Public Program

Public Program 1990-12-10

Location
Talk duration
62'
Category
Public Program
Spoken Language
Marathi

Current language: Marathi, list all talks in: Marathi

The post is also available in: English.

10 डिसेंबर 1990

Public Program

Loni (India)

Talk Language: Marathi | Transcript (Marathi) - Draft

सत्याला शोधणाऱ्या आपण सर्व साधकांना आमचा नमस्कार . परमेश्वर सत्य आहे असे म्हंटलेले आहे . तसेच परमेश्वर हा प्रेमाचा स्रोत आहे असेही म्हंटले आहे . तेव्हा सत्य आणि प्रेम हे दोन्ही एकीकडे एकवटलेलं आहे . अशी शक्ती परमेश्वराची कोणती आहे ?. आपण रोजच कितीतरी जिवंत क्रिया पहात असतो . हि फुल आपण बघतो एका लहान बिजा पोटी इतकी सुंदर फुल येतात . एक लहानसं बीज त्याला इतकी सुंदर फुल कशी लागतात ?,आपण कधी विचार सुद्धा करत नाही फक्त समजून घेतो कि आहे हि जिवंत क्रिया आहे . आणि ती आपल्याला जाणण्याची काही गरज नाही . पण हि जिवंत क्रिया घडते कशी ?,कोण घडवत ?,तसच प्रत्येक मनुष्याची उंची एका मर्यादेत असते . एखाद्या झाडाची सुध्दा उंची त्याला सुध्दा एक मर्यादा असते . नारळाच्या झाडाला एक मर्यादा असते . प्रत्येक ऋतू मध्ये वेगवेगळे शेतीचे कार्य होतात . हि सगळी वेगळी कार्य करण्याची कोणती शक्ती आहे ?जी हि संबंध कार्याला घडवून आणते . आपण त्या बद्दल विचारही करत नाही . आणि त्यामुळे आपला जो काही प्रगतीचा मार्ग आहे तो फार एकांगी झालेला आहे . एकतर्फा झालेला आहे . जेव्हा आपण विज्ञानाच्या गोष्टी करतो तेव्हा विज्ञान हे फारच एकतर्फी आहे . आणि त्याच्याच मुळे आपल्याला आश्चर्य वाटेल कि परदेशा मध्ये आपण समजतो कि भौतिकता खूप वाढलेली आहे ,ती सगळी वाढ आहे ती तोलायची क्षमता त्यांच्यात नाही . ते ते तोलू शकत नाहीत . कारण त्यांचा पाया अध्यात्माचा नाही . तो पाया आपल्या देशात ,विशेषतः आपल्या महाराष्ट्रात अत्यंत भक्कम असा संत लोकांनी मांडलेला आहे . हे संतसाधु महाराष्ट्रात आले ,त्यांनी किती गहन कार्य केलय ,त्याची आपल्याला कल्पना सुध्दा आहे . आणि त्या गहन कार्याला आपण सर्व पूर्ण पणे जाणत असून सुध्दा ,त्या गहन कार्याचा आपल्याला किती लाभ झालाय त्याबद्दल आपल्याला माहिती नाही . संतांची आपण स्तुती गातो ,त्याची भजन गातो ,अभंग गातो आणि हे कार्य अव्याहत पणे खेड्यापाड्यातून चालू आहे . पण नुसतं तोंडानी बोलून काहीही मिळत नाही ,नुसतं वाचन करून काहीही होत नाही . हि काहीतरी अशी विशेष गोष्ट आहे जी आपल्या मध्ये झाली पाहिजे ,ज्यामुळे ह्या मानवी चेतनेच्या पलीकडे हा उंबरठा ओलांडून आपल्याला पलीकडे जायला पाहिजे आणि ती गोष्ट फक्त कुंडलिनीच्या जागृतीने होऊ शकते .

आता पुष्कळांचं अस म्हणणं आहे कि मेडिकल सायन्स मध्ये कुंडलिनी हा शब्द नाही . मेडिकल सायन्स मध्ये पुष्कळ शब्द नव्हते ते आज आले आहेत आणि आता पुढे कुंडलिनी हा शब्द सुध्दा येईल . आणि आपल्याला आश्चर्य वाटेल कि दिल्लीला तीन डॉक्टर्स ना एम डी ची पदवी सहजयोगात मिळाली . आणि त्यांनी अशे रोग ज्याला आपण दमा म्हणतो ,किंवा ज्याला आपण एपिलेप्सी म्हणतो त्याच प्रकारे शारीरिक सुधृडता या विषया वरती ह्या लोकांनी प्रबंध केले आणि ह्या लोकांना यात एम डी ची पदवी मिळाली . हि जी एम डी ची पदवी मिळते त्याला परीक्षक सुध्दा त्याच्याही पेक्षा उच्च प्रतीचे असले पाहिजेत . आणि त्यांनी मेडिकलच परिमाण धरूनच ,त्यांनी काही हवेत केलं नाही ,मेडिकलच्याच परिमाणाने सिध्द केलं कि कुंडलिनीच जागरण जे आहे हे पॅरासिम्फथेटिक नर्व्हस सिस्टम म्हणून जी आपल्या मध्य मार्गातील ,सुशुम्ना नाडीतील जी शक्ती आहे त्या शक्तीला अलौकिक करते . तसेच इंगलंड ला सुध्दा आपल्याला आश्चर्य वाटेल कि साठ डॉक्टर्स याच्यावर खूप काम करत आहेत . आणि ज्या ज्या लोकांना याने बर वाटलंय ते त्यांनी सगळं नमूद करून ठेवल आहे .

सर्वात मुख्य म्हणजे रशिया मध्ये जवळ जवळ ४०० डॉक्टर्स सहजयोग करतात . आणि सहजयोगा वरती खूप मेहनत घेत आहेत . कारण आज त्या देशात इतका पैसा नाही . तेव्हा हि कि सहज सुलभ प्रक्रिया आहे ,यात आपल्याला काही पैसे द्यायला नको ,काही विशेष मेहनत करायला नको . आणि सहजच कुंडलिनी जागृत झाल्यामुळे लोकांची तब्बेत ठीक होते हे बघून त्या लोकांनी याच्यावर फार लक्ष दिलेलं आहे . आणि तीन चार ठिकाणी अफाट मोठमोठाले असे आरोग्यकेंद्र त्यांनी काढले . तसच तिथले जे वैज्ञानिक होते त्यांच्या लक्षात आल कि सायन्स सुध्दा एका सीमेलाच पोहोचू शकत . त्यांनी लोकांना शांती ,आनंद ,प्रेम मिळालेलं नाही . हि फार एकांगी प्रवृत्ती आहे . सायन्स मध्ये जेव्हा आपण वाढतो तेव्हा आपण एकांगी होऊन जातो . याची त्यांना कल्पना आल्या मुळे अशे २००तिथे सायन्टिस्ट आहेत ज्यांनी सहजयोगा वरती खूप मेहनत घेतली आहे . आपल्या देशाचा वारसा विशेष करून महाराष्ट्राचा वारसा आहे .

