
Public Program 1982-12-30
30 डिसेंबर 1982
Public Program
Malharpeth, Kolhapur (India)
Talk Language: Marathi | Transcript (Marathi) - VERIFIED
परम पूज्य श्री माताजी श्री निर्मला देवी यांनी ३० डिसेम्बर १९८२ साली मल्हारपेठ, भारत येथे नवीन साधकांना दिलेला उपदेश आणि जागृती:
कलियुगामध्ये जन्म घेणं आणि तेही आईच्या रूपाने म्हणजे फार कठीण काम आहे. गुरु म्हटला की त्याचा आपोआपच सगळ्यांना वचक असतो. आई म्हटली की प्रत्येक मानवाला असे वाटतं की आपल्या जी हक्काची आई आहे आपण कसंही तिच्याशी वागलं तरी ती आपल्याला क्षमाच करणार आहे. तेव्हा सहजयोग आईच्या रूपानी साध्य करणं तर व्हावंच लागतं, कारण त्याच्याशिवाय होणारच नव्हतं. आईच व्हायला पाहिजे. दुसऱ्या कोणाच्या शक्तितच नव्हतं हे काम. तर मल्हारपेठेत सत्कार बघून आईचा या कलियुगात, फार आश्चर्य वाटलं आणि फार आनंद झाला. म्हणजे - कलियुग बदलून कृतयुगाला सुरुवात झाली आहे - असं पंचांगात आहे, ते खरं आहे, हे आज मात्र मला पटलं. आम्ही एक स्त्री आहोत, तेही आई आहोत. म्हणजे एकतऱ्हेचा दुबळेपणा आहे हृदयाला. तुमचं काही वाईट झालं तर तेही दुखतं, त्यानीच त्रास होतो आणि तुमचं चांगलं व्हावं म्हणून इतका आटोकाट प्रयत्न असतो, की कसंही करून ह्यांना एकदा मिळालं पाहिजे, कारण आईला स्वतःचं काहीच नसतं. तिला आपली मुलं ठीक झाली, त्यांना शक्ति मिळाली, त्यांचं जे काही आहे ते त्यांना मिळालं, त्याच्या पलीकडे काय आईला नको असतं. तेव्हा एक फक्त देण्याचं जे काम आहे, ते झालं म्हणजे कृतार्थ वाटतं. त्याच्या पलीकडे आणखीन आम्हाला काही नको.
आपण इतकी मंडळी मल्हारपेठेत सहजयोगाच्या कार्यक्रमाला आलात, म्हणजे किती भाविक आणि किती सात्विक लोक! परत संत तुकारामांच्या नावाने इथे एवढी सुंदर शाळा काढलेली आहे. याबद्दल मला इथले मुख्याध्यापक जे आहेत, ते मला दिसले नाहीत कोणते आहेत ते. तर त्यांना - अत्यंत त्यांचे आभार मानायचे आहे. संत तुकाराम म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून आमचेच आपलेच, स्वतःचेच आहेत. त्यांनी संबंध सहजयोगाची व्यवस्था आधीच करून ठेवली होती. त्याची तयारी आपल्या सर्व कवितेमधनं त्यांनी पसरवून ठेवलेली होती. आज अनेक वेळेला भाषणातून मी त्यांचे उल्लेख करत असते. इतकंच नव्हे पण ही जी मंडळी परदेशातली आली आहेत, त्यांनीसुद्धा त्यांची भजनं शिकलेली आहेत आणि मराठीत व्यवस्थित म्हणतात, त्यांची भजनं म्हणतात. आता तुम्हाला कधी जर ऐकायला मिळाली, तुम्हाला आनंद वाटेल की हे मराठी भाषा शिकुन आलेत आणि मराठी भाषेत संत तुकारामांची भजनं चांगलीच पाठ करून ठेवलेली आहेत त्या लोकांनी. त्याचे अर्थ काय आहे, त्याचे अर्थ काय, गुपित अर्थ काय, वगैरे सर्वच शिकून राहिले आहेत. पण आपल्याकडे मात्र थोडं धर्माकडे मनुष्याला जास्त लक्ष पाहिजे, कारण आपण खरोखर विशेष लोक आहोत! जरी आपल्याला एवढी श्रीमंती नसली, तरी आपण एक विशेष आहोत. कारण या सह्याद्रीच्या पठारावर आपल्याला माहिती आहे, की साडेतीन वेटोळे घालून विश्वाची कुंडलिनी वसलेली आहे. साडेतीन पीठं जी आहेत, ती ह्या आपल्या महाराष्ट्रात आहेत. इतकंच नव्हे तर अष्टविनायकसुद्धा ह्या महाराष्ट्रात आहेत. म्हणजे आपल्याला पृथ्वीचं फार मोठ देणं आहे आणि फार महत्वाची आपली भूमी आहे आणि ह्या भूमीवर तुम्ही जन्मल्यामुळे ह्या भूमीचं जे दान आहे, ते तुम्हाला रात्रंदिवस मिळत असतं. ह्याचं जे काही खाणं-पिणं वगैरे आहे ते सगळं तुम्हाला मिळत असतं. ते सगळं मिळालेलं आहे. ते सस्यश्यामलां भूमीमध्ये इथे आपण आता इतक्या भरभराटीला आलो, की आपल्याला आश्चर्य वाटेल.
