Public Program 1984-03-05
5 मार्च 1984
Public Program
Kolhapur (India)
Talk Language: Marathi | Transcript (Marathi) - VERIFIED
Public Program. Sadoli in the Kolapur area of Maharashtra (India). 5 March 1984.
(Dots indicate that the content is unclear)
सहजयोगी १ :
साडोलीच्या भूमीमध्ये आज हा अभूतपूर्व योगायोग आहे. महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली असे त्रिगुणात्मक कुंडलिनीचा अवतार माताजी आज तुम्हाला पावन करण्यासाठी आल्या आहेत. नवीन पर्व आले. नवीन विचार आले. भारत वर्षामध्ये, भारत देशामध्ये फार मोठी योग भूमी समजली जाणारी. फार मोठे योगी होऊन गेले. फार मोठे तपस्वी होऊन गेले. विश्वामित्रासारखा, राम जन्माच्या अगोदर रामायण लिहिणारा, महर्षी भूमी आहे. तरीसुद्धा हा जो माताजींचा सहज योग आहे, हा या जगामध्ये पहिलेच काम आहे कारण मला असं वाटतं लोकांनी भक्ती केली, जप केलं, ग्रंथ वाचले, पारायणं केली. सगळा देश तूडविला. हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत, रामेश्वरापर्यंत पदयात्रा काढली. तरी सुद्धा त्यांना दैवी शक्तीबद्दल जितकं समाधान मानायला पाहिजे होतं ते मिळालं नाही आणि त्याच गोष्टींचा मी सुद्धा ...........................पण गगनगिरीनी सांगितलं......नाही. योगी नाही व्हायचं. संसार करून परमार्थ करायचा. राम राम करत रहा. ठीक आहे. श्रद्धा, नम्रता अशा जोडीला, अशा तऱ्हेचा जोडीला विचार घेऊन मी जवळ-जवळ १७ वर्ष गगनगिरीनी सांगितलं ते केलं. अनेकदा प्रत्यय आला की माझी तळमळ होती ती काही नाही.......... ही तळमळ माझ्या अंतकरणात होती जी समाधान देऊ शकत नाही. परमार्थाच्या विचाराला, हृदयाला समाधान मिळायला पाहिजे. दैवी शक्तीने जे समाधान मिळायला पाहिजे ते मिळत नव्हतं. तरीसुद्धा माझं भाग्य समजतो मी की मागील वर्षी ८३ च्या १ जानेवारीला १ तारखेला माझ्या १७ वर्षाच्या तपश्चर्येच्या फळाला फळ आलं आणि त्यादिवशी माताजींची आणि माझी गाठ पडून मी पार झालो. कुंडलिनी शक्ती जागृतीचा प्रयोग आणि पार झाल्यानंतर, समाधान झाल्यावर माताजींकडे मी गेलो. माताजींकडे बघितलं. माताजी मला बोलायचं आहे मी बोललो. ठीक आहे. ही वेळ नाही बोलायची. तुम्हाला जे काही बोलायचं ते कोल्हापूर सेंटर आहे. केंद्रावर यायचं आणि काही विचारायचं ते विचारा. आणि एवढं समाधान वाटलं. या सहजयोगाच्या पार होण्यानं आणि कुंडलिनी जागृतीने जे काही अपूर्व आहे, त्याचा लाभ आज तुम्हाला सहजासहजी होत आहे. माझ्यापेक्षा तुम्ही खरोखरच भाग्यवान. मी १७ वर्षे गुरुछत्राचे पारायण केल्यानंतर मला वाटलं की श्री माताजींनी मला पार केलं पण आज तुम्हाला ठावे असेल, काही असेल म्हणजे वारकरी असतो.................................... चालवत असतो. पण माताजींचं कार्य असं आहे की