जर आपणआपल अध्यात्म मिळवलं नाही तर जी काय आपण प्रगती करू तीअगदी कुठेतरी जाऊन आपल्याला पोहोचवून टाकेल . म्हणजे समजा एखादा मनुष्य असला त्याला जर आपण १०० रुपये दिले तर तो सरळ गुत्या कडे जातो . आपल्या मुला बाळांसाठी तो काय बघत नाही . किंवा काहीतरी वाईट कामाला लागतो ,हे का ?तसच जगामध्ये बघतो कि अनेक धर्म आहेत ,हिंदू ,मुसलमान ,ख्रिश्चन तर तऱ्हेचे लोक आहेत . आणि ह्या लोकांमध्ये सुध्दा आपण अस बघत नाही कि जरी हे आपल्याला धार्मिक म्हणवतात तरी सुध्दा कोणताही मनुष्य कोणतेही पाप करू शकतो . मग हे कस काय?. कोणाला हे बंधन पडत नाही कि मी या धर्माचा आहे तर मग मी कशाला असं पाप करायचं . म्हणजे काय कि ते धर्मा पासून चुत लोक आहेत . त्यांच्यावर धर्माच काहीही बंधन नाही आणि म्हणूनच हि भांडण सुरु झालेली आहेत . सहजयोगात जेव्हा कुंडलिनी जागृत होते तेव्हा ती सहा चक्रातून जसकाही एखाद सुत अनेक मण्यातून आपण काढाव तशी ती निघते आणि शेवटी हे जे टाळूच स्थान आहे त्याला फाऊंटेनिल बोन एरिया म्हणतात त्या जागेतून ती छेदून ब्रम्हरंध्राला छेदून ह्या सर्वव्यापी शक्तीशी तिला एककारिता प्राप्त होते . हि सर्वव्यापी शक्ती आहे आणि ती अत्यंत सूक्ष्म आहे ,त्याच्या मध्ये हि एक घटना आपल्या मध्ये झाली पाहिजे ,जस हे माईक ,माझ्या जवळ एक यंत्र आहे ,मी बोलत आहे कारण याचा संबंध मेन शी आहे ,जर याचा संबंध मेन शी तुटला तर याच्यातून बोलण्याचा काहीच उपयोग होणार नाही . तसच होत . तेव्हा आपला संबंध जेव्हा सर्वव्यापी शक्ती बरोबर होऊन जातो तेव्हा एक महान परिवर्तन आपल्या मध्ये येत . शारीरिक तर येतच ,मानसिक ,बौध्दिक ,वैचारिक सर्व पातळीवर हे होत . कारण आपल्या डोक्याचा मेंदू सुध्दा आपण फार थोडाच वापरतो . त्याचा पुष्कळसा भाग अजून अंधारातच आहे . जेव्हा कुंडलिनी आपल्या मेंदूत शिरते तेव्हा त्या प्रकाशात आपली बुध्दी फार प्रगल्भ होते . मी पाहिलंय पुष्कळशी मुल जी ढ म्हणवली जात होती ती पार झाल्या नंतर वर्गात पहिली येऊ लागली ,त्यांना स्कॉलरशिप मिळू लागली . राहुरी ला अशी खूप मुल आहेत . तर त्याला कारण काय कि मनुष्याची जी सीमित शक्ती आहे ती असीम ला मिळते . म्हणजे एक व्यक्ती आहे ,एक व्यष्टी आहे ती समष्टी त सामावते . त्यामुळे माणसामध्ये महदंतर येऊन जात . कारण त्या प्रकाशात आत्म्याच्या प्रकाशात तो बघतो कि हे काय ,हे मी काय करतोय ?. जस मी एक उदहारण देत असते कि आपण एक हात मध्ये साप घेऊन उभे असतो ,अंधार आहे ,डोळे मिटलेले आहेत ,काही दिसत नाही आहे . हा साप आहे म्हणून आम्ही सांगत असतोय पण तो असा हट्ट धरू शकतो कि हा साप नाही दोरखंड आहे . साप चावे पर्यंत आपण असे म्हणत राहू . पण जेव्हा का थोडासा प्रकाश येईल तेव्हा लगेच आपण साप सोडून देऊ . तसच आहे हे ." आधी कळस मग पाया ". आधी कुंडलिनीची जागृती ने थोडासा प्रकाश आपल्यात आला कि लगेच आपल्या लक्षात येत कि अरे ;हे काय आपण करतो आहोत . त्यामुळे व्यसनातून पुष्कळशे लोक मुक्त झाले आहेत . आता इथे मंडळी बसली आहेत त्यातली पुष्कळशी मंडळी व्यसनाधीन होती . फारच सुशीक्षीत ,डॉक्टर्स ,आर्किटेक्ट ,इंजिनिअर्स आहेत तसेच फार विद्वान लोक आहेत . आणि यांनी जेव्हा पाहिलं कि कुंडलिनीच्या जागरणाने आमची व्यसनातून मुक्ती होते ,आमच्या लंडन ला एक डॉक्टर्स आहेत ते सुध्दा व्यसनाधीन होते . आणि सहजयोगात आल्यावर त्यांचं व्यसन पूर्णपणे सुटल्यावर ते सात हॉस्पिटल्स मध्ये सायकॅट्रिस चे इन्चार्ज आहेत . तर आपल्याला हे समजलं पाहिजे कि आपल्या मध्ये अनंत शक्त्या आहेत . आपण अत्यंत शक्ती शाली आहोत .