माझी आई नगरची होती आणि तिचे वडील श्रीमंत असायचे आणि मुंबईला जायचे आणि तिथून द्राक्ष घेऊन यायचे. जर्मनचे द्राक्ष घेऊन यायचे. आणखीन फक्त तिलाच खायला मिळायचे आणि इतर मुलींना शाळेतल्या - मिळत नसे. तर जेव्हा लग्न होऊन ती नागपूरला गेली, तर मला सांगत असे की “बाई, मला एक वाटतं की आमच्या नगरच्या लोकांना कधी द्राक्ष खायला मिळाली नाही. त्यांनी कधी द्राक्ष पाहिली नाही. इथे जर कोणाला द्राक्ष खायला मिळाली तर किती बरं होईल?” म्हटलं, “ मिळतील, तुम्ही काळजी करू नका.” आणि आज बघा, केवढी सुबत्ता तुमच्यामध्ये आली! किती फरक झालेला आहे! आज त्या नाही आहेत, पण त्या लोकांच्या सगळ्यांच्या आत्म्याला किती आनंद झाला असेल! ज्या दिवशी ही सुबत्ता लोकांमध्ये आली. पण सुबत्तेवरुन धर्म वाढला पाहिजे. परमेश्वरावरची भक्ती वाढली पाहिजे. परमेश्वराच्या साम्राज्यावरही विश्वास ठेवला पाहिजे. पण सुबत्ता आल्याबरोबर माणसाला असं वाटतं ‘मीच हे केलं, मीच ते केलं!’ पण मनुष्य काय करू शकतो? तुम्हीच सांगा. जर एखादं झाड पडलं आणि मेलं, तर त्याचं तुम्ही फर्निचर (furniture) करू शकता. पण एका बी ला तरी तुम्ही रोखू शकता का? किंवा एका फळातनं तुम्ही म्हणाल तर बी काढू शकता. पण एका फुलाला तुम्ही फळ करू शकता का? काहीच करू शकत नाही.
सर्व जिवंत कार्य आहे. हे परमेश्वराच्या शक्तिने होत असतं. ही परमेश्वराची जिवंत शक्ति आहे, त्यानीच आपल्याला मानवसुद्धा केलं आहे आणि ते सहजच केलं आहे. ’स-ह-ज‘, सह म्हणजे तुमच्याबरोबर जन्मलेला असा हा योगाचा अधिकार आहे, ही तुमच्यामध्ये कुंडलिनी आहे. त्याबद्दल ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे. अनादीकाळापासून हे चाललेलं आहे. सगळे सहजच व्यवस्था आहे. ही सर्व सृष्टीची रचना सहज आहे. त्यातनं तुमचं हे मानव होणंसुद्धा सहज आहे आणि त्यापलीकडे अतिमानव होणंसुद्धा सहज आहे. काही त्याला कर्म पद्धत नाही, काही त्याला त्रास नाही. पण प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा असं काही झालेलं आहे, तेव्हा एकाला कोणालातरी येऊन हे कार्य करावं लागतं. त्यात आता आमची नेमणूक झाली आहे, म्हणून हे आता कार्य होत आहे. तरी अनेकांनी याचा फायदा घ्यावा. स्वतःला अतिमानव करून घ्यायचं. ते सगळं आपल्यामध्ये आहे. आत्मा आपल्या मध्ये आहे आणि कुंडलिनी आपल्यामध्ये आहे. फक्त कुंडलिनीचा संबंध आत्म्याशी झाल्याबरोबरच, त्या सर्वव्यापी शक्ति बरोबर आपला संबंध होऊन, हातातून असं गार-गार वाहू लागतं. डोक्यातूनही इथून ब्रह्मरंध्रात असं गार-गार वाहू लागतं. आता सहाव्या अध्यायामध्ये का सांगितलं की तो वर्ज्य आहे? कदाचित काही ब्राह्मणांनी उगीचच, यांना काही मिळू नये म्हणून सांगितलं असेल किंवा का सांगितलं, मला हे समजत नाही. पण कुंडलिनीच्या नावावरसुद्धा अत्यंत गोंधळ लोकांनी करून ठेवलेला आहे. कारण ज्यांना अधिकार नाही त्यांनी हे कार्य करायचं नाही. अधिकार हा परमेश्वराकडनं येतो. अशा माणसाला शुद्ध पावित्र्य असावं लागतं. ज्या