Public Program, Swacha dharma 1985-12-22
22 डिसेंबर 1985
Public Program
Pune (India)
Talk Language: Marathi | Transcript (Marathi) - VERIFIED
1985-12-22 Public Program, Swacha Dharma, Pune.
पाडवळीत गावातले सरपंच तसेच इथले ग्रामस्थ मंडळी त्यांनी हा कार्यक्रम इतका उत्साहाने योजला आहे की माझं हृदय भरून आलं आहे . या पवित्र भुमीत श्री तुकाराम महाराज राहीले त्यांनी परमेश्वराची गाथा गायली .परमेश्वराची ओळख सांगितली . लोकांना अनेक प्रकारे आपल्या जीवनातून अत्यन्त मुल्यवान अशी माहीती दिली .आज येतांना उशीर होत होता कारण रस्त्यामध्ये दुसरी गाडी फेल ( fail ) झाली तर तिकडे मला तुमच्या उत्साहाची आणखिन त्रासाची पूर्ण कल्पना येत होती .पण त्या वेळेला तुकारामांचा एक अभंग आठवला समयासी सादर व्हावे . समयाला सादर असलं पाहिजे. इतक्या सोप्या शब्दात फार मोठी गोष्ट तुकाराम बुवांनी सांगितली .समयासी सादर व्हावे म्हणजे आपण एकतर पुढचा तरी विचार करतो किंवा मागचा तरी विचार करतो .पण ह्या क्षणाला ,ह्या क्षणाला काय मिळतंय ते आपण बघत नाही . वर्तमान काळात राहू शकत नाही , आज आता इथे काय आहे ते आपल्या लक्षात येत नाही .त्यामुळे जे विशेष आहे जे महत्वाचं आहे ,जे संपुर्ण आहे ते आपल्याला मिळू शकत नाही एवढी मोठी गोष्ट एका वाक्यामध्ये समयासी सादर व्हावे इतकं नम्रपणानी त्यांनी म्हटलेलं आहे .इतका उत्साह इतकं प्रेम तुम्ही आईला दिलंत त्यासाठी माझ्याजवळ शब्द नाहीत . आज एवढया धकाधकीच्या काळामध्ये आपल्या समाजात अनेक तऱ्हेचे वैगुण्य आलेले आहेत .पुष्कळ खराबी आलेली आहे त्यामुळे प्रत्येकाला काहीना-काहीतरी दुःख आहे कुणाला शारिरीक दुःख आहे ,तर कुणाला मानसिक दुःख आहे ते नसलं तर एखाद्याला कौटंबिक दुःख पण फार आहे ,सामाजिक दुःख आहे .तरतर्हेचे त्रास एकदम जशे काही सगळेच्या सगळे एकत्र फोफावून उभे राहिलेत. माणसाला समजत नाही भांबावून गेलेला आहे की जावं तर जावं कुठे करावं तरी करावं काय . नल- दमयंतीच्या आख्यानात आहे की , नळाला कलीने फार त्रास दिला तेव्हा त्याने एक दिवस पाठलाग करुन कळीला धरलं आणि सांगितलं मी तुझा सर्वनाश करतो कारण तू फार त्रासदायक आहे ,कटकटी आहेस सगळ्यांना भ्रमित करतोस ,सगळ्यांना वाईट मार्गाला लावतोस ,चुका करवतो आणि ह्या चुका करून लोक कुठल्या मार्गाला जातील पतनाच्या मार्गाला जाऊन नंतर नरकात बुडतील .त्यांचा आपल्यावरचा ताबा सुटेल त्यांच्या घरामध्ये वैमनस्य वाढेल ,आप -आपसात वैमनस्य वाढेल ,भांडण होतील देवाच्या नावावरती लोक पैशे खातील तेव्हा ते नको.असा कलियुग यायलाच नको तर तुलाच,तुझाच मी सर्वनाश करतो .तेव्हा कलीने सांगितलं कबुल .हे सगळं होणारं मी जेव्हा येईल तेव्हा अज्ञानात लोक पडतील आणि ह्या सगळ्या गोष्टी होतील हे मी मान्य करतो . पण माझं माहात्म्य तू ऐकून घे ते ऐकल्यानंतर जर तुला मला मारून टाकायचं असलं तर मला मारून टाक . माझं एकच माहात्म्य आहे ते म्हणजे ह्या कलियुगातच हे जे दरी खोऱ्यामध्ये मोठे- मोठे संतसाधू परमेश्वराला शोधत फिरत आहेत आणी जे सर्वसाधारण समजत सुध्दा देवाचा एवढा टाहो फोडतायत ह्या सर्वांना मुक्ती मिळणारं आहे ,मोक्ष मिळणारं आहे त्यांची कुण्डलिनी जागृत होऊन त्यांना आत्म्याचा साक्षात्कार होणार आहे तेव्हा जर तुला मला मारून टाकायचं असलं तर मारून टाक .मग त्याने असं म्हटलं की बरं तुला मी ह्या गोष्टीवर सोडतो पण हे सगळं करण्याची गरज काय ? ते म्हणे मानवाच्या अज्ञानाने जेव्हा मनुष्य पराकोटीला जातो तेव्हा तो परमेश्वराला विसरून हे सर्व कार्य करतो .परमेश्वराची त्याला आठवण राहत नाही आणि संत साधूंचा तो छळ करतो . आपण पाहिलंच आहे की एवढे मोठे संत श्री तुकाराम त्यांच्या सगळ्या पोथ्या या इंद्रायणीत बुडवल्या गेल्या पण ही नदी केवढी पवित्र की ,तिने त्या सर्व जशाच्या तशा किनाऱ्यावरून आणून घातल्या अशा पवित्र ठिकाणी आपण वावरत आहात .जे तुकारामांनी सांगितलं आपल्याला ते काही खोटं नव्हतं . परमेश्वर हा आहे ,आहे आणि सगळीकडे वावरत असतो .जे -जे ह्या मोठया - मोठया संत साधूंनी आपल्याला सांगितलं आहे ते सगळं खरं आहे . त्याच्या विरुध्द जे बोलतात त्यांना जे त्रास देतात ते खोटे आहेत खोटेच नाही पण अत्यंत दुष्ट आहेत .आणि दुष्ट लोक अशी चांगली माणसं दिसली म्हणजे त्यांना त्रास देणारच .पण आता परमेश्वराचं साम्राज्य आहे दुष्टांचं साम्राज्य संपल असं समजायचं पण त्याला कारणीभूत तुम्ही भक्तगण आहात .भक्ती आपल्याकडे धर्मवेड्याकडे सुध्दा घेऊन जाते . लोक नुसते धर्मवेडे होऊन जातात .धर्म वेडे झाले म्हणजे आता मला परवा लोक सांगत होते की ,इथे प्रत्येक गावात दोन चार बाबाजी लोक येऊन बसलेले आहेत कोणी अमका बाबा , कोणी तो बाबा, असल्या तऱ्हेचे बाबाजी लोक बसलेत तिकडे पैशाच्या नुसत्या राशी ओतल्यात . गुरुचरीत्रात अगदी सुरवातीलाच सांगितलय की जो मनुष्य पैसे घेतो तो सद्गुरू नव्हे .हे सगळं असून सुध्दा आपल्याला असं वाटतं बरं पैशे दिले तर ,बरं मी सुध्दा आता खेडेगावात गेले की लोक मला काहीतरी पाच पैशे ,दहा पैशे देतात तर मी त्यांना म्हणते की मी काही पैशे घेत नाही तर म्हणतात बार मग तुम्हाला आम्ही वीस पैशे देऊ का ? म्हणजे डोक्यात ,आपल्या रक्तात भिनलेलं आहे की प्रत्येक गोष्टीला पैशेच दिले पाहीजे .