पण ती संबंध शक्ती आपण जो पर्यंत त्या महान शक्तीशी जोडली जात नाही तो पर्यंत ती कार्यान्वित होऊ शकत नाही . तो पर्यंत ती सुप्तावस्तेत आहे . आणि तिचा परिणाम आपल्या रोजच्या आयुष्यात होत नाही . इतकाच नव्हे पण शेती ,पशुपालन वैगेरे ह्या गोष्टीत सुध्दा चमत्कार आम्ही बघितला ,ह्या चैतन्य लहरींनी शेतीत कधी कधी दहापट उत्पन्न होत . आता हे हारेगाव लाच आम्ही आलो होतो ,हारेगावला लोकांनी सांगितलं माताजी इथे ऊस होऊ शकत नाही कारण इथे पाण्याचा त्रास आहे ,अमुक आहे तमुक आहे ,आणि आमचं जे आहे ते बंद पडलं आहे . मग त्यांनी म्हंटल कि माताजी तुम्ही काहीतरी सांगा . त्यांनी माझ्या पासून चैतन्यमयी असं पाणी घेतलं आणि ते जाऊन त्यांनी त्या कॅनॉल मध्ये टाकलं . त्यामुळे ह्या वर्षी बघा कितीतरी ऊस आला . कितीतरी प्रमाणात आला . एकदम इतका ऊस आला कि त्यांना आश्चर्य वाटलं . कि ऊस नव्हता म्हणून आमची फॅक्टरी बंद पडली होती . चार पैकी दोन फॅक्टऱ्या बंद पडल्या . ह्या शिवाय त्यांना आश्चर्य वाटलं कि हे कस काय झालं . हे अगदी सोपं काम आहे ,हे शिकायला नको ,काही करायला नको ,फक्त आपल्या मध्ये जी शक्ती आहे ती जागृत करून घेतली पाहिजे . आपल्या आणि संतान मध्ये फार फरक आहे हे जाणलं पाहिजे . कुणी आज संतांना काही म्हंटल तरी सुध्दा हे जाणलं पाहिजे कि त्यांची लायकी आपल्यामध्ये नाही . त्यांची लायकी काय होती ?ते कधीही कोणत्याही अहंकारात पडले नाहीत . त्यांनी कधी चोऱ्या माऱ्या केल्या नाहीत ,त्यांनी पैसे खाल्ले नाहीत ,कोणाचा दुष्टावा केला नाही ,कुणाला त्रासवल नाही . ज्या ज्या लोकांनी त्यांचा छळ केला त्यांना सुध्दा संतांनी क्षमा केली . असे ते उदार चरित्र ,फार मोठे झाले . त्याला कारण त्यांचा संबंध त्या महान शक्तीशी झालेला होता . आणि त्या महान शक्ती बरोबर ते असल्या मुळे हि जी शान्ति ,त्यापेक्षाही आपण म्हणू कि हा जो आनंद आहे ,त्या आनंदाच्या डोहात असल्या मुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी शुल्लक वाटायच्या . जसे काही मच्छर बिच्चर फिरतात किंवा किडेमकोडे इकडून तिकडे फिरतात तसच त्यांना वाटायचं कि हे लोक काय किड्या मकोड्यां न सारखे वागतात यांच्यात काही अर्थ नाही . कारण ते इतके मोठे होते . तुकारामांनी म्हंटलय ना कि"तुका अणुरेणू सारखा दिसत असला तरी तुका आकाशा एव्हडा आहे ". हे लोक खोट बोलत नसत . त्यांनीच परमेश्वरा बद्दल इतकं सांगून ठेवल आहे मग आपण त्यांचं का ऐकू नये ?.

त्यांनी आपल काय बिघडवल आहे ?का त्यानं च आपण ऐकू नये ?. पण आपण अशा लोकांची भाषण ऐकत बसतो जे अत्यंत दांभिक ,खोटे ,पैशेखाऊ ,वाटेल ते धंदे करणारे पापकर्मी आहेत . त्यालोकांचं ऐकण्या पेक्षा संतांनी काय सांगितलं ते ऐकलं पाहिजे . आता ज्ञानेश्वरांनी इतक्या लहान वयात ज्ञानेश्वरी लिहिली ,शक्य नाही ,कोणीही लिहू शकत नाही . २३ वर्षाच्या वयात इतकं सुंदर त्याच निरूपण केलं ,आणि विशेष म्हणजे त्यांनी आपल्या एका मोठ्या परंपरेला बदलून घेतलं . ती परंपरा अशी कि एका गुरूला एकच शिष्य ,आणि एकाच शिष्याची जागृती करायची . हि परंपरा नाथ पंथीयांची होती . त्यावेळी त्यांनी याचना केली ,आपले गुरु आणि मोठे बंधू निवृत्तीनाथ हेच त्यांचे गुरु होते . त्यांना विनंती केली कि कृपा करून मला अशी परवानगी द्या कि निदान हे जे गुप्त ज्ञान आपल्याला माहिती आहे ते समाजाला नुसत लिहून उघड करून सांगतो . दुसरं काही नाही . मला दुसरं काही नको फक्त एव्हडं सांगुदेत ,मी दुसऱ्या कोणाला जागृती देणार नाही ,काही करणार नाही पण कुंडलिनी बद्दल मला सांगूद्यात . म्हणून ज्ञानेश्वरीत सहाव्या अध्यायात त्यांनी कुंडलिनीच वर्णन केलं आहे . त्यांनी कुंडलिनीच वर्णन केलं सहाव्या अध्यायात पण ते ह्या धर्ममार्तंडांना आवडल नाही . त्यांना आधी त्रास दिला ते संन्यास्याची मुल आहेत असं म्हणून त्यांचा फार छळ केला ,त्यांच्या पायात वहाणा सुध्दा नव्हत्या . ते बिचारे इतके त्रासात असून सुध्दा काय सुंदर रचना करून ठेवली आहे ,त्यात एक अमृतानुभव म्हणून एक पुस्तक लिहिलेलं आहे ते फारच वाचण्या सारखं आहे . पण ते वाचायला सुध्दा ,ते समजायला सुध्दा तुमच्यात आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे . नाहीतर ते समजणार नाही .नाहीतर तुम्हाला वाटेल काहीतरी आहे आपल भजन . तर अशे मोठे आपले बाराव्या शतका मध्ये श्री ज्ञानेश्वर झाले ,ज्यांनी फार मोठी कामगिरी केली माझ्या मते कारण त्यांनी समाजाला हे उघड करून सांगितलं . आज त्यांनी जे उघड करून सांगितलं आहे त्याचा साक्षात घेण्याची वेळ अली आहे . त्याचा साक्षात घेतला पाहिजे . आणि तो एकदोन माणसांना नाही तर सगळ्यांना होऊ शकतो . अहो ,रशिया सारख्या देशात त्या लोकांनी गणपतीचा ग पण ऐकला नसेल ह्या लोकांना गणपतीचा ग कुठे माहित होता ,ज्यांना देवाचं नाव पण माहित नव्हतं असे सोळा सोळा हजार लोक आमच्या प्रोग्रॅम ला येतात .आपल्याला आश्चर्य वाटेल तिथे स्टेडियम मधेच प्रोग्रॅम होतो . सोळा हजार ,चौदा हजार च्या कमी लोक येत नाहीत . आणखीन सगळेच्या सगळे पार होतात . अशे देश जे तिथे आहेत ,सगळे अशा प्रकारचे देश त्या सगळ्या देशात मी गेलेली आहे . आणि त्या सर्व देशानं मध्ये मला आश्चर्य वाटलं हजारोनी लोक येतात ,आणि जर समजा एखाद्या पाचसहा हजार राच्या हॉल मध्ये आम्ही प्रोग्रॅम घेतला तर खिडकीतून चढून ,खिडकीतून ते लोक,इतकी त्यांना उत्कंठा . म्हणजे त्यांच्या मध्ये हे आलं कस ?. आपल्या कडे देवधर्म म्हणून जे काय आहे त्याच्या मध्ये खोटेपणा पुष्कळ आला आहे ,दांभिक लोक पुष्कळ आलेले आहेत ,अंधश्रध्दा पुष्कळ आलेली आहे ,नसत्या गोष्टी डोक्यात भरलेल्या आहेत . आणि ह्या गोष्टीन मुळे आपल्यामध्ये एक पडदा आहे मला वाटत . ते लोक म्हणजे एक स्वच्छ अशी पाटी आहे ,अगदी स्वच्छ लोक . त्यांना देवधर्म वैगेरे काही माहित नाही हे अगदी बर आहे . कारण ज्यांना माहित आहे त्यांना ,हा कोणचा तरी गुरु ठेवला आहे ,नाहीतर काहीतरी आम्ही आज सप्ताह ठेवला आहे ,अमका तमका . हे सगळं चालू असत . हे नुसतं व्यर्थ आपलं आयुष्य घालवण आहे ,कुणी सांगितलं होत सप्ताह करा म्हणून . फक्त एव्हडं म्हंटल होत कि तुम्ही देवाचं नाव घ्या . याचा अर्थ असा नाही कि तुम्ही एक लाख देवाचं नाव घ्यायचं . देवाचं नाव एव्हड्या साठी घ्यायचं कि देवाची आठवण राहिली पाहिजे . पण इकडे देवाचं नाव घ्यायचं आणि इकडे दारू प्यायची ,याला काही अर्थ आहे ?.