माणसांमध्ये स्वतःचं पावित्र्य नाही, तो दुसऱ्याच्या कुंडलिनीला हात कसा घालू शकेल? कारण कुंडलिनी, ही तुमची अतिपवित्र अशी आई आहे, आणि ती प्रत्येकाजवळ आहे. तिला तुम्ही मलीन नाही करू शकत. ती अत्यंत पवित्र, अशी तुमची शुद्ध इच्छा, बाकी सर्व तुमच्या इच्छा विकृत होतात. पण ती शुद्ध इच्छा, परमेश्वराला मिळवण्याची जी शुद्ध इच्छा आहे, ती कुठे सारखी नसते आणि म्हणून तिला म्हणतात, ती सुप्तावस्थेत आहे. कारण अजून तिचं जागरण झालेलं नाही आणि ते जागरण तेव्हाच होऊ शकेल, जेव्हा त्या कुंडलिनीला हे कळेल की समोर, कुणी तरी अशी व्यक्ती आहे, जी त्या कुंडलिनीच्या कार्याला जाणते. आता आमच्यामुळे म्हणा किंवा इतर सहजयोग्यांच्यामुळे, इतर पुष्कळ लोक पार झाले. त्यातले काही लोक इथे आले आणि बरेच सहजयोगी लोकांनी इथे येऊन, एवढं मोठं - इथे बरंच कार्य सुरू केलेलं आहे. आता असंच मल्हारपेठेत, मग पुढे असं वाढत-वाढत, हे सहयोगाचं कार्य सगळीकडे पसरलं पाहिजे आणि हे पसरणारच.
कारण ह्याबद्दल पूर्वी हजारो वर्षापूर्वी भाकीत झालेलं आहे. हे भाकीत म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटतं, की भृगुंनी, हज्जारो वर्षांपूर्वी, सोळा-सतरा हज्जार वर्षांपूर्वी म्हणतात लिहून दिलं आहे. आता त्यांचे किती हजार वर्षं झाले, त्याबद्दल वाद घालण्यापेक्षा असे त्यांनी पुष्कळ जुनं, नाडीग्रंथामध्ये लिहून दिलेलं आहे, की १९७० सालापासनं हे कार्य सुरू होणार आहे. आणि सहजयोग हा १९७० सालापासनं सुरू झाला आणि त्यात सहजच अशी कुंडलिनी जागृत होऊन, आणखी सगळ्यांना हे परमेश्वराचे जे ज्ञान आहे, ते मिळणार आहे. आता जसं सांगितलं की तुकारामांनी काही वाचन केलं नव्हतं. ही गोष्ट खरी आहे. रामदासांचं काही वाचन झालेलं कुठे पाहण्यात नाही आलं, कोणच्या शाळेत ते गेले नाहीत. चोखामेळा झाले किंवा कुणीही झालं, सखुबाई झाल्या किंवा नामदेव झाले, त्यांनी कोणत्या शाळा, युनिव्हर्सिटी (university) पाहिल्या नव्हत्या. पण शाळा, युनिव्हर्सिटीत (university) जाणं वाईट आहे असं मी म्हणत नाही. पण शाळा, युनिव्हर्सिटीत (university) जाऊन तुम्ही परमेश्वराच्या वर होत नाही. शाळा, युनिव्हर्सिटीत (university) जाऊन, लोकांना असं वाटतं की जे पुस्तकात आहे ते परमेश्वराच्या वर आहे. इथेच माणूस चुकतो. तेसुद्धा ज्ञान परमेश्वरापासून आलेलं आहे. सगळं ज्ञान परमेश्वरापासूनच येतं. पण शेवटी आत्म्याचं दर्शन झाल्यावर त्यात, आतूनच ते ज्ञान येऊ लागतं आणि सर्व साधारण मनुष्यसुद्धा अगदी इतका संतां सारखा बोलू लागतो. सहजयोगानी पार झाल्यावर, आपण सर्व संतच होतो आणि संतांना काही तुम्ही घरदार सोडून पलायनवाद घेण्याची गरज नाही. घरातंच राहून, मुला-बाळांमध्ये राहून, आपला संसार चांगलासा साजरा करून, अगदी व्यवस्थित पणे नांदुन, त्या घरामध्ये एकतऱ्हेचं परमेश्वराचं साम्राज्य आणलं पाहिजे आणि ते साम्राज्य सुखदायी, आनंददायी आणि मंगलमयी असेल. ते जर झालं नाही, तर ते परमेश्वराचं साम्राज्य नाही. असा ईश्वरीय