Public Program

Public Program 1990-12-18

Location
Talk duration
60'
Category
Public Program
Spoken Language
Marathi

Current language: Marathi, list all talks in: Marathi

The post is also available in: English.

18 डिसेंबर 1990

Public Program

Karad (India)

Talk Language: Marathi | Transcript (Marathi) - Draft

Sarvajanik Karyakram 18th December 1990 Date: Karad Place Public Program Type

सत्याला शोधणार्या आपण सर्व साधकांना आमचा नमस्कार! सर्वप्रथम आपण जाणलं पाहिजे की सत्य आहे. जे इथे आहे ते आपण बदलू शकत नाही किंवा ते आपण आपल्या कल्पनेत ते बदलू शकतो. ते सुद्धा जाणण्यासाठी मानवी चेतना अपुरी आहे. आपण उत्क्रांतीमध्ये, इव्होल्युशनमध्ये आज मानव स्थितीला आलो, पण या मानवस्थितीत आपल्याला केवळ सत्य मिळालेले नाही, केवळ ज्ञान मिळालेले नाही, ज्याला आपण कैवल्य म्हणतो. त्यामुळेच तरत-हेचे नवीन-नवीन विचार, नवीन नवीन धारणा निघतात आणि एकाचा दूसऱ्याला मेळ बसत नाही. मुख्य कारण असे आहे की केवळ सत्य जाणण्यासाठी आत्म्याचे ज्ञान झाले पाहिजे, ज्याला आपण अध्यात्म असे म्हणतो. आता डॉ.प्रभुणेंनी सांगितली ती गोष्ट खरी आहे. पण ती अशी समजून घेतली पाहिजे की विज्ञान हे एकांगी आहे आणि एकांगी असल्यामुळे मनुष्याची सर्वांगीण उन्नती त्या विज्ञानामुळे होऊ शकत नाही. विज्ञानामध्ये कला नाही, प्रेम नाही, आनंद नाही. शुष्क आहे. जे समोर दिसते आहे त्यालाच आविष्कारीत करून मनुष्याने आपल्या भौतिक प्रगतीकरता हे विज्ञान वापरलेले आहे. पण जी भौतिक प्रगती अध्यात्माशिवाय होत नाही तिचा त्रास हा महाराष्ट्रात राहून कळणार नाही. आता आमचं म्हणजे काहीतरी असं नशीब आहे की सारखे आम्ही फिरत असतो आणि अनेक देशांत प्रवास केला। आणि अनेक देशात वास्तव्य झालं. इथे माझ्या लक्षात जी गोष्ट आली ती अशी की ह्या लोकांना या एकांगी विज्ञानामुळे अनेक त्रास झाले. मुख्य म्हणजे ह्यांची सामाजिक व्यवस्था अगदी तुटून गेली. मुलांना काहीही वळण नसल्यामुळे मुलं तिथे ड्रग घेतात, दारू पितात , वाट्टेल तसे वागतात. पुष्कळ मुलांनी तर शाळा-कॉलेजला जाणं सोडलं. ते जरी असलं तरी अमेरीकेसारख्या देशामध्ये ६५% लोक, मग ते मोठे असोत, लहान असोत, मुलं असोत ह्यांनी आपल्या चुकीमुळे, स्वत:च्या या एकांगी वर्तणुकीमुळे फार घाणेरडे रोग लावून घेतले आहेत. इतके घाणेरडे रोग आहेत की त्यांची वाच्यतासुद्धा करणं मला कठीण जातं आहे. हे रोग ठीक होण्यासारखे नाही. ते सगळे मृत्यूच्या पंथाला लागलेले आहेत. आणि आता असं भाकीत आहे की लवकरच २ - ३ वर्षात ७०% लोकांना हा रोग होऊन जाईल. म्हणजे किती भयंकर अवस्था तिथे असेल हे आपण समजू शकता. कसंही वागायचं, मनाप्रमाणे वागायचं म्हणजे हे जे स्वैराचाराचं वागणं तिथे सुरू झालं त्याला कारण असं की त्यांच्या पार्श्वभूमीमध्ये आपल्या भारतासारखी संस्कृती नव्हती. भारताची जी संस्कृती आहे, त्याच्यामध्ये मुख्य स्थान आत्म्याला आणि संतांना आहे. आता संतांचही आपण बघितलं तर बघा या संतांना कधी वाईट गोष्टी सुचल्या नाहीत. ह्यांनी कधी कोणाला त्रास दिला नाही. 'जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती' आजकाल आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात काय कुठेही किती भ्रष्टाचार चाललेला आहे. तुकारामांना जेव्हा श्री शिवाजी महाराजांनी बरीचशी आभूषणे वरगैरे अर्पित केली होती. त्यांनी सांगितलं, 'शिवबा, आम्हाला हे सगळं काय शोभायचं? आम्ही राजे नाहीत.' काय त्यांच ते ন

बोलणं होतं! हे सगळं बोलणं आजकाल आपल्याला ऐकायला मिळतं का? ही एक उदात्त, महान व्यक्तित्वाची एक फार मोठी ठेव या महाराष्ट्राला मिळाली आहे. हे संत, साधू एक इकडे, एक तिकडे असे विखुरलेले आहेत. आणि त्यांचा किती छळ केला लोकांनी. आता ज्ञानेश्वरांचीच गोष्ट घ्या की ज्ञानेश्वर हे म्हणजे नाथपंथी आणि नाथपंथींयांमध्ये अशी परंपरा होती की एक गुरू, त्याला एकच शिष्य. आणि हे जे कुंडलिनीचं ज्ञान होतं ते फक्त एक गुरू एका शिष्याला सांगत असे. पुढे कोणाला सांगायचे नाही अशी एक परंपरा त्यांनी बांधून घेतली. श्री ज्ञानदेवांनी आपले गुरू निवृत्तीनाथ यांना विनंती केली की, 'कृपा करून मला एवढं तरी वरदान द्यावं की मी जो हा वाणीचा यज्ञ मांडलेला आहे, ही जी मी ज्ञानेश्वरी लिहीत आहे तर कमीत कमी कुंडलिनीबद्दल लिहिण्याची मला परवानगी असावी.' म्हणजे मराठी भाषेमध्ये. संस्कृतमध्ये तर पुष्कळ वर्षापासून कुंडलिनीबद्दल वर्णन आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल की आयुर्वेदामध्ये तर कुंडलिनीवरच सगळे अवलंबून आहे. आता आमच्या आयुर्वेदाचे तुम्ही जर स्टुडंट पाहिले तर ते कुंडलिनीचेच अध्ययन करतात. त्याशिवाय त्यांना मन, आत्मा या सर्व गोष्टींचं त्यांना अध्ययन करावं लागतं. फार मोठं कार्य मी म्हणते ज्ञानेश्वरांनी केलं की ज्ञानेश्वरीमध्ये सहाव्या अध्यायात त्यांनी कुंडलिनीचे वर्णन केले आहे. पण धर्ममार्तंडांनी सांगितले की हे सगळं निषिद्ध आहे. असं म्हणून की 'हे सगळं निषिद्ध आहे' त्यांनी पूर्णपणे सहावा अध्याय बंद करून टाकला. त्यामुळे कोणालाच कुंडलिनीची माहिती नव्हती. हे केवढं मोठ ज्ञान, ही केवढी मोठी गोष्ट, ती एका अर्थाने त्यांनी ती दडपून टाकली. ह्मा एकंदर कारणामुळेच पुष्कळांना कुंडलिनी म्हणजे कारय माहिती नाही. आणि त्याची काहीही माहिती नाही. आज सहजयोग म्हणजे जे त्यांनी जगाला समजवून सांगितलं, त्यावेळेला दिलं होतं ते आज साक्षात होत आहे. आपल्यामध्ये ही शक्ती आहे हे मी आज सांगते आहे असं समजू नये. अनादिकालापासून मार्कडेयांनी त्याच्यानंतर श्री आदिशंकराचार्यांनी, त्यांनतर नानकांनी, कबीरांनी तसंच बायबलमध्ये किंवा कुराणातसुद्धा कुंडलिनीचं वर्णन आहे. सगळीकडेच कुंडलिनीचं वर्णन आहे. तेव्हा एकमात्र सगळीकडे सत्य आहे की ही कुंडलिनी जेव्हा जागृत होते तेव्हाच आपल्याला आत्म्याचं ज्ञान होतं. पण जेव्हा हे होतं तेव्हा अध्यात्माच्या नावावर आपण ज्या बऱ्याच गोष्टी करतो, त्या तशा नसतात हे समजतं. आणि त्यामुळे आपल्याला असं वाटू लागतं की हे कसं? हे कसं शक्य आहे? ही एक आपण म्हणू शकतो अंधश्रद्धेची बाब झाली. ही जी अंधश्रद्धेची बाब आहे ही समजून घेतली पाहिजे. श्रद्धासुद्धा चार प्रकारची असते. पहिली जी श्रद्धा आहे तिला आम्ही म्हणू आपल्याला, कोणी मनुष्य आला, जेलमधून सुटून आला, जर त्याने भगवी वस्त्र घातली तर लागले त्याच्या पाया पडायला. जो आला लागले त्याच्या पडायला. कोणी आला त्याला पैसे द्यायचे. कोणी म्हटलं की इतके पैसे तामसिक श्रद्धा. जिथे घाला इथे हे दैवत आहे. तुमचं हे भलं होईल, ते भलं होईल, इतके पैसे घाला. सगळं काही ते पैशावर अवलंबून असतं. आणि लोक भोळेपणाने पैसे देतात. आता मला सुद्धा, लोक येतात, म्हणते, 'कशाला पाया पडता?' 'नाही, नाही माताजी. ' मग काही तरी पैसे घेऊन यायचे. म्हटलं, 'मी पैसे घेत नाही.' 'बरं, मग तुम्हाला पंचवीस पैसे देऊ का?' म्हणजे लोकांच्या हे डोक्यातच येत नाही की अध्यात्म हे पैशाने नाही मिळवता येत. पैशाचा आणि अध्यात्माचा काही संबंध नाही. पैसे माणसाने बनवलेले आहेत. बँका माणसाने बनवलेल्या आहेत. पैशाशी