जर धर्म तुमच्या मध्ये मुरलाच नाही ,तुमच्यात उतारलेलाच नाही अशा धर्माला तरी काय अर्थ आहे ?. तेव्हा हि अंधश्रध्दा आपल्या मध्ये आणि अशा रीतीने अनेक लोकांनी तर तऱ्हे नि असं सांगून कि आपल्याला तुम्ही पापी आहात ,तुमचं हे चुकलंय ते चुकलंय म्हणजे इतकं मिंध करून टाकल आहे कि मनुष्याला असं वाटत कि आम्ही हे सांगतात ते केलं नाही तर आमचा पुढचा जन्म कसा जाणार . आमचं कस काय होणार ह्या भीतीनं सुध्दा माणस वाट्टेल ते करतात . मग ह्या भामट्या लोकांना आपण पैसे देतो . पैशाचा आणि परमेश्वराचा काय संबंध असेल सांगा बर ,त्याला काय माहित पैसे काय असतात ?. त्याला काय बँका माहित आहेत का ?त्याला काही समजत का या गोष्टी ?अहो ज्याला याच काही ज्ञान नाही त्याला कशाला तुम्ही पैसे देता . लोकांना समजतच नाही ,मी म्हंटल कि हि जिवंत क्रिया आहे ,हि पृथ्वी हिला आपण काही पैसे देतो का हि एव्हडं जिवंत कार्य करते ,समजत का काही हिला पैसे दिले तर . आता आम्ही कुठे गेलो कि लोक पैसे द्यायला लागले ,अगदी सवय झाली आहे ,एका बाईला म्हंटल ,तिने पाच पैसे दिले म्हंटल आम्ही पैसे बिशे घेत नाही ,मग २५ पैसे तरी घ्या . म्हणजे डोक्यातून जातच नाही कि पैसे घेतल्या शिवाय परमेश्वर कसा प्रसन्न होणार हे इतकं अज्ञान आपल्या मध्ये आहे आणि त्या अज्ञाना मध्ये आपण वाहवत चाललो आहोत . आणि लोक म्हणतातच ना कि तुम्ही इतके पैसे घाला आम्ही तुमच्या पितरां साठी असं करू ,इतके पैसे तुम्ही दिले तर असं होईल ,गाय तुम्ही आम्हाला अर्पण करा म्हणजे गाईचं दूध तुमच्या पितरांना जाईल . जस काही यांच्या जवळ नवीन काहीतरी पोस्टमन ची व्यवस्था आहे . आपण आपलं डोकं सुध्दा लढवत नाही कि असं कस होऊ शकत ?. पण कुंडलिनी हि आहे त्या बद्दल मात्र शंका करण्याची गोष्ट काही नाही . कारण ती ब्रम्हरंध्रातून जेव्हा भेदन करते तेव्हा तुम्हाला जाणवेल कि तुमच्याच डोक्यातून थंड अशा लहरी येतील . बर याच्या बद्दल आदिशंकराचार्यानी म्हण्टलेलं आहे ,महंमद साहेबानी म्हंटलेले आहे ,ख्रिस्तानी म्हण्टलेलं आहे ,सगळ्यांनी सांगितलेलं आहे कि तुम्ही आत्मसाक्षात्कार घेतला पाहिजे . ते गेलं एकीकडे आणि आपण भांडतच बसलोय आपापसात .

