Public Program, Rudhigat hone hi tamasik pravrutti ahe 1985-01-18
18 जानेवारी 1985
Public Program
Nashik (India)
Talk Language: Marathi | Transcript (Marathi) - Draft
Rudhigat Hone Hi Tamasik Pravrutti Aahe Date 18th January 1985: Place Nasik Public Program Type
सर्व सत्यशोधकांना आमचा नमस्कार असो! नाशिकला आजपर्यंत अनेकदा येणे झालेले आहे आणि पूर्वजन्मी नाशकात काही वेळ घालवलेला आहे. पण त्या जन्मात आणि ह्या जन्मात इतके अंतर आलेले आहे, की हे क्षेत्रस्थळच आहे की काय आहे? अशी मला शंका वाटू लागते. इतर ठिकाणी खेडेगावात जिथे श्रीरामचंद्रांनी पायसुद्धा ठेवले नव्हते, लोकांमध्ये धर्माची जाणीव, धर्माची चुणूक आणि कुशाग्रता जास्त आहे आणि नाशिकमध्ये एवढी का कमी आहे, याचा मी अनेकदा विचार केलेला आहे. त्याला कारण असे आहे मला वाटते, क्षेत्रस्थळी अनेक रूढी बांधल्या जातातच. कारण पोटभरू लोक, ज्यांना पैसे कमवायचे आहेत, ते काहीना काही तरी अशा रीतीचे प्रबंध आणि दंडक बांधत असतात, की त्याने माणसं त्यात गोवली जातात. जसं एखाद्या बैलाला घाण्याला जुंपतांना आपण झापड घालतो, तशीच अशा ठिकाणी झापड लोकांना बांधली जाते आणि त्या झापडीत ते असेच गोल गोल फिरत असतात. त्यात आपली काही प्रगती झाली की नाही ते बघत नाहीत. त्यामुळे जिथे श्रीरामांचा वास झाला, जिथे शूर्पणखेला एवढे अपमानित केलं गेलं त्याच ठिकाणी अशा गोष्टी का घडाव्यात? ह्याचं मला वारंवार आश्चर्य वाटत होतं . पण एकंदर आराखडा घेतांना असं समजलं, की रूढीगत होणे, ही खरोखर तामसिक प्रवृत्तीच्या लोकांना असते. आपल्यामध्ये बहुतके करून राजसिक आणि तामसिक प्रवृत्तीचे लोक असतात. त्यापैकी राजसिक लोक जे असतात ते वाईट काय, चांगलं काय ते बघत नाहीत. वाईट काय आणि उत्तम काय ते त्यांना समजत नाही. पाश्चिमात्त्य देशामधील लोक राजसिक आहेत. त्यांना सांगितलं की तुम्ही धर्म करा तर तोही बरा, अधर्म करा तर तोही बरा. हेही चालेल आणि तेही चालेल. त्यांना कोणतं चांगलं आणि कोणतं वाईट हेही समजत नाही. पण तामसिक प्रवृत्तीचे जे लोक असतात, ते वाईटालाच मोठ मानून आपल आयुष्य खराब करत असतात. जे वाईट असेल, जे चुकीचे असेल, जे अधार्मिक असेल, त्यालाच धर्म मानून त्याच्यामध्ये तुमची आई आहे, म्हणून आपली सगळी शक्ती लावत असतात. त्याची अनेक उदाहरणं मी पाहिलेली आहेत. मी मी तुम्हाला स्पष्ट सांगते, की आता आणखीन आयुष्य वाया घालू नये. सर्वात मुख्य म्हणजे इथे एक प्रश्न कोणीतरी विचारला होता, की गीतेमध्ये कुंडलिनीबद्दल सांगितलं नाही. म्हणजे गीता काय ह्यांनीच लिहिली आहे का? पहिल्यांदा प्रश्न हा. गीतेमध्ये जर कुंडलिनीबद्दल सांगितलं नाही, त्याला कारण एकच, की श्रीकृष्णाने फक्त दोन तास अर्जुनाला युद्धाच्या ठिकाणी एक उपदेश दिला. आज जवळजवळ वर्षानुवर्षे मी भाषणं देत आहे, आणि तरीसुद्धा अजून जे बोलते ते संपत नाही. तेव्हा दोन महिन्यामध्ये किंवा दोन दिवसामध्ये किंवा दोन तासामध्ये कोणती गोष्ट सांगता येईल, संपूर्णपणे , हे अगदी चुकीचे आहे. कृष्णाला नुसतं दोन तासामध्ये ठासून त्याला बांधून घ्यायचं. कारण पुस्तक आपण काखेत मारू शकतो. परत सांगायचे म्हणजे कृष्ण हा ब्राह्मण नव्हता. तेव्हा ब्राह्मणांचे जर असे म्हणणे असेल, की गीता आमची आहे. तर ती ন
ब्राह्मणांची नाही. तो एक गवळी जातीचा होता. गवळी जातीला पूर्वी शूद्र मानत असत. तेव्हा तो सर्वसाधारण जातीतला एक मनुष्य होता आणि रुक्मिणी ही त्याच्या जातीतली नव्हती. तिच्याबरोबर पलायन केलेले आहे हे आपल्याला माहिती आहे. हे सगळ कृष्णाने एवढ्यासाठीच केलं, की त्यावेळेलाही आपला देश अत्यंत रूढीगत झाला होता. इतका रूढींमध्ये फसला होता, की त्या रूढींमुळे जो आनंदाचा आश्रय होता तो संपलेला होता. म्हणून त्यांना ठीक करण्यासाठी श्रीकृष्णाने लीलाधर अस स्वरूप धारण केलं ही सगळी लीला आहे परमेश्वराची. तुम्ही काय असे खितपत पडले. दूसरे, गीता ज्यांनी लिहिली तो ही ब्राह्मण नव्हता किंवा तोही धर्माचा असा हकदार नव्हता, की मी धर्म जाणतो. तो कोण होता ? तुम्हाला माहिती आहे. एका कोळिणीचा असाच झालेला एक मुलगा. कायद्याने नव्हता तिचा मुलगा तो. वडिलांचा पत्ता नसावा अशातला तो मुलगा, असा तो व्यास. त्याच्याकडून गीता लिहून घेतली देवाने. कशाला? दाखवायला की तुम्ही जन्मावरून ज्या जातीपाती लावता, ती गोष्ट खोटी आहे. जन्माने तुमची जातपात समजत नाही. जात ही माणसाची, जाती शब्द जो आहे, त्याचा अर्थ असा आहे, की कोणती तुमची प्रवृत्ती आहे, त्याप्रमाणे तुमची जातपात ठरवण्यात येते. त्याप्रमाणे