ज्ञानेश्वरांनी भगवद्गीता काही ठराविक ब्राह्मणांच्या माणसांनाच ती वाचता येत होती असं आताच्या ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा मराठीत करून गोरगरीबापर्यंत त्या ज्ञानेश्वरीचा रस ठेवला. ज्ञानेश्वरीचं ज्ञान गोरगरीबाच्या झोपडीपर्यंत पोहोचलं. पण ज्ञानेश्वरा नंतर सहजयोगाच्या योगानं जो माताजींनी जगातला पहिला प्रयोग ही कुंडलिनी शक्ती हजारो माणसांची एका वेळेला त्यांनी पार केली. हजारो माणसांना एका वेळेला पार करण्याचा जगातला एकमेव पहिला प्रयोग. त्यांचं काम, त्यांचा प्रामाण्य. काही लोकांचं प्रमाण नसतं. अप्रमाणित गोष्टी असतात आणि तो आज न्याय तुम्हाला मिळालाय. अन्याय.............. आज पावन झाली असावी सडोली. माझ्यासारखा............ हे असच समजणार की माताजींच्या चरणाखाली सडोल्यातली भूमी पावन झाली. यापलीकडे काय सुख आहे ? यापलीकडे काही नाही. ते सुख आज तुम्हाला मिळणार आहे आणि या सडोलीच्या भूमीत आज मी माताजींच्या कडे एवढीच विनंती करतो की तुम्ही आज हे..........तुम्ही जागृती करणार आणि जागृती करून सडोलीला सहजयोगाचं मोठं सेंटर निर्माण होऊन हजारो माणसं सहजयोगातून पार होऊन सहजयोगाच्या जागृतीचा, कुंडलिनीचा आनंद मिळवून द्यावा अशी एवढी त्यांना विनंती करून मी माझं भाषण संपवतो.
सहजयोगी २ :
तू संसार संतांची सावली, अनाथ जीवांची माऊली ||
आमच्या चीर प्रसंगी, तुझीच कृपा ||
या संत ज्ञानदेवांच्या वचनाप्रमाणे परम पूज्य श्री निर्मला माताजी यांच्या चरणी शतशः वंदन करून आजच्या कार्यक्रमाच्या माझ्या प्रस्ताविक भाषणाला मी सुरुवात करत आहे. कार्यक्रम मुळातच जास्त वेळा जवळ आलेला आहे. त्यामुळे माझं प्रास्ताविक भाषण जास्त लांबवता पुढचा कार्यक्रम पुढील कार्यक्रम योग्य रीतीने चालू व्हावा म्हणून या कार्यक्रमाच्या नियोजना पाठीमागे जे उदात्त आणि पवित्र आणि मंगल हेतू होता आज ते तुमच्या सर्व श्रोत्यांसमोर येण्याची संख्या पाहून आम्हाला धन्य वाटत आहे की आमच्या कार्यक्रमाचा मंगल आणि पवित्र उद्देश होता, सहजयोगाचा उद्देश, सहजयोगाचं कार्य आणि सहजयोगाचं फल हे प्रत्येकाच्या अंतःकरणापर्यन्त जाऊन भिडायला हवं. त्याप्रमाणे महाराष्ट्रीय परंपरेमध्ये संत तुकारामांसारख्या एखाद्या संतांनी आपल्या एका एका अक्षरांमध्ये रमाकांत भरवलेला होता. त्याच प्रमाणं सहजयोगाच्या या माध्यमातून सौंदर्य लहरींचा, चैतन्य लहरींचा, स्वात्मसुखाचा, स्वानंद अनुभवाचा आणि सच्चीदानंदाच्या कंदातील जी काही नित्य आणि नित्य अशी शांतता आहे, या शांततेचा अनुभव आपल्या ग्रामीण विभागातील सर्व मंडळींना यावा ही आमची एकच इच्छा होती. मी १९८३ मध्ये परमपूज्य माताजींचा अर्थात मुंबईमध्ये एक कार्यक्रम साने गुरुजी सभागृहामध्ये माताजींचा आम्ही एक कार्यक्रम ऐकला आणि हा कार्यक्रम ऐकल्यानंतर त्याच वेळी परमपूज्य माताजीना मी अशी विनंती केली की आमच्या आमचा एक कार्यक्रम तुम्ही घ्यावा आणि योगायोगाने मागच्या काही दिवसापूर्वी माताजी कोल्हापुरात येऊन गेल्या. त्या वेळेला या वेळेची तारीख आम्हाला मिळाली. सहजयोगा संबंधी अनेक विपर्यास, सहजयोगा संबंधी अनेक भ्रमिष्ट कल्पना जरी तुम्हाला दिसत असल्या तरी शोधा म्हणजे सापडेल ही एक मराठीत म्हण आहे.