हे जे मोठमोठाले संतसाधु झाले ,मोठमोठाली अवतरण जी झाली हि सर्व एका झाडावर आलेली फुल आहेत वेगवेगळ्या वेळेवर . आणि ज्या वेळेला आपण समयाचार म्हणतो म्हणजे समयाला अनुकूल त्यांनी कार्य केलेलं आहे . ते सगळे एकाच झाडावर जन्मलेले आहेत . आपणच ती फुल तोडली आणि हे माझं फुल ,हे माझ फुल म्हणून भांडत आहोत . आणि म्हणून हि भांडण उभी झालेली आहेत . हि आता मेलेली फुल आहेत यांच्यात काही दम नाही तेव्हा एक विश्वधर्म जो आपल्यामध्ये आहे तो जागृत झाला पाहिजे आणि कुंडलिनीच्या जागृतीने आपल्यात हा जो पोटामध्ये आपल्या धर्म आहे तो जागृत होतो . दत्तात्रयांनी तो धर्म आपल्यात बनवला आहे ,असे दहा गुरु आपल्यात आहेत आणि त्या दहा गुरूंचे जे दहा गुण आहेत ते मानवाला साजेसे आहेत . कार्बनला चार व्हॅलेन्सीज असतात आणि माणसाला मात्र दहा व्हॅलेन्सीज आहेत . त्या जागृत झाल्या बरोबर माणूस एकदम आतून धार्मिक होतो . जशे संतसाधु होते . त्यांना कुणी दारू प्यायला मना केली नव्हती ,त्यांना कुणी सांगितलं नव्हतं कि अस नका करू आणि तस नका करू . स्वतः ते असल्या गोष्टी करूच शकत नव्हते . त्यांचं चारित्र्य ,त्यांचं एकंदर वागणं ,सगळं काही किती वेगळं होत . ते लक्षात घ्या त्यांच्या विरुध्द लोक आता पुष्कळ बोलायला लागलेत कि ते सगळं खोट होत इतपर्यंत कि देव नाही . म्हणजे काय हा उद्दाम पणा आहे कि देव नाही आहे . कशा वरून नाही आहे ,हे अशास्त्रीय आहे ,तुम्ही शोधून काढला का देव ?. आधी शोधून काढा मग म्हणा आहे किंवा नाही . आणि जर नाही शोधून काढला तर एव्हडं म्हणा कि आम्हाला माहित नाही कि देव आहे किंवा नाही . पण देव का नाही कारण देवाला कुठेतरी ठेऊन टाकायचं कोनाड्यात घालायचं आणि आपण वाट्टेल तस वागायचं . आपल्याला जर वाट्टेल तस वागायचं असलं तर असच म्हणायचं कि आमचा देवावर विश्वासच नाही त्यामुळे कसही वागलं तरी चालेल कारण आमचा देवावर विश्वासच नाही ना . अशा रीतीने आपण देवाची सुध्दा बोळवण केली आहे . हा आजच्या आधुनिक काळातला फार घोर कलियुग आहे . हे समजलं पाहिजे . आणि या कलियुगातच हे कार्य होणार होत असं चौदा हजार वर्षा पूर्वी भृगु मुनींनी सांगितलं आहे . कारण जेव्हा माणूस भ्रांतीत पडतो आणि त्याला समजत नाही खर काय खोट काय ,असं का होतंय तस का होतय ,त्यावेळी ह्या कलियुगातच हे कार्य होणार आहे आणि ते होत आहे .

आपल्याला नलदमयंतीच आख्यान हे माहित असेल ,लोकांनी वाचल असेल किंवा नसेल पण कालिनी फार त्रास दिला नला ला ,त्याच्या बायको पासून त्याला वेगळं केलं ,तेव्हा एका वेळेला असं झाल कि कली त्या नल च्या हातात सापडला तर त्यांनी विचारल कि हे बघ कली तू मला एव्हडा त्रास दिला आहेस आणि मी तुला आता पूर्ण पणे कस तरी करून तुझा नायनाट करून टाकतो . म्हणजे कोणालाही तुझा त्रास होणार नाही . तर कलि नि सांगितलं कि कबूल आहे मला ,तू माझा नायनाट कर पण त्याच्या आधी तू माझ माहात्म्य ऐकून घे . कि जेव्हा माझ कलियुग येईल त्यावेळी दारिकंदरात फिरणारे हे सगळे लोक जे परमेश्वराला शोधत आहेत ते एक सर्वसाधारण गृहस्थ बनतील आणि त्यांना जे ते शोधत आहे ते मिळेल . आपण शोधत काय आहोत ?आपण शोधत आहोत परमेश्वर . आणि परमेश्वर शोधायचं म्हणजे काय तर जी परमेश्वराची शक्ती आहे तिचा पहिल्यांदा आपल्याला पूर्णपणे अनुभव ,बोध झाला पाहिजे . नामदेवांनी म्हंटल आहे ,"भरीन बोधाची परडी ",बोध म्हणजे काहीतरी डोक्यात विचार करणे नव्हे ,पुस्तकात वाचणे नव्हे किंवा भजन वैगेरे नुसत करून काहीतरी चर्पट पंजिरी करणे सुध्दा नव्हे . बोध म्हणजे तुमच्या बोटांवर तुमच्या मज्जासंस्थेवर ,त्याच्यावरती तुम्हाला जाणीव झाली पाहिजे कि हि शक्ती आहे . हा बोध आहे . त्याच्या पासून शब्द बुद्ध निघाला . तसेच वेदा मध्ये विद शब्द आहे . विद शब्द म्हणजे काय परत तेच . आणि ख्रिस्ती धर्मा मध्ये सुरवातीला जे ख्रिश्चन लोक होते त्यांना ज्ञास्टिक्स म्हणायचे . ज्ञ शब्द हा आपल्या ज्ञाना पासन ,उत्तर हिंदुस्थानात न ला ज्ञ म्हणतात . त्याला जाणलेले जे ज्ञानी ,ज्ञानी म्हणजे जे नुसते धरमार्तंड नव्हे ,पढत मूर्ख नव्हे पण ज्यांनी जाणलय ,ते जाण ण म्हणजे तुमच्या हातावर ,तुमच्या मज्जासंस्थेवर जाणलं गेलं पाहिजे . ते झाल्यावर मग तुमच्या मध्ये सगळ्यात मोठी जी गोष्ट होते ती अशी कि तुम्ही सामूहिक चेतने मध्ये जागृत होता . आता हा फार मोठा शब्द वाटतो पण तस काही नाही . दुसरा कोण आहे जर सर्वच आपल्या शरीराचे अंगप्रत्यंग आहेत तर दुसरा कोण आहे ?. तुमच्या हातावरच तुम्हाला लक्षात येईल कि तुम्हाला कळेल कि ह्या माणसाला काय त्रास आहे . तसच स्वतः बद्दल हि आत्मज्ञान झाल्यावर कळेल कि मला काय त्रास आहे ,हि चक्र कोणती आहेत ,ती चक्र फक्त जाणून घेतली कि आता समजा हे जर करंगळीच बोट धरलं ,या बोटाला जर त्रास होत असला ,याला गर्मी यायला लागली तर समजायचं कि तुमच्या हार्ट ला काहीतरी त्रास आहे .