श्रीकृष्णाने तीन जाती मांडलेल्या आहेत. तामसिक, राजसिक आणि साक्त्विक आणि जी सात्त्विक मंडळी असतात, ती कुशाग्र असतात. शिकलेली नसली, खेडेगावात रहात असली, तरीसुद्धा त्यांना हे समजतं , की चांगलं काय ? आणि त्यासाठी ते आपलं सगळं काही, लूटायला तयार असतात. संगळ काही द्यायला तयार असतात. जे काही खरं आहे, जे काही उदात्त आहे. जे परमेश्वरी आहे, त्याला ते ओळखतात. तुकारामाची जात कोणती होती ? अहो, सजन कसाईसुद्धा एवढा आपल्यामध्ये मोठा संत साधू झाल्यावर, ह्या महाराष्ट्रात हे सगळ झाल्यावर, अजून ही खूळे चाललेली आहेत, ह्याला काय म्हणावं ! म्हणजे चूक गोष्टीला सगळ्यात मुख्य मानून त्याच्यामध्ये आपलं आयुष्य घालवायचं. आता परवा एक बाई माझ्याकडे आल्या होत्या. त्यांना एक फार भयंकर रोग झालेला आहे. म्हटलं, 'काय करता तुम्ही?' 'माताजी, मी सगळी पारायणं करते.' 'बरं, आणखीन.' 'उपवास करते. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरूवार, सगळे उपवास करते. ' म्हणे, 'अहो, इतकं मी केलं तरीसुद्धा माझ काही भल झालं नाही.' तर म्हटलं, 'तुम्हाला उपवास करायला सांगितलं कोणी? कोणी सांगितलं तुम्हाला? तुम्ही कशाला करता उपवास?' 'परमेश्वरासाठी.' 'परमेश्वराने सांगितले का तुम्हाला उपवास करायला ? कुठे सांगितले आहे की तुम्ही उपवास करायचा परमेश्वराच्या नावाने?' पण एक खूळ डोक्यात धरलं. एक फॅड डोक्यात धरलं, तसं वागायचं. सुरूवातीपासूनच. ह्या महाराष्ट्रावरती संत-साधुंचे अनेक उपकार आहेत. पण त्यांना छळलंसुद्धा खूप आहे लोकांनी. आता सुरूवातीपासून कशाला ? तुम्ही फक्त ज्ञानेश्वरांचच आयुष्य बघा! संन्याशाचा मुलगा आहे म्हणून त्यांनी झोडपायला सुरूवात केली. त्यांना त्रास झाला. अहो, पण तुमचा व्यास एका कोळ्याचा मुलगा होता. तरी त्याला तुम्ही का मानता? त्याच्या गीतेला का मानता तुम्ही? कारण ते तुमच्या खिशामध्ये एक पुस्तक झाले नां! आणि आज ज्ञानेश्वरसुद्धा तुमच्या खिशातले एक पुस्तक झाल्याबरोबर 'आमचा ज्ञानेश्वर' झाला. कुठून. तुमचा काय संबंध? जे दान ज्ञानेश्वरांनी सांगितलं आहे, मी वाचून वाचून शंभरदा सांगते ते पसायदान आणि ते पसायदान तुम्हाला विचारायचं आहे, आज मला द्यायचे आहे तुम्हाला.
त्यांनी जे तुम्हाला वचन दिलेलं आहे, ते पूर्ण करायचं आहे. त्यांनी जे एक एक सांगितलं आहे, ते सिद्ध झालं पाहिजे. त्याच्यानंतर इथे गांधीजींना नाशकात आणून सांगितलं, की तुम्ही प्रायश्चित्त करा. ते तरी काय करणार बिचारे! मी गांधीजींच्या बरोबर बरीच वर्षे होते. काय करणार ? सगळ्यांच प्रायश्चित्त केल्याशिवाय तुम्हाला होत नाही आणि आता सगळे फारेनचे कपडे घालून फिरतात आणि फारेनर्ससारखे मिरवतात. तेव्हा तुम्हाला प्रायश्चित्त करायला नको. अशी जबरदस्ती तुम्ही ह्या थोर माणसावरती केली, की तुम्ही येऊन प्रायश्चित्त करा, ह्या ढोंगी लोकांसमोर. ह्या ढोंगी लोकांचं महत्त्व वाढवून तुम्ही सगळ काही सोडून टाकलं आहे. सर्वनाशाकडे चालले आहे. एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांना तुम्ही नमवून टाकले आहे. ज्ञानेश्वरांसारख्या माणसाला तुम्ही एवढे छळले, की त्यांना समाधी घ्यावी लागली. शेवटी आपण साईनाथांना एवढ मानतो. शिर्डीचे साईनाथ हे मुसलमान होते. होते मुसलमान. ह्याची सिद्धता आम्ही देऊ शकतो, की ते मुसलमान होते. पण ते मुसलमान धर्मात जन्माला आले. म्हणजे जेवढे मुसलमान धर्मात जन्माला आले, ते वाईट आणि जेवढे हिंदू धर्मात जन्माला आले ते भगवान, असं वाटतं का तुम्हाला? अशा गैरसमजूतीत राहून आपण सबंध आपलं आयुष्य खराब करून घेतलेले आहे. तुम्ही कोणत्याही धर्मात जन्माला आलात, कोणत्याही जातीत जन्माला आलात किंवा कोणत्याही वंशात जन्माला आला आहात, तुमची जी करणी आहे, त्याच्यावरून तुमची माहिती होते, तुम्ही कोण आहात ? तुमची करणी काय आहे ? तुमची करणी जर तशी उदात्त असली, तशी मोठेपणाची असली, तर सारं जग तुमचं होतं . साच्या जगाला मग तुमची किंमत कळते आणि सारं जग तुमच्या चरणावरती येतं. पण जर तुमची करणी वाईट, तर तुमच्या जातीला आणि आईवडिलांना आणि कोणाला कोण विचारतं ? मी म्हणेन, ही एक प्रवृत्ती आहे आणि त्या प्रवृत्तीमुळे बरोबर आपण त्या चाकोरीत फिरत असतो. दूसरे असे आहे, की परमेश्वरी क्रिया ही एक जीवंत क्रिया आहे. जसं आधी मुळे येतात. त्याच्यानंतर त्याचा बुंधा येतो. मग त्याला फांद्या येतात. पालवी येते, त्याच्यानंतर फुलं लागतात. मग फळ होतं. एकानंतर एक गोष्ट अशी अशी, हळूहळू होत जाते. ती परमेश्वरी शक्ती आहे. तेव्हा ज्यावेळी जे व्हायचं ते