परमेश्वराचा काहीही संबंध नाही. मनुष्याला वाटतं, 'दोन पैसे देऊन जर चार पैसे मिळत असतील तर का घेऊ नये? चला आपल्याला जर गुरू एखादा कमवता आला तर काय वाईट आहे!' गुरू आपल्या हातात आहे ना! चारा त्याला पैसे. पण पैशाचा आणि परमेश्वराचा किंवा अध्यात्माचा काहीही संबंध नाही, हे आपण संतांपासून जाणू शकतो. संतांनी ह्यावर केवढे कोरडे ओढले आहे . म्हणजे असं आहे की आपण जर व्यासंग केला, मला वाटतं मराठी भाषेत, निदान आम्ही जेव्हा मराठी भाषा शिकलो तेव्हा कमीत कमी ८०% म्हणजे सबंध अध्यात्मच शिकवला. फक्त २०% असेल दुसरं काहीतरी त्यावेळेला सुरू झाले होते, नाहीतर त्याच्याशिवाय दुसरं काहीच नव्हतं. बहुतेक अध्यात्मच. आणि त्या अध्यात्मातच आम्ही पाहिलं की एवढे जेवढे संत झाले त्यात आता तुम्ही तुकाराम घ्या, तुकारामांनी किती जात-पात विचार, 'इझाला महार पंढरीनाथ' पंढरीनाथालाच महार करून टाकलं. एकनाथ महाराच्या घरी जेवायला गेले. लक्षात घेतलं पाहिजे ! एकनाथ महाराच्या घरी जेवायला गेले, जात असतं. त्याच्यावर त्यांना वाळीत टाकलं, इतका त्रास दिला, छळलं. दूसरे आपण म्हणू नृसिंह- सरस्वती. हे तर फार जबरदस्त होते. ते ब्राह्मण होते स्वत:. कुठे एखादा मनुष्य दगडबिगड मांडून बसला आणि त्याच्यावर कोणी सिंदूर घालून बसला की तिथे जाऊन काहीतरी त्याला मारायचे, ठोकायचे. तसेच दासगणू, दासगणू म्हणतात, 'आम्हासी म्हणता ब्राह्मण, आम्ही जाणिले नाही ब्रह्म आम्ही कसले ब्राह्मण|' अहो, आगरकरांनीसुद्धा ब्राह्मणांची टर उडवली आहे याबाबतीत. आणि भटजी लोकांवर तर इतकं या लोकांनी लिहिलेले आहे. रामदासस्वामी, त्यांना तर शिव्याबिव्याही येत नव्हत्या, एखाद्या वाईट गोष्टीबद्दल श्रद्धा असणं, ही तामसिक श्रद्धा आहे. दिसत असूनसुद्धा आपण चुकीच्या रस्त्यावर जातो ही तामसिक श्रद्धा आहे. दुसरी असते राजसिक श्रद्धा. म्हणजे एखादा मनुष्य राजा असला, आजकाल आपले मिनिस्टर किंवा कोणी असे असले, म्हणजे मिनिस्टर आला म्हणजे झालं. त्यांना बघितल्याबरोबरच लोकांना काहीतरी होऊन जातं. म्हणजे जो राजा आहे किंवा त्याच्याजवळ काही सत्ता आहे त्या सत्तेबद्दल आदर असणं किंवा त्याच्यावर श्रद्धा असणं ही राजसिकता. पण सात्विक श्रद्धा दूसऱ्या प्रकारची असते. सात्विक श्रद्धा ती जिथे त्या माणसाचं चरित्र, त्याची शुद्धता, त्याचं कार्य त्याचं प्रेम, त्याची महानता बघून जी श्रद्धा होते ती श्रद्धा ही सात्विक आहे. जसं आजकालच्या काळात गोर्बाचेव्ह बद्दल लोकांना श्रद्धा आहे. गोर्बाचेव्हला लोक फार मानतात. कारण तो आत्मसाक्षात्कारीच आहे. लालबहादूर शास्त्रींच्या बद्दल लोकांना अत्यंत श्रद्धा होती, ती सात्विक श्रद्धा होती. कारण केवढा चरित्रवान होता. ही जी सात्विक श्रद्धा आहे, जरी हे लोक राजकारणी असले तरी त्यांच्याप्रती असलेली श्रद्धा ही मनुष्य सात्विक आहे. पण जी संतांच्याबद्दल श्रद्धा असेल ती पूर्णतया असावी. कारण ह्या संतांचं चरित्र बघितलं, एकेकाचं वागणं बघितलं, कालच मी सांगत होते की नामदेव हे जेव्हा पंजाबात गेले तेव्हा नानकसाहेबांनी त्यांच्यासमोर लोटांगण घातलं. 'बाबा तू पंजाबी शिक आणि पंजाबी काव्य कर.' पंजाबीमध्ये एवढं त्यांनी पुस्तक लिहिलेले आहे. मला