आता हे इतकं शास्त्रशुध्द आहे कारण हे केवल ज्ञान आहे . त्याच्या मध्ये शंका कुशंका घ्यायची कुठे गरजच नाही ,लहान मुल असेल तरी तो पण सांगेल कि हे बोट धरतंय किंवा हे बोट धरतंय . दहा मुल बसवलीत आणि त्यांचे डोळे बांधलेत तरी ते तेच सांगणार . त्यावरून फक्त एव्हडं पाहून घ्यायचं कि ह्या बोटाचा अर्थ काय आणि हे कस नीट होणार ?. एव्हडं कळलं म्हणजे झालं . तुम्ही स्वतः च लोकांना बरे करू शकता . मला करण्याची काही गरज नाही . आधी स्वतः ला बर करून घ्यायचं मग लोकांना बर केलं पाहिजे . पण यांच्यात एक गोष्ट आहे आपली गहनता ,आपल्या मध्ये पूर्व जन्माची फार गहनता आहे . त्यामुळेच तुम्ही या महाराष्ट्र देशात जन्माला आला . हे लोक तुम्हाला सगळ्यांना साधू संत च समजतात कारण यांचं असं मत आहे कि महाराष्ट्रात जन्माला येणारा म्हणजे केव्हडा पुण्याईने भरलेला ,पूर्व जन्मी आम्ही बहु पुण्य केले म्हणून इथे जन्माला आलो . असं ह्यांना वाटतंय . आता आपण समजा हि जरी गोष्ट खरी असली तर आपल्यात गहनता किती असली पाहिजे आत मध्ये . आणि त्या गहनतेला आपण उतरलं पाहिजे . जो पर्यंत तुम्ही त्या गहनतेला उतरत नाही तो पर्यंत सहजयोग तुमच्यात मुरत नाही. . तो मुरल्यावर तुमच्या लक्षात येईल कि इतक सहज आहे हे कार्य ,त्याच्या मध्ये काही पैसे लागत नाहीत ,त्याच्या मध्ये काही प्रसिद्धी लागत नाही ,काही लागत नाही . फक्त तुमच्या मध्ये इच्छा असायला पाहिजे ,शुध्द इच्छा असायला पाहिजे कि माझा आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे .

आता सगळ्या इच्छा आपल्या आहेत . आपल्याला इकॉनॉमिक्स चे कायदे आपल्याला माहित असतील कि कोणतीही इच्छा एकसाथ कधीही माणसाला संपूर्ण सुख देऊ शकत नाही . आज मला वाटलं कि समजा मी मोटर घ्यावी तर ती घेतल्यावर वाटेल कि आता घर बांधाव . ती मोटर घेतली त्याच्यात काही आनंद नाही मग घर बांधायला निघाले ,घर बांधल्यावर वाटत आता आणखीन कायतरी करावं . म्हणजे ज्याच्या साठी धावपळ करतोय ते मिळाल्यावर ते नको लगेच दुसरं . म्हणजे काय ?. म्हणजे तुमची शुध्द इच्छा नव्हती . पण शुध्द इच्छा एकच आहे आणि ती हि आहे कि आपल्याला कदाचित माहितीही नसेल त्याच्या बद्दल जाणीवही नसेल आपल्याला पण शुध्द इच्छा आपल्या मध्ये जी सुप्तावस्थेत आहे ती म्हणजे आपली कुंडलिनी आणि ती शुध्द इच्छा हि आहे कि माझ्या जीवाचा शिवाशी संबंध झाला पाहिजे . मला आत्मसाक्षात्कार मिळाला पाहिजे . ह्या माझ्या कुंडलिनीचा संबंध त्या सर्वव्यापी शक्तीशी झाला पाहिजे हि खरी शुध्द इच्छा आहे आणि कुंडलिनी सुध्दा शुध्द इच्छेचीच शक्ती आहे . पण आश्चर्याची गोष्ट आहे कि आपली सगळ्यांची वेगळी वेगळी कुंडलिनी आहे ,आणि प्रत्येकाची कुंडलिनी त्याची आई आहे . तीच त्यांची जन्मदात्री आणि ती आई प्रत्येका बद्दल जाणून आहे आणि आतुर आहे कि तुम्हाला दुसरा जन्म द्यायचा आहे तो देण्या साठी . आणि त्या साठी ती मेहनत करते .ती वाट बघून आहे कि अशी कोणची वेळ येईल कि ज्या वेळेला मी माझ्या मुलाला हा अधिकार देईन . तेव्हा हा आपला जन्मसिध्द अधिकार आहे कि ह्या योगाला प्राप्त होणं हा आपला जन्मसिध्द अधिकार आहे तो आपण घ्यावा .