झालं. ज्यावेळी जे करायचे ते केले. ज्यावेळी जे समजवायचे ते समजवले. तसेच आपल्या इथल्या सामाजिक, तुम्ही जर पाहिलंत तर ज्यावेळेला आगरकर आले होते, तेव्हा त्यांनी स्वत: म्हटलं, की मी एखाद्या विधवेशी लग्न केल्याशिवाय होणार नाही.. नी सांगितलं की विधवेशी लग्न करा. स्वतः. ते ब्राह्मण होते. पण त्यांच्या लक्षात आलं, की आमचे चुकलेले आहे. टिळकांनी स्वत: एका विधवेशी लग्न करून सिद्ध करून दिले, की ही जी विधवा विवाह संस्था तुम्ही अमान्य केलेली आहे, तिला तुम्हाला मान्य केले पाहिजे. त्याच्यावर बघा, जेव्हा गांधीजी आले. माझे वडिल गांधीजींचे परम भक्त होते. त्यांनी माझ्या वडिलांना सांगितले की, 'सगळ्या तुमच्या, आम्ही अकरा भावंडे होतो, सगळ्या मुलांची लग्न अकरा आपल्या हिंदुस्थानातले जे नागरीक आहेत, तिथे कुठेतरी तुम्ही करा. मग ते हिंदू असोत, मुसलमान असोत, ख्रिश्चन असोत. कोणीही असोत.' त्याप्रमाणे माझे लग्न यू.पी. ला झाले. आम्ही सगळे सुखी आहोत. फार आनंदात आहोत. पण कारण त्यावेळेला गांधीजींनी असा विचार केला, की आता आपण फक्त भारतासाठी भांडतो आहे. त्या भारतातल्या लोकांचे सांगा.
पण आज वेगळी वेळ आलेली आहे. आज विश्वाची वेळ आलेली आहे. त्या विश्वामध्ये आपल्याला फिरलेच पाहिजे. या विश्वामध्ये आपले संचारण झाले पाहिजे. आपण धर्म धर्म म्हणून जे बसलेलो आहोत, धर्माला इतकी अंधता येऊन काहीही उपयोगाचे नाही. ह्या दिले. आता परवाचीच एक गोष्ट सांगते. आमच्या इथे एक मुलगी आली. तिचे आठव्या वर्षी लग्न लावून कारण पैसे मिळाले म्हणजे झाले. लग्न लावायचं. ती आठ वर्षाची मुलगी आहे. तिचं लग्न कसं लावायचं तो विचार नाही केला. ते लग्न म्हणजे अनैतिक तर होतेच. पण बेकायदेशीर होते. ईल्लिगल होते. तेव्हा तिला सोडून टाकली. तशीच ती बिचारी त्यानंतर मॅट्रिक झाली. कोणी तिच्याशी लग्न करायला तयार नाही. सगळे अगदी फार देवभक्त! कोणीही तिच्याशी लग्न करायला तयार नाही. दिसायला चांगली देखणी मुलगी. सगळ्यांनी सांगितले, की हिचे लग्न झालेले आहे. आम्ही हिच्याशी लग्न करणार नाही. काही विचारू नका अगदी. त्या मुलीचं लग्न आम्ही एका फ्रेंच मुलाशी करून दिले. ती आनंदात, सुखात बसलेली आहे. इथे जर ती शेण खात बसली असती तर लोकांना फार आनंद झाला असता! तिचा सबंध सर्वनाश केला असता तर आणखीन त्याहून आनंद झाला असता! आपल्याला माहितीच आहे, स्वजातीय लग्नांचे आजकाल काय प्रकार चाललेले आहेत. आणि ह्या सर्व गोष्टींच्या पलीकडे पाहणारे लोक कुशाग्र आहेत. सांगितलेलेच आहे, 'येऱ्यागबाळ्याचे काम नोहे.' आता तुमच्या महाराष्ट्रातली ही क्रांती सबंध विश्वात पसरणार आहे आणि पसरत आहे. ती तुमच्या डोक्यात कितपत येते ते पहायचे आहे. त्याला डोक पाहिजे. पहिल्यांदा म्हणजे कुशाग्रता पाहिजे. ज्याला कुशाग्रता नाही तो ही गोष्ट आकलन करू शकत नाही. आज कोणती वेळ आहे ? ह्या वेळेला कसं करायला पाहिजे ? कसं वागायला पाहिजे? ह्याला आपल्याकडे समयाचार म्हणतात. पण धर्माच्या बाबतीत आपण अगदी ढिले आहोत. दारू पिणे, मुख्य धर्म आहे आपला आजकाल. नसलं, तर तंबाखू, वारकरी लोक आहेत. काय त्यांनी धर्म मिळवला? मी विचारते. पंढरीनाथ, पंढरीनाथ करून तिथपर्यंत कोणी सांगितले तुम्हाला तसे करत जायला? ज्ञानेश्वरांनी सांगितलं होतं ? त्यांनी काय तुम्हाला दिंड्या घालायला सांगितल्या होत्या? अहो, त्या लोकांची स्थिती पाहून मला अगदी रडायला येते. खर सांगते तुम्हाला. वारक-्यांच्या प्रोग्रॅमला गेले होते तर त्यांना बघून मी रडतच होते. बोलूच नाही शकले. रडतच होते सारखी. ते म्हणे, 'माताजी, काही तरी बोला. ' म्हटलं, काय बोलायचे आता हे. अहो, देवाच्या नावावर ही काय स्थिती करून ठेवली आहे? वाळून नुसते अगदी पाप्याचे पितर दिसतात. त्यांची स्थिती काही भक्तांची आहे. त्यांच्या चेहऱ्यावर काही तेजस्विता आहे. अहो, काहीतरी असायला पाहिजे नां धर्माने. हे काय पंढरीनाथांचे शिष्य आहेत का? अहो, सुदामा त्याच्याकडे गेला होता, तर त्याची सोन्याची द्वारका केली. त्या पंढरीनाथाच नाव बदनाम करणारे हे लोक सगळे रस्त्यावर दिंड्या नेत आणि त्यात तंबाखू खात फिरताहेत. जे खर ते मी सांगते. गळ्यात माळा घालायची. तोंडात तंबाखू कोंबायची आणि जायचं. सगळे कॅन्सरने आजारी. आईने सांगायचे नाही तर कोणी सांगायचं! तुम्हाला वाईट वाटलं तरी हरकत नाही. पण जे खरं आहे ते मी सांगते. म्हणजे उद्या तुम्ही म्हणणार नाही, 'माताजी, तुम्ही आम्हाला सांगितलं नाही.' पण ह्यावेळेला ह्या सगळ्या विश्वाच्या कार्यामध्ये फार महत्त्वाची गोष्ट होती की सबंध विश्व ह्याला एकवटायचं.