ज्या वेळेला आपण अनुभव घेऊ त्या वेळेला आपणाला समजू शकेल या सहजयोगा मध्ये जास्त काही नाही, परंतु फक्त पाच महिने आम्ही आहो आणि या पाच महिन्यांमध्येच शब्दज्ञानाच्या फुटपट्टीने, अध्यात्मज्ञानाला आणि कुंडलिनी शक्तीला मापणाऱ्या विद्वानांची मते किती तोकडी असतात याचा आम्हाला प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे. तुम्हाला सांगतो ग्वालनानगर मध्ये एक विद्वान आहेत, सु. श. शिरोडकर आणि या शिरोडकरांनी आपला फोटो आणि आज सकाळ ला जाहीर आव्हान केलं होतं की चैतन्य लहरींचा अनुभव किती लोकांना येत असावा? त्याच वेळेस आमचे भोगावती महाविद्यालयाचे एक प्राध्यापक आहेत. प्राध्यापकांचे नाव आहे प्राध्यापक ए. के. देशपांडे. त्या देशपांडे यांनी प्रत्यक्ष ताराराणी विद्यापीठात परमपूज्य माताजींच्या कार्यक्रमाचा सर्वे किंवा त्या ठिकाणचे निरीक्षण केल्यानंतर त्यांनी मला प्रत्यक्ष सांगितलं. शेकडा ४८ टक्के मंडळींना सौंदर्यलहरीचा अनुभव आलेला आहे. प्राध्यापकांना मी हेच सांगितलं शेकडा ५० टक्के मंडळी या समाजात अजूनही अशा आहेत की ज्यांच्याकडे श्रद्धा नावाची सरिता अजून त्यांच्या अंतकरणात मध्ये निर्माण झालेली नाही.
श्रद्धा लागी सरिता, जशी चढू लागे पांडू सुता ||
तशी नीत नवी भजीता सकळांसी ||
मंडळींनो, माताजीना तुमच्या अंतःकरणात ज्या शंका असतील त्या तुम्ही अवश्य विचारा, पण कुशंका विचारू नका. शंकेच्या पाठीमागं तुमची श्रद्धाच आली. कुशंकेच्या पाठीमागे तुमची .........असावी. आता पार होण्याचा कार्यक्रम चालू झाल्यानंतर माताजी सांगतील गळ्यामध्ये जे काही काळं असेल ते काढून टाका, त्यावेळेला मंगळसूत्र काढून टाकायचं काय हा प्रश्न जर तुम्ही एखाद्याने विचारला तर कुशंका होईल. ती शंका होणार नाही. तुमच्या अंतःकरणामध्ये ज्या रास्त शंका असतील, सहजयोगासंबंधी तुम्हाला जे काय विचारायचे असेल, ते थोडक्या शब्दांमध्ये माताजीना तुम्ही विचारू शकता आणि यथार्थ आणि योग्य प्रकारे माताजी त्यांचं समाधान करून देतील. असो. माझं प्रास्ताविक भाषण जास्त न लांबवता आमच्या सहजयोगी बांधवांच्या अनाथ जीवांची माऊली, परम पूज्य माताजी श्री भगवती या ठिकाणी आलेल्या आहेत आणि तुम्ही सर्व श्रोतेजन या ठिकाणी प्रचंड संख्येने उपस्थित झालेले आहात. तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करून मी माझं प्रास्ताविक भाषण संपवतो. जय माताजी.