आपल्या देशामध्ये फार मेहनत करावी लागते . पण लोक इतके चांगले आहेत कि कुंडलिनीच्या जागृतीची मेहनत नको फक्त इकडून तिकडे फिरायला कारण आपले रस्ते वैगेरे इतके सुंदर आहेत कि सांगायलाच नको . त्यामानाने तुम्ही कोणच्याही प्रदेशात गेलात विशेषतः महाराष्ट्राचे रस्ते इतके खराब आहेत कि हिंदुस्तानात कुठे इतके खराब रस्ते नसतील . आदळत आपटत सहर्ष तुमच स्वागत होत असत . पण तरी सुध्दा इथे जे लोक आहेत त्यांच्यात जी गहनता आहे ,ती पूर्व पुण्याईने सजलेले लोक आहेत . तेव्हा त्यांच्या पुढे मला जायलाच पाहिजे ,त्यांच्यावर मेहनत करायलाच पाहिजे . कारण हे तुमच देण्याच राहील आहे ते दिलच पाहिजे . "तुझं आहे तुझं पाशी "ते आपल्याला दिल पाहिजे मी . आणि त्यासाठी म्हणून सारखी माझी मेहनत सुरु आहे . बरेच वर्षा पासून मी महाराष्ट्रात येते ,लोणीला सुध्दा पूर्वी आले होते मी पण आपल्या मध्ये गहनता जेव्हडी आहे तेव्हडी आपण जाणली नाही ,उतरलो नाही . नाहीतर कुठल्या कुठे जाऊ . आता ह्या लोकांना बघा हे कसे उतरले . हे एका महिन्यात कुठल्या कुठे पोहोचून जातात . आणि इकडे आम्ही पाहिलं तर ,"हो ,आम्ही जातो माताजी ध्यानाला कधीतरी . "वैगेरे असं तस . "पण आता मला हा रोग झालेला आहे ",बर तो ठीक केला ,"अहो आता तरी ध्यानाला जात जा ,सगळं ठीक करून घ्या "." कारण हि सामूहिक क्रिया आहे एकट्याने करण्याची नाही ." अहो आम्ही घरी पूजाबिजा करतो ". पण त्यांनी काही होणार नाही . तुम्ही सामूहिक ध्यानाला गेल पाहिजे . सामूहिक ध्यानाला गेल्यावर मी बघते तुम्हाला कोणचा रोग होतो तो ,कोणचा त्रास होतो तो . अहो कुठल्या कुठे जाऊन पोहोचाल तुम्ही . पण तेच एक आपल्याला येत नाही कि हे सामूहिक कार्य आहे आपण सेंटर वर गेलं पाहिजे आणि याचा लाभ घेतला पाहिजे . त्याच्या मध्ये तुम्हाला काही पैसे द्यायला नको, काहीही तुम्हाला त्रास घ्यायला नको . फक्त एव्हढच कि थोडासा आपल्यासाठी वेळ काढून ,आपल्या आत्मसाक्षात्कारा साठी थोडी तरी मेहनत केली पाहिजे . आणि हे सामूहिक कार्य आहे आणि सामूहिकतेत जर तुम्ही उतरले नाही तर हे कार्य होऊ शकत नाही . म्हणजे समजा जर आमचं एक नख तुटल मग ते पडून राहील एकीकडे . जिवंत ते ते लक्षात ठेवलं पाहिजे कि संबंध जे शरीर आहे त्या शरीराला च निगडित असल पाहिजे ,त्या शरीरालाच जुळून असल पाहिजे . त्यातून तोडून तुम्ही जिवंत राहू शकत नाही . तेव्हा सामाजिक ,आर्थिक , मानसिक ,तुमच्या राजकारणाचे प्रश्न ह्यांनी बदलू शकतात . कारण हे सगळे प्रश्न आपण मानवानेच तयार केलेले आहेत . जर मानवा मध्ये परिवर्तन झालं आणि तो एक नवीन मानव झाला समजा तर एक नवीन दुनिया तयार होईल . तर आमच्या सहजयोगा मध्ये मला तरी वाटत त्यांनी सांगितलं ४० तरी देश सांगितले पण तसे ५६ देशा मध्ये सहजयोग सुरु आहे . आणि आता ते लोक सगळे येतात इकडे प्रत्येक वर्षी ,परत आम्ही गणपतीपुळ्याला सगळ्या देशातले प्रतिनिधी असतात . पण मी कधी यांना भांडताना पाहिलं नाही ,कागाळ्या करताना पाहिलं नाही ,काही त्यांच्या मध्ये काही प्रश्न नाहीत काही नाही . सगळे समर्पणात . आणि जे तुकारामांचं वर्णन आहे ते तुम्हाला बघायला मिळत कि "आनंदाच्या डोही ". परत हे पसायदान जे ज्ञानेश्वरांनी लिहिलं आहे ते तुम्ही साक्षात बघा . तेच साक्षात आहेत . हे लोक चाललेत इथून . तर आपल्याला समजलं पाहिजे कि आपला हा सगळा वारसा असून ह्या लोकांनी मिळवायचं आणि आपण मिळवायचं नाही . म्हणजे आहे काय ?याला अर्थ काय आहे ?. आपण आज गरीब आहोत असं लोकांचं आज म्हणणं आहे . अहो ती गरिबी बरी ह्या श्रीमंती पेक्षा . तिथे हजारो लोकांसमोर असे असे काही भयंकर प्रश्न आहेत कि त्यांची उत्तर च त्यांना मिळणार नाही आहेत . अशा भयंकर स्तिथीत ते लोक गेलेले आहेत . कारण तिथे म्हणजे बेछूट पणे कोणताही अध्यात्माचा आधाराच्या विरुध्द ,कोणत्याही नैतिक मूल्यांच्या विरुध्द लोक वाट्टेल ते करतात . आणि मग त्याची फळ भोगावी लागतात . आणि ती फळ म्हणजे त्या लोकांना अशा भयंकर परिस्तितीत घातलेलं आहे कि त्यांना असं वाटत कि आज आम्ही नष्ट होतो कि उद्या आम्ही नष्ट होतो . तेव्हा आपण समजून घेतलं पाहिजे कि आपल्याला देवांनी हा फार मोठा वारसा दिलेला आहे . आणि ह्या वारस्यानी आपलं जर परिवर्तन झालं तर का करून घेऊ नये आपण आपलं परिवर्तन . आणि ते फुकट आहे , मी उद्या म्हणेन कि फुकट एक हिरा आहे तुम्हाला हवा असेल तर या . तर आस्ट्रेलिया हुन लोक येतील . हा तुमचा हिरा आहे ,हा तुमचा आत्मा आहे तो जाणून घ्या . सत्य हे आहे कि तुम्ही आत्मा आहात ,तुम्ही शुध्द आत्मा आहात . हे शरीर ,मन ,अहंकार आदी या व्याधी तुम्ही नाही ,या उपाधी आहेत . पण तुम्ही शुध्द आत्मा आहेत हे पाहिलं सत्य आणि दुसरं सत्य असं आहे कि हि चरा चरा त हि पसरलेली हि सूक्ष्म सृष्टी ईश्वराच्या प्रेमाची तिला आपण परामचैतन्य म्हणतो ,तिला आपण ब्रम्हचैतन्य म्हणतो ,तिला रुह असं म्हणतात . त्या परमात्म्याच्या प्रेमशक्तीला आपण प्राप्त झालं पाहिजे . आणि मग परमेश्वराच्या साम्राज्यात येऊन बसा . मग बघा तुम्ही काय आहात ते . तुमच्या गौरवला जाणाल तेव्हाच ,आता तर तुम्हाला वाटत कि आम्ही आहोत कोण . सगळे जण तुम्ही महान आहात तेव्हा ते प्राप्त करावं आणि स्वतःची महानता जाणून घ्यावी .

आपल्या सगळ्यांना माझा अनंत आशीर्वाद आहे .

आता एक दहा मिनिट आपल्याला आत्मसाक्षात्काराचा अनुभव होईल आणि त्यासाठी ज्या लोकांना हवा असेल त्यांनीच बसाव . त्याला कारण कि कोणावरही आत्मसाक्षात्काराची जबरदस्ती करता येत नाही . ते आपल्या स्वतंत्रतेतच मिळायला पाहिजे . कारण आपली स्वतंत्रता परमेश्वराने जेव्हडी दिली आहे त्या स्वतंत्रतेला पूर्ण मान्यता एव्हड्या साठी द्यायची कि आता संपूर्ण जर तुम्हाला स्वतंत्र व्हायचं असलं ,आणि समर्थ व्हायचं असलं तर पहिल्यांदा जी तुमच्या मध्ये स्वतंत्रता आहे ती मेनी केली पाहिजे . जर आपल्याला आत्मसाक्षात्कार नको हवा असला तर आपण कृपा करून जावं .आणि हवा असेल तर बसावं दहा मिनिटा मध्ये हि गोष्ट होणार आहे . त्याला काय विशेष वेळ लागत नाही . रामदास स्वामींना विचारलं एकदा कि कुंडलिनी च जागरण व्हायला किती वेळ लागतो तर त्यांनी शब्द वापरला तत्क्षण . पण देणारा पण अधिकारी पाहिजे आणि घेणारा पण तसाच पाहिजे . आता देणारे तर आहेतच पण घेणारे बघितले पाहिजेत . तेव्हा पूर्ण मनामध्ये अशी इच्छा करायची कि आम्हाला आत्मसाक्षात्कार घडला पाहिजे .