अंश तुमच्यामध्ये जागृत झाल्याबरोबर, तुमचं वागणं कसं ईश्वरीय होऊन जातं! आता इथे जी मंडळी आलेली आहेत बाहेरून, जसं ह्यांनी सांगितलं ते लोक तर तुमच्या मानाने पुष्कळच जास्त वसलेले आहेत, पुष्कळ जास्त. तर हे म्हणजे संत. खरं म्हणजे ह्यांची एक स्थिती फार उच्च प्रतीची असली पाहिजे. जर आज हे पार झाले आणि उद्या सगळं सोडून बसले. ही स्थिती आपल्या महाराष्ट्रात मी एवढी पाहिली नाही. तरी पुष्कळ चांगलं आहे. पण तरीसुद्धा एका दिवसात आज पार झाले आणि उद्या सगळं सोडून आणि व्यवस्थित झाले - असे हे लोक. म्हणजे किती मोठे संत असायला पाहिजे! म्हणजे यांची पूर्वजन्माची केवढी कमाई असायला पाहिजे! त्याच्या शिवाय काही होऊ शकत नाही; की आजच ह्यांना मी पार केलं आणि उद्याच्या दिवशी अगदी सगळं मोकळं सोडून, अगदी कमळासारखे वर आले. सगळं चिखलातलं राहून गेलं आणि सगळे वर आले. हे मात्र मला ह्यांचं पाहून फार आश्चर्य वाटतं. हे यांचं विशेष आहे. बरं त्यांना तुमच्यासारखी धर्म-मीमांसा नाही. त्यांना काही लहानपणापासून तुमचं वळण मिळालेलं नाही. जसं वागायचं तसं वागा! आई-वडिलांचं सुद्धा लक्ष नाही. घर वगैरे - अशी काही व्यवस्था नसतांनासुद्धा, ह्या लोकांनी जसा सहजयोग आत्मसात केला आणि जो डोक्यावर उचलून धरलेला आहे, त्याच्याकडे पाहून मला कधीकधी आश्चर्य वाटतं, की आपल्या महाराष्ट्रात आपण रोजच धर्माबद्दल ऐकत असतो आणि आपल्याला एवढे-एवढे मोठे संत झालेले आहेत, त्यांनी, लहानपणापासून आपण त्यांचे अभंगवाणी वगैरे म्हणत असतांनासुद्धा, जेव्हा आपल्या जवळ हा धर्म येतो, आपल्या आत जागृत होतो, तेव्हा मात्र आपण एवढ्या जोराने जमत का नाही? कारण कदाचित आपल्याला अति-माहीत असल्यामुळे, ‘अतिपरिचयात अवज्ञा’ होत असेल आणि त्यामुळे लोक एवढे त्याच्यात जमत नाहीत. पण खरं सांगायचं म्हणजे, आपल्या देशामध्ये इतकं वरदान आहे परमेश्वराचं, इथे आपण खरोखर इतके भाग्यवान लोक आहोत, की त्याची आपल्याला कल्पनाच नाही आहे, की ह्या लोकांनी काय काय दुःख केलं आणि काय काय त्रास सहन केला... असो. जे असेल ते झालं, आता मात्र पुढे सर्वांनी सहजयोग जमवून घ्यायचा. सहजयोगामध्ये म्हटलं तर, अनादि आहे, पूर्वी काळचा आलेला, आज तसाच आहे आणि पुढे अत्यंत मॉडर्न (modern) पण आहे. कारण याच्या मध्ये सर्व धर्मांची शक्ति मिळवलेली आहे. तेव्हा अगदी सगळ्यात विशेष म्हटलं तरी अगदी मॉडर्न (modern) हा धर्म आहे, की दत्तात्रेयांचा संबंध रामाशी काय आहे? दत्तात्रेयांचा संबंध मोहम्मदाशी काय आहे? याचा संबंध इतर गुरु लोकांशी काय आहे? सर्व जगातले गुरु हे कोण-कोण दत्तात्रेयांची अवतरणे झाली, हे सगळं काही सहजयोगात आहे. मग सीतेला झालेली दोन मुलं, लव आणि कुश, त्यांच काय झालं? ते कोणाचे अवतरण आहेत? त्यांची अवतरणं काय झाली? ते पुढे बुद्ध, महावीर कसे झाले? वगैरे सगळं काही - तुम्हाला सहजयोगात समजेल आणि बरं, हे जे आपण काय बोलत आहोत, आज पर्यंत 'बोलाचाच भात, बोलाचीच कढी!’ पण आता मात्र हे तुम्ही सिद्ध करू शकता.