श्री माताजी :
साडोलीच्या व त्याच्या आसपास असणाऱ्या भोगावती नदीच्या तीरावर राहणाऱ्या सर्व भाविक, सात्विक, सदाचारी साधकांना आमचा प्रणिपात. आपण इतक्या उत्साहाने आणि प्रेमाने आमचं स्वागत केलं हे पाहून आईच्या हृदयाला काय होतं की डोळे भरून येतात. काय बोलावं ते समजत नाही. प्रेमाला काही उत्तर नसतं. प्रेमाला काही भाषा राहत नाही आणि फक्त भक्तीचा ओलावा. त्याच्यावर बहरलेलं हे तुमचं भोगावतीचे वातावरण. ते बघून असं वाटलं की आज काही सर्व तारांगण लुप्त होऊन तुमच्यामध्ये सामावले आहे. अशा गोष्टी ज्या सहजयोगाबद्दल लोक बोलतात त्याचं मला आश्चर्य वाटत नाही. त्यात आश्चर्य करण्यासारखं काय ? लोक आंधळे आहेत. जगामध्ये अंधार आहे म्हणूनच तर आम्हाला यावं लागलं. अंधारात चाचपडणारे कुठे आदळतील, कुठे आपटतील आणि कुठे ओरडतील. तुम्ही ज्या काळी, अनंत काळापासनं म्हटलं तरी चालेल, संत साधूंना किती त्रास दिला आपण ? त्यांचा किती छळ केला ? कोणी ओळखलं का की हे संत साधू आहेत बोवा? कमीत कमी त्यांचा छळ थांबवता येत नसला तर निदान त्यांचा पाठिंबा तरी दिला पाहिजे. पण नाही. त्या वेळेला आपल्याला ओळखच नव्हती त्यांची किंवा आपल्या मध्ये एवढी हिंमत नव्हती. आपण एवढे समर्थ नव्हतो की त्यांची मदत करावी. असे अनेक साधु-संत या महाराष्ट्राच्या भूमीवर सुद्धा झाले आहेत. ही योगभूमी आहे. पण योगभूमी पेक्षा ही संत भूमी आहे. ह्या भूमीशिवाय सबंध आपल्या भारताला सुद्धा काही अर्थ राहत नाही. तेव्हा ही महान भूमी, जी महाराष्ट्राची आहे, जिथे शिवाजीसारखे मोठमोठाले वीर झाले, ते देवीतूनच. हे सगळं मानत असताना सुद्धा त्याच ठिकाणी परदेशी शासनाखाली वाढलेले, त्यांच्या विज्ञानात वाढलेले लोक आता जर माझ्या विरोधात उभे झाले तर मला त्याचं मुळीच आश्चर्य वाटत नाही. कारण ही सगळी पोट भरून व्यवस्था आहे. त्यांचा पोट ह्यानंच भरतं तर ते तरी काय करणार? माताजी रोग बरे करतात. तर त्यांच्या पोटावर पाय येतो. पण बाबा, मी काय तुमचे पेशंट घ्यायला तयार नाही. तुमच्याकडे श्रीमंत लोक आहेत ना. त्यांना तुम्ही बघा. मी तर गोरगरिबांसाठी आहे. माझं लक्ष श्रीमंतांकडे नाही. त्यांचे पैसे तुम्ही घ्या. त्यांच्यावर तुमचं चालवा. तुमचा उदरनिर्वाह त्यांच्यावर चालू शकतो. गोरगरिबांना कोण पाहणार आताशी ? त्यांच्यासाठी आम्हाला मेहनत करू द्या. त्यांची मेहनत, त्यांचा कळवळा आम्हाला आहे. कारण श्रद्धाही गोरगरिबांना मध्ये असते. श्रद्धा ही सामान्य जनतेत असते. जे असामान्य आहे ते सामान्यातच आहे. असामान्यांमध्ये तुम्हाला असा मान्य मिळणार नाही जे स्वतःला फार समजतात. आपल्याला मोठमोठाले पदवीधर समजतात, यशस्वी लोक समजतात , त्यांच्यामध्ये हृदयच नसतं, त्यांच्यात काय शोधायला जायचं