तुम्हाला दुसरे प्रश्न आहेत. तसच इंग्लंडला गेलं की ते म्हणतात, 'तुम्ही हिंदू करतात लोकांना.' अमेरिकेत गेलं, ते दुसरं म्हणतात, तुम्ही कम्युनिस्ट करतात. कोणी कुठेही गेलं त्याच्याविरूद्धच आम्ही सगळ्यांना करत बसलेलो आहोत. अर्थात, एका अर्थाने विरोधातच होत आहे. कारण जे तुम्ही गच्च धरून बसलेले आहात . ज्याला तुम्ही सत्य मानलेलं आहे, ते सत्य नाही असं म्हंटल्याबरोबर ते विरोधात पडणारच. त्यातल्या त्यात गोष्ट अशी आहे, की जी प्रगती आपण करायची आहे, ती जीवंत प्रगती होण्यासाठी काहीतरी परमेश्वराने व्यवस्था केली असेलच. जर परमेश्वर आहे तर ! त्याने काय आपल्याला खितपत पडायला, की काय नाशिकची स्थिती आहे ! बघवत नाही. घाणेरडी स्थिती. लोक अगदी घाणेरडेच्या घाणेरडे रहातात. इथेच रामचंद्रांनी अनवाणी चालून सगळं आपलं चैतन्य लुटवलं होतं. विचार करा. ज्यांनी सांगितलं होतं योगभूमी आहे. आहे. भारतभूमी फार मोठी आहे. ह्याच्यात जो जन्मला त्याने हजारो वर्षांची तपस्या केली असेल किंवा फार पुण्यसंपदा असेल, ज्यांनी पर्वताएवढे पुण्य गाठले असेल पूर्वजन्मात, तो इथे जन्माला येतो. मग त्याची दैन्यदशा का ? परवा एका डोंगराळ ठिकाणी बघितलं मी, तिथे एका शाळेत मूलं, अहो, काय ती शाळा! काय ती मुलं! बापरे बाप! काय ही दैन्यदशा बघवत नाही. खरोखर सांगते आणि तरीसूद्धा शिष्ठपणे मिरवायला सगळेजण तयार. म्हणजे एक तर भिकारपणा आणि त्यात उद्दामपणा. हे आपल्या हिंदुस्थानात दिसते. एखाद्या भिकाऱ्याला म्हटलं, 'अरे बाबा, आता माझ्याजवळ पैसे नाही जा. चार शिव्या देऊन जाईल तो. असं वागून आपली दैन्यदशा जाणार नाही. जे लोक सुबुद्धीवाले आहेत, त्यांना ह्या देशाची काळजी आहे. त्यांनी एकदा विचार करायला पाहिजे, की ही दशा कधी ठीक होणार? सांगायचं म्हणजे, खरोखर ही योगभूमी आहे. इथे एवढे मोठाले साधू-संत आणि अवतार झाले, पण तुम्ही त्यांना छळलं आहे. त्याची अजून पापं फेडायची आहेत मला. दुसरं म्हणजे असं, की जे त्यांनी सांगितलं ते कृतीत आणत नाहीत. कृष्णाने सांगितलं की, 'योगक्षेमं वहाम्यहम्'. आधी योग घ्या, मग क्षेम सांगितलेले आहे. योगाशिवाय क्षेम सांगितलेले नाही. जर तुम्ही योग घेतला, परमेश्वराशी तुमच तादात्म्य झालं, जेव्हा तुमच्या आत्म्याशी समग्रता आली, तेव्हाच तुमचं क्षेम होईल, असं सांगितलेले आहे आणि होतं. ज्यांनी ज्यांनी सांगितलेलं आहे त्यांचं होतंय. पण तो योग इतका सहज कसा मिळेल? समजा मिळतो. जर मिळतो तर काहीतरी असल्याशिवाय मिळतो का? काहीतरी झाल्याशिवाय मिळतो का? आम्ही काहीतरी हशारच असलो पाहिजे. आमच्यात काहीतरी विशेषच असायला पाहिजे. पण ज्याला मिळायचं त्यालाच मिळणार असं दिसतंय मला. योगधर्म मूर्खांसाठी नाहीये. जे मूर्खपणात राहतात त्यांच्यासाठी योगधर्म मिळणार नाही. कारण त्यांना झेपणारच नाही तो. झेपायचाच नाही. जे शहाणे आहेत आणि जे वीर आहेत तेच देवीची भक्ती करू शकतात. तेच कुंडलिनीला पुजू शकतात. ज्यांच्यात ते नाही त्यांच्या बसचं हे काम नाही. तेव्हा नाशिकमध्ये तुम्ही बघायचंय, शोधून काढायचं आहे, इथे किती वीर आहेत ते. अहो, त्या शिवाजी महाराजांनासुद्धा तुम्ही राज्यावर बसू दिलं नाही. म्हणे तो कुणबी आहे. असं कां? आणि आता त्यांच्याच नावावरती मोठमोठाले ऑर्गनायझेशन काढून हिंदू धर्मप्रतिपालक असं त्याला बनवलं ते कसं! त्यांना म्हणे तुम्ही कुणबी आहात. आता राज्यकारभारावरती ब्राह्मण जाऊन बसले तर त्याला का नाही म्हणत तुम्ही ब्राह्मण आहात.