एक मनुष्य मुसलमान होते. ते इराणातनं आले - डॉक्टर होते. त्यांना पोटाचा भयंकर कॅन्सर (cancer) झालेला. तर मी त्यांना म्हटलं की “तुम्ही दत्तात्रेयाला मानता का?” ते म्हणे “नाही. आम्ही फक्त मोहम्मद साहेबांना मानतो”. तर म्हटलं, “ते एकच होते”. “ते आम्ही मानायला तयार नाही. आम्ही फक्त मानतो, ते फक्त मोहम्मद साहेबांना. बाकी आम्ही कोणाला मानत नाही.” म्हटलं, “जर तुम्ही हे मानलं नाही, तर मी तुम्हाला ठीक करू शकत नाही. म्हणूनच तुम्हाला पोटाचा कॅन्सर (cancer) झाला.” तर ते काही मानायला तयार नव्हते. तर म्हटलं, “तुम्ही आता घरी जा मग. मी पुढे काही करू शकत नाही. माझे मी हात टेकले तुमच्यापुढे.” तर त्यांच्या बायकोला थोडं शहाणपण आलं. आठ दिवसांनी परत घेऊन आली. की आता ‘हे’ मरायलाच टेकले आहेत, तेव्हा, “आता तुम्ही काय म्हणाल आई, तेच करू.” मी म्हटलं, “आता म्हणा तुम्ही, की मोहम्मद, तुम्ही दत्तात्रेय आहात का? असा प्रश्न विचारा. मोहम्मद साहेब तुम्ही दत्तात्रेयच आहात का? असाप्रश्न विचारा.” करता – करता, त्यांचा कॅन्सर (cancer) एकदम ठीक झाला! असं आम्ही तुम्हाला सिद्ध करून दाखवतो. आता कुंडलिनी जागृत झाली. समजा, जर ही कुंडलिनी इथे येऊन अडकली, तर हे कोणतं चक्र आहे? [श्री माताजी अनाहत चक्रावर हात ठेवतात]. आता इथे अडकली तर कोणचं नाव घेतलं पाहिजे? तर जगदंबेचं नाव. आता जर जगदंबेचं नाव तुम्ही आधीपासून उगीचच घेत असाल तर.. पुष्कळांना आहे, ‘आम्ही हा मंत्र घेतला, आम्ही तो मंत्र घेतला, आम्ही रामाचा मंत्र घेतला आणि आम्हाला काय आजार आहे? - तर दमा आहे!’ होणार... कारण ज्या माणसाने रामाचा मंत्र घेतला, ते आमच्याकडे, जे आम्ही; उजव्या हाताला जे चक्र आहे रामाचं, हृदयाजवळ, त्या चक्रावरती काम करावं लागतं आणि खरोखर ज्या माणसाला अधिकार नाही रामाचं नाव घेण्याचं, त्यानी जर घेतलं, तर त्याचं ते चक्र धरतं. कारण असं आहे की, तुमचा अजून परमेश्वराशी संबंध झालेला नाही. समजा जर, तुमचे इथले जे कुणी मिनिस्टर (minister) असतील, समजा - आमची त्यांची काही ओळख नाही, काही नाही, आम्ही जाऊन त्यांचं नाव घ्यायला सुरुवात केली, तर तिथे पोलीस आम्हाला पकडतील की नाही? तसंच होतं. म्हणजे जोपर्यंत तुमचं योगसाधन झालेलं नाही, जोपर्यंत तुम्ही परमेश्वराच्या साम्राज्यात नाही आलात, तेव्हा वेड्यासारखे पोपटपंची करून जर तुम्ही एकच नाव घेत राहिलात, तर ते चक्र तुमचं नक्की खराब होईल. म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे, की नामाचा सुद्धा महिमा फार आहे. पण नामाचा महिमा म्हणजे गुरूंनी जे नाव दिलं ते घेतलं पाहिजे. पण आजकाल गुरु सुद्धा इतके भामटे निघाले, की वाटेल ते नावं देतात! म्हणजे त्याला काही अर्थच लागत नाही. म्हणजे स्वतः सुद्धा गुरु जो