Public Program 1987-12-09
9 डिसेंबर 1987
Public Program
Aurangabad (India)
Talk Language: Marathi | Transcript (Marathi) - Draft
आता आपल्याला सांगायचं म्हणजे हि पुण्यभूमी औरंगाबाद ,हि फार मोठी पुण्यभूमी आहे असं मला वाटत . मोठमोठाले संत इथे झाले . हजारो वर्षांपासून लोकांनी इथे मेहनत केली . आणि तुम्हाला एव्हडं पुण्यदान दिल आहे . त्या पुण्याच्या दमावर आपण इथे बसलात ,सदाचरण केलत ,धर्मानी वागलात पण अजून पूर्णत्वाला आला नाहीत . म्हणून आत्मानुभव घेतलात . आत्मानुभव घेतल्यानंतर जे आपल्यातले दोष आहेत ते फक्त आले पाहिजेत . नाहीतर तुम्हाला प्रकाश मिळालेला नाही . आता परदेशी लोकांचं जे आहे ते त्यांचे दोष वेगळे आहेत . आणि हिंदुस्थानी लोकांचे दोष वेगळे आहेत . आणि ते इतके ठळकपणाने आता मला दिसतात कि कधी कधी असं वाटत कि स्पष्ट पणाने सांगितलेलं बर . खर म्हणजे भारतीय लोकांना माझ घर माझी मुलगी माझा नातू हे फार आहे . आणि त्या घराच्या गुरफाट्यात एव्हडे जास्त आहेत कि त्याच्या बाहेर त्यांना निघता येत नाही . आम्ही इथून चारपाच मुलांना लग्न करून ,नोकऱ्या लावून ऑस्ट्रेलियाला पाठवलं ,तिथे जाऊन अजून त्यांना मोठ्या नोकऱ्या मिळाल्या तिथे जाऊन त्यांनी आपलं घर लगेच स्थापन केलं . घरा शिवाय हिंदुस्थानी माणूस राहूच शकत नाही . आश्रमात सगळी व्यवस्था असताना सुध्दा आपलं वेगळं घर केलं . त्यांच्या बायका कंटाळल्या कारण वेगळं घर करायचं म्हणजे सगळी काम स्वतः करावी लागायची . तिथे मोलकरणी नसतात आणि काही नसतात . त्यांना बाळंत व्हायचं तरी स्वतः सगळं करावं लागत . गरोदर असल्या तरी स्वतः काम करायची . नवऱ्यानी बाहेर गमज्या मारायच्या . मोटारी फिरवायच्या ,टेलिव्हिजन घ्यायचा . मग सगळीकडे फिरायचं . आणि मग फिरून घरी आल्यावर बायकांवर ओरडायचं तू स्वयपाक ठीक केला नाहीस ,हे केलं नाहीस ,ते केलं नाहीस म्हणून . त्या बायका कंटाळल्या . हे कसले नवरे म्हणे . तिथे आश्रमात सर्व काम करता येत नाही ,बाहेरची स्वच्छता करता येत नाही फक्त माझं घर असलं पाहिजे व्यवस्थित आणि आपलं बाहेर फिरायचं . आणि ते सगळ्यांचंच आहे आपलं इथे . इथल्या सगळ्या पुरुषांना काही हात कशाला लावता येत नाही ,काही काम करता येत नाही . सगळे पांढरपेशी इथून तिथून . आमच्या कडे आम्ही एक माळी ठेवलेत माळी आहेत बरका ते . आणि आस्ट्रिया वरून तिथले ते un चे ते अग्रीकल्चरचे ऍडव्हायजर आहेत ते इथे आले . ते आपले हातात फावडा घेऊन कुदळ घेऊन मेहनत करतात हे आपले कमरेवर हात ठेऊन उभे आहेत पायात रबराचे बूट घालून . म्हंटल पायात रबराचे बूट का घातलेत तर म्हणे मला चिखला ने त्रास होतो . असं का म्हंटल . मग आता तुम्ही कुठे तरी जाऊन राजेसाहेब व्हा . हे आपल्या मध्ये फार जास्त आहे . आणि बायकांचा एक विषय असा झाला आहे कि त्यांना कळत कि पुरुषांना घर व्यवस्थित करून दिल आणि चमचमीत जेवण करून दिल कि ते आपल्या हातात असतात . मग त्या आज हे करायचं उद्या नवऱ्याला ते करायचं . जेवणात हे द्यायचं ,हे आवडत ते आवडत . मग त्यांना जर कारली आवडतात तर भांडून कारली बाजारातून आणायची . ती तयार करून द्यायची ,नवऱ्याची सगळी सेवा करायची . नवऱ्याच्या पाठी पाठी लागायचं . त्यांनी नवरे खराब होतात . आणि घर
म्हणजे काहीतरी विशेष जे आपण केलेलं आहे त्याच्या पलीकडे काही एक लक्ष जात नाही .