तुम्ही ह्या इंद्रायणी नदीसाठी किती पैशे मोजले होते देवाला . ह्या पवित्र भूमीसाठी किती पैशे मोजले होते . असं सायन्स वाले म्हणतात की अमिबा पासून तुम्ही माणसं झालात तर तुम्ही किती पैशे मोजले त्यांना काय मेहनत केली कशे झालात तुम्ही ?काय केलं त्याच्यासाठी सहजच सगळं झालेलं आहे .आता तुम्ही शेतकरी आहात तेव्हा तुम्हाला माहिती आहे की तुम्ही एक बी पेरलं की त्याच्यामध्ये कितीतरी फळं आपोआप सहजच लागतात ते कसं काय . हे रोज आपण बघतो ही किमया बघतो आपल्या डोळ्यांनी बघतो आपण की हे होत आहे .ह्या पृथ्वीच्या उदरात नुसते दोन-चार जर आपण पाण्याचे थेंब जरी घातले तरीसुध्दा ही भूमि ,उर्वरा भूमीतूनच बी च्या पोटी कितीतरी अनेक फळे गोमटी निघतात असं सांगितलं आहे आणि तुम्ही पाहिलेलं आहे . पण हा चमत्कार बघून सुध्दा आपल्याला काही तो चमत्कार वाटत नाही ,तो कसा होतो . तसंच परमेश्वराने जे आता आपल्याला मानव स्वरूपात आणलेलं आहे असा मनुष्य म्हणून जो तो आपण आता मानव झालो तर ह्या मानवाला एक विशेष पद मिळालेलं आहे ,विशेष पदावर आलेला आहे तो अशासाठी नाही आला की , आपलं आयुष्य बेकार गोष्टींसाठी घालवायचं .नसती भांडण , नको ते व्यसनं ,नको त्या आवडी ,अश्या रितीने मनुष्य आपलं हे पवित्र जीवन एवढं महत्वाचं एवढं मोठं परमेश्वरानी हजारो वर्ष मेहनत करून तुम्हाला मानव केल्यावर ते घालवायचं. आणि नाहीतर धर्माच्या नावावर सुध्दा महामुर्खपणा आपण करत असतो त्याला काही अर्थ आहे का ? ज्या गोष्टीला अर्थ आहे तो म्हणजे ज्यानी तुम्ही समर्थ व्हाल .सम-अर्थ ,अर्थ कोण तर तुम्ही जे आहात जो तुम्ही आत्मा आहात त्या आत्म्याचा प्रकाश तुमच्या आयुष्यात , तुमच्या हृदयात सगळीकडे पसरला पाहिजे . पण जेव्हा आत्म्याचा प्रकाश येतो तेव्हा बोध होतो .नामदेव,एकनाथ महाराजांनी म्हटलेलं आहे की बोधाची मी भरीन परडी . आईला म्हटलेलं आहे की आई... मला जोगवा दे ,जोग दे . सगळ्यांच्याच तुम्ही रोजच्या या गोंधळात वैगैरे तुम्ही मागत असतात आई मला जोग दे जोगवाच म्हणतात त्याला आपल्याकडे तो जोग म्हणजेच योग . ज्याला तुम्ही मागत होतात तेच द्यायला आलेलो आहोत आम्ही . आम्ही आम्हाला हा योग दे आम्ही गोंधळाला जातो ,जेजुरीला जातो तेथे जाऊन हेच म्हणतो आई आम्हाला तू योग दे तोच योग आहे हा सहजयोग जे तुम्ही मागत होता तेच मिळायचंय. पण त्याच्यात बोधाची परडी आता हा बोध म्हणजे नुसतं तुम्हाला काहीतरी लेक्चर द्यायच नाही किंवा पायावर की माताजींच्या पायाला हात लावलेत त्याने काय होणार आहे .आहो पुष्कळ देऊळ आहेत की विचार करा कुठेतरी संपल पाहिजे नं हे . रोजचं चालू आहे पारायण रोजच चालू आहे यात्रा .रोजची मेहनत चालली आहे ,पूजा चालली आहे आता पुढे काय ? ही एवढी मेहनत कशासाठी केली काहीतरी त्याला फळ नको का ? समजा एखादं झाड असलं त्याला फळंच आलं नाही तर ते झाड काय कामाचं . तसंच मनुष्याच्या भक्तीला फळ यायला पाहीजे आणि त्याच फळ म्हणजे आत्मसाक्षात्कार . तो जोपर्यंत मिळाला नाही तोपर्यन्त भक्तिलाही काही अर्थ राहत नाही नुसतं टाळ कुटत बसलं म्हणजे झालं का ?तुलसीदास च्या बदद्ल म्हणणं आहे की ते आपले बसले होते तिथे चंदन उगाळीत त्यावेळेला श्रीराम तिथे आले सगळ्यांना टिळा लावत होते श्रीरामांनाही टिळा लावून टाकला त्यांना ओळखलं सुध्दा नाही तर फायदा काय? तेव्हा काहीतरी कमी राहिलेलं आहे म्हणून आपल्याला समाधान नाही . समाधान कशानी होईल.एकाला वाटलं चला आपल्याकडे एक शेत असावं शेताचं मग मोठ शेत असावं ,तेही आलं . ट्रॅक्टर यायला पाहिजे तेही आलं मोटर यायला पाहिजे ,ते यायला पाहिजे . जितके लोक श्रीमंत होतात तितकेच ते दुःखी, सगळ्यात जे श्रीमंत देश आहेत आपल्या सबंध विश्वामध्ये त्या देशांमध्ये जाऊन मी पाहिलेलं आहे की तिथली तरुण मुलं आत्महत्येला निघाली त्याला काय अर्थ आहे . माझ्याकडे आले तरुण लोक मुली तरुण, पोरं तरुण हे म्हणजे स्वछंदाने आता आरामात राहण्याचे दिवस त्यांच्याजवळ मोटारी गाडया ,घर, पैशे सगळं असून त्यांची अशी स्थिती जशी प्रेताचेच. आम्ही म्हटलं , असं काय तुम्हांला झालं काय ? म्हणे आम्ही फक्त हा विचार करतो की आता आत्महत्या कशी करायची ? म्हणजे पैशांनी तुम्हांला समाधान येणार नाही . पैसा सुध्दा वापरायचा तो सुध्दा लक्ष्मीरुपाने वापरला पाहिजे .पैसे सुध्दा माणसाला झेपत नाही माहितीय तुम्हाला .उद्या शंभर रुपये कोणाचा पगार वाढला तर लगेच .... जातात अकलेचे काही काम करता का ? तेव्हा पैसे झेपत नाही माणसाला .सत्ता तर मुळीच झेपत नाही . जराशी सत्ता अली की डोकं बिघडलं . कोणाचीच गोष्ट माणसाला झेपत नाही .फक्त एकच झेप त्याला घ्यायची की परमेश्वराला गाठलं पाहीजे. आत्मा एकदा तुमच्या हृदयात चमकू लागला की , मग बघा सगळ्यांचाच सत्य स्वरूप त्याच तत्व काय ते लक्षात घेऊन तुम्ही दुसऱ्याच एका वातावरणात उतरता त्याला आपण परमेश्वरी साम्राज्य असं म्हणतो . शिवाजींनी सुध्दा स्पष्ट म्हटलेलं आहे स्वधर्म ओळखावा . स्व चा धर्म ,स्व चा धर्म म्हणजे काय आत्म्याचा धर्म , कारण आत्मसाक्षात्कारी होते . तुकाराम बुवा सुध्दा आत्मसाक्षात्कार होते म्हणून त्यांच्या दारी आले .