असतो, तो स्वतः पार असायला पाहिजे. आता ओळखताच येत नाही लोकांना, गुरु कोणता पार आहे? आणि गुरू आहे की नाही? हा संत आहे की नाही? ही सुद्धा लोकांना ओळख पटत नाही. आता परवा आम्ही एका गावाला गेलो होतो. त्याचं नाव होतं - मियाँ की टाकळी. गेल्याबरोबर मी सांगितलं की, “कुणीतरी फार मोठे संत होऊन गेले.” “हो” म्हणे, “माताजी, मियाँ होते इथे. ते फार मोठे संत झाले.” आणि तिथे आम्ही बसलो तर डोक्यावर असा जोरात त्यांनी लाईट (light) फेकला, की फोटोत (photo) सुद्धा तो लाईट (light) आला. यांनी जो फेकलेला लाईट. तो तुम्ही आता बघा. तुम्हाला दिसेल. पण काय आहे की; आता तुम्ही म्हणाल, तो मुसलमान होता मियाँ तो, तर तो पार नव्हता. तो मुसलमान असो, हिंदू असो, त्यांना जात नसते. कारण संन्यासी ना! त्यांना कसली जात आली? तसच कुठेही एखादा मनुष्य म्हटलं, की हा पार आहे की नाही आहे, तर ते कसं कळणार? जागृत स्थान आहे की नाही, ते कसं कळणार? तर तुमच्या मध्ये अजून ती शक्ति आलेली नाही बघण्याची.
जेव्हा तुम्हाला - कुंडलिनीचं तुमचं जागरण होतं आणि तुमचा आत्मा जेव्हा तुमच्या चित्तातून वाहू लागतो, तेव्हा तुम्ही कुठेही हात करून विचारलं, की ते स्थान खरं आहे की खोटं आहे? जर खरं असेल तर आतून एकदम धडधड असं हातात येऊ लागेल चैतन्याच्या लहरी. ज्या आदिशंकराचार्यांनी सांगितल्या होत्या, त्या चैतन्याच्या लहरी तुमच्या हातात अशा भरभर-भरभर येऊ लागतील. आता असं म्हणाल, की हे कार्य पूर्वी फार कठीण होतं. होतं! असो, पण आम्हाला नाही. पहिली गोष्ट; कारण की आम्ही विशेष आहोत. बरं आणि दुसरी गोष्ट अशी, की झाडाला पूर्वी एकच-दोन फुलं लागली, म्हणून आजच बहार आलेली आहे आणि पुष्कळ फळं होतात; तर मग ते मानत का नाही की बाहेर आलेली आहे? याच्यात भांडण कशाला करायचं की, पूर्वीही नव्हतं आणि आता स्वच्छता का नाही करत? हे काय? आम्हाला जसं जमतंय तसं आम्ही करतो आहे आणि हे तुम्ही करून बघा. ह्याला काही पैसे लागत नाही, ह्याला काही मेहनत लागत नाही. पण एकदा पार झाल्यावर मात्र तुम्हाला जमावं लागतं. जसं एखादं बी तुम्ही आज आईच्या उदरात घातलं की तिच्या शक्तिने ते जरी त्याच्यात अंकुर आला, तरी ते बीज जपावं लागतं. तो अंकुर वृक्ष होईस्तोवर ते जपावं लागतं. तसंच सहजयोगामध्ये नंतर जपावं लागतं आणि ही सगळी सामूहिक क्रिया आहे. तुम्ही म्हणाल, “माताजी, आम्ही घरी फोटो घेऊन गेलो, तिथे मेहनत केली, तिथे पूजा केली.” त्यानी चालायचं नाही. सामूहिक आहे. म्हणून इथे जे सेंटर (centre) आहे, त्या सेंटर (centre) वर सर्व मंडळींनी येऊन भेटलं पाहिजे. नंतर येऊन मला पुढल्यावर्षी सांगायचं नाही की, “माताजी, आम्ही प्रोग्रामला (programme) आलो होतो, जागृत झालो, पण आम्हाला कॅन्सरचा (cancer) रोग झाला.” मग