जे माझं माझं आहे ते इतकं संकुचित संकुचित होता होता आपण त्याच्यात नष्ट होता . हे आपल्यातलं एक जायला पाहिजे तुम्ही जर सहजयोगी ,योगिजन झालात तर जिथे बसाल तिथे तुमचं घर . जिथे जाल तिथे तुमचं घर . कुटुंब एव्हडं लहानसं कि काही विचारायला नको . ते लहानपण मोठं कस होणार . आणि त्यामुळे जेव्हडा काही पूर्व जन्मातील कमावलेलं पुण्य आहे त्यामुळे अशा योगभूमीत ,भारतभूमीत जन्माला आलात . त्याचा सर्व नाश होतो . ते मोठंपण यायला पाहिजे . ते मोठंपण येत नाही . आणि पुरुषांच्या मध्ये तर फार कमी असं ह्या लोकांचं म्हणणं आहे . आता सगळ्यांनी लिहून पाठवलं आहे कि आम्हाला भारतातल्या बायका फार आवडतात पण पुरुष नको . कारण सगळे आळशी आहेत . ते दिसत आपल्याला घराच्या बाहेर घाण पडलेली असेल तर आपण त्याच्यावर तुडवून वर जाऊ पण घर मात्र बायका स्वच्छ ठेवतात . बर बायका हुशार आहेत . घर ठीक ठेवलं पाहिजे म्हणजे नवरा घरात रहातो . त्याला घरात ठेवणेच कठीण कारण तो सारखा बाहेर राहतो . घरातून पळतच असतो . तेव्हा आपल्यातली जी चूक आहे ती हि आहे . कि आपल्यामध्ये सामूहिकतेचा मुळीच अंश नाही . सामूहिकतेत कस राहायचं ,सगळ्यात मिळून मिसळून कस राहायचं ,सगळ्यान बरोबर आपुलकीने कस रहायच तो विचार नाही . आता आम्ही दिल्लीला मोठ्या मुश्किलीने एक आश्रम काढला . तिथे एक माणूस राहायला तयार नाही . नवरा बायकोला दादापुता करून मुंबई वरून पाठवलं तर दोन दिवसात परत . माझं घर हि भावना ती आधी तोडायला पाहिजे . सगळं जग माझं घर आहे असं ज्या दिवशी म्हणाल तेव्हाच म्हंटल पाहिजे कि तुमचं थोर मन झालेलं आहे . मन इतकं संकुचित आहे मग सहजयोगात वाढ कशी होणार . जरी सहजयोगी झाले जरी ध्यान करतात सगळं काही चांगलं आहे . पूर्वपुण्याई आहे . पण जैसे थे . त्याच्या पुढे काही होत नाही . त्याला कारण मी शोधून काढलं अत्यंत घुटमळण आहे घरातल्या घरात . जर तिथल्या तिथे च फिरायला लागले तर पुढे कसे जाणार . सामूहिकतेत उतरता येत नाही . सगळं स्वतःला धरून करायचं ,स्वतःची प्रतिष्ठा वाढवायची . स्वतःच घर ,स्वतःची बायको स्वतःच घर स्वतःच अमुक स्वतःच तमुक हे सगळं . जो पर्यंत तुम्ही त्याच्यातून बाहेर निघत नाही आणि नुसती गाढव मेहनत . सगळं जर परमेश्वर करतो तर तुम्ही कशाला गाढव होता . जेव्हा तुम्ही म्हणाल कि मी सर्व काही करतो तर तुम्ही गाढव झाले . जस ख्रिस्त गाढवावर बसले होते . आणि ते गाढव त्यांना घेऊन चालला होता . त्या गाढवाला असं वाटलं कि सगळे जण माझ्या गळ्यात हार घालतात . म्हणजे मीच ख्रिस्त झालो . तर तो ख्रिस्ताला जरा त्रास देऊ लागले तर त्यांनी गाढव सोडला आणि