आणि त्यांना काय द्यायचं ? ज्यांच्याजवळ हृदयच नाही त्यांच्याशी बोलायचं काय? तेव्हा ह्या माझ्या महाराष्ट्रात खेडोपाडी, ग्रामीण स्थितीत आम्ही तिथेच आहोत. अशा ठिकाणी वास्तव्य तरी करून काय फायदा ज्या ठिकाणी लोकांच्याजवळ हृदय नाही. पण इतका असून सुद्धा आजपर्यंत तुम्ही लोकांनी ही श्रद्धा टिकवून ठेवली आहे. जे साधुसंतांनी सांगितलं ते मानून त्याप्रमाणे तुम्ही त्या श्रद्धेत राहिलात आणि कितीही विपत्ती आली, कितीही गरिबी आली, कितीही त्रास झाला तरीही धर्माला जागून राहिलेले आहेत. आणि त्याशिवाय परमेश्वराची नेहमी आठवण ठेवलीत त्याचा आशीर्वादच तुम्हाला द्यायचा आहे. ज्या लोकांनी फार कमावलं, ते वाईट मार्गाला लागले. दुष्ट मार्गाला लागले. परमेश्वराला विसरले. आणखीन वाह्यात गोष्टी बोलू लागले. ज्यांना विज्ञान मिळालं ते तर म्हणतात की परमेश्वर नाहीच. अरे बाबा तू स्वतःला बनवू शकतोस का ? एका फुलातनं तरी तुम्ही फळ करू शकता का ? कशाला अशा मोठ्या गमजा मारायच्या आहेत ? परमेश्वर नाही म्हणजे आहे तरी काय बाकी परमेश्वराशीवाय ? पण अशा रीतीच्या बडेजावीच्या गोष्टी हे लोक करू लागलेत. तरी एका आईने काय करावं? नुसतं हसावं ? त्यापलीकडे मला काहीच सुचत नाही. लहान मुलासारखं कुणी बोलावं ? पण ही आंधळी आहेत मुलं. तेव्हा त्यांची क्षमा केली पाहिजे. पण तुम्ही मात्र शहाणे आहात. खेडेगावात राहता म्हणून शहाणपण वाचलेलं आहे. जर शहरात राहिले असते तर अर्धेअधिक आत्ताच मूर्खात निघाले असते. माझा तरी हाच अनुभव आहे की शहरातली माणसं म्हणजे आता अगदी पागलखान्याला जाण्याच्या योग्य झालेले आहेत. तुम्ही लोक शांतपणाने येथे राहता. जसं काही असेल ‘ जैसे राखवू तैंसे ही ’ . जे काही परमेश्वराने दिलं, त्याच्यात संतोष मानून तुम्ही राहता. श्रद्धेने एक दिवस परमेश्वर भेटतो ह्याच इच्छेने तुम्ही राहता. ही फार मोठी गोष्ट आहे. गगनगडानी मला सांगितलं होतं की माताजी तुम्ही कोल्हापुरच्या ग्रामीण भागामध्ये जेव्हा याल तेव्हा इथली श्रद्धा तुम्हाला जाणवेल आणि माझा असा फार विचार होता की इथल्या ग्रामीण भागामध्येच हा प्रोग्राम झालेला बरा आणि आज आमच्या पाटील साहेबांच्या मेहेरबानीने हा कार्यक्रम घडला ही फार फार अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी. असो. आपल्यामध्ये परमेश्वराने ज्या शक्त्या दिलेल्या आहेत त्याच्याबद्दल तुम्ही विज्ञानाने कसे जाणू शकाल ? कारण विज्ञान ही एकच शक्ती आहे आणि ती शक्ती म्हणजे फक्त ज्याला आपण महासरस्वतीची शक्ती म्हणतो. त्या शक्तीने तुम्ही तिन्ही शक्त्या कशा जाणू शकाल ? आणि त्याही तिन्ही शक्ती जेव्हा एकत्र होतात तेव्हा आदिशक्तीची शक्ती तुम्ही कशी जाणू शकाल ? तेव्हा ही शक्ती जाण्यासाठी आपल्यामध्ये