आपणा सर्वाना त्यासाठी तीन अटी मान्य कराव्या लागतील . पहिली अट अशी आहे कि आमचं असं चुकलं ,आम्ही पापी ,आम्हाला कस हे मिळणार वैगेरे वैगेरे जे न्यूनतेचे जे आपल्या मध्ये भावना भरलेल्या आहेत त्यासगळ्या तुम्ही नष्ट करून टाकायच्या . मागील सगळं विसरून जा . कारण आपण मानव आहात आणि मानवच चुका करू शकतात . परमेश्वर नाही कि तुम्ही चुका नाही करणार . म्हणून माझं हे चुकलं ते चुकलं असं मना मध्ये आणायचं नाही . आणि जे लोक तुम्हाला सांगतात कि तुम्ही पापी आहात ते स्वतः पापी आहेत . असं लक्षात घेऊन तुम्ही आपल्या बद्दल स्वतःलाच क्षमा करा .

आणि दुसरी अशी अट आहे कि एकसाथ सगळ्यांना क्षमा करून टाका . म्हणजे तुम्ही क्षमा करा अथवा नका करू तुम्ही काही करत नाही . पण एका मिथ्या गोष्टी साठी आपण आपल्याला उगीचच त्रास करून घेतो . आणि जो मनुष्य तुम्हाला त्रास देतो आहे तो मनुष्य मात्र आरामात आहे . तुम्ही मात्र उगीचच स्वतःला त्रास देतात विचार करून . कारण तुम्ही त्याला क्षमा करत नाही . मग असले उलटे प्रकार कशाला ?. पण प्रत्येक माणसा बद्दल विचार करू नका . व्यक्तिगत विचार करायचा नाही . सगळ्यांना एकसाथ क्षमा करून टाकली असं म्हणायचं . एकसाथ दिलदार मनाने क्षमा करून टाकायची . हि दुसरी अट .क्षमा नाही केली तर डोक्यातून गरम येईल थंड नाही येणार . आणि कुंडलिनी पण जागृत होणार नाही .

तिसरी अट म्हणजे अशी कि आम्ही कोणत्याही जातीचे ,धर्माचे ,पंथाचे असलो तरी आम्हाला आत्मसाक्षात्कार मिळणार . हा पूर्ण आत्मविश्वास आपल्या मध्ये असला पाहिजे . मिळणारच ,का मिळणार नाही . ?ह्या तीन अति जर आपण स्वीकारल्या तर आपली जागृती होण्यात मुळीच त्रास होणार नाही .

दुसरं म्हणजे ब्रम्हरंध्र जे आहे ते टाळू मध्ये आहे . म्हणून आपण सगळ्यांनी टोप्या काढून ठेवा . आपण काही आई समोर टोप्या घालून जात नाही . कुणी काही मिनिस्टर बिनिस्टर नाही मी . ज्यांना सहजयोगात आत्मसाक्षात्कार नको असेल त्यांनी शंका कुशंका इथे काढत बसायचं नाही . कारण त्यांना होणार नाही आणि त्यांच्या मुळे सगळं वातावरण मात्र खराब होईल . तर ज्यांना आपल्यावर विश्वास आहे ,आणि ज्यांना आत्मसाक्षात्कार हवा असेल त्यांनीच इथे बसावं ,त्यांनी अवश्य बसावं . त्यांच्या साठीच आम्ही आलो आहोत .

आता तुम्हाला कुणी गुरु नकोत ,कुणी नकोत तुम्ही स्वतःच गुरु व्हायचं . आणि त्यासाठी सहजयोगामध्ये जी सामूहिक कार्यक्रमाची व्यवस्था आहे त्यात आपण आल पाहिजे . आणि थोडीशी त्याबद्दल माहिती जर सुरु झाली तर आठ दिवसामध्ये तुम्ही स्वतःचे गुरु व्हाल . आपणा सर्वाना माझे अनंत अनंत आशीर्वाद आहेत .

आता पायावर वैगेरे येण्याची आपल्या कडे फार पद्धत आहे . दर्शन ,दर्शनाला देवळात बसलेल्या आहेत भरपूर देवी . आणि जो पर्यंत तुमच्या आत्मसाक्षात्काराची पूर्णता होत नाही तो पर्यंत काही पायावर यायची गरज नाही . काही गरज नाही . आम्ही तुमच्या बद्दल नेहमी विचार करतो आणि तुम्ही आमच्या चित्तातच आहात सर्व जण . तेव्हा दर्शन वैगेरे घेण्याची काही गरज नाही किंवा यावर वादविवाद ,चर्चा करायची पण गरज नाही . जे काय झालं ,घटित झालं आहे ते काय आहे ते आपण आत जाणलं पाहिजे . यावर पण विचार सुरु करू नका . कारण ती आलेली निर्विचारता सुटेल ,म्हणून जास्त विचार करायचा नाही . शांतपणाने घरी जायचं ,एकदुसऱ्याशी वादविवाद करायचा नाही . आणि आनंदाने योगनिद्रेत जायचं . पुढच्या वर्षी तुम्ही इथं फार मोठाले सहजयोगाचे वृक्ष उभे कराल अशी मला आशा आहे . आमचे आपल्याला अनंत आशीवाद आहेत .

कोल्हापूरला आपले गोंधळी आहेत ,तसे हे हि आईचे गोंधळी आहेत . आणि त्याच्या कडे जाऊन हे शिकले नामदेवांचा जोगवा ,आईला जोग मागितला ,योग मागितला . हजारो वर्षांपासून आपल्या देशामध्ये आईला खेड्यापाड्यातून योग मागत आहेत . आणि तो आज आपल्याला लाभला . पण हे लक्षात घेतलं पाहिजे कि महालक्षीमीच्या देवळा मध्ये अंबेला उदो उदो म्हणतात . अंबे म्हणजे कोण मग तर हि कुंडलिनी . आणि महालक्षीमीच्या देवळात का ,कारण हि मधली शक्ती जिला आपण मज्जासंस्था म्हणतो ती खरं म्हणजे महालक्षीमीची शक्ती आहे . आणि तिला सुषुम्ना नाडी असं म्हणतात .त्या सुषुम्ना नाडीतून तू जागृत हो म्हणून महालक्षीमीच्या देवळात बसून ते म्हणतात कि हे अंबे ,हे कुंडलिनी तू जागृत हो . तेव्हा हे ऐकण्या सारखं आहे . फार सुंदर लिहिलं आहे . अत्यंत सुंदर नामदेवांनी लिहिलं आहे .

Loni (India)

Loading map...