दुसरीकडे निघून गेले . तर तिकडून ज्याचं ते गाढव होत तो परीट आला आणि दोनचार हाणले त्या गाढवाला . त्याचा लक्षात आलं कि मी गाढवच आहे . तर जो ख्रिस्त होता तो ख्रिस्तच आहे . तसा जो योगिजन आहे तो योगिजनच आहे तो काही गाढव नाही आहे . नसती गाढव मेहनत करायची आपल्या बायकोला खुश करायचं ,याला खुश करायचं ,त्याला खुश करायचं . काहीही गरज नाही . सामूहिकतेत उतरलं पाहिजे आणि त्यात उतरण्यासाठी पहिल्यांदा ह्या सर्व लहान लहान गोष्टी सॊडल्या पाहिजेत . आणि क्षुद्र माणसाला सगळं क्षुद्रच दिसत . मोठं काही दिसत नाही . सगळं काही जे क्षुद्र आहे ,चुकीचं आहे ते पहिल्यांदा धरत म्हणून आपलं मन आधी थोर केलं पाहिजे . पाहिलं माझं घर हा शब्द काढला पाहिजे . माझा शब्द हा खोटा आहे . माझ्याला काय अर्थ आहे . ते जस काल म्हंटल कबिरा च कि जस एक ठगवा आला आणि मला लुटून घेऊन गेला . म्हणजे कोण मृत्यू . ज्या वेळेला मृत्यू येतो त्यावेळेला सगळं सुटत सगळे माझे बिझे सुटून जातात . पण हा मृत्यू आपला झालेला आहे कारण आता आपण सहजयोगी झालेलो आहोत . जे आपण अंड रूपाने होतो ते आता पक्षी रूपाने झालो आहोत . तेव्हा ते मागच सगळं काही सुटलेलं आहे . तेव्हा आता आपण पंख पसरून भराऱ्या मारायच्या आहेत . ते सोडून अजूनही त्याच पंखात आपण फसलेले आहोत . तेव्हा काय म्हणावं . त्या चिखलात आपण रुतून बसलेलो आहोत . या पुढे प्रत्येकाने आपलं मन थोर केलं पाहिजे . मोठेपण आणलं पाहिजे . आणि ते मोठे पण आणण म्हणजे सगळ्या मध्ये रममाण झालं पाहिजे . इतकी मंडळी इथे येतात . तुम्ही त्यांच्याशी बोलत नाही भेटत नाही . कुणाशी ओळख पाळख करत नाही . ते बरोबर नाही . हि मंडळी आलीत तुम्ही कोण काय . त्यांच्या सेवेला आहात हे कबूल . पण त्यांच्याशी ओळख झाली पाहिजे . मैत्री झाली पाहिजे . कारण ते तुमचे भाऊ आहेत . आणि तुम्हाला कुणी भाऊ नाहीत ,बहीण नाहीत . हे तुमचे नातलग ,हे तुमचे सगेसोयरे होती असं ज्ञानेश्वरांनी म्हंटलेलं आहे . हे तुमचे सगेसोयरे आहेत बाकी सगळे जे कोण आहेत ते सगेसोयरे नाहीत . त्यांची आणि तुमची बरोबरीचं नाही . बोलतात एक करतात एक . आम्ही आमच्या घराण्याचं सांगू शकतो . कि असं आहे काही लोक आहेत ते आहेत नाहीत ते मला नाहीत . ते पारखे आहेत . तेव्हा जे लोक सहजयोगात नाहीत ते आपले नातलग नाहीत असं धरून चालायचं . त्यात तुम्हाला आश्चर्य वाटेल पुष्कळशा गोष्टी सुटून जातील . म्हणजे आता मराठा आहे तर मराठ्यांनी मराठ्यांशीच लग्न करायचं मग त्या बायकोला झोडपलं तरी चालेल तो सहजयोगी नसला तरी चालेल . कसाही वागला तरी चालेल पण मराठ्याने मराठ्यांशीच लग्न केलं पाहिजे . कशाला ?