परमेश्वराने काही व्यवस्था केली असली, समजा जर अशी व्यवस्था असली तर कोणीही शास्त्रीय मनुष्याने असा म्हणणं की हे सर्व खोटे आहे हे म्हणजे तो मनुष्य शास्त्रीय नाही. शास्त्रात सुद्धा आहे, जे वैज्ञानिक आहे त्यांना माहिती आहे की आज एक कोणचातरी विचार येतो, उद्या तो बदलला जातो, मग दुसरा येतो, मग तिसरा येतो, मग चौथा येतो. पण तसं मात्र परमेश्वराचं नाही. त्यांचा जो विचार आहे कोणत्याही साधुसंताचा विचार एक विरोध एका विरोधात दुसरा बसणार नाही. पण ते सगळे साधुसंत असावेत. जर तुम्ही अगुरू असले, पोटभरू असले, तर त्या उलट्या गोष्टी सांगतील. पण सगळ्यांचा विचार एकच असतो. सगळ्यांचं म्हणणं एकच असतं की तुम्ही परमेश्वराला स्मरा. तुम्ही आधी आपल्या आत्म्याचे ज्ञान जाणुन घ्या. त्याच्या मध्ये त्यांचे शिष्यगण म्हणा किंवा संप्रदाय वगैरे तयार झालेत. त्याच्यामध्ये घोटाळे होतात. म्हणजे आता जर त्यांनी सांगितलं की तुम्ही विठ्ठलाला स्मरण ठेवा तर लागले आपण विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल सुरू झालं. ठीक आहे. ही अपराभक्ती म्हणून त्यांनी सांगितलं सांगितली पण ह्यानंतर पराभक्ती पाहिजे. त्यांनी सांगितलं, माताजी मी दत्तात्रेयांचे पारायण, गुरुचरित्र वाचन, पारायण केलं. ठीक आहे ना. काही वाईट नाही केलं. पारायण केलं त्याच्यात काही वाईट नाही. त्यानी शुद्धता राहिली. धर्मावरती विश्वास राहिला. तुमची परीक्षा झाली. आज तुम्ही फार मोठे सहजयोगी झालात. तुमच्यासाठी आम्हाला काही सांगावं लागलं नाही. हे तयार होतं जसं काही. अगदी फळ अगदी म्हणतात ना पिकायला आलं तशी स्थिती. एका मिनिटात पार होऊन ते मला म्हणायला लागले, मला काही बोलायचंय. म्हटलं बोलायचं काय ? त्याच्याबरोबर बोलणं संपलं. कबीरदास म्हणतात ‘ जब मस्त हुये फिर क्या बोले ?’ अरे जर तुम्ही पारच झाले तर आता बोलायचे काय? आता मजा करा म्हटलं. तेव्हा जेंव्हा तुम्ही फळालात, फळाला यायच्या ऐवजी जर तुम्ही आधीच वादावादी घातली, भांडाभांडी केली, तर शब्दजाळात फसून राहाल. शब्दजाळामध्ये फसलेले लोक कधीही बाहेर निघू शकत नाही असे आधीच शंकराचार्यान्नी स्वतः सांगितले आहे. त्यांना स्वतःचाच अनुभव होता. सुरुवातीला त्यांनी ‘ विवेकचूडामणि ’ म्हणून एक फार विद्वान असा लेख लिहिला आहे. लेख म्हणण्यापेक्षा पुस्तकच लिहिले आहे आणि त्याच्यात सबंध मीमांसा केली आहे आणि सगळे ताडले की याचं असं, त्याचं तसं, त्याचं तसं. ते शास्त्र असं, ते शास्त्र असं. सगळं विवेचन केलं. त्यानंतर त्यांच्या पाठीला हेच लागले. त्यावेळचे जे शब्द पांडित्य घेऊन लोक होते. पढतमूर्ख ज्याला म्हणतात. ते पढतमूर्ख लागले त्यांच्या डोक्याला आणि म्हणायला लागले, अरे हे सगळं तुम्ही काय लिहिता? ह्याला