कोणचाही तुम्हाला रोग होणार नाही, कोणचाही तुम्हाला त्रास होणार नाही. उलट तुम्हीच दुसऱ्यांचे त्रास ठीक करणार. दुसऱ्यांचे जेवढे काही वैतागलेले जीव आहेत, त्यांना तुम्ही ठीक करणार. घरामध्ये ज्यांच्या संसारीक त्रास असतील, ते तुम्ही ठीक करणार. म्हणजे तुम्ही शक्तिशाली होणार. पण ही शक्ति पहिल्यांदा तुम्ही पूर्णपणे आपल्यामध्ये सामावून घेतली पाहिजे आणि ती सामावल्यानंतर, तिचा उपयोग कसा करायचा ते शिकलं पाहिजे. स्वतःला कसं बचावलं पाहिजे, तेही शिकलं पाहिजे. त्याला आम्ही कवच असं म्हणतो. म्हणजे ‘बंधन’ असं. ही बंधनं कशी घ्यायची, घरातून जाताना किंवा घरात झोपताना, ते शिकलं पाहिजे. या सर्व गोष्टी सहजयोगात अशा आहेत - जसं तुम्हाला एक आम्ही मोटार दिली; आता मोटार आधी तुम्ही सुरळीत केली, तर तुम्ही आधी त्याची - त्याच्यामध्ये शक्ति यायला पाहिजे. नाहीतर तर ती मोटार चालणारच नाही. तेव्हा आधी त्याचं स्विच (switch) उघडायला पाहिजे. तसं झालं समजा की, तुमचं आधी स्विच (switch) उघडलं. त्याच्यामुळे तुमच्या मध्ये शक्ति आली. म्हणजे तुमच्यामध्ये आता जागृती झाली. त्याच्यानंतर आता हे डावी साईड (side) आणि उजवी साईड (side) काय - ती समजून घेतली पाहिजे. म्हणजे तुमचं ब्रेक (break) आणि ऍक्सिलरेटर (accelerator) कसं चालतं, हे समजून घेतल पाहिजे. मग करता करता, तुम्ही निष्णात अगदी होऊन जाता. निष्णात झाल्यावर ऑटोमॅटिकली (automatically) तुम्ही ती मशीन (machine) चालवू शकता. हे मशीन (machine) कशी चालते हे समजून घेणं हीच म्हणजे ‘सहजयोग विद्या’, आणि त्याला तुम्हाला काहीही कठीण जाणार नाही. कारण लगेच चुकलं ते समजतं, लगेच व्हायब्रेशन्स (vibrations) जातात. लगेच हे ठीक केलं की लगेच व्हायब्रेशन्स (vibrations) येतात. बरं त्याच्यानंतर - मग ते झाल्यानंतर, जो ह्याचा स्वामी आहे, म्हणजे ह्याचा स्वामी जो आत्मा आहे, तो फ्री (free) होऊन जातो. म्हणजे या मोटारीचा जो स्वामी आहे, तो आपल्या मधला ड्रायव्हरही (driver) बघतो आणि त्यातला ब्रेक (break) ही बघतो आणि ऍक्सिलरेटर (accelerator) ही बघतो. अशी स्थिती आल्यावर तर मात्र तुम्ही निर्विकल्पात उतरता. म्हणून सहजयोगामध्ये दोन पायऱ्या असतात. पहिली पायरी असते ‘निर्विचारीता’ आणि दुसरी पायरी असते ‘निर्विकल्पता’. ती सगळ्यांनी मिळवली पाहिजे. ते मिळवल्याशिवाय सहजयोगाचं कार्य इतक्या गहनतेने होणार नाही. याला गहराई येणार नाही. त्याला गहनता येण्यासाठी माणसाला पाहिजे की त्यांनी स्वतःबद्दल आस्था पाहिजे. स्वतः आम्ही काहीतरी विशेष आहोत, स्वतः आधी संत झालं पाहिजे आणि “येऱ्या गबाळ्याचे काम नोहे” जे सांगून गेलेले आहे, ती अगदी गोष्ट खरी आहे. पट्टीचे लोक पाहिजे त्याला. सहजयोगाला जे पट्टीचे लोक असतात, त्यांनी