मग जर त्या मुलीला उद्या त्रास झाला तर तुमचे मराठे उभे रहाणार आहेत का ?सहजयोगी मात्र उभे राहतील . सहजयोग्यानी सहजयोग्याशीच लग्न केलं पाहिजे . आणि मग त्याचे त्रास सुरु झाले कि माताजी मी असं लग्न केलं त्या मुळे असे त्रास झाले . हा जो जाती द्वेष आहे आणि हा जो आपल्या आपल्या धर्मा बद्दल जो द्वेष आहे किंवा जो परजाती बद्दल किंवा परदेशा बद्दल जो द्वेष आहे तो लग्न करूनच जाईल दुसरं मला काही इलाज दिसत नाही . म्हणजे डोळ्यांनी बघून कळत . आता परवाच एका मराठ्यांच्या मुलीच लग्न आम्ही ऑस्ट्रेलिया ला केलं . त्यांच्या घरातील लोकांनी नुसतं आकांडतांडव आणि भांडण केलं होत . आणि म्हणे कि आम्ही जाऊन पोलिसात देऊ . म्हंटल जा . काय करायचं ते करा . ती आता तरुण झालेली आहे आणि तिला सर्व अधिकार आहेत . तेव्हड त्यांनी केलं पण त्यांचं काही चाललं नाही . आता ती मुलगी इतकी शहाणी आहि आणि इतकं सुंदर लग्न झालं तीच आणि नवऱ्याला फार मोठा पगार वैगेरे . आता दिसत त्यांना सगळं . आता सगळे निघाले आस्ट्रेलियाला गाठोडी बांधून . लग्नाच्या वेळेला एव्हडा मूर्खपणा केला . तसच आम्ही ब्राम्हणालाच देऊ . आणि ब्राम्हणांनी उद्या काढली घरातून तर काय करणार तुम्ही . मग माझ्याकडे यायचं माताजी तुम्ही आता करा काहीतरी बुवा आमच्या जावयावर . काय करणार ?तुम्ही काढलात ना आता शोधून जावई . ब्राम्हण शोधला ना मग आता त्याच्या गळ्यातच बसा .
या प्रमाणे अनेक आपण मोठ्मोठ्याला गोष्टी आपण आंधळेपणाने घालवतो . आणि हे अनेक प्रश्न आज आपल्या समोर एव्हड्या साठीच उभे राहिलेत कारण आपण आपलं हृदय मोठं केलं नाही . आपण योगिजन आहोत . आतून आपण सन्यस्त झालो आहोत . बाहेरून जरी सन्यास नाही घेतला तरी . आणि आपण सन्यस्त झालो आहोत ह्या गर्वा मध्ये तुम्ही राहील पाहिजे . आणि त्याचाच आनंद मानून घेतला पाहिजे . नाहीतर तुमची प्रगती होणारच नाही . कधीच प्रगती होणार नाही . काही जरी केलं तरी तुमची प्रगती होणार नाही जो पर्यंत तुम्ही आपलं मन थोर करणार नाही . आणि ह्या अशा चुकीच्या समजुती आपल्यामध्ये पुष्कळ आहेत आणि त्या गेल्या पाहिजेत . त्या गेल्या शिवाय आपण खरोखर योगिजन आहात कुणी म्हणून घेणार नाही . तेव्हा कुणीही अशा भलत्या सलत्या ज्या गोष्टी आपल्या मध्ये आहेत त्या ठेवल्या नाही पाहिजेत . तुम्हाला आश्चर्य वाटेल कि मी जे सांगते त्याच्या आधी इथे ह्या महाराष्ट्रात जेव्हडे मोठमोठाले संतसाधु झाले ,फार मोठमोठाले संतसाधु झाले त्यांनी हेच सांगितलं कि जातपात हे धर्मअंधता इतकी वाईट आहे . आणि वाट्टेल तो दगड घ्यायचा त्याच्यावर शेंदूर फासायचा . त्याच्यावर नृसिह सरस्वती म्हणतात कि त्याच्यावर जाऊन थुकायचं . असं काही दिसलं तर त्याच्यावर जाऊन थुंकायचं . याच्यावर त्यांनी इतक्यांदा शस्त्र उगारलं . पण एकटेच होते बिचारे . ज्ञानेश्वरांनी सुद्धा किती छळ सहन केला ,कारण ते संन्यासाचे पुत्र म्हणून किती त्यांना त्रास दिला . अहो ते कुणाचेही पुत्र असले तरी ते सर्व ब्राम्हणां पेक्षा उच्च होते ते . अशा प्रकारे आपल्या देशामध्ये अनेक गोष्टी झाल्या आहेत . तेव्हा त्या इतिहासापासून आपण शिकले पाहिजे आणि आता आपण योगिजन झालो आहोत तेव्हा आपणच अशा रीतीने वागलं पाहिजे कि आपल्या मूलभूत तत्वावर आपण उभे आहोत . आपण आपलं मिळवलेलं आहे तेव्हा आता आम्ही हे काहीही नाही आम्ही फक्त योगिजन आहोत . आणि योग्याला हे सगळं काही शोभत नाही . अशा रीतीने ह्या सर्व तुमच्या काही आजपर्यंत च्या समजुती आहेत किंवा धारणा आहेत ती सोडून परमेश्वराला आपल्या हृदयात स्थान दिल पाहिजे . ह्या सर्व गोष्टी सोडून देऊन त्याचा हट्ट सोडून दिला पाहिजे . चोखामेळा सुद्धा संत होते आणि तसेच आपले रामदास स्वामी सुद्धा संत होते पण रामदास स्वामींचे शिष्य आणि चोखामेळांचे शिष्य यांच्यात अत्यंत भांडण झाली . हि आश्चर्याची गोष्ट आहे . दोन्ही संत असताना त्यांच्यात भांडण कशाला पाहिजे . पण असणारच कारण द्रीष्टी नाही ना तेव्हा तेव्हड्या पुरत दिसत . आणि म्हणून सगळ्यांना माझं असं सांगणं आहे कि आता ह्या जाती पाती तुन आणि ह्या मूर्खपणातून निघालं च पाहिजे . ते मुसलमानांमध्ये ,ख्रिश्चन मध्ये सगळ्यांमध्ये एकसारखं आहे . पण एव्हडे धर्म करून सुद्धा मला तुम्ही एक सांगा कोणच्याही धर्मामुळे माणूस हे पाप करू शकत आंही असं दिसलंय का कुठे . ?सगळ्या पापाला तयार . कोणी म्हंटल तो मुसलमान असेल ,ख्रिश्चन असेल ,हिंदू असेना का तो कोणच्याही पापाला मी करणार नाही असा म्हणणारा मी पहिला नाही . पण योगिजन पाप करू शकत नाहीत . जर केलं तर हातातून चैतन्य जाणार . संत लोकांनी कधी पाप केली नाहीत . त्यांना काही सांगावं लागलं नाही . आपोआपच ते अशे झाले . तशेच आपण सर्वानी व्हावं आणि नेहमीच हे जे अढळ पद आहे ते मिळवावं असा हा मुक्ती द्वाराचा सहजयोग आहे त्यात तुम्ही आला तेव्हा स्वतःला फार विशेष समजलं पाहिजे . स्वतःचा फार आदर केला पाहिजे . आणि त्या आदरा मध्ये आपली वाढ करून घेतली पाहिजे . खरोखर म्हणजे सहजयोगामध्ये कोणाचाही त्याग करावा लागत नाही . जर तुम्ही बुद्धीचा त्याग केला तर त्याला आम्ही काही करू शकत नाही . पण यांच्यात काही त्यागमूर्ती वैगेरे लोक नको आहेत . उलट यांच्यात लाभच लाभ आहेत . प्रत्येकाला