काय अर्थ आहे ? हे आम्हाला सिद्ध करून दाखवा. ते म्हणाले, सोडा या लोकांना. शेवटी त्यांनी एकच पुस्तक लिहिलं ‘ सौंदर्य लहरी ’. त्यात फक्त आपल्या आईचं वर्णन म्हणजे आदिशक्तीचा वर्णन लिहून टाकलं. नखशिखान्त वर्णन. एखाद्या लहान मुलाने आईच करावं इतकं बारीक. कोणचं तेल वापरतात, काय जेवतात, काय खातात, काय आहे सगळं बारीक-सारीक वर्णन लिहून ठेवले आहे. ..... अरे काय करतात तुम्ही ? अहो इथे विवेकचूडामणी सारखा एवढा मोठा विद्वत्तापूर्ण लेख लिहिल्यानंतर आता हे काय तुम्ही नवीन काढलं लहान मुलासारखं आईचं वर्णन ? तेव्हा म्हणे बघा. योग हे असाध्य आहे. या सर्व गोष्टींनी काहीही होणार नाही. आईच्या कृपेशिवाय हे कार्य होत नाही. तेव्हा तिची स्तुती मी करतो. बाकी सगळं काही राहू दे तुमच्या डोक्याला त्रास द्यायला. शब्दजाळात जे लोक फसले ते शब्दजाळातच राहिले शहाणा जो शेतकरी असतो तो झाडावर झाडावरचं फळ काढतो, पानं मोजत बसत नाही. ते काही शहाणपणाचं लक्षण नाही. जर एखादा मनुष्य आपल्या खेड्यात येऊन पानं मोजत बसला तर तुम्ही त्याला वेड्यात काढाल. पण तेच जर तो पुस्तकांची पानं चाळत बसला तर त्याला मात्र आपण वेड्यात काढत नाही. त्याला फार विद्वान समजतो. त्या पानांमध्ये काय ठेवलेलं आहे ? त्याचं फळ काय मिळालं ते पाहायचं. तुमच्या भक्तीला फळ आलं पाहिजे की नाही ? तुम्ही विठ्ठलाला बोलावलं ते कशासाठी ? की त्यांनी यावं म्हणून. त्यांनी आलं पाहिजे की नाही ? मग तुम्ही ओळखणार कसे ? समजा उभे राहिले तुमच्यासमोर. बरं, आम्ही आलो आता. विटेवरही आले तरी तुम्ही ओळखणार कसे ? त्याला काही मार्ग आहे का ओळखण्याचा तुमच्याजवळ ? नाही आहे. मग ओळखायला शिकवलं पाहिजे ना. कसे शिकणार तुम्ही ? स्वयंभू आहे म्हणे देऊळ इथलं ? स्वयंभू देऊळ आहे कशावरून ? खोटं असलं तर ? एखाद्या भामट्याने बांधलं असेल तर ? ते स्वयंभू कशावरून ? हे ओळखणार कसे ? त्याला काही आहे का तुमच्याजवळ माप ? काहीच नाहीये. मी गगनगडांचेच सांगते. ते गडावर बसले होते. मी त्यांना कधीच पाहिलं नव्हतं. त्यांनी माझ्याकडे एक डॉक्टर पाठवले. म्हणे आता साक्षात माताजी आल्यावरती तुम्ही काय माझ्याकडे येता वाराला ? तर त्या मला भेटायला आल्या. तर म्हटलं असं का ? कुठे बसलेत कोल्हापूरला. म्हटलं कोल्हापूरला जाऊ आता त्यांना भेटायला. तर आम्ही निघालो त्यांना भेटायला. आमच्याबरोबर आणखी शिष्य लोक होते आमचे सहजयोगी. पक्के पोचलेले होते म्हणा सगळे. म्हणाले माताजी तुम्ही कोणत्याच गुरूंना भेटायला जात नाही. तर मग यांना कशाला भेटायला जाता ? अहो म्हटलं असं नाही. आम्ही सगळ्यांना भेटायला जातो. ही माझी मुलं आहेत ना ? मुलांना नाही भेटायला जायचं तर कोणाला भेटायला जायचं ? तर म्हणे माताजी पण