त्यांना भेटायला आले .एवढे मोठे राजे असून त्यांना भेटायला आले . आणि किती मोठी निरपेक्षता त्यांना . निरपेक्ष त्यांनी एवढं त्यांना देऊ केलं ,त्यांनी सांगितलं हे बघा आम्हाला काय करायच आम्ही समाधानी माणसं . कारण जी तुमच्यामध्ये कुण्डलिनी शक्ती आहे ती शुध्द इच्छा आहे . ती जर एकदा जागृत झाली तर मनुष्य समाधानात . आता इथे जी तुमच्याकडे मंडळी आलेली आहे ही सगळी बाहेरून आलेली आहे . तुम्ही इतके पाहिलेले असतील गोरे लोक त्यांची पद्धत वेगळी आहे त्यांना भिकेचे डोहाळे लागलेत त्यांना म्हटलं तुमच्यासाठी आम्ही तिकडे शहरात हॉल -बील करतो तर म्हणे आम्हाला सिमेंट वर राहायचं नाही .आम्हाला कुठेतरी जंगलात एखाद बांधून दिल तर झोपडीत आम्ही तिकडे राहू .तर म्हटलं त्यांच्यासाठी झोपडया कुठून बांधायच्या तर म्हणे तुम्ही एखाद मंडपाचा घालून द्या आम्ही तिथेच जाऊन झोपतो .आंघोळ आम्हाला नदीवर करायची आहे . आम्हाला काही बाथरूम -बिथरूम नको कारण आता भरलं सगळं मन ,झालं पुष्कळ झालं आता नको रे बाबा तेव्हा माझं असं म्हणणं नाही की , माणसाला पैशे नाही मिळायला पाहिजे किंवा त्याची गरीबी नाही गेली पाहिजे. गरिबी ही गेली पाहिजे . पण समाधान पहिल्यांदा मिळवलं पाहिजे . समाधान मिळाल्याबरोबर तुम्हाला सगळं क्षेम मिळतं ."योग क्षेम वाहम्यहं "कृष्णाने म्हटलेलं आहे . सुदामा जेव्हा कृष्णाला भेटला तेव्हाच त्याच संबंध क्षेम झालं .तसच आहे जेव्हा कुण्डलिनी तुमच्या आत्म्याला मिळते आणि त्याच्यात प्रकाश येतो सगळ्या तऱ्हेचे क्षेम तुम्हाला मिळतं आणि मनुष्याला वाटतं किती देतो बाबा आता फार झालं आता नको रे देवा , इतकं किती द्यायला लागलायस मला .कारण समाधानाचं एक फार मोठं अस्त्र तुमच्या जवळ येतं आणि ते मनुष्याच्या चेहऱ्यावर झळकू लागतं .एक तऱ्हेची तेजस्वीता येते अशा माणसाला पण आपलयाला ह्याची समज पाहीजे की , पहिल्यांदा आपल्याजवळ सगळी ही धन संपदा आहे असं माताजी म्हणतात असं मीच म्हणत नाही ,वेदांच्या पासून त्यांच्या आधी मार्केंडेय स्वामींच्या पासन मग हजारो वर्षापासून ह्या आपल्या भारत भूमीमध्ये सगळे हे म्हणत आले विशेषकरून महाराष्ट्रात .आता मी आले तर मी चपला काढून ठेवल्या म्हटलं संतांची भूमी ही . इथे एवढे मोठे संत पायी अनवाणी फिरलेले आहेत म्हणून मी चपला उतरवून अनवाणी इथे आले . तसंच श्रीरामांनी सुध्दा तुमच्या या दंडकारण्यात जेव्हा आले ,या महाराष्ट्रात आले त्यांनी पायाच्या चपला काढून ठेवल्या , ,सीतेने सुध्दा आपल्या चपला काढून ठेवल्या ,लक्षिमणाने आपल्या चपला काढून ठेवल्या.ह्या पवित्र भूमिवर आम्हाला चालायचं बाबा .ह्या अशा पवित्र भूमीत तुम्ही बसलेले आहात .इथे कुण्डलिनी जी विश्वाची आहे ती संबंध इथे बसलेली आहे .साडेतीन वेटोळे घालून बसलेली ही कुण्डलिनी महाराष्ट्राच्या ह्याच्यात आहे . आणि हे जे पुण्याचं शहर आहे आता काही राहिलं नाही असं म्हटलं तरी चालेल पण तरी ह्याला पुण्यपठणम असं म्हटलेलं आहे म्हणजे साऱ्या जगाची पुण्याई या पुण्यात आहे . आणि मी सुध्दा पुण्यातच घर करुन शेवटी राहायचं असं ठरवलं आहे पण अशा ह्या महाराष्ट्रात जिथे एवढे मोठे मोठे संत साधू झाले त्यांनी त्रासच उचलला असल्यामुळे पुष्कळ लोकांना असंही वाटतं की कशाला आपलं माताजी सांगतात आम्हाला तसं व्हायचं नाही .आम्हाला तुकाराम बुवा सारखा त्रास उचलायचा नाही पण त्यांना विचारा ते हसतच होते आणि विमानात निघून गेले .ते कधी रडत बसले का,मला हे दुःख आहे मला ते दुःख आहे . पण आज मी बघते किती-किती श्रीमंत गडेजंगी लोक माझ्याकडे माताजी मला हे दुःख आहे आणि जितका श्रीमंत आहे त्याला जास्तच दुःख . एवढे मोठं -मोठाले पहलवान लोक त्यांच्या तब्बेती एवढ्या छान तेही येऊन सांगतात मला हे दुःख आहे न मला ते दुःख आहे . समाधान म्हणून कुणालाही नाही .सारखी स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये प्रत्येक तऱ्हेचा त्रास आहे .तेव्हा हा प्रत्येकाचा वैयक्तिक अनुभव आहे की ,आम्हाला जो भ्रांतीचा त्रास आहे तो गेला पाहीजे आणि त्यासाठी तुम्ही सज्ज आहात. परमेश्वराने तुमच्यामध्ये ही कुंडलिनी बसवलेली आहे .तुम्ही हिंदू असा ,मुसलमान असा ,ख्रिश्चन असा, काहीही असा विश्व धर्मात तुम्हाला यायला पाहीजे .विश्वधर्मात आता हे जे जातीचे प्रकार चालले चालले आहेत . त्याला मारेल ,त्याला मारेल ,ब्राम्हण -ब्राह्मणेत तर अमक मराठा ,अमक हे ,अमक ते हे सगळं जायला पाहिजे .ते जाणार कसं तर तुम्ही विश्व धर्मात यायला पाहीजे .विश्वधर्म तुमच्यामधे आहे .हा जो आत्मा आहे हा विश्वात्मा आहे . हे जे आपण जे बनवून ठेवलं आहे ते सगळं आपण बनवलेलं आहे .पूर्वी कर्मानुसार जाती असायच्या . नाहीतर व्यासमुनी कोण होते तुम्हाला माहीत आहे कोळीणीचा मुलगा .ज्याच्या बापाचा पत्ता नाही .वाल्मिकी कोण होते ?कोळी होते साधे. रयदास कोण होते ? ते रयदास चे लोक लंडनला मला भेटले तर मला आश्चर्य वाटलं .मला म्हणायला लागले कि माताजी रयदासला आणि कबीरदासला हिंदुस्तानात मान नाही .म्हटलं असं कसं ? हो म्हणे , आम्हाला तिथे देऊळ बांधू दिलं नाही लोकांनी , आम्ही बांधलं तर पडून टाकलं म्हणून आता आम्ही लंडनला येऊन रायदासच आणि कबीरदासाचे देऊळ बांधले म्हणजे काय शरमेची गोष्ट आहे .