पंजाबी येतं आणि त्यात जनाबाईंचे अभंग आहेत आणि नामदेवांचेही अभंग आहेत. आणि हे सगळे ग्रंथसाहिबात वाचतात, त्यात आपले नामदेवांचे किती तरी अभंग आहेत . पण ते काय आहे नुसतं वाचत जायचं. म्हणजे अडीच दिवसांचा त्यांचा अखंड पाठ . एका माणसाने बसायचं. ते वाचायचं. जिथपर्यंत पोहोचलं तिथे बोट ठेवायचं, मग दुसर्याने बोट ठेवायचं. जो आपल्याकडे सप्ताह-बिप्ताह असतो तसा प्रकार. आणि सगळे सरसकट तेच करत बसतात. आता ही अंधश्रद्धाच आहे. त्यांनी काय सांगितले, 'काहे रे मन खोजन जाए, सदा निवासी सदा आलेपा तुही संग सदा' आणि शेवटी सांगितलं, 'कहे नानक बिन आपाची होय' स्वत:ला ओळखल्याशिवाय 'मिटे न भ्रम की खाई' स्पष्ट सांगितलं त्यांनी. अगदी स्पष्ट सांगितलेले आहे. आणखीन कबीरांनी सबंध कुंडलिनीवरच सांगितलं आहे की 'इडा, पिंगला सुखमन नाडी, शून्य शिखर पर अनहद बाजी' सगळं काही कुंडलिनीचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि इतकं साद्यंत वर्णन करूनसुद्धा आज तुम्हाला आश्चर्य वाटेल की कबीर ज्यांनी कार्य केलं, मेहनत केली अशा त्या उत्तर हिंदुस्थानात विशेषकरून पटणा वरगैरे ज्याठिकाणी ते राहिले तिथे ते तंबाखूला सुरती म्हणतात, त्यांनी कुंडलिनीला सुरती म्हटलं. 'सूरती चढै कमान' त्यांनी सूरती कोणाला म्हटलं, तर ह्या कुंडलिनीला आणि हे लोक त्याला म्हणजे आपण जी तंबाखू बघितली त्याला सूरती म्हणतात. म्हणजे काय कमाल आहे माणसाची बघा. आता तुम्ही म्हणाल, कबीरांनी तंबाखू खायला सांगितली. म्हणजे कोणत्याही मोठ्या गोष्टीचं खोबरं कसं करायचं ते मानवाला विचारलं पाहिजे. मी जेव्हा त्या पटणाला गेले तेव्हा मला समजेना की ह्याला सूरती कसं म्हणतात? कारण कबीरांचं माझं वाचन फार आहे. मला मोठं आश्चर्य वाटलं की हे काय कबीराचं करून ठेवलं आहे. तसंच संत -साधूंनी ज्या गोष्टी सांगितल्या त्याचा व्यासंग हवा. म्हणजे आपल्या लक्षात येईल की तेविसाव्या वर्षी ' अमृतानुभव' सारखा महान ग्रंथ, मला त्याच्याहून मोठा ग्रंथ आजपर्यंत नाही मिळाला. मला भयंकर व्यांसग आहे, मी फार वाचन केले आहे, सर्व तऱ्हेची भाषा मला येत असल्यामुळे बरेच वाचन केलेले आहे मी, पण महानुभवापेक्षा मोठा ग्रंथ मी पाहिलेला नाही. इतका महान होता. अगदी त्याच्या दोन ओळी जरी मला वाचायला मिळाल्या तरी धन्य वाटे. कारण त्याच्यात ज्या सूक्ष्म गोष्टी सांगितल्या आहेत त्या कोणीतरी अवतारी पुरूषाने सांगाव्या अशा त्या अत्यंत सूक्ष्म, आनंददायी आहेत आणि अत्यंत उघडपणे सांगितलेल्या आहेत. काय भाषा वापरली आहे ! जसं काही त्यांना कोणाचं तरी वरदानच होतं किंवा स्वत:च काहीतरी विशेष ते सरस्वतीचे पुजारी होते. ते अमृतानुभवाचं पुस्तक, मला आश्चर्य वाटलं, मी एकदा औरंगाबादला गेले होते. तिथे एका कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलाने त्याचा मला प्रश्न विचारल्यावर मी चमकले. म्हटलं हा मुलगा, ह्याने अमृतानुभव वाचलं कसं ? त्याला बोलवलं. तो आत्मसाक्षात्कारीच जन्मला होता मुळी. तो जन्मलाच होता आत्मसाक्षात्कारी. त्याचं लक्ष तिकडेच जाणार. मग अध्यात्म आणि विज्ञान ह्यातला झगडा जो आहे तो कुठे सुरू होतो की अध्यात्माच्या पायाशिवाय जिथे विज्ञान सुरू होतं तिथं असंतुलन येतं. म्हणून हे देश गडबडले. तुम्ही अध्यात्माशिवाय कोणतीही प्रगती घ्या. आपल्या देशात घ्या. आता निघाले आहेत, पुष्कळ ट्रमा काढायच्या. आता ते निर्मूलन काढलं आहे. अहो, ज्या लोकांना स्वत:लाच आंधळेपणा आहे ते काय निर्मूलन करणार? हे संतांचं कार्य आहे. आणि त्यांनी कितीही कार्य केलं तरी लोकांच्या डोक्यात प्रकाश पडलाय का ? नाही पडला. तेव्हा करायला काय पाहिजे, जनजागृती. आता इथे ही मंडळी बसली आहेत ती आपल्याला फॉरेनची वाटतात, ह्यांच्यात अंधश्रद्धा नव्हत्या कां? भयंकर

अंधश्रद्धा! काही विचारायला नको. अहो, अमेरिकेला तर अमकं तमकं फार आहे. पण ह्यांचं काय आहे की एकदा सत्याला धरलं की पडले त्याच्यात. हे लोक वेगळ्या विचारांचे आहेत. इथे असेही लोक आहेत ज्यांना रजनीशशी....... त्यांच्या ज्या काही घाणेरड्या सवयी होत्या किंवा त्यांचे जे फारच खालच्या दर्जाच्या ज्या त्यांच्यामध्ये एकंदर इच्छा होत्या किंवा त्यांची कमजोरी म्हणा त्यावर मेहनत करून आणि त्यांना बळकावून घेतलं आणि त्यांनी ५८ रोल्स रॉइस घेतल्या. अहो, संतांना रोल्स रॉइस असेल नाही तर बैलगाडी असेल. त्यांना काय करायचे आहे ? ते कसले संत झाले ! आणि अशी घाणेरडी माणसं आपल्या देशात आहेत. 'सर्वेची दृष्टी'. आणि त्या माणसाला कुठेही जगात टिकू दिलं नाही. आणि अंधश्रद्धावाले त्या माणसाला गुरू मानतात. आता काय म्हणायचं! अशा घाणेरड्या माणसाला, त्या माणसाचं नाव घेतल्यावर तोंड धुतलं पाहिजे, त्याला ह्यांनी गुरू मानून ठेवलं. आणि त्यांनी सर्व आपल्या देव - देवतांची फार थट्टा केली आणि ज्ञानेश्वरांवर असं म्हटलं की, 'त्याची तुम्ही समाधी उघडून बघा. त्याच्यामध्ये त्याची हाडं आहेत का?' ह्याच्या समाधीला कोणी हातसुद्धा लावणार नाही कारण याला एडस् झाला होता मरायच्या अगोदर. अशा गोष्टी बोलल्यावरसुद्धा काही वाटत नाही. काही आपल्या लक्षात येत नाही की हे काय आपण चालवलेले आहे. तेव्हा अध्यात्म तिथे नसेल. आता हे लोक तरी काय तिथे जाऊन एवढे पैसे कमवू शकतील! त्या देशामध्ये अध्यात्म नाही, असंतुलन आलं त्यामुळे ह्यांचं आयुष्य, म्हणजे सबंध आयुष्याला इतकी काळीमा आली. सबंध ह्यांच्या जीवनाची वाट लागली. त्यामुळे आता काहीतरी धरायला पाहिजे. हे लोक तिथून पोहोचले, आम्ही अध्यात्म घेऊन पोहोचलो. असे पुष्कळ आहेत भामटे. एकच नाही आणि त्यांनी ह्या लोकांना एवढा त्रास दिलेला आहे, तुम्हाला माहिती नाही. सबंध लुटून खाल्लं त्या लोकांनी. मुलं-बाळं रस्त्यावर पडली. त्यात आणखीन एक असेच ट्रम काढणारे निघाले. त्यांनी सांगितलं की ही संस्कृतीच नको आम्हाला. अँटी कल्चर. करता-करता त्या अॅटी कल्चरमधून कोण निघाले तर सगळ्यांनी शाळा सोडल्या, कॉलेज सोडले, काही अभ्यास नको, काही नको आणि जाऊन ड्रग आणि ड्रग नंतर जो आहे प्रकार तो तुम्हाला माहितीच आहे. अर्धेअधिक तर मेलेच. अर्धेअधिक कामातून गेले. म्हणजे ही जी त्यांची उन्नती झाली ती इतकी एकांगी होती की ती जर झालं काय.....हिप्पी! हिप्पी नंतर सोडली तर कुठे जाऊन पडेल. तुम्ही जर एखाद्या माणसाला शंभर रुपये देऊन बघा. तो चालला गुटख्यावर सरळ. पण संतांना दिले तर ते सत्कारणी लावणार. तेव्हा कुंडलिनीने काय होतं की कुंडलिनीच्या जागरणाने आपल्यामध्ये जी षट् चक्रं आहेत ती जागृत होतात. आता ही षट् चक्र मेडिकलीसुद्धा तुम्ही समजू शकता. मीसुद्धा मेडिसीन केलेले आहे. आणि मेडिसीनचा स्ट्रगल, जी स्थिती आहे ती मी जाणते. कोणीतरी एम.बी.बी.एस. डॉक्टर आहे, रिकामटेकडा आहे समजा. तर त्याला असं वाटत की 'माताजी, आता आमच्या पोटावर पाय आणणार' कारण ह्यांच्या हातून पुष्कळ रोग बरे झाले आहेत. 'मुळीच होणार नाही.' अहो, आम्ही श्रीमंत लोकांना बघतच नाही, आम्ही गरीब लोकांसाठीच हे कार्य काढलेले आहे. कुंडलिनीच्या जागरणाने निर्विवाद अनेक रोग ठीक होतात. आणि आम्ही कॅन्सरसारखे अनेक रोग ठीक केलेले आहेत. हे निर्विवाद आहे आणि होतं. आणि त्याची आमच्याजवळ पूर्णपणे माहिती आहे. आता सातशे डॉक्टर आले होते एका कॉन्फरन्सला. त्याच्याबद्दल खोटे नव्हतेच लिहिलेले पेपर. आपले पेपर.