तिथे राजपूताला बसवा. म्हणायला पाहिजे. कारण आपल्याकडे फक्त राजपूत लोकांनाच बसायचा अधिकार आहे नां! देवकृपेने मी राजपूत जातीतली आहे. त्यामुळे माझ्यावर तुम्ही आक्षेप घेऊ शकत नाही. मला राजकारण नको. पण सांगायचं म्हणजे असं, की आत्म्याला प्राप्त करणं, हे मुख्य जे आपलं धर्मातलं आहे, जो गाभा आहे, तो सोडलेला आहे. त्या गाभ्यालाच सोडल्यामुळे आपले सगळे नुकसान झालेले आहे. तो गाभा आपण धरला पाहिजे. आता तो कसा मिळवायचा? हा प्रश्न आहे. बरोबर आहे, की आपण तो मिळवायचा कसा? पण समजा तर त्याची कोणी व्यवस्था केली, समजा जर कोणी म्हटले, की तुमच्यामध्ये कुंडलिनी आहे ती आम्ही जागृत करतो तर त्याला तुम्ही मारायला उठणार का? आजकाल सबंध जगामध्ये फक्त वर्तमानपत्रकार दिसतात मला शहाणे. सगळ्यांवर ताशेरे झाडायचे. इतके ताशेरे झाडायचे. जिथे लोकांना ठीक करायचं, तिथे तोंड बंद असतं त्यांचं. अशा लोकांना, मला कधी कधी वाटतं, की स्वत:ची जबाबदारी समजत नाही. उद्या परमेश्वराने खाड्कन प्रश्न विचारला तर हे काय उत्तर देणार आहेत त्यांना. सगळ्यात मुख्य गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की आपली ही जी आज दशा आहे, ती नीट करण्याचा मार्ग काय? सहजयोगाचं तत्त्व एक आहे, की आत्म्याला तुम्ही मिळवा. त्याला पैसे लागत नाही, काही तुम्हाला पुस्तकं लागत नाही. तर ही जीवंत क्रिया आहे. जसे एखादे बी तुम्ही पेरले, म्हणजे कसे आपोआप अंकुरते. तसेच तुमच्यात कुंडलिनीचा जो जागृतीचा प्रयोग होतो, तो आपोआप, सहज होतो. डोक्यावर उभं राहून, परवाच कोणीतरी गृहस्थ येऊन सांगायला लागले, की एक विष्णुतीर्थ म्हणून गृहस्थ आहेत त्यांनी पुस्तक लिहिलं आहे. त्याच्यात तरूणोपाय, अरूणोपाय, गाढवोपाय सगळे लिहिले आहेत. स्पष्ट सांगायला लागले. त्यातला कोणता आहे. म्हटलं असं कां? आता एका शब्दात, खरं सांगायचं म्हणजे सगळं खोटं आहे. कसलाही उपाय ..... उपाय करायचा नाही. तुमच्यात सगळंे आहे ते. अहो, तुम्ही जर पूर्वजन्मात एवढी पुण्याई नसती केली, तर ह्या नाशिक क्षेत्री जन्माला आले असते का? पण सगळं वाया जाणार आणि त्या गोदावरीत तुम्ही टाकणार असं दिसतं. ते सगळे तुम्ही केलेले आहे पूर्वजन्मात. काही पुढे करायला नको. सगळं तयार आहे. म्हणजे मला असं वाटतं की सगळे करून मग ते सगळे पाण्यात घालायचं. दिसतंय मला स्पष्ट. ही संगळी किमया तुमच्यात आहे. तुम्हाला जितक्या लवकर जागृत करू शकते, तितक्या लवकर फारेनर्सना नाही करू शकत. त्यांच्यात तुमच्यासारखा धर्म नाही बसलेला. पण धर्म म्हणजे एक चाकोरी नाहीये. धर्म प्रगतीशील असतो आणि तो जीवंत असला पाहिजे. मेलेला धर्म काय कामाचा आहे? त्या मेलेल्या धर्माला चिकटून बसलात, म्हणून त्या धर्मापासूनही काही मिळालेलं नाही आणि सगळं देवादिकांचं नाव खराब करून ठेवलंय तुम्ही. आता विशेष म्हणजे सहजयोगाचं की जेव्हा आत्मा मिळतो तेव्हा क्षेम हे घडले पाहिजे. ही त्याची ओळख आहे. सर्वप्रथम जागृती झाल्यावर तब्येती ठीक होतात. प्रकृती ठीक होते. आम्ही पुष्कळ लोकांचे कॅन्सर ठीक केले आहेत. संजीव रेड्डी आहेत. ते आले होते ऑपरेशननंतर. तुम्ही पत्र लिहून विचारा त्यांना, लंडनला. तर मी माझ्या यजमानांच्या बरोबर होते. तुम्हाला माहिती आहे, माझे यजमान फार मोठ्या हृदुद्यावर आहेत आणि संजीव रेड्डींनी सांगितलं की, 'आता मी वाचत नाही.' इतक्यात तिथे जे बी....... म्हणून होते, हायकमिशनर साहेब,