ह्या जातीपायी तुम्ही एवढ्या मोठं -मोठया संत- साधूंना खाली पाडून टाकलं ,तेच नामदेव आपले गेले होते नानकच्यांकडे गुरुनानकांच्याकडे त्यांनी त्यांचं पाचारण केलं त्यांचं स्वागत केलं तेव्हा काय हे आमच्याकडे तुम्ही आले .केवढे मोठे आणि त्यांना मुख्य स्थान नामदेवांना ,मुख्य स्थान त्या ग्रंथ साहिबात दिलेलं आहे . आपल्याकडे त्यांना हा रे हा शिंपी हा देवळात गेल्यावर सुध्दा चालायचं नाही .हे तर -तऱ्हीचे प्रकार आपल्याकडे झालेले आहेत .आणि ते होण्याचं कारण असं की अजून आपल्या रक्तात वैमनस्य भरलेलं आहे .काहीतरी बहाणा घेऊन वैमनस्य करायचं .तू काळा नि मी गोरा तुला अमक तर तुझा बाप तसा तर तू असा तर तू तसा . आम्ही सर्व एक आहोत . एका परमेश्वराच्या अंगाचे प्रत्यंग आहोत ही भावना जोपर्यंत आपल्यामध्ये खरोखर आपल्या बोधात म्हणजे आपल्या नसा-नसात येत नाही तोपर्यन्त नुसती भाषणं देऊन जाणार नाही , ही भांडण संपणार नाही ,कधीच संपणार नाही . आता परवा मी प्रकल्पात तिथे गेले होते संगमनेर ला तर म्हटलं बुवा किती दिवसापासनं हा प्रकल्प होत का नाही तर म्हणे दोन पार्ट्या आहेत ,असं का ,तर एक पार्टी म्हणते इथे करा तर दुसरी पार्टी म्हणते तिकडे करा . ते वर्षानुवर्षे झाले तिकडे सगळे बंगले बांधून ठेवले तो प्रकल्पच चालत नाही कारण दोन्ही भांडताय .अरे पण कुठेही झालं तर दोन्हीकडे पाणी वाहणार आहे का एकीकडे वाहणार आहे पाणी . इथे करा किंवा तिथे करा असा हट्ट कशाला त्याला कारण हे की दुसरा आणि मी ,असं तू -तू असं चालतं की तू वेगळा तू वेगळा ,तू वेगळा आणि मी वेगळा मी आणि माझी मुलं मग ती मुलंही डोक्यावर बसतात . ही गोष्ट जाणार कशी तो विश्वात्मा आपल्यामध्ये आहे ,सर्वदा आहे .तो सदा साक्षी आहे तो बघतोय आपला मूर्खपणा .पण तो ज्यावेळेला जागृत होतो तेव्हा तुमच्यामध्ये जे विश्वात्मच जे ऐक्य आहे जे ज्ञानेशांनी सांगितलं आहे ते जागृत होऊन तुमच्या नसा -नसात वाहू लागतं आणि तुम्हाला जाणवतं ह्या चैतन्य लहरींमुळे की प्रत्येक मनुष्य आपल्या शरीरातच आहे .प्रत्येकाकडे लक्ष दिलं म्हणजे कळतं हा कुठे ,हा कुठे ,हा कुठे ह्याला कुठे धरलेलं आहे कोणच चक्र धरलेलं आहे . तत्वात उतरल्या बरोबर सगळीकडे आपल्याला फिरत येतं . समजा जर एखाद्या झाडाला कीड लागलं . आपण बाहेरून त्याला ठीक करायचं म्हटलं तर होत नाही पण त्याच्या गर्भात आपण पाणी घातलं तर ते पाणी बरोबर त्याच्या मधोमध चढून त्याच्या तत्वात जाऊन सगळीकडे पसरतं आणि भिनत .तसंच हे तत्व आपण एकदम धरल्याबरोबर सगळ्यांच्या तत्वात आपण उतरतो . मग कोण इंग्लिश ,मग कोण फ्रेंच आणि कोण स्पॅनिश सगळे एक होऊन जातात ,सगळे एकजीव होऊन जातात आता हे तुमच्याबरोबर भेटले कशे एकजीव झाले .ते त्या समुद्रात उतरायला पाहीजे .तिथे विरघळायला पाहीजे . हे नसते आपण जे आपल्या वरती लादून लहान - लहान आपल्याला करून हे एक - एक थेंब इकडे - तिकडे भांडत बसलोच कारण आपल्याला एक - एका थेंबाला अस वाटत की उद्या सूर्य आला आपण संपणार पण तेच जर तुम्ही समुद्र झालात तर त्याच समुद्रातून जे मोठे मोठे ढग होतील ते हिमालया पर्यंत पोहोचणार आहे. तेव्हा समुद्र हे झालं पाहीजे. लहानशे अशा क्षुद्र गोष्टींना घेऊन आपल्याला संपवून घ्यायला मग तुम्ही महाराष्ट्रातले जीव नाही. हा महाराष्ट्र आहे. त्यातलं महान तरी तुमच्यात यायला पाहिजे. आणि ते महान तत्व तुमच्यात फार मोठं आहे हो ते भक्तीच केवढं मोठं आहे ह्या महाराष्ट्रात. इथे एवढे मोठ - मोठाले संत झाले आता मात्र तुम्ही संतांचा छळ तर करणार नाही ना, त्यांना असा त्रास तर देणार नाही आता माझा एवढा उदो - उदो केला तुम्ही. मी तुमची आई आहे पण आमच्या संताना खूप त्रास दिलेला आहे सगळ्यांनी आणि आता परत ते होणार नाही जर कोणी प्रयत्न केला तर त्याला तिथेच फटका मिळणार आहे हे जाणून असलं पाहिजे. तेव्हा आता तुम्ही संत होऊन घ्यायचं. संत होऊन घायच म्हणजे काय हिमालयावर जाऊन बसायच नाही. तुमच्या समोर श्री तुकाराम - बुवा आहेत ते काही हिमालयावर जाऊन बसलेत, लग्न केल, मुलं झाली, सगळं व्यवस्थित, संसार सोडून कुठे जायचं नाही. समर्थ ज्यांनी सुद्धा सन्यास घेतला होता कारण त्यांची व्यक्ती अशी होती ते हनुमानाचे अवतरण होते. म्हणून जरी त्यांनी लग्न नाही केल, तरी सांगितलं आहे की संसार सांडुनी कुठे जाऊ नये. ज्यांनी संसारात राह्यला संसारात राहायचं, लग्न करायचे, मुलं - बाळ व्हायचे हे सुद्धा एक यज्ञ आहे .पण कायद्यात राहिलं पाहिजे कायद्यात सगळ झाल पाहिजे आता त्यात सुद्धा भांडा - भांडी त्यात आज काल मुलीच्या याला आंदण देणे, पैशे देणे, मग विधवा झाली मग अमक - तमक. बायकांच्या बरोबर सगळ छळून -छळून काढायचं आजच एक बाई भेटायला आली नवरा दारू पितो, मुलांना काही खायला नाही, ती बिचारी एवढ्या मोठ्यांची बायको आणि कोणाच्याकडे भांडी घासते कारण नवरा दारुडा .पण मला एक फार बार वाटलं की ह्या ग्रामपंचायतींनी असा निर्णय घेतलेला आहे की जो मनुष्य दारू पेयील त्याच्यावरती काहीतरी म्हणजे शिक्षा होणार. पैश्यांचीच होई नाका. असं सगळीकडे झालं तर पुष्कळांच दारिद्र जाईल आणि दारूच एक आहे. विशेष कि इकडून दारूची बाटली आली की तिकडे लक्ष्मी निघाली. पण सुटता सुटणार नाही.