सुद्धा काय आहेत तुम्हाला समजत नाही. आता म्हणा त्यांनी दरुस्ती केली, पण खोटनाटंच लिहायचं. अहो त्या तीन डॉक्टरांना दिल्लीला एमडी. मिळाली, सहजयोगातले. एम.डी. ची पदवी, एमबीबीएस पासून एम.डी. झाले. ते काय मेडिकलच्या परिमाणाशिवाय झाले असतील? अहो, एवढं तरी डोकं आहे का या लोकांना! हे जे एमबीबीएस इथे दोन-चार फिरत आहेत त्यांना असं विचारा की 'तुम्ही एमबीबीएस होऊ शकता का? मेडिकलच्या परिमाणाशिवाय. कारण ही कुंडलिनी आपल्या देशातील गोष्ट आहे. म्हणून ती वाईट. आपल्या घरातील, आपल्या देशातील रेशमी साडी नको, पण बाहेरची नायलॉनची चालेल तशातला हा प्रकार. मी म्हणते बाहेरचे जे चांगले आहे ते घेतले पाहिजे, पण आपलं जे चांगल आहे ते का जाणून घेऊ नये! ही कुंडलिनीची शक्ती आपल्यामध्ये आहे हे जसं आपल्याला आता डॉक्टरसाहेबांनी सांगितलं ही खरी गोष्ट आहे. अनेक वर्षांपासून, हजारो वर्षांपासून हे कुंडलिनीचे कार्य ह्या देशात होत होतं, पण फार सीमित, फार थोडं. जेव्हा ही कुंडलिनी जागृत होते तेव्हा ही सहा चक्रं जेव्हा तुमची उघडतात मुख्य म्हणजे तुमची बुद्धी फार तल्लख होऊन जाते. पुष्कळशी मुलं 'ढ' म्हणून होती, ती मुलं आज 'फस्स्ट क्लास' येताहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल की आमच्या सहजयोगात सगळी मुलं 'फर्स्ट क्लास' आहेत. सगळी फर्स्ट क्लास मुलं आहेत. आणि पहिल्या ह्याला पास होतात. आताच एक मूलगा मला भेटायला आला, इंजिनियरींगचा. तर तो पास झाला. म्हटलं, 'झाला कसा?' 'माताजी, सहजयोग !' म्हटलं, 'कसं काय?' 'बस,' म्हणे, 'माझ्या डोक्यातच सगळे राहतं. त्यांनी प्रश्न विचारले , मी उत्तरे दिली. झालं सगळं. पास झालो.' सगळी मुलं फर्स्ट क्लासमध्ये पास होतात. त्याला कारण असं, बुद्धीमध्ये, आज आपण जेवढी बुद्धी वापरतो त्याच्यात थोडासा प्रकाश यायला हवा. पण जेव्हा कुंडलिनीचे जागरण होते तेव्हा आपल्या बुद्धीमध्ये फार पसरलेला असा प्रकाश येतो. आणि त्या प्रकाशात आपल्याला एक तऱ्हेचा तल्लखपणा असतो. आपण चालाखी शिकत नाही. त्याच्यात आपण निपुण होतो. कोणतही कार्य असो त्यात आपण निपुण होतो. तसच मी पुष्कळ आर्टिस्ट लोकांना पाहिलं. आपण अमजद अलीचं नाव ऐकलं असेल, पुष्कळ असे आर्टिस्ट आहेत, ते मुसलमान लोक आहेत बहुतेक. ते आपले अनुप जलोटा तसाच. त्याच्या बापानं सगळ्यांना सांगितलं , 'मातीजींनी आशीर्वाद दिला तेव्हापासून आमचा अनुप जलोटा आहे.' असे अनेक लोक आहेत, किती नावं सांगायची तुम्हाला. म्हणजे काय आहे की त्याने तुमची सृजनशक्तीसुद्धा वाढते. ही जी कुंडलिनी आहे, ही अशी चक्रांतून जाते. आपल्यामध्ये दोन बाजू आहेत-डावी आणि उजवी. दोन सिंपरथॅटिक नव्व्हस् सिस्टीम्स आहेत, मध्ये एक चक्र आहे. आता काय होतं, आपण ही तरी वापरतो किंवा ती तरी वापरतो. त्यामुळे ही संकुचित होऊन जाते. संकुचित झाल्यामुळे सगळी शक्ती नष्ट होते. आणि सगळ्यांची संकुचितच असते सुरुवातीपासून आणि ती आणखीन संकुचित होऊन जाते. मग कुंडलिनी जेव्हा येते तेव्हा जसा काही एखादा दोरा मण्यातून काढावा तशी ती अशी येऊन आणि सबंध गुंडाळते त्यामुळे आपल्या या शक्त्या वाढतात. 'तुझे आहे तुजपाशी' म्हटलं आहे ती गोष्ट म्हणजे कुंडलिनी. आणि तिच्या जागरणाने तुमच्यामध्ये ज्या शक्त्या आहेत त्या पूर्णपणे प्लावित होतात. पण हे पाहिलं पाहिजे की सगळ्यात मुख्य काय होतं. शारीरिक, मानसिक, सामाजिक सर्वतऱ्हेची स्थिती सुधारते. पण तुमच्यामध्ये, तुमच्या चिंतनामध्ये एक नवीन आयाम, एक

नवीन डायमेंशन येतं आणि ते कोणतं तर त्याला कलेक्टिव्ह कॉन्शसनेस म्हणतात. हे, ने ह्याच्याबद्दल ह्यूम लिहिलेले आहे. ह्यूम म्हणून एक फार मोठा फिलॉसॉफर होऊन गेला. त्याने लिहिलेले आहे की अशी स्थिती येणार आहे की लोकांना सामूहिक चेतना, सामूहिक चेतना म्हणजे तुमच्या हातांवर, बोटांवर तुम्हाला कळेल की ह्या माणसाला काय त्रास आहे. आणखीन तुम्हाला काय त्रास आहे. आता आपल्याला आश्चर्य वाटेल, महंमद साहेबांनी हे सांगितलेलं आहे की जेव्हा रिझरेशनची वेळ येईल कियामा म्हटलं आहे त्याला, उत्क्रांतीची वेळ येईल त्यावेळी तुमचे हात बोलतील आणि ते तुम्हाला सांगतील, की तुमच्यात काय चुकलेलं आहे. स्पष्टच सांगितलेलं आहे. सबंध एक चॅप्टरच्या चॅप्टर आहे, पण जसा आपला सहावा अध्याय आपण निषिद्ध ठरवला तसं मुसलमानांनी हा अध्यायसुद्धा गुंडाळून ठेवला आहे आणि भांडाभांडी करत बसले आहेत. पण आता आमचे पुष्कळ मुसलमान शिष्य झाले आहेत आणि कदाचित अशी वेळ येईल की मुसलमान सगळ्यात जास्त आमचे शिष्य होतील. कारण त्यांना कंटाळा आला आहे या भांडकूदळपणाचा. खरोखर कंटाळलेले आहेत. तेव्हा हे लक्षात घेतलं पाहिजे की ही जी कुंडलिनी आहे हिच्यामुळे आपल्याला अनंत शक्त्या तर मिळतातच, पण आपली जी चेतना आहे, जी मानव चेतना आहे ती मानव चेतनेला बोध किंवा जाणीव होणे, म्हणजे आपली जी मज्जासंस्था आहे जिला आपण सेंट्रल नव्व्हस् सिस्टीम म्हणतो त्याच्यावर आपण जाणू शकतो की दुसर्याला काय त्रास आहे आणि आपल्याला काय त्रास आहे. त्याला काही विशेष शिक्षण लागत नाही, डॉक्टरी लागत नाही. नुसतं असं बोटांवर जाणून घ्यायचं. आणखीन बायबलमध्ये तिला 'ऑल परवेडिंग पॉवर ऑफ गॉड ' म्हटले आहे किंवा 'कूल ब्रिज ऑफ द होली घोस्ट' म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर आदि शंकराचार्यांनी त्याला 'सलिलं इदं' म्हटलेलं आहे. सलिलं म्हणजे थंड थंड अशा लहरी, सौंदर्य लहरी म्हटलं आहे. अशा अनेक तऱ्हतर्हेच्या गोष्टींनी त्याचे वर्णन केलेले आहे. ही अशी जी ऋतंभरा प्रज्ञा आपल्याजवळ आहे ती आपल्या हाती लागते आणि आपल्या हातामध्ये असं थंड थंड वाह लागतं. आता आपली शक्ती सामूहिक चेतनेत उतरल्यावर आपण जेव्हा ह्याच्यात प्राविण्य मिळवता तेव्हा आपणसुद्धा सगळ्यांची जागृती करू शकता. इतकचं नव्हे तर सगळ्यांचे रोग बरे करू शकता. इतकेच नव्हे सगळ्यांना मानसिक शांती मिळू शकते . आता कुंडलिनीच्या जागृतीतच सगळे आल. तिने आता ब्रह्मरंध्र छेदल्याबरोबर, जसं तुम्ही समजा, आता हे एक आयुध आहे आणि जोपर्यंत याचे कनेक्शन मेनशी होत नाही तोपर्यंत याला काही अर्थ नाही. तसच मानवाचं झालं आहे. जोपर्यंत आपलं कनेक्शन मेनशी होत नाही तोपर्यंत आपल्याला केवळ ज्ञान मिळू शकत नाही, म्हणजे एकमेव ज्ञान. तुम्ही जर दहा मुलं, जी आत्मसाक्षात्कारी आहेत त्यांचे डोळे बांधून ठेवा आणि त्यांना विचारा की 'हा जो समोर मनुष्य आहे त्याला काय त्रास आहे तर' ते एकच बोट दाखवतील. सगळे एकच. त्यामुळे भांडण नाही कारण सगळ्यांना एकच सत्य माहिती आहे. संतांमध्ये कधी भांडणं झालेली ऐकली आहेत का तुम्ही? कधीच होत नाही. नामदेवांचे मी सांगत होते आपल्याला. नामदेव एकदा गोरा कुंभारांना भेटायला गेले होते. कुंभारच ते. माती, चिखल पायाने तुडवत होते. त्यांना बघूनच स्तंभित झाले. स्तंभित होऊन काय म्हणतात बघा आता. हे फक्त एक आत्मसाक्षात्कारी दुसऱ्या आत्मसाक्षात्काऱ्याला म्हणू शकतो. दुसरं कोणी म्हणू शकत नाही. इतक सुंदर म्हटलं ০