त्यांनी सांगितलं, की ह्या माताजी निर्मलादेवी आहेत. त्यांनी माझे नाव ऐकलेले आहे. दिल्लीच्या लोकांना शहाणपण जास्त आहे म्हणा इथल्यापेक्षा. तर त्या म्हणाल्या की, 'तुम्ही माताजी, निर्मलादेवी. मी असं ऐकलंय की तुम्ही लोकांना बरे करता. माझ्या नवर्याला बरे करा. कृपा करा.' आणि ते गृहस्थ फार वाईट परिस्थितीत होते. ऑपरेशन झालं होतं , पण फेल्यूअरसारखं. मी फक्त दहा मिनिटं त्यांच्या पाठीवर हात ठेवला आणि एकदम बरं वाटलं त्यांना, एकदम बरं वाटलं. त्याच्यानंतर आले आणि मला म्हणायला लागले की, 'लोकांना असं वाटलं असेल, की मी ह्यांच्यासाठी अॅम्ब्यूलन्स वगैरे घेऊन आलो आणि आता हे उतरले कसे ?' नंतर स्वत: बोलवून त्यांनी माझा. तो एक संत-साधु, कुशाग्र मनुष्य होता असंच म्हटलं पाहिजे. ५-१० मिनिटामध्ये मी त्यांना ठीक केलं. असे बरेच लोकांना मी ठीक केलेले आहे. पण बरे केल्याबरोबर, 'आम्ही तुम्हाला पाच हजार रूपये देतो, पण आम्ही म्हणू त्या माणसाला बरे करायला पाहिजे.' आम्ही मुळीच करणार नाही. आम्ही काय तुमचे नोकर आहोत. असा दावा करायचा, म्हणजे उद्दामपणा किती? किती उद्दाम! ठीक करता की नाही करत ? म्हणजे असं, अहिल्येची शिळा झाली. तिला तुम्ही ठीक करता की नाही असं रामचंद्रांना म्हटलं असतं, तर रामचंद्रांनी सांगितलं असतं, चालते व्हा इथून. पण सहजयोगाने कॅन्सरसारखे रोगसुद्धा बरे झालेत. इतकच नाही तर अनेक रोग बरे होतात. तुम्ही जर ह्या लोकांचे चेहरे बघाल, आता ते आले नाहीत. सगळेजण बाहेर गेलेले आहेत. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, गुलाबाच्या फुलासारखे सगळे दिसतात. तुम्ही पुण्यातले, मुंबईतले सहजयोगी बघा. एकदम ओळखू येतात. त्यांचं आयुष्य म्हणजे एक विशेष, सुरभित, कमळासारखं आहे. पण निदान तुमची तब्येत तरी ठीक असू देत. परवा एक भेटले मला. त्यांची सबंध फॅमिली कामातून गेलेली. मुलगा आजारी, बायकोला फिट येते, नवर्याने सगळे पैसे गमावलेले. अगदी भयंकर स्थिती. चेहरे बघितले तर वाटते काय ही, काय त्यांची स्थिती झाली आहे. म्हटलं, 'काय हो, तुम्ही करता काय?' म्हणे माताजी, 'आम्ही फार सेवा केला गुरूंची.' 'कोण गुरू ?' म्हणे नाव केरोबा. असं कां? म्हटलं, केर का ? आता घाणोबा एक शोधा म्हटलं. नावंसुद्धा सुंदर सुंदर आहेत सगळ्यांची आणि त्या केरोबांनी ह्यांना केर करून टाकलेलं. मेले म्हणे आता ते. म्हटलं त्यांनी केलं काय? नाही म्हणे, आधी त्यांनी सव्वा रूपये तोळा सांगितले होते. मग सव्वा रूपया सांगितला , मग सव्वा तोळे सोनं सांगितलं. मग अमकं झालं, सव्वा सव्वा करत ह्यांचं सवाई करून टाकलं ह्यांनी आणि गेलेस्द्धा. ही अशी वेडेपणाची कामं तुम्ही करणार असाल आणि मग परमेश्वराला तुम्ही दुषणं द्याल, तर परमेश्वराने तरी काय करायचं? मग त्यांना सगळ्यांना बसवून, त्यांना पार केलं. त्यांच्या तब्येती ठीक केल्या. जवळजवळ तीन तास घालवले. म्हणजे त्या केरोबाचा केर काढता काढता माझी अशी स्थिती झाली. आता तुम्ही शोधून सगळे असेच आणणार. आमचे गुरू! काय केलं तुमच्या गुरूंनी तुमच्यासाठी? विचार करायची पहिली गोष्ट. काही नाही माताजी. मग? म्हणे आम्ही गुरूभक्ती करतो. असं कां? सद्गुरू पाहिजे. सद्गुरू आहेत का? सद्गुरू पैसा घेणार नाहीत. तुमच्याकडे जेवणारसुद्धा नाहीत आणि जेवतील तर त्याचे पैसे देतील. तुम्ही त्यांना एक वस्तू दिली तर दहा वस्तू तुम्हाला परत करतील. ते सद्गुरू ! पैसे खातात ते गुरू नाहीत. इथे दोन पैसे ठेवा, ठेवले, चार पैसे ठेवा, ठेवले. इथे डोकं ठेवा, झालं. अहो, हे डोकं परमेश्वराने बनवलं आहे. हे डोकं काही असं तसं आहे का तुमचं? अहो, ह्या ০
योगभूमीत जन्माला आलात. हे डोकं सगळ्यांच्या समोर झुकवायला तुम्ही आहात तरी काय? अहो, जनावरं झुकवत नाही. तुम्ही कशाला सगळ्यांच्या समोर झुकवता? त्याने काय मिळणार आहे तुम्हाला? माझ्याही पायावर येऊ नका, कृपा करून. मला त्याचा त्रासच होतो. काही फायदा होत नाही. जर तुम्ही पार नाही झालेले. तुम्हाला जर आत्मसाक्षात्कार झाला नाही, तर माझ्या पायात आणि तुमच्या पायात काही फरक नाही. हां, आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे. आत्मसाक्षात्कार म्हणजे सगळ्यांच्यामध्ये परमेश्वराच्या प्रतिबिंबाचा जो भाग आहे, तो आत्मा आहे. आपलं जे प्रतिबिंब परमेश्वराच्या हृदयावर पडलेलं आहे, तो आत्मा आहे. आणि तो आत्मा मिळविण्यासाठी आपल्यामध्ये कुंडलिनीची व्यवस्था परमेश्वरानेच करून ठेवली आहे, आपण नाही केलेली. ती जर जागृत झाली, सहज भावाने, तर त्या आत्म्याचा आणि कुंडलिनीचा जेव्हा योग घडतो, तो खरा योग आहे. बाकी हुंदडत रहायचं, कपडे उतरवून फिरत रहायचं किंवा आणखीन काय, उपवास करायचा. आणखीन नुसतं बडबड, जप जप करत जायचं. हे काही परमेश्वरी कार्य नाहीये. विड्या प्यायच्या आणि जेव्हा विड्या नाही प्यायच्या तेव्हा राम राम करत रहायचं. रोजच बघतो असे लोक. मीच सांगते अशातली गोष्ट नाही. पण तरीसुद्धा आपण हे बघून, समजून, उमजूनसुद्धा तसेच वागतो. पण त्याच्या उलट दुर्दशा सुरू झालेली आहे. जी आपली तरूण मंडळी आहेत ते म्हणतात की काहीतरी थोतांड दिसतंय. काही खरं नाही. सोडा. आपण आपले कम्युनिस्ट होऊयात. असं अल्जेरियाला झालं, तर ५०० - ६०० मुलांनी कम्युनिस्ट होण्याची प्रतिज्ञा केली होती. त्यातला एक. पण ते कुशाग्र बुद्धीचे लोक आहेत. भयंकर कुशाग्र. मुसलमान असले तरी. फार कुशाग्र आहेत. एक मुलगा एरोनॉटिकल इंजिनियर, जमैल म्हणून, आला लंडनला आणि पार झाला. त्याने सांगितलं, थांबा, थांबा, परमेश्वर आहे. त्या चैतन्याच्या लहरी तुम्हाला हातात लागतात. त्याला आपण विद् म्हणतो. तुमच्या हातात, तुमच्या मज्जातंतूवरती आहेत. त्याचा परिणाम आत्म्याचा आणि तुमच्या हातात लागला पाहिजे. ज्याने वेद शब्द निघाला तो विद् आहे. वेदात पहिलाच श्लोक आहे, जर तुम्हाला विदु झालं नाही तर वेदाचा काही उपयोग नाही. म्हणजे ते वेदांच पाठांतर, अर्थ नाहीये त्याला. म्हणजे नुसते शिकलेलेच लोक पार होणार आहेत का ? जे वाचू नाही शकत ते गेले वाटतं. आपल्या देशात शिकलेलेच नाहीत लोक. हे विद् झालं पाहिजे. आपल्या सेंट्रल नव्व्हस सिस्टीमवर, आता मज्जातंतूंवर कळलं पाहिजे. बाकी बाबतीत आपण मॉडर्न आहोत, पण धर्माच्या बाबतीत अत्यंत मागासलेले आहोत. आजपर्यंत जी आपली उन्नती झाली. जी प्रगती झाली. जे आपण मानवस्थितीत आलो आहोत, ते सगळं काही आपल्या नसांवर आहे. आता एखाद्या माणसाला सांगितलं , की तू ह्या घाणेरड्या गलर्लीतून जा. तर तो नाक बंद करेल . नाशिकमध्ये तसं काही दिसत नाही. इथे लोक चांगले व्यवस्थित चालतात. पण तरीसुद्धा. बहुतेक घाण वाटते. पण जर एखाद्या गाढवाला सांगितलं किंवा कुत्र्याला सांगितलं तर तो व्यवस्थित जातो. तसंच आत्मसाक्षात्कारानंतर होतं, की मनुष्यामध्ये धर्म असा जागृत होतो, की तो पापाकडून जातच नाही. त्याला इच्छाच होत नाही. रामाला सांगावं लागलं होतं का, की तू पाप करू नकोस? महात्मा गांधींना सांगावं लागलं की तुम्ही इमानदारी ठेवा पैशांच्या बाबतीत ? ख्रिस्ताला सांगावे लागले का, की तू बायकांच्याकडे बघू का, नकोस? धर्मच त्यांच्यात जागृत झाला. त्यांच्या जागृत झालेल्या धर्मामुळेच ते स्वत:चेच गुरू झाले. ज्ञानेश्वरांना
काही सांगावं लागत होतं का, की तुम्ही वाईट मार्गाला जाऊ नका वगैरे? ती मंडळी कशी सुरभित होती ? त्यांच्यामधून हे गुण कुठून आले? हा पण विचार केला पाहिजे. हे गुण येण्याचं कारण त्यांच्यामध्ये आत्म्याचा प्रकाश होता. एकदा का आत्म्याचा प्रकाश आला तर मनुष्याला सर्वकाही समजतं आणि दिसतं आणि तो सन्मार्गानेच चालतो. जेवढे काही वाईट मार्ग आहेत ते सुटून जातात. साधु-संतांनी हे सांगितलं आणि त्यांनी हे सांगितलं की बाबारे, तोपर्यंत तू नाव घेत रहा. तोपर्यंत तू नाव घे म्हणजे तुझ्या लक्षात राहील, की परमेश्वर आहे. त्यांना भीतीच होती. पण त्याच उलट झालं. त्यांनी नाव घ्यायला सांगितलं तर, 'नाव घे म्हणतोस का? मग चोवीस तास मी नावच घेत रहाणार.' मग जर परमेश्वर दत्त म्हणून उभा राहिला तरी मी त्याचं नावच घेत रहाणार. त्यालाही ओळखणार नाही. तुलसीदासांनी वर्णन केलं आहे स्वत:च की, 'चित्रकूट के घाट पर, भरी संतं की भीड।' चित्रकूटच्या घाटावरती संतं की भीड झाली. संत आले पुष्कळ. 