उगीचच लेक्चर देऊन सुटणार नाही. काही गोष्ट सुटणार नाही हे मला समजत मी आई आहे . जबरदस्ती काही तुमच्यावर करणार नाही पण उद्या तुमच्या आत्म्याला तुम्हाला भेटुद्या, सुटणार, लगेच सुटणार. सर्व सवयी सुटतात. आता ह्यातले हे जे लोक आलेले आहेत त्यातले अर्धे लोक कामतन गेलेले आहेत. शिकलेले आहेत. पुष्कळ मोठे आहेत, विद्वान आहेत, पण ह्यांनी तिकडे ड्रग्ज घ्यायला सुरवात केली. म्हणजे चरस, गांजा जे तुम्ही कधी जन्मात पाहिले नसेल ते घ्यायचे आणि तश्याच मेलेल्या स्थितीत माझ्याकडे आलेले आहेत. एका दिवसात त्यांनी सोडलं कारण त्यांची शक्ती जास्त आहे. एखाद्याच्या मागे लागले म्हणजे लागले असं नाही. अर्धवट काम नाही. आता इथे बघा. प्रोग्राम सुरु झाला. आता पुष्कळ ठिकाणी प्रोग्राम झाले. आमचे अशे हजारो माणसं आले. करत करत निम्याने होत - होत दहा माणसं राहतात सहजयोगात . त्याला पाहिजे जातीचे! सांगितललंच आहे. म्हणजे हे लोक जातीचे पक्के दिसतात . जे एकदा आले की लागले त्या कामाला. पण तसं आपल्याकडे नाही. आज काल म्हणजे लेच - पीच काम आहे. गबाळ्याचे काम नोहे रे ! सगळं सांगून ठेवलेले आहे. मला सांगायलाच नको काही. पण ते नुसतं वाचायचं म्हणून वाचायचं. चांगलंय कविता आपली वाचत बसायला चांगली आहे. पण त्यात काय लिहलेलं आणि आम्ही कस वागायला पाहिजे ते सगळं सहजयोगा बद्दल सांगितलेलं आहे की कसा स्वाध्याय झाला पाहिजे. कस माणसाला पुढे वाढलं पाहिजे, कोणची स्थिती आपण मिळवू शकतो. बाकी जगातली ही संपन्नता आणि ही मिळवलेलीच मंडळी आहेत न मग ती कशाला तुमच्या इथे आली आणि कशाला येऊन तुमची माती डोक्याला लावतात ? तिथे लोळत पडलेत ? ह्या माती मध्ये काय विशेष आहे. आपण त्या पुण्याईच्या राशीवर बसूनसुद्धा जर त्या पुण्याई मुकलो तर परमेश्वर काय म्हणणार आहे. अरे बाबा तुला एवढं दिल होत. तुझ्या पायाखाली पुण्याई आणि तू त्यातनं काही मिळवलं का नाही ? बरं सांगणारे सगळं हे सांगून गेलेत. काही नवीन मी सांगते अशातलं नाही. तेंव्हा ते घ्यावं, घेतील होतील हे पार. काल आता आम्ही अमळनेरला होतो, नाही संगमनेरला. जवळ - जवळ सात हजार माणसं होती. सगळ्याच्या सगळे पार झाली कबुल, पण त्यातले जमणार किती? त्यात काही दिड-शहाणा एखादा आला की तो लागला सांगायला . एक गृहस्थ येऊन सांगायला लागला की असं कुठे शास्त्रात लिहलेलं आहे म्हटलं काय दारू पिणं शास्त्रात लिहलं होत ? का बिडी ओढणं लिहिलं होत? तुम्ही सगळं शास्त्रात बघून करता का? जे चांगुलपणाचा काम ते करायला काय हरकत आहे आणि आहे शास्त्रात. नाडी ग्रंथात लिहिलेल आहे. त्याच्यानंतर मार्केंडेय स्वामींनी लिहलेल आहे. सगळं वर्णन आहे पण पसायदान जे आहे ते संबंध हेच आहे. पण त्यातला खोलवर अर्थ बघायचा नाही. आणि मग ते एक येऊन बसलेत पंडितजी म्हणे की ,हे आहे असं कस होतच नाही असं शास्त्रात . मोठे शास्त्र शिकलेले दिसतात. तुम्ही काय भलं केल कुणाच . आपले खिशे भरण्या पलिकडे आणखीन काही केल का? तर मग काय बुवा-बाजी, बुवा-बाजी करतात, आपण बघतोय की नाटक झालेत, इतके काय काय झालेत. पण तरी तेच, अस का? आणि जे सत्य तिकडे आपण का चिकटत नाही. सत्याला आपल्याला चिकाटी का नाही. त्या शिवाजी रायांनी साधे मावळे घेतले आणखीन सबंध जिंकून घेतल. नुसता एकच मंत्र म्हणायचे - हि श्रींची इच्छा. आहो पण श्रींची इच्छा जी आहे ती आम्ही तुमच्यात आम्ही जागृत करतो तरी सुद्धा तुम्ही का जमत नाही त्याला? काय असं झालेलं आहे? एवढी का ग्लानी आली मला समजत नाही. गांधीजींच्या स्वातंत्र्याच्या वेळेला आमचे वडील -आई इतक्यांदा जेलला गेले. आमचे आम्ही एवढे श्रीमंत लोक. आम्ही झोपडीत राहिलो. आमची काय-काय दुर्दशा झाली . सगळं आम्ही सहन करून घेतल. त्या वेळेला नुसतं स्वातंत्र्य मिळाल. त्याची काय हे आहे ते दिसतंच आहे म्हणा पुढे. पण हे स्वच तंत्र मिळवण्यासाठी का मेहनत करू नये आपण. त्यांनी सर्वच प्रश्न मिटणार आहेत. सगळच भलं होणार आहे. सगळेच आनंदाच्या सागरात पोहणार आहेत आणि परमेश्वराचा क्षेमच तुमच्यावरती येणार आहे. मग कश्याला घेऊन नाही घ्यायच? कृष्णाने सांगितल होत का खोटं सांगितल होत का? इकडे हरे राम हरे कुष्णा म्हणत जायच आणि कृष्णाने जे सांगितले आहे - " योग क्षेम वाहम्यहं!" आधी योग होईल. योग शिवाय क्षेम नाही. अस कृष्णाने सांगितलेलं आहे. नाही तर तो उलट म्हणाला असता. क्षेम योग म्हणाला असता. पण ते इन्शुरन्सच्या ह्याच्यामध्ये लिहितील. योग क्षेम वाहम्यहं! म्हणजे कोण इन्शुरन्स वाले आपल योग क्षेम काढतील मेल्यानंतर ते आपल्याला पटत. पण जे खर आहे ते पटत नाही. तिथेच मला एक समजवायचं आहे. एक आई स्वरूप आईला अस वाटत कारे बाबा. तुझ्या जवळ आहे सगळं. हे सगळ म्हटलेल आहे ना? तुजपाशी ते घ्यायच नाही का ? सगळ ठेवल आहे न वाढून मग ते घे. आम्ही काय मेहनत केली , कसा स्वयंपाक केला ,काय ते रुचकर आहे का नाही, ते तू खाऊन तर बघ. आणि खाल्यावर पचवल पाहिजे. जर ते पचवल नाही, ते अंगी लागायच नाही. अंगी लागल पाहिजे. एक सर्व साधारण भाषेमधे समजवून सांगायच म्हणजे - अस आहे की सगळा उत्साह फार असतो आपल्यात. पण तो क्षणिक नसला पाहिजे, तो क्षणिक नसला पाहिजे. सातत्यानी सातत्यानी ते झाल पाहिजे. तरच त्याला काही अर्थ आहे. तुम्ही जर नुसता एका वेळेला उत्साह दाखविला एखाद मोठ उत्साह करून आपण जर काही बी पेरल तर त्या बी ला बघायला नको. त्याची रोप यायला नको. ते रोपाला नीटपणे पाणी द्यायला नको. आणि जपून त्याच वृक्ष वाढायला नको का? आणि त्या वृक्षाला मग फळ लागायला नकोत का? असा आपण आपल्याला प्रश्न विचारायचा. आईच काही म्हणणं नाही. मला तुमच ते फक्त जे आहे तुम्हाला द्यायच आहे. तुमच्या किल्या तुमच्या हातात. पण एकदा जर का किल्ली दिली तरी वारंवार ते बघायला पाहिजे. नाहीतर सगळंकाही वाया जायचं . तेंव्हा आता सगळ्यांनी पूर्णपणे दृढ - निश्चयानी मनामध्ये असा विचार करून की आईनी आम्हाला जर कुंडलिनीची जागृती दिली तर आम्ही त्याच्यावर मेहनत करू. आधी काहीही तुम्हाला मेहनत करावी लागणार नाही. बी ला आपण जेंव्हा पेरतो तेंव्हा ही आई पृथ्वीमाता ही तिला रूप देते. त्याच्यातंन अंकुर निघतो. पण नंतर तुम्हाला मेहनत करावी लागते. तसंच हे अंकुरलेल तुमचं जे आहे त्याला तुम्हाला सांभाळाव लागत. एक महिना जरी तुम्ही व्यवस्थित मेहनत केली तर तुम्ही जमून स्वतः चे गुरु होता. त्याला काही सोडायला नको. काही करायला नको. सोडायच काय त्याच धरलंच नाही तर सोडायचं काय ? पण एक महिना तरी अगदी व्यवस्थित त्याला मेहनत केली पाहिजे. आणि ते अगदी सोप काम आहे. त्याच्यासाठी आम्ही तयार आहोत. आता पुण्यालाच येऊन राहणार आहे. तेंव्हा तुमच्यावर वाट्टेल तेवढीं मेहनत करू या. पण पहिल्यांदा तुम्ही स्वतः बद्दल एवढं लक्षात ठेवल पाहिजे की तुम्ही फार पवित्र भूमीत बसलात आणि तुम्ही सगळेच्या सगळे जशे तुकाराम बुवा विमानात गेले तशे जाण्याला सिद्ध होऊ शकता. तेंव्हा ती सिद्धता तुम्ही मिळवली पाहिजे. आज हे लोक तुमच्याकडे आलेत इथे. उद्या तुम्ही लोक तिकडे जाऊन त्यांना शिकवू शकता. हि गोष्ट अगदी खरी. तुम्हाला अजून आपल्या बद्दल कल्पना नाही . ही पण दुसरी गोष्ट आहे. म्हणून मी तुम्हाला पूर्णपणे ही कल्पना दिलेली आहे आणि कृपा करून आता हे स्वीकाराव. हे जे दान आहे ते घ्याव. मी काहीच देत नाही. हे परमेश्वराच जे वाहत आहे ते घेऊन घ्याव आणि स्वतः तन ते बघून घ्याव. जेंव्हा तुम्हाला कुंडलिनीची जागृती होऊन आणखीन ब्रह्मरंध्र छेदन होईल तेव्हा त्याच्यातंन अशे थंड -थंड गार -गार वारे येतील. त्याच्याबद्दल आदिशंकराचार्यानी संस्कृतात म्हटलेल आहे - सलीलम सलीलम ! थंड - थंड अशे वारे येतात अगदी गार वाटत आतून आणि हातामध्ये असं गार-गार गार - गार सगळीकडे वार लागत. थंड - थंड म्हणजे संबंध हे सृष्टी चैतन्यमय, चैतन्यमय आहे. जी शक्ती ज्या शक्तीच्या द्वारे हे सगळं रोजच काम सहजगत्या जे जिवंत कार्य घडत असत. जेवढा जिवंत कार्य घडत असत ते संबंध घ्या. चैतन्यामुळे ह्या ब्रम्हशक्तीमुळे घडत ही परमेश्वराची प्रेमाची शक्ती आहे ती सर्वप्रथम आत्मसाक्षात्कार झाल्यावरती हाताला लागत. पण तुकाराम फक्त एकटे होते. त्यांना कोणीही साथीदार नव्हता म्हणून त्यांनी कविता लिहून ठेवून दिल्या ते समजणारे सुद्धा कमी त्यावेळेला. उलट दृष्ट त्यांना वाटल आपलं पाय येतो. माझ्याही मागे लागतात म्हणा. पोटावर पाय येतो म्हणून त्यांना त्रास द्यायला लागले. पण तुम्ही शहाणपणा धरावा. आणि हे हृदयात धरून ते सत्य ते बाळगावं आणि नंतर आत्मसाक्षात्कार झाल्यावर त्याच संगोपन करून बरोबर ह्या पूजनीय दशेला उतराव. ही पूजनीय दशा तुम्हाला फारच अगदी सहजच मिळणार आहे. तर सर्वाना विनंती आहे की सर्वानी आत्मसाक्षात्कार घेऊन नम्रपणे तो स्विकारून आणि त्याच्या पुढच्या मार्गाला लागून इतर सर्वांचं सुद्धा भल करा. तुम्ही एवढा उत्साह दाखवला. इतक प्रेम दाखवल. ह्या सगळ्यांना बघून सुद्धा अगदी आश्चर्य वाटल की बघा कस हृदय उघडून सगळ्यांनी म्हटलेल आहे. तेव्हा जरी दर्शन म्हणजे पायावर येणं. ते जरी नसल तेवढं जमायच नाही. तरी सुद्धा काही हरकत नाही. आपण पायावर सर्वांच्याच जातो. सगळ्या देवळात फिरलो. तिथे आहेतच सगळं ते. पण आता तुम्हाला कळेल की पंढरीला तुम्ही गेले तर तिथे काय आहे. आतापर्यंत दगडच होते ते. पण आता तिथे गेल्यावर चैतन्य केवढं त्याच्यातन वाहतंय. म्हणून पंढरीनाथ खंडोबा काय ते कळणार नाही. खंडोबाला आपण शंभरदा जातो. जेजुरीला जातो. तिथे जाऊन एवढा गोंधळ घालतो. पण खंडोबा काय ते कळत नाही. आता जाऊन