आहे, 'निर्गुणाच्या भेटी आलो सगुणाशी' काय ते भाषेत बोलणं. हे बोलणं ऐका. 'निर्गुणाच्या, निग्गुण म्हणजे सगळीकडे पसरलेली ही जी शक्ती आहे तिला बघायला मी आलो होतो तर तु सगुणात उभा आहे. तुझ्यात सबंध ती शक्ती आहे.' ह्याच्यापेक्षा महान असं अभिवादन काय असू शकतं! ह्याच्यापेक्षा कोणती अशी गोष्ट आहे की ती कोण कोणाला म्हणू शकतं! आणि त्याच वेळेला त्यांच्या तोंडून हे शब्द निघाले. तेव्हा आत्मसाक्षात्कार होणं हे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या उत्क्रांतीत आपण मानव स्थितीला आलो आहोत. ह्याच्यापुढची एक पायरी आहे आणि ती म्हणजे आत्मसाक्षात्कार, पण हे तुम्ही अध्यात्मात जाल तेव्हा. अध्यात्माचा पाया पाहिजेच. जर अध्यात्माचा पाया नसेल तर तुमची ती स्थिती होईल जी दुसऱ्या देशांची झाली आहे. आता ते इथे येऊन शिकतील अध्यात्म आणि नंतर तुमचा काय प्रकार होईल ते तुम्ही समजून घ्या. मला आठवतं मी पहिल्यांदा जेव्हां लंडनला गेले. आमचे यजमान तिथे सिलेक्ट होऊन गेले म्हणून मी लंडनला गेले. तेव्हां सात हिप्पी आले. चार वर्ष मी हात मोडले त्यांच्यावर. तेव्हा कुठे त्यांची जागृती झाली. पण इंग्लिश लोक कसे आहेत. मी त्यांना हार्ड...म्हणते. पण एकदा जर का झाले पार की ते कोळून प्यायले सहजयोग. कोळून प्यायले. साऱ्या जगातलं काय असेल ना ते आणून माझ्यासमोर टाकत आणि म्हणत, 'हे बघा माताजी. ' अरे म्हटलं 'मला तर माहितीच आहे. तु कुठून शोधून आणलं?' साच्या जगात फिरून, कुंडलिनी काय आहे ते सिद्ध करून सगळे पूर्ण केलं. पण त्यांच्यामध्ये एक विशेषता आहे की सत्याला चिकटणं. एकदा सत्य मिळालं मग सोडत नाही. चिकटतात आणि आपल्या गहनतेत. सात्विक श्रद्धा मी तुम्हाला सांगितली. जी आपण दुसऱ्याच्या चांगुलपणावर, त्याच्या चरित्रावर, त्याच्या महान कार्यावर एक श्रद्धा ठेवणं. ही जी गोष्ट आहे त्याने मनुष्याला गहनता येते. मनुष्य गहन होत जातो. गहनता येते. आणि अशी मंडळी जेव्हा सहजयोगात येतात, मी पाहिलं आहे एकदम, खटकन अवधूतस्य. पण जे उथळ मनाचे आहेत त्यांना कठीण जातं. कारण बुद्धीने जाणण्याची गोष्ट अध्यात्म नाही. आत्म्यानेच आत्म्याला जाणलं पाहिजे. ही स्थिती येण्यासाठी कुंडलिनीचं जागरण आवश्यक आहे. बरं, ही जिवंत क्रिया आहे. आता जमिनीमध्ये तुम्ही जर एखादं बीज घातलं तर काय आपण या जमिनीला काही देतो का पैसे. तिला काही समजतं तरी का? तिला काही अक्कल आहे का पैशाची. तिला बँक वरगैरे समजतं का बिचारीला! तीच्या शक्तीनुसार ती तुम्हाला देते. ही फळं घ्या, फुलं घ्या, जे पाहिजे ते घ्या. पण सर्व गोष्टींवर ताबा आहे. आंब्याचं झाड एका उंचीच झाड आहे. मानव एक उंचीवर, कुत्रा एक उंचीचा आहे. म्हणजे ताब्यात येतं. ही ऋतंभरा प्रज्ञा आहे. ही सगळें करते. पण तिला तुम्ही पैसे किती देणार? तेव्हा आधीच मी सांगितलं की अध्यात्मात कोणीही मनुष्य तुमच्याजवळ पैसे मागत असेल तर तो मनुष्य महाभोंदू, ढोंगी तुम्हाला काय शब्द येतील ते म्हणा आणि अशा माणसाच्या दारात जायचं नाही. असच मला एका गृहस्थाने सांगितलं की एका गृहस्थाने करोडो रुपये देवाच्या नावावर कमवले. अहो, कसे फेडू शकता! किती मोठ पाप आहे देवाच्या नावावर पैसे कमवणं! फार मोठ पाप आहे. पण पाप, पुण्य याची कल्पनाच सुटल्यावर मग वाट्टेल तसं वागायचं. वाट्टेल ते करा. सहजयोगामध्ये जी सर्वांगीण उन्नती होते ती मात्र पाहून आश्चर्य वाटतं. आता रशियासारखा देश, आपण लक्षात घ्या, रशियासारखा देश, जिथे गणपतीचा 'ग' तर सोडा पण देव काय ते माहीत नाही. त्यांना देव माहीत नाही, धर्म माहीत नाही, काही