लाभ होतो पण ती एक भुरळ आहे त्या भुरलीत पडलं नाही पाहिजे . अनेक लाभ होतात लक्ष्मीचा लाभ होईल . तुम्हाला प्रकृतीचा लाभ होईल . पण ती एक भुरळ आहे . त्याच्या पलीकडे आत्मा आहे तो मिळवला पाहिजे . आणि त्यात रममाण झालं पाहिजे . हे मी आज स्पष्टपणाने आपल्याला सांगत आहे . आणि सगळ्यांनी सर्व ह्या धर्माच्या अंधश्रद्धेच्या गोष्टी आहेत त्या सोडल्या पाहिजेत . तसच नास्तिकांनी सुद्धा जरासं डोकं उघडून बघितलं पाहिजे . कि परमेश्वर आहे किंवा नाही . उगीचच परमेश्वर नाही असं ठासून सांगायला त्याना काहीही अधिकार नाही . ते कोण होतात असे म्हणणारे . आणि जर असे ते म्हणतात तर त्यांचं अगदी चुकीचं आहे . कारण त्यांनी अजून पहिलंच नाही कि परमेश्वर आहे कि नाही ते . तेव्हा विशुध्द स्वरूप असायला पाहिजे . स्वतःच स्वरूप अगदी निर्मल करून घ्यायचं . आणि त्या स्वरूपा मध्ये देवाला आपण आकलन केलं पाहिजे . त्या शिवाय हे आकलन होणार नाही . ते तादात्म्य येणार नाही . आणि काहीही लाभ होणार नाही . उगीचच जशा आपण पंढरीच्या वाऱ्या करतो तशा इथे वाऱ्या करू नयेत . काही तरी मिळवावं अशी सर्वाना विनंती आहे माझी . अत्यंत कळकळीची विनंती आहे . आणि मी हेच बघते कि महाराष्ट्रात इतकी मेहनत करून सुध्दा सहजयोग का रुजत नाही . कारण फक्त माझी पूजा करून काही होणार नाही . काय उपयोगाचं आहे . तुम्ही सगळ्या देवळात करतच आलात कि . आणि इथे नुसती पूजा करून काही उपयोगाचं नाही . एक निश्चय आणि निर्धार करायला पाहिजे कि आम्ही सगळी हि थोतांड बाजूला सारून माताजींची पूजा करू . स्वतःला स्वच्छ करून आज आम्ही माताजींची पूजा करतो आहे . तेव्हा काहीतरी फायदा होईल . नाहीतर मलाच त्रास होतो आहे ह्या सर्व पूजेचा . हा अधिकार फार मोठा आहे . तो आम्ही जरी तुम्हाला दिला तरी त्याची लायकी तुम्ही मिळवायला पाहिजे .
सगळ्यांना माझा अनंत आशीर्वाद आहे . अनंत आशीर्वाद आहे . कृपा करून आपल्याकडे लक्ष द्या . आपलं महत्व जाणा . आपलं मोठेपण जाणा . आज कोणच्या कार्याला तुम्ही लागले आहेत ,हे विश्वाचं एव्हडं मोठं कार्य क्रांतीच कार्य आम्ही काढलेलं आहे त्यात तुम्ही उभे आहात . आणि त्या साठी तुम्हाला सज्ज असायला पाहिजे स्वतःची मजबुती तयार पाहिजे . आज पहिला दिवस आहे . म्हणून मी विशेष निक्षून सांगते कृपा करून व्यवस्था जी करायची आहे ती तुम्ही करत आहात पण ते आम्ही करत नाहीत माताजी करत आहेत अशा विचाराने केली आणि त्या नंतर आम्ही जे करत आहोत त्याच्या मध्ये फक्त परमेश्वरी कार्य होउदे हि मनामध्ये जर इच्छा ठेवली तर सर्व काही व्यवस्थित होईल . सगळ्यांना माझा अनंत आशीर्वाद .