बघितल तर चैतन्यच वाहून राहिलेल आहे. तऱ्हतऱ्हेने तुम्हाला लक्ष्यात येईल की हे चैतन्य वाहतंय सगळीकडे म्हणून हे खंडोबा आहे. पृथ्वी तत्वातन आलेलं वरती आहे. आता ह्या सगळ्या ज्या आपल्या महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, तुळजापूरची भवानी म्हणा किंवा माहूरची, माहूरगडावरची किंवा आपलं कोल्हापूरची ह्या सगळ्यांचं काय महत्व आहे हे लक्ष्यात घेतल पाहिजे. कोल्हापूर महालक्ष्मीच्या देवळात जाऊन आपण उदो उदो अंबे म्हणतो म्हणजे ती कोण तीच तर कुंडलिनी. कशाला महालक्ष्मीच्या देवळात जाऊन म्हणायच कारण मध्य तत्वामध्ये महालक्ष्मी आहे. मध्य तत्वामध्ये महालक्ष्मी आहे आणि तिथूनच त्या तत्वातनचं उदे उदे अंबे म्हणतो. ती कुंडलिनी जागृत होते. म्हणून तिथे महालक्ष्मीच्या देवळात आपण जाऊन असं म्हणायचं हे सगळं जे आहे त्याच काय महत्व आहे. आपण आता वर वर करत असतो. अष्टविनायक म्हणजे काय हे सगळं काय आहे. त्याच तत्व त्याच माहात्म्य हे समजलं पाहिजे हे सगळं ज्ञान जे आहे हे मुळातल ज्ञान आहे. हे मुळातल ज्ञान आहे बाकी जे परदेशातल ज्ञान आहे ते झाडाच ज्ञान आहे. त्यांना मुळाच ज्ञान नाही. ते आपल्याला असून आपल लक्ष्य नाही. तेव्हा झाडाच ज्ञान असून उपयोगाच काय मुळाच ज्ञान असायला पाहिजे. तेव्हा ते मुळाच्या ज्ञानाकडे वळले आहे आणि आपल्यात ते आहे थोडं बहुत आहे पण ते बरोबर व्यवस्थित आपण जाणून घेतल पाहिजे. आणि त्यासाठी एक विशेष तर्हेची चेतना असायला पाहिजे. ज्याला आत्मसाक्षात्कारी चेतना अस म्हटल आहे. ती चेतना तुमच्यात आली म्हणजे सगळं एकदम तुमच्यात येईल त्याला काही वाचन नको, शिक्षण नको, काही नाही . कोण तुकाराम बुवा आपले युनिव्हर्सिटी वगैरे गेले नव्हते. पण कुठल्या कुठे पोहचलेले लोक आहेत नामदेव कुठे होते अशे गेलेले किंवा एकनाथांनी असं काही केल. गोरा कुंभारांनी असं काही केलंय का पण निर्गुण आणि सगुणाच्या काय सुंदर - सुंदर कविता लिहून ठेवलेल्या आहेत. त्या कुठून आल्या. ते सगळं आपल्यामध्येच आहे ज्ञान ते सगळं ज्ञान ह्या आत्मसाक्षात्काराने त्याच्या प्रकाशात तुम्हाला जाणवेल तेव्हा सगळ्यांना अशी विनंती आहे की आत्मसाक्षात्कार घेण्याच्या आधी आतमध्ये प्रतिज्ञा करायची की आई आम्ही ह्याच्यामध्ये वाढू आणि ह्याच्यामध्ये आम्ही तृप्त होऊ आणखीन पुढच्या मार्गाला लागू. एकदा दिवा पेटवला म्हणजे मग त्याला वरती ठेवतात. जमिनीवर ठेवत नाही. म्हणजे सगळ्यांना तो प्रकाश देतो दिवा पेटवल्यानंतर त्याच कार्य काय, प्रकाश देणे. त्याच्या आधी सगळी भक्ती झाली त्याच्या आधी सगळ काही झाल. आता दिवा पेटवला आता प्रकाश द्या आता प्रकाश दिला पाहिजे आणि तसंच आता होणार आहे. तुम्ही सगळे इथे जे आलेले आहात त्यांना सगळ्यांना आत्मसाक्षात्कार होईल अशी मला पूर्ण आशा आहे कारण ज्या भूमीवर तुम्ही बसला आहात ती अत्यंत पवित्र भूमी आहे. परमेश्वर तुम्हाला सुबुद्धी देवो. अनंत आशीर्वाद देवो ज्याने तुम्ही परमेश्वराच्या साम्राज्यात आनंदात, सदासर्वकाळ चिरंतर राहाल. आता गावकरी लोकांना एकदा प्रश्न असला तर विचारा. पण व्यवस्थित विचारायचं नाहीतर आम्ही परवा आता गेलो एक दारुडे विचारायला लागले आता त्यांना काय उत्तर द्यायच मलाच समजेना , म्हटलं जाऊ द्या. जे पिऊन आले त्यांना करायच काय? बाहेर करा. आणखीन काय वेड्यासारख काही विचारायच नाही. शहाणपणाने विचारा. मुलांनी बोलायच नाही. थोड शांत रहा. आता बसले तसेच पाच मिनिट आणखीन शांतता ठेवा. आत्मसाक्षात्काराचा प्रोग्राम आम्ही करणार आहोत. पण पाच मिनिट शांत बसायला पाहिजे. जरा चित्त शांत व्हायला पाहिजे. जर एखाद्याला प्रश्न असला तर विचारा नाहीतर सोडून टाका. कारण वाद - विवाद करून काही होणार नाही. वाद विवादानी काही मिळणार नाही. रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे. मिटे वाद संवाद ऐसा करावा. ज्याने वाद वाढेल तसं नाही . आता दुसर्यांना बघू नका. एक मनुष्य आला की लगेच डोळे तिकडे. लक्ष इकडे ठेवायच. लक्ष इकडे ठेवा. लक्ष कुठे आहे. लक्ष इकडे पाहिजे . थोडावेळ चित्त एकाग्र. लक्ष इकडे पाहिजे. लक्ष इकडे तिकडे कशाला घालायच. लक्ष्य एक मनुष्य आला की लक्ष मुलगा रडला की लक्ष. लक्ष चित्त एकाग्र असायला पाहिजे. शांत चित्त असलं पाहिजे. बरं तर आत्ता आपण आत्मसाक्षात्काराचाच प्रोग्राम करूया. अगदी सोप्प काम आहे. पहिल्यांदा सगळ्यांनी अशे हात ठेवायचे. मधून उठून बाहेर जायचं नाही ,दुसऱ्यांना त्रास द्यायचा नाही . सगळ्यांनी शांतपणानी अशे हात ठेवायचे . आता डोळे मिटून घ्या. उजवा हात जमिनीवर ठेवायचा बाजूला ,अगदी सहजगत्या ,सहजगत्या काही प्रेशर नाही झालं पाहिजे. साध असं काही वजन नाही पडलं पाहीजे. साधं अगदी असं बसायचं. आता ही पृथ्वी मी आधीच