माहीत नाही. तरी त्यांच्यात या अंधश्रद्धा नाही असं म्हटलं पाहिजे. अहो, मला आश्चर्य वाटलं. मी गेले तिथे लेनिनग्राडला पहिल्यांदा तर २००० माणसं बाहेर आणि २००० आतमध्ये. पण खटक्यात पार झाली. बाहेर येऊन बघते तर परत २००० बसलेले. म्हणे, 'आम्हाला तुम्ही कधी रियलाइझेशन देणार ?' गेलेच नाहीत. मी म्हटलं, 'आता मी उद्या येते सकाळी. आपण बाहेर करू या.' ते आतले २००० आणि बाहेरचे २००० हालतात कुठे. आणखीन मुलं आली. पण त्यानंतर इतक पेटलं ते. त्यांनी कधी माझं नावसुद्धा ऐकलं नव्हतं हो. त्यांना कुंडलिनी कशाशी खातात हे माहिती नाही. ते इतक्या जोरात पेटलं की आता तिथे हॉलमध्ये जे प्रोग्रॅम होत होते ते स्टेडियममध्ये होतात, १६,०००, १४,००० च्या पलीकडे. म्हणजे सबंध सहजयोग जसा काही धर्मासारखा तिकडे पसरला. गोर्बाचेव्हसुद्धा मला मानतात फार. नशीब त्यांचं की गोर्बाचेव्हसारखा साक्षात्कारी मनुष्य त्यांचा प्रेसिडन्ट आहे. आमचं नशीब खरं म्हणायचं. त्याठिकाणी आपल्याला आश्चर्य वाटेल की सोळा हजार माणसं, चौदा हजार माणसं चोहीकडे आहेत आणि विचारलं, 'किती किती लोकांना हातात थंड वाटलं? ' सगळ्यांचे हात वर. बस् एक माझा फोटो पाहिजे त्यांना. चारशे डॉक्टर तिथे सहजयोग करत होते. चारशे. आणि दोनशे फार मोठमोठाले वैज्ञानिक आले. ते पराकोटीला पोहोचलेले वैज्ञानिक आहेत. मला म्हणे, 'आता विज्ञान तुम्ही सांगू नका माताजी. मुळीच सांगू नका. झालं ते पुष्कळ झालं. आता आम्हाला आत्मसाक्षात्कार द्या.' आता आपण विज्ञान करून, हिप्पी होऊन, ड्रग घेऊन मग सहजयोग घेणार आहात. ते आता घ्या. प्रश्न हा आहे. आत्ता तुम्ही आत्मसाक्षात्कार करून घ्यावा. आणि ही जी आपली स्थिती आहे, आपलीच कुंडलिनी, आपल्यामध्येच बसलेली आपलीच आई आणि ती आपल्याबद्दल सगळे काही जाणते. तिला सगळं माहिती आहे तुम्ही काय केलं. जसं टेपरेकॉर्डर रटतो तसं ती आहे. आणि ती तुम्हाला हा पुनर्जन्म देण्यासाठी अत्यंत उत्सुक आहे. अत्यंत उत्सुक आहे. बरं दुसरं सांगायचं म्हणजे हा महाराष्ट्र म्हणजे फार मोठा देश आहे. महा राष्ट्र खराच आहे हा! हे तुम्ही नाही मी जाणणार पण मी जाणते. हे लोक जाणतात. हे कोठे जायला तयार नाहीत. महाराष्ट्रातच जायचं आपल्याला. म्हटलं जाऊन तुकारामाच्या समाधीवर जाऊन या तर तिथे गेले तर सगळे सांगायला लागले की तिथे लोळत होते हे जमिनीवर. म्हटलं, 'तुम्ही लोळत कशाला होता जमिनीवर?' 'माताजी, जमिनीतून चैतन्य येत होतं . अहो, जमिनीतून चैतन्य येत होतं.' कुठे त्यांना म्हटलं, 'दुसरीकडे खूप कार्य होतं.' तर म्हणाले, 'नाही आम्हाला इकडे महाराष्ट्रातच घेऊन या.' ह्यांनी ओळखलं की ही संतांची भूमी. रामालासुद्धा चपला काढून तिथे यावं लागलं. ही अशी पुण्यभूमी. त्या पुण्यभूमीत तुम्ही जन्मलात हे तर तुम्हा सगळ्यांना समजतय. पूर्वजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेच तुम्ही लोक आहात हे त्यांना वाटतं. कारण तुम्ही महाराष्ट्रात कसे जन्माला आले! म्हण आहेच की पिकतं तिथे विकत नाही. .. मराठीसारखी भाषासुद्धा नाही. आता मी पुष्कळ भाषा जाणते. मराठीसारखी भाषाच नाही. आता इंग्लिश भाषेला आपण एवढं मानतो. काय आहे त्या इंग्लिश भाषेचं कर्म, कटकट सांगायची. मला तर त्याच्याबद्दल, आत्म्याबद्दल बोलायचं तर भयंकर त्रास होतो. आता इंग्लिशमध्ये मला प्रावीण्य आहे. म्हणजे बघा, स्पिरीट म्हणजे आत्मा, स्पिरीट म्हणजे दारू, स्पिरीट म्हणजे देश स्पिरीट म्हणजे अहो, आता त्यातलं कोणतं धरायचं! आपल्याकडे कसे सगळ्याला वेगळेवेगळे शब्द असतात. रंगाला, ह्याला.

काय ही मराठी भाषा. ह्या मराठी भाषेला तोड नाही. कधी कधी तर मला वाटतं की ती संस्कृतावर जाईल काही काही ठिकाणी. म्हणजे रोजच्या भाषेत. आपल्या रोजच्या भाषेमध्ये म्हटलं 'आता कंटाळा आला.' म्हणे 'कंटाळा म्हणजे काय?' आता म्हटलं, 'बाबा, त्याचा अर्थ कुठे लागत नाही. 'कोणत्याच भाषेत कंटाळा कुठे नाही. तुम्ही मला विचारताय तर हिंदी भाषेत मी सांगते की हिंदी मला फार चांगली येते असं लोकांच मत आहे. पण मराठीच्या तोडीला हिंदी नाही. आता हे सगळे मराठी भाषा कसे शिकले ? तुम्ही समजा. एवढी कठीण भाषा की इंग्लिश लोकांना म्हणायचं असलं की 'दरवाजा बंद कर' की त्यांना सांगायचो आम्ही की 'देअर' असं म्हणायचं पहले. एक शब्द येत नसे त्यांना. 'देअर वॉज ए बांड करा' म्हणजे 'दरवाजा बंद कर.' म्हणजे मग त्यांची जीभच वळली, एवढी जाड जीभ की वळतच नव्हती. मग करायचं काय? आता हे लोक जे, त्यांच्यामध्ये जर्मन आहेत, यांच्यामध्ये इंग्लिश आहेत, यांच्यामध्ये फ्रेंच आहेत, यांच्यामध्ये इटालियन आहेत बरेच देशातले लोक इथे आलेले आहेत. इराणियन्स आहेत. तऱ्हेत-हेचे लोक इथे आलेले आहेत. हे लोक इतकं सुंदर मराठीमध्ये तुमचे पोवाडे गातील. तुमच्या लावण्या, पोवाडे, तुमचे भारुड करतात. अहो, भारुड करतात हे लोकं! नामदेवांच भारुड. परवा यांनी मला भारुड दाखवलं. इतकचं नव्हे तर जोगवा, नामदेवांचा जोगवा, तो फार वर्षापासून आपल्याकडे आहे, तो इतका सुंदर गातात. त्यांना मी सांगणार आहे की ह्याच्यानंतर आपला एक प्रोग्राम होऊ देत. तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यांचे नुसते चेहरे पांढरे आहेत. बाकी अगदी महाराष्ट्रीयन पक्के झालेत ! गळ्यात मंगळसूत्र पाहिजे, कुंकू पाहिजे. असं सगळें घालायचं. व्यवस्थित डोक्यावर पदरबिदर घेऊन. मी सांगते की डोक्यावर पदर घेऊ नका. काही गरज नाही. फार बायका कमी घेतात डोक्यावर पदर. तर मग आता हे. इतकं ह्यांना कुठून आलं. अहो, आपली संस्कृती घेणं काही सोपं काम नाही. ह्या लोकांना तर एवढा स्वत:बद्दल गर्व होता. हे रजनीशचे शिष्य फिरतात बघा, घाणेरडे फिरतात सगळे, कसे फिरतात. त्याच्यात काही आली आहे का संस्कृती आपली ? आणि इथे तुमचे खेडेगावातले, मला आश्चर्य वाटतं त्यांना भाषा येत नाही, काही नाही. पण या खेड्यातल्या लोकांना गळ्यात गळे घालून पाहिलं. म्हटलं, 'तुम्ही बोलता तरी काय?' ते ही म्हणे, 'माताजी, त्यांना चैतन्य फार आहे या लोकांमध्ये. आम्ही फक्त चैतन्य देतो.' म्हटलं इतकं यांचं प्रेम कुठून आलं? ही मंडळी म्हणजे किती अॅडिक्ट आहेत त्यांच्यात. आणि सर्व गोष्टींना इतकं ह्यांना वाटतं की केवढी मोठी महाराष्ट्राची संपदा, केवढी मोठी संस्कृती! ह्या संस्कृतीला काही विचारू नका. शिवाजी महाराजांचा सबंध इतिहास यांनी वाचून टाकला. काय शिवाजी महाराज होते, राणा प्रताप काय होते ? अमूकतमूक. हे म्हणे, आमच्याकडे असे कधी राजे झालेच नाहीत. असे राजे आमच्याकडे झाले असते तर आम्ही त्यांच्यासारखे झालो असतो. आपल्या लक्षातच येत नाही की आपल्याजवळ काय-काय मोठंे आहे. आणि म्हणून हे लोक इतक्या लांबून इथे आलेले आहेत. बरं, कराड बद्दल विशेष आहे मला. पुष्कळ वेळा इथून जाणं-येणं होतं. कराडमध्ये अवश्य एकदा प्रोग्राम केला पाहिजे. कारण यशवंतराव चव्हाण हे माझ्या वडिलांचे एक मित्र होतेच, पण माझे वडीलसुद्धा काँग्रेसमध्ये होते. पण त्याच्यानंतर माझ्या यजमानांचं आणि त्यांच फारच प्रेम होतं कारण माझे यजमान हे शास्त्रीजींचे मुख्य सचिव होते आणि फार प्रेम होतं. आणि ते लोक जेव्हा शास्त्रीजींचा मृत्यू झाला, त्यावेळेला बरोबरच आले. तेव्हा

