऊनच हे कार्य झालं पाहिजे कारण तुम्ही मग संपूर्ण स्वातंत्र्यात येता ,कोणाच्याच प्रकारची तुमच्यावर जबरदस्ती कोणी करू शकत नाही . ज्यांना जागृती पाहिजे त्यांनाच आम्ही देऊ शकतो दुसऱ्यांना आम्ही देऊ शकत नाही . तर असे लोक ज्यांना जागृती नको आहे त्यांनी इथून जाव . ह्याला फक्त दहा मिनिट लागतील . आणि ज्यांना हवं असेल त्यांनी येऊन बसावं थोडा वेळ . अहो पूर्वी लोक उपाशी तापाशी हिमालयात जायचे ,केव्हढे तप ,जप करायचे ,केव्हडी मेहनत करायचे ,हे मिळवायला ,आता मी तुमच्या दारात आले आहे ,घेऊन टाका काय लागतय त्याला .

हसतखेळत हि गोष्ट होणार . स्वतःची थोडी कदर पाहिजे . स्वतः बद्दल मान पाहिजे . स्वतः बद्दल प्रेम असलं पाहिजे . झिडकारायच नाही स्वतःला . तर यातली पहिली जी अट आहे ती अशी कि आपल्याला आपल्या बद्दल मान असला पाहिजे ,मागच सगळं विसरून जायचं ,मी काही चूक केली नाही हे लक्षात ठेवायचं . जर तुमच्या डोक्यात असं असेल कि आम्ही फार दोषी आहोत ,आम्ही पापी आहोत तर ते डोक्यातून काढून टाका . तुम्ही मानव आहेत ,आणि मानव चुका नाही करणार तर काय परमेश्वर चुका करणार ?तेव्हा सगळं मागच विसरून जायचं हि पहिली अट . मी दोषी नाही हि पहिली अट . अहो तुम्ही परमेश्वराच्या साम्राज्यात जाणार ,तुम्हाला थोडीच जेल मध्ये घातलं जाणार आहे का .

दुसरी अट सगळ्यांना एकसाथ क्षमा करायची ,म्हणजे यांनी मला असं म्हंटल ,त्यांनी मला असं म्हंटल असा कोणाचाही विचार करायचा नाही . व्यक्तिगत विचार करायचा नाही एकसाथ सगळ्यांना क्षमा करायची . आता कुणी म्हणेल कठीण आहे . क्षमा करा अथवा नका करू तुम्ही करता काय ?काहीच करत नाही ,म्हणजे काहीतरी मिथ्या गोष्ट आहे ना . त्याच्या मागे तुम्ही कशाला आपलं डोकं खराब करता . अहो ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्याची तुम्ही आठवणच काढू नका . त्या सगळ्यांना एकसाथ तुम्ही क्षमा करून टाका .

तिसरी गोष्ट मला आत्मसाक्षात्कार होईलच असा आत्मविश्वास असला पाहिजे . कारण मी ह्या महाराष्ट्रात जन्माला आलो आहे ,ह्या संतांच्या भूमीत मी जन्म घेतला आहे . त्यामुळे मला आत्मसाक्षात्कार होईलच . हि पूर्ण श्रध्दा आपल्यावर ठेवा . त्यात शंका घेऊ नका . सगळ्यांना अनंत आशीर्वाद आहे तुम्हाला . अनंत आशीर्वाद आहे तुम्हाला .

तिथे माझे हात मोडतात हो फॉरेन कंट्रीज मध्ये लोकांना पार करायचं म्हणजे आणि तुम्ही लोक किती सहज पार झाले . हि सगळी संतांची कृपा आणि त्यांचा आशीर्वाद आहे हे जाणून घ्या . आता सगळं जाणून घ्या . बघा बाहेर एकसुध्दा पान हालत नाही आहे इथे कस हलु राहिलाय ,बाहेर सगळं स्तब्ध आहे ,पण आता हळू हळू सुरु होईल . तुम्ही लोक जशे जशे चालाल तसा वारा सुटेल . आता शांत राहा कुठलाही वादविवाद करू नका . ज्यांना हे झालं नाही त्यांना म्हणावं आम्हाला वाद करायचा नाही . कारण हि विचारांच्या पलीकडची गोष्ट आहे . एकदा तुम्ही सहजयोगात जमले म्हणजे मग मला लिहाल पत्र आणि कळवा काय झालं ते . अनंत आशीर्वाद तुम्हाला .

Kopargaon (India)

Loading map...