सांगितलंय. त्यातल विशेष म्हणजे इतकी पवित्र पृथ्वी . तेंव्हा गणेशाला मनामध्ये नमन करून असा हात ठेवायचा मनामध्ये. ( उजवा हात जमिनीवर ) लक्ष माझ्याकडे, लक्ष माझ्याकडे बघा. या पृथ्वीला नमन करून श्रीगणेशाला नमन करून असा हात ठेवायचा मनामधे . हातात गार-गार वाटतय का बघा. हातात गार आल्यासारखं वाटतय, डोळे उघडे ठेवायचे. सध्या डोळे बंद करू नका. मग सांगते, डोळे बंद करायला. ही पृथ्वी आहे न ही सगळ्यांचे ताप ,पाप सगळं ओढून घेते. इतकी कमालीची पृथ्वी आहे तुमची. तो पृथ्वीचा भाग तुम्हाला परमेश्वराने दिलेला आहे. जास्त काही मला मेहनत करायलाच नको इथे. वाटतंय हातात गार, वाटतंय का? येतंय हो म्हणा तोंडानी हो म्हणायच. आता उजवा हात माझ्याकडे करा आणि डावा हात असा ( आकाशाकडे) म्हणजे आकाश तत्वाकडे. आपल्याकड़े जे जे विचार वगैरे अशे येतात ते जाण्यासाठी अहंकार मनुष्यामध्ये अहंकार फार आलेला आहे. दोन पैशे आला की अहंकार. एकाग्र बसा , एकाग्र . उजव्या हातात येतंय. खालून जर गार वाटत असेल तर अस करून घ्यायचं. पुष्कळांना खालून गार वाटेल त्यांनी असं करून घ्यायच, खालून असं वर . ज्यांना असं वाटत असेल त्यांनी आता उजव्या हाताकडे लक्ष ठेवा. उजव्या हातात येतंय का बघायचं, येतंय? आता ही , हेच चैतन्य आहे हे दोन्हींकडून म्हणजे आपल्याकडे संतुलन नाही. म्हणून हे संतुलनात तुम्हाला बसवलं मी. आता डोळे मिटून दोन्ही हात वर करायचे अशे. आकाशाकडे अशे. मान अशी मागे टाकायची आणि म्हणायचं की हीच काय परमेश्वराची प्रेमशक्ती आहे . मनात म्हणायचं. हीच काय ब्रम्हशक्ती आहे , हेच काय विश्वव्यापी चैतन्य आहे. असा प्रश्न करायचा श्री माताजी ही परमेश्वराची शक्ती आहे का? अशे तीनदा प्रश्न विचारायचे . आता हात खाली करा. डोळे उघडा हळूच. डावा हात माझ्याकडे करायचा. उजवा हात डोक्यावर बघा. गार येतंय का डोक्यातन. आधी गरम येईल ,आहे? मुलांना लवकर येत. मोठ्याना जरा कमी . हं.. ,आता दुसरा हात घ्या. उजवा हात. अगदी सोप काम आहे बघा. हा तर हजारो लोकांची कुंडलिनी जागृत होते. तर एक गृहस्थ म्हणायला लागले असं कास शक्य आहे. म्हटल होते समजायचे होते तर मग त्या व्यक्तीला काहीतरी मानलं पाहिजे न . काहीतरी असल्याशिवाय का होतंय. काहीतरी असलच पाहिजे. हा बघा येतय ना. आता परत हा हात एकदा ,आता बघा. किती वरपर्यंत येतंय ते बघा. कुठपर्यंत येतय अगदी फवाऱ्यासारख वर येतंय हं.. आता नमस्कार करून मनामध्ये निश्चय करायचा की, आम्ही सहजयोगाला लागू आणि पूर्ण प्रयत्न करू. सगळ्या वाईट सवयी सोडून टाकू. इतकं माताजींच्या समोर तर ते होणारे सगळ्या आमच्या वाईट सवयी सोडू देत आणि आम्हाला सहजयोगामध्ये वृद्धिंगत होऊ देत असं मनामध्ये म्हणा, म्हणजे बघा कळेल तुम्हाला ( . . . . . . . . ) आता एकदम आतमध्ये शांत वाटेल बघा. काहीही विचार येणार नाही. माझ्याकडे बघा. काहीही विचार येत नाही आहे. विचार थांबलेत. तुम्ही टोप्या सुद्धा काढल्या नाहीत. मी नेहमी लोकांना टोप्या काढा म्हणते. कारण जरासा थोडासा परिणाम येतो. बघा आता. आता बघा परत येतंय का गार. डोक्यात विचार करायचा नाही . लक्ष इकडे, टाळू कडे ठेवा लक्ष. हं.. तिकडे येतंय का सगळ्यांच्या ? त्या साइडला ,काय हो ? मांड्या घालून बसा. जरा मांडी घाला. पाय खाली सोडून बसलेत . ते बरोबर नाही. मांड्या घालून बसा . हं.. मांडीच बर असत. पाय सोडून नाही बसायचं. दुसऱ्या हातानी बघा आता येतंय का? बोलायचं नाही बोलायचं नाही. ह्यांच्यानंतर शांत राहा. शांती शांती जी मिळाली आहे. शांतीची पै शांती म्हणजे शांती ची जी शांती आहे त्यांच्यावर जी शांती आहे ती गाठली पाहिजे. शांतीची पै शांती म्हणजे शांतीच जे तत्व जी शांती ती शांती आपल्या इथे स्थापित झाली पाहिजे. शांत राहायला पाहिजे. छान वाटतंय ? हात खाली करा. डोळे मिटून एक दोन मिनिट डोळे मिटून राहायचं दोन मिनिट डोळे मिटा बघा सगळीकडन गार-गार वाटतंय बघा. गार येऊन राहलय. वाटलं तर उजवा हात जमिनीवर ठेवा. डोळे मिटून घ्या . कबीरांनी म्हटलेलं आहे की , संतजन उत्तर गये पार ! हां.. आता दोन्ही हातानी बघा. आता तुमच्यासाठी फोटो आणलेले आहेत ते इथे तुमच्या सेंटर वरती आम्ही ठेवणार आहोत. जे मंडळी सेंटर वरती येतील त्यांना फोटो मिळतील. तसंच सेंटर वर येऊन ध्यान - धारणा कशी करायची ते शिकल पाहिजे . नुसतं एकदम उफाण आल्यासारखं नाही करायच . शांत चित्तानी सगळं मिळवून घेतलं पाहिजे आणि मिळवून एक गुरुत्व साधन केलं पाहिजे. म्हणजे श्री तुकाराम बुवांच्या आत्म्याला केवढा आनंद होईल. किती त्यांना सुख समाधान मिळेल आणि त्यांना वाटेल की झालं माझं कर्तव्य पूर्ण झालं . अशी संधी त्यांना द्यावी हे विशेष आशीर्वादाची गोष्ट आहे. आमचा अनंत आशीर्वाद. तुम्हाला अनंत आशीर्वाद आहे.