फार जिव्हाळ्याचं त्यांच होतं. आणि काय व्यासंगी आहेत. मला नाही वाटत की कधी त्यांनी असं म्हटलं की अंधश्रद्धा, हे करा, असं करा, तसं करा. आता म्हणे, त्यांना व्यसनमुक्तीसाठी वापरणार. कशाला मुलांना वापरता. अहो, तुम्ही लोक करा तुम्हाला काय करायचं ते. मुलांना अभ्यास करू द्या. मुलांची ही टूरम काढायची आणि मूलांना अशा मार्गावर घालायचं की त्यांना काही अभ्यास नको, काही नको. आणखीन कामातून जाणार. मी परवा अशीच एक ट्रम काढली लोकांना. म्हटलं, 'काहो, तुमचं धोरण काय ?' एकदम चुप्प झाले. काही धोरण आहे की नाही तुम्हाला. एवढी तुम्ही सगळी धावपळ करता, एवढी तुम्ही सगळी युवाशक्ती नेली, त्याला काही धोरण असायला पाहिजे. 'अहो,' म्हणे, 'असं आहे. धोरण तर काही नाही पण आमचे जे मोठे लोक सांगतात तसं आम्ही करतो.' म्हणजे तुम्हाला काही व्यक्तित्व नाही का? जे सांगतील ते करायला तयार आहेत. 'अरे,' म्हटलं, 'तुम्हाला काही वाटतं का ? कुठेही जाऊन नारे लावायचे. दगड फेकायचे. ही लायकी आहे का तुमची? आपल्या प्रतिष्ठेला जागृत व्हा. ह्या लायकीचे तुम्ही आहात का ? की फुकटचे आपले हे धंदे करायचे.' तेव्हा त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला. तेव्हा सहजयोगाने तुम्हाला स्वत:ची प्रतिष्ठा समजते. त्याच्याआधी तुम्ही काय ते काहीही तुम्हाला माहीत नाही. किती मोठे, किती महान आहेत हे काहीही तुम्हाला माहीत नाही. कारण असं आहे की एखाद्या खेडेगावात गेले. त्यांनी कधी टेलीव्हिजन पाहिला नाही. आपण म्हटलं हे बघा, हे टेलीव्हिजन आहे. 'ह्याच्यामध्ये सगळ्या जगातले लोक दिसू शकतात, ह्याच्यामध्ये नाटक, हे, ते दिसेल.' 'तेव्हा हा काय करतोय डबडं. ह्याच्यात काय होणार आहे?' खेडेगावात असंच म्हणणार लोक. ह्या डबड्यात तुमचं काही नाही रहात. पण तुम्ही त्याचा योग किंवा त्याला मेन्सला लावल्याबरोबर आश्चर्यचकित होता. ही कमाल आहे! तेव्हा आपल्यामध्येसुद्धा एक दिव्य असं कॉम्प्युटर देवाने बनवलं आहे. आणि ते कॉम्प्युटर सुरू झाल्याबरोबर अशा गोष्टी घडतात की लोकांना आश्चर्य वाटेल लोक कुठल्याकुठे गेले आणि आपल्यापेक्षा ते लोक फार पुढे गेले आहेत. आपल्यात एक मागासलेपणा आहे तो असा की आपण कोणत्याच गोष्टीत प्रावीण्य मिळवत नाही. पण सहजयोगात आल्यावर तुम्ही पाहिलयं की हिंदुस्थानी मनुष्यसुद्धा प्रावीण्यात येतो. आर्किटेक्टस मी पाहिले की सहजयोगात आल्यावर कुठल्या कुठे पोहोचले. सरकारी नोकर कुठल्याकुठे पोहोचले. प्रत्येकाला मी पाहते आहे की असे साधेच आले आणि कुठल्याकुठे पोहोचून गेले. शिक्षक काय, ते कुठल्या कुठे पोहोचले. जे लोक कधी भाषण सुद्धा देऊ शकत नाही, त्यांची भाषणं ऐकली तर आश्चर्य वाटतं की हे किती इतके पोहोचलेले कसे ? परत भ्रष्टाचारात हे लोक पडत नाही. प्रश्नच पडत नाही. कोणत्याही देशात. तो मग हिंदुस्थानी असे ना का, कोणीही भ्रष्टाचार करत नाही. मी कोणाला काही सांगत नाही. मी असं नाही म्हटलेले आहे की तुम्ही हे करू नका, ते करू नका. पूर्णपणे व्यसनातून मुक्त होतात कारण ते समर्थ होतात. समर्थ झाल्यावरती एवढी शक्ती येते की कोणत्याही व्यसनाला शरण यायची काय गरज आहे. तुम्ही समर्थ होता. मला आश्चर्य वाटतं की सुरुवातीला मला त्रास जरूर झाला. पण त्यानंतर मी पाहिलं काय की जागृती झाल्यावर ड्रग्ज घेणारे लोक, ज्यांचे ड्रग्ज सुटत नव्हते, दुसर्या दिवशी सोडून मोकळे. आता एक फार मोठे डॉक्टर आहेत लंडनला. ते सात हॉस्पिटलचे मुख्य आहेत. ते स्वतः ड्रग्जमध्ये होते. आणि त्यांची सगळी नोकरी वगैरे सुटून निघून गेले. जागृती झाल्यानंतर कुठल्या कुठे ते पोहोचले. आता आले

होते कॉन्फरन्सला. आणि त्यांनी सगळे सांगोपांग सांगितलं की सहजयोगात कसं होतं पॅरासिम्पर्थॅटिक नव्व्हस सिस्टीम कशी तुम्ही नरीश करता. त्याच्यात कशी प्लावित करता आणि त्यानी कसं कार्य होतं. सबंध त्यांनी सांगोपांग सांगितल्यावरसुद्धा न्यूजपेपर वाले मात्र लिहितात की त्यांनी काही सांगितलं नाही. म्हणजे झोपले होते की काय! ही जी आपल्याकडे एक विशेष प्रवृत्ती आहे म्हणजे खोटं बोलणं. त्यामुळे जे खरं आहे ते पसरणार नाही. आणि जे काही खरं असेल त्याच्या विरोधात उभं रहायचं. खोट्याला मदत करायची आणि खरऱ्याच्या विरोधात उभं रहायचं. पण जे खरं आहे ते साऱया जगाच्या कल्याणासाठी आहे. ते हितकारी आहे. हे सबंध जग जर बदलायचं असलं तर माणसाचं परिवर्तन व्हायलाच पाहिजे. आणि ते कुंडलिनीच्या जागरणाशिवाय होऊ शकत नाही. हे सर्व जागतिक कार्य आहे. आणि इथे पंचावन्न देशातले लोक. आता तर नाही, पण होतीलच पंचावन्न देशातले लोक. अगदी निवडक लोक आलेले आहेत. आणि फार पोहोचलेले लोक आहेत. सगळे संत- साधू. सगळे संत-साधू आहेत. आता ह्यांच्याकडे सगळं आहे. मोटारी आहेत, घरं आहेत, हे आहे, ते आहे सगळे श्रीमंत लोक आहेत. सगळे आपला खर्च करून येतात. आणि इथे मात्र बघा जमिनीवर झोपतील, जमिनीवर बसतील. त्यांना कधी मांडी घालून बसायची सवय नाही. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल तुम्ही ह्यांचं गाण ऐकाल तर मी म्हटलं ते खरं वाटेल. बरं आता एक दहा मिनीट आणखीन आपलं जागृतीचं कार्य संपल्यावर हे लोक आपल्याला गाणी ऐकवतील. सर्वप्रथम मी डॉ.प्रभुणे यांची फार आभारी आहे. त्यांचे शब्द ऐकून मला फार संतोष आणि आनंद झाला. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा ह्या गोष्टी आम्ही ऐकत असू. आमचे वडीलसुद्धा आत्मसाक्षात्कारी होते. पण आज मला इतका आनंद झाला की वडीलधारी लोक जर अध्यात्माबद्दल एवढी श्रद्धा बाळगतील तर आमच्या मुलांचे कधी नुकसान होणार नाही. कधी नुकसान होऊ शकत नाही. तेव्हा आधी अध्यात्म मिळवायचे आणि त्यात तुम्हाला वाट्टेल तशी प्रगती करा. कधीही तुमचं संतुलन जाणार नाही. तुम्ही कधीही वाईट मार्गावर जाणार नाही. म्हणून अध्यात्म हा जरुरी आहे. ज्याला पाया नाही ते घर किती दिवस टिकणार आहे हे लक्षात घेतले पाहिजे. अध्यात्म ही आपल्या देशाची संपदा आहे, ती आपण सर्व जगाला देऊ शकतो, एवढी मोठी आपल्याजवळ संपदा आहे. साऱ्या जगाचे लोक तुमच्या चरणावर येतात. मी तुमच्यातलीच एक आहे हे समजलं पाहिजे. आपली जी श्रीमंती आहे ती जाणली पाहिजे. ह्यांची श्रीमंती काय क्षणभंगूर आहे. आपली श्रीमंती, काय सांगावं, काय वर्णावी ती, तिची स्तुती किती करावी आपल्या श्रीमंतीची! त्याची जाणीव या लोकांना आहे आणि आपल्याला जर झाली नाही तर लोक म्हणतील की 'हे शहाणे नव्हे!' तेव्हा आपली फार मोठी जबाबदारी आहे. फार मोठी जबाबदारी आहे. आणि जर आपली शक्ती आहे तर ती का मिळू नये. ती आपण का घेऊ नये. त्यासाठी काही पैसे लागत नाही, काही नाही. मला काही त्याच्यात मिळणार नाही. तर आपण का घेऊ नये. जे मिळतय ते का नाही मिळवून घ्यावं. एक साधा प्रश्न स्वत:ला विचारला पाहिजे. हे काही शहाणपणाचं लक्षण आहे का? आम्ही असा सहजयोग शोधून काढलेला आहे की तुम्ही खुर्चीवर बसलेले असला काय किंवा तुम्ही कुठेही असलात तरी कुंडलिनी ही जागृत होते. मलाच आश्चर्य वाटतं की झालंय काय या परम चैतन्याला! तोच