इतकी कार्य करून दाखवलेले आहेत की आश्चर्याची गोष्ट आहे. आता धुमाळ साहेबच आपल्याला माहिती आहेत, त्यांनी हजारो लोकांची जागृती दिलेली आहे. किती लोकांना यांनी ठीक केलेलं आहे. पण सहजयोगामध्ये लोकांना ठीक करण्याच काम नाही आहे. ते आपोआपच पार झाल्यावर लोक ठीक होतात. तेव्हा सगळे जगातले आजारी घेऊन नाही यायचं. मला पुष्कळ लोक असं म्हणतात की, “माताजी, तुमच्याकडे जेवढे शिष्य येतात तेवढे आजारीच येतात का?” म्हटलं, “नाही. हजारोंनी सगळे चांगलेच येतात. पण एखाद-दोन आजारीसुद्धा येतो, आणि जर पार झाले, तर तुम्ही सर्व ठीक होऊ शकता!” तेव्हा लक्ष इकडे द्यायचं की आमचं भलं होण्यासाठी परमेश्वरानी सहजयोगाला आज महायोगाच रूप दिलेलं आहे. तेव्हा या गंगेत सगळ्यांनी न्हाऊन घेतलं पाहिजे.
जागृती (realisation)
कृपा करून सगळ्यांनी माझ्याकडे असे हात करायचे. आज उशीर झाला, उशीर होतोच आम्हाला; म्हणजे तिथेच एक प्रोग्राम (programme) परत झाला, तो प्रोग्रॅम (programme) करून मग इकडे आलो त्यामुळे उशीर होतोच. तरी काही हरकत नाही. वेळेनी सर्व कार्य होत असतात. तेव्हा नुसते असे हात करून बसा आणि आता डोळे मिटा..... फक्त डोळे मिटायचे. काही दुसरं करायचं नाही..... सगळ्यांच्या हातामधे थंड येत असेल... पण ज्यांच्या येत नसेल त्यांनी जमिनीवर थोडा नमस्कार करा दोन्ही हातांनी, म्हणजे येईल. पटकन असा नमस्कार जमिनीला, धरतीमातेला नमस्कार केला, की ती ओढून घेईन सगळा काही त्रास. आणि खटाखट हातात येऊ लागेल. नम्रपणे नमस्कार करुन घ्यायचा; “आई, माझं काही चुकलं असेल तर ओढून घ्या स्वतःमध्ये.” हलू नका... हलणं-बिलणं नाही. जे हलत असतील, त्यांनी डोळे उघडायचे. ही काय चांगली लक्षणं नाहीत. ज्यांच अंग हलतं आहे, त्यांना काहीतरी त्रास आहे. अंग हललं नाही पाहिजे, डोळे हलले नाही पाहिजे. काही नाही, सगळं आत मध्ये. आंतर योग आहे. बाहेर हलतात, म्हणजे काहीतरी चुकलेलं आहे तुमच्या गुरूचं. काहीतरी चुकीचं करून ठेवलेलं आहे. ते बरोबर नाही. डोळे उघडे ठेवायचे. काहीही बाहेर तमाशा नाही करायचा. अगदी डोळे उघडे ठेवायचे. अशा लोकांनी, ज्यांना हलायला होतं आहे किंवा अंगात वारं येतं आहे, अशा लोकांनी डोळे उघडे ठेवायचे..... काहीही बाह्यात होत नाही. आतमध्ये सगळं घटित होतं. आता बघा, डोक्यावरसुद्धा बघा, गारगार येतं आहे का बघा डोक्यावर. उजवा हात डोक्यावर ठेवा. डावा हात माझ्याकडे. डोळे उघडेच ठेवा. टाळूवर बघा. टाळूवर अधांतरी धरायचं, अधांतरी धरा आणि फिरवून बघा गारगार येतं आहे का बघा.. वरती अधांतरी धरून. येतं आहे ना?... आलं का?... बघा सर्वांनी टोपी काढून बघा.. काही हरकत नाही, गार वाटेल! आता गारच वाटणार आहे सगळ्यांना. उन्हातसुद्धा गार वाटणार आहे. दुसरा हात करून बघा, येतं आहे का गार?