'तुलसीदास चंदन घिसे, तिलक करत रघूवीर।' रघूवीर आणि तिलक. पण मी ओळखलं नाही. त्यांच्या प्रोग्रॅमला म्हणे, साक्षात् असा हुनुमान येऊन बसला असतांना 'मी ओळखलं नाही.' सूरदासांनी सबंध सूरसागर लिहिला. लिहून झाल्यावर असं म्हटलं आहे नम्रपणाने, 'सूरदास की सभी अविद्या दूर करो नंदलाल।' ह्याच्या आधीची जेवढी काही विद्या आहे ती अविद्या आहे. विद्या जेव्हा आमचं आत्मसाक्षात्काराचं स्वरूप येईल तेव्हा जी ही सर्वव्यापी शक्ती चैतन्य जी आहे, ब्रह्मशक्ती जी आहे, तिला मी जेव्हा जाणेन, चैतन्याच्या लहरींनी, तेव्हा जी शक्ती आमच्यामध्ये येईल, ती खरी ब्रह्मशक्ती आणि त्या ब्रह्मशक्तीला धरून, त्याची विद्या धरून तिचं कार्य बघून ती कशी कार्यप्रवण आहे, तिच्यामध्ये कशी ऋतंभरा प्रज्ञा आहे, हे सगळं काही जाणून त्याच्यावर आम्ही जेव्हा मात करू, तेव्हा आम्ही खरे गुरू. ते गेलं एकीकडे. कसला तरी पलायनवाद घेऊन बसायचा. हा बुद्धीवाद्यांचा एक प्रकार झाला. आपल्या हिंदुस्थानातील बुद्धिवाद्यांचा प्रकार मला समजत नाही. अहो, केवढा मोठा वारसा आहे तुमच्याकडे. साऱ्या जगाला झुकवाल अशी मोठी किमया ह्या देशाची आहे. काय तुम्ही घेऊन बसलात? मला समजत नाही. कोणत्या गोष्टीचं भांडण घेऊन बसलात तुम्ही माझ्याशी ? त्यांच्याजवळ जेवढं ज्ञान आहे, ते फक्त झाडाचं झाडं ज्ञान आहे. त्यांचं झाड एवढ वाढवून घेतलं आहे त्यांनी, की आता कोलमडायला लागलं आहे आणि आपल्याकडे जे ज्ञान आहे, ते मुळाचं ज्ञान आहे, पण आपण वाढवून नाही घेतलेलं . ते वाढवून घ्या. म्हणजे सबंधच्या सबंध झाडंही पोसाल, आणि त्या झाडाला तुमची किंमत येईल. पण आपण आपल्याला अतिशहाणे समजतो. त्याच्यामुळे आपले बैल रिकामे आहेत. धर्माची आणि क्षेमाची सांगड बसत नाही. म्हणजे काय आहे, कुठेतरी चुकलेलं आहे, असच म्हटलं पाहिजे की नाही. सांगड का बसत नाही, जर आपण धार्मिक आहोत, तर आपल्यात संतोष मुळीच नाही. का नाही ? कुणाचं कसं वाईट करायचं. कोणाचे गळे कसे कापायचे, ते हिन्दुस्थानात येऊन शिकावं लोकांनी. ही आपली प्रसिद्धी बाहेरच्या देशात आहे आणि आपण अत्यंत शहाणे बनून बसलो आहे. लबाड आहोत आपण. हे समजलं पाहिजे. ही लबाडी विकत घेऊन आली? कारण आपण परमेश्वरालासुद्धा कुठून बसलेलो आहोत. आपल्याला असं वाटतं , परमेश्वरसुद्धा आपल्या हातात आहे, काय म्हणू ते द्यायला. तुम्हाला परमेश्वराला ओळखायला पाहिजे. परमेश्वर आहे तितका सोज्वळ आहे, पण तितकाच भयंकर
पण आहे. एकदा जर का तो तापला, तर त्याला थांबवू शकत नाही. म्हणजे आपल्यामध्ये आत्मा मिळवला पाहिजे. त्याला तुम्हाला काही करायचं नाही. काही मोजायचं नाही. काही मेहनत नाही. काही उपवास नाही. फक्त शुद्ध मनाने हे स्वीकारावं. आणि हे पसायदान आहे आणि हे घ्यावं आणि हे घेतल्यानंतर त्यांनी जे काही वर्णन केलेले आहे, ते तुम्ही होता की नाही हे बघावं. 'कल्पतरूंचे आरव।.... बोलते पियूषांचे आर्णव। ' ते तुम्ही होता की नाही ते बघा. सहजयोग्याचं सगळ्यात मोठे म्हणजे हे आहे, की आत्तापर्यंत जे काही धर्माबद्दल लोक बोलले आणि केले त्याची प्रचिती नव्हती. आज सहजयोगामध्ये प्रत्येक गोष्टीची प्रचिती आहे. त्याचे फायदे साक्षात् होतात. आमच्या नगर जिल्ह्यामध्ये लोक मला रोकडामाई म्हणतात, रोकडामाई की आज तुम्ही पार झाले, उद्या नोकरी मिळाली. परवा पैसे मिळाले. नंतर बरा झालो. तेरवा हे झालं. रोजचं त्यांचं एक एक येतच. म्हटलं लिहन ठेवा हे सगळं. कारण मला वाचायला फुरसत नाही आणि ऐकायलाही फुरसत नाही. पुस्तकं लिहून ठेवा. ग्रंथच्या ग्रंथ लिहावे अशी स्थिती आहे. म्हणजे कारय होतं ? कसं होतं ? ते समजवून सांगा. थोड समजून घ्या. कोणत्या गोष्टीवर परिणाम आला. कारणं असतील. कारणामुळे परिणाम , परिणामांकडे आपण लक्ष दिले म्हणजे आपण कारणाशी झुंजतो. कारण आणि परिणामामध्ये आपण झुंजत रहातो. असं वाटतं, की कारण जर आपण ठीक केलं तर ठीक होईल. परिणाम जर ठीक केला तर ठीक होईल. कारण आणि परिणाम हे एकाच नाण्याचे दोन भाग आहेत. त्याला तुम्ही, एकाला बांधून दुसऱ्याला ठीक करू शकत नाही. मग इलाज काय आहे ? कारणांच्या पलीकडे गेले पाहिजे. कसे जाणार? कारणांच्या पलीकडे गेल्याबरोबर कारण नष्ट पावणार आणि परिणामसुद्धा. पण कसे जायचे ? तुमची कुंडलिनी तुम्हाला घेऊन जाणार. कारणांच्या पलीकडे आत्मा आहे.