उतरलेला दिसतोय. काय कमाल होऊन राहिलीये. आश्चर्य वाटतं. आता इच्छा मात्र असायला कृतयुगात पाहिजे. अशी जबरदस्ती कुणावर करता येत नाही. इच्छा असायला पाहिजे कारण ही जी कुंडलिनी आहे ना, ही शुद्ध इच्छा आहे. आपल्या बाकीच्या इच्छा शुद्ध नसतात. आज वाटतं आपण हे घर बांधावं. मग मोटर घ्यावी, मग शेत घ्यावं. जे मिळतं त्याच्यात काही आनंद वाटत नाही. एक अशी इच्छा आहे, ती तुम्हाला माहीत असो वा नसो, तिची तुम्हाला जाणीव असो वा नसो, अशी इच्छा आहे की या परम चैतन्याशी आपला योग घटित झाला पाहिजे. आणि ही इच्छा जेव्हा पूर्ण होते तेव्हा सबंध सात रंग बदलून जातात. आणि मनुष्य समाधानात येतो. इतकी शक्ती येते माणसामध्ये. शक्ती तर येतेच पण त्याशिवाय इतकं प्रेम आणि इतका आनंद, मनुष्य शक्तिशाली होतो, तसाच तो आनंदमयी आणि प्रेममयी होतो. आता माझं वय तुम्हाला माहितीच असेल, ६८ वर्षाचं वय आहे. दर दोन, तीन दिवसांनी मी प्रवास करते. आजसुद्धा जवळ-जवळ ३०-३५ लोकांना मी बर करत बसले होते तिथे. तिथून मग निघालो मग इथे. मग काय होतच नाही. सगळ्यांना आश्चर्य वाटतं हे कसं काय चाललं आहे माताजींचे! घरचे लोक काळजी करतात म्हणा, पण त्यांना आता कळलंय की यांना आता काही होत नाही. तसंच आपल्यालाही होईल, सगळ्यांना. आता हे ही लोक किती प्रवास करताहेत. रात्र -रात्र जागरणं, हे, ते पण काही नाही. मजेत आहेत, आनंदात आहेत. तेव्हा तुम्ही हे मिळवा आणि आपल्या गहनतेत उतरलं पाहिजे. त्यासाठी ही जी आमची सामूहिक व्यवस्था आहे त्यात आले पाहिजे. म्हणजे ही सगळी जी वाढ होते ती सामूहिकतेत होते. तसंच जर आपलं एखादं नख कापलं गेलं तर ते नख वाढत नाही. तसच आपण जर म्हटल की आम्ही घरी हे सगळे करतो, तर तसं नाही. तुम्ही एकदा तरी आठवड्यातून आलं पाहिजे आणि थोडा वेळ तरी या आत्मसाक्षात्काराला दिला पाहिजे. एकदा तुम्ही याच्यात प्रावीण्य मिळवलं म्हणजे तुम्हीच हे कार्य करू शकता. हे प्रावीण्य मिळण्यासाठी तुम्हाला थोडीशी तरी मेहनत करायला पाहिजे. इतकी मजा येते की तुम्हाला सोडावसंच वाटत नाही. बरं याच्यात तीन अटी आहेत. पहिली अट अशी की माझं हे चुकलं, माझ ते चुकलं. मला असं नको करायला पाहिजे होतं किंवा माझ्या लेक्चरमध्ये मी काही म्हटलं तरी ते सगळं विसरून जायचं. अहो, तुम्ही मानव आहात. मानव हा चुकणार, परमेश्वर नाही तुम्ही. पण तुम्हाला लोक सांगतात की तुम्ही पापी. म्हणजे इतके पैसे काढा म्हणजे तुमचं पाप इतकं जाईल. पैशाने का पाप धुतलं जातं ? तुमचं हे चुकलं, ते चुकलं, रात्रंदिवस ऐकून- ऐकून आपल्यामध्ये एक न्यूनगंड येतो. तसं काहीही नाही. आईसमोर सगळी मुलं ठीक आहेत. काहीही माझं चुकलं नाही अस मनात धरून चालायचं. काहीही चुकलं नाही मागचे सगळे विसरून जा. असेल चुकलं-माकलं गेलं, झालं. आत्ता या क्षणाला माझंे काहीही चुकलं नाही, असा मनामध्ये एक विचार ठेवायचा. आणि जे लोक असा विचार ठेवतात की मी असं चुकीचे वागतो किंवा माझ्यात हे चुकलं त्यांचं हे एक चक्र धरतं, इकडे, डावीकडे आणि त्याने अंजायनाचा रोग होतो. अंजायनाचा रोग होतो इतकेच नव्हे पण ज्याला आपण स्पाँडिलायटिस म्हणतो, जिथे हाडं, मणक्याची हाड हलतात तो सुद्धा रोग त्यानेच होतो. तेव्हा हे काही चांगलं नाही. काहीच चुकलेल नाही. कसलं काय ! स्वच्छंद मनाने राहिलं पाहिजे. बरं एक गोष्ट ही. दूसरी म्हणजे अट अशी आहे की तुम्ही सगळ्यांना एकसाथ क्षमा करून टाका. एकसाथ म्हणजे असं की

प्रत्येकाची आठवण करून. उगीचच डोक्याला त्रास नको. नाहीतरी आपण क्षमा करतो किंवा नाही करत. काही करतो का आपण? विचार करा. काहीच करत नाही. पण क्षमा नाही केली तर आपण आपल्या डोक्याला ताण देतो. म्हणून एकसाथ 'मी सगळ्यांना क्षमा केली' अस मनात तुम्ही म्हणूनच टाका. सगळ्यांना क्षमा केली, जाऊ देत. बघा, किती आनंद वाटेल तुम्हाला! बरं, तिसरी गोष्ट म्हणजे अशी की 'मला आत्मसाक्षात्कार होईलच.' हा पूर्ण आत्मवि्वास आपल्यामध्ये ठेवा. पूर्ण आत्मविश्वास. अहो, तुम्ही या महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलात. हे लोक जेव्हा मुंबईला येतात, तेव्हां एरोप्लेनमधून उतरल्या उतरल्या पहिल्यांदा तुमच्या या महाराष्ट्राच्या भूमीची थोडीशी धूळ अशी डोक्याला लावून नमस्कार करतात. ही एवढी महत्त्वाची जागा आहे. कळलं का? तेव्हा 'मला आत्मसाक्षात्कार होईलच' हा पूर्ण साक्षात्कार ठेवायचा आणि ते हमखास आपल्याला मिळणारच.

Karad (India)

Loading map...