हे गुरु आहेत ? हो म्हटलं. हे सद्गुरु आहेत. पण त्यांनी कोणालाच पार नाही केलेलं ? नसेल पण आहेत सद्गुरु. म्हटलं तुम्ही असं करा की आता तिकडे हात वर करा आधी गगनगडाच्या कडे. ते गडावर बसले होते आणि धोधो धोधो जे हातात त्यांच्या चैतन्याच्या लहरी वाहू लागल्या. म्हटलं चला पुढे आणि आम्ही वर चढून गेलो. ते म्हणे माताजी तुम्ही कसे चढणार ? म्हटलं आमची चिंता नको. आम्ही जाऊ. तुम्ही आपला विचार करा. वरती गेलो तर पाऊस सारखा. गगनगडाचं त्यांनी वर्चस्व मिळवलेलं आहे. प्रभुत्व आहे त्यांचे गडावर की मी पाऊस म्हणेल तेव्हा येईल. नाही म्हणणार तर नाही आणि पाऊस सारखा. त्यांना राग येत होता. पावसाचं. ऐकत का नाही ? सारखे खेळ चाललेले. परंतु आम्ही चढून गेलो तर रागाने नुसते अशे अशे मान करत बसले होते. बोलले नाही माझ्याशी. मी जाऊन पलंगावर बसले. आले. मग पायाला हात लावला. म्हणे आई तुम्ही काय माझ्या अहंकाराला हात घातला का ? पावसाला मला थांबवू नाही दिलं ? म्हटलं काय म्हणता महाराज तुम्ही ? तुम्ही आमचे मुलगे. आम्हाला सगळ्या गोष्टींचा तुमचा अभिमान आहे. असं कसं ? तर म्हटलं तुम्ही माझ्यासाठी एक साडी घेतली आहे ना विकत आणि तुम्ही आहात संन्याशी तर संन्याशी मुलाकडंन मी साडी कशी घेणार ? म्हणून भिजवून घेतलं स्वतःला. झालं. सगळा रुबाब त्यांचा कोसळला. आईचं कार्यच वेगळं असतं. गुरूचं कसं असतं, कडकपणा, शिस्तपणा . म्हणे हे ते. सगळ्यात सगळा राग कोसळून पडला. अरे हो खरंच. म्हटले माताजी कसं कळलं तुम्हाला ? म्हटलं आम्हाला नाही कळणार तुमचं ? मुलांचं नाही करणार तर कोणाला कळणार? का ? त्यावर अगदी शांत झाले आणि दुसरं म्हटलं की आता आम्ही चाललो.
आमच्या अंगावर जर पाण्याच्या सऱ्याच आल्या तर तुमच्या येथे सर्व हिरवगारच नाही का होणार ? तेव्हा मी भिजले तर त्याच्या तुम्हाला एवढा राग का आला ? मी तर भिजतच असते. नेहमी भिजत असते. मला काय त्रास होणार आहे ? एकंदरीत काय की आईचा आणि मुलाचा तो खेळ अगदी पाहिला आणि इतक्या प्रेमाने सगळं काही त्यांनी केलं. विचार केला आणि मग सगळं बोलायला लागले तेव्हा ते म्हणाले होणार कसं ? हे कसं काय होणार ? म्हटलं काही तुम्ही काळजी करू नका. काय होणार आहे ? राक्षस उठलेत म्हणे. इथे कोल्हासुर बसलेला आहे . मला म्हटलं सगळं माहिती आहे. तुम्ही काही काळजी करू नका. सगळ्यात नेस्तनाबूत होतील. तुम्ही त्याची काळजी करू नये. म्हणे मी तर इतक्या वर्षापासून येथे मेहनत करतोय. काय करावं समजत नाही आणि लोक सुद्धा अजून गहनतेला उतरत नाहीत. तर म्हटलं आता असं आहे की त्याची तुम्ही काळजी सोडायची. सहजयोग ह्याच थराला आला ह्याचच मला स्वतःला आश्चर्य वाटतंय. अहो तुम्ही लोक संत साधू आहात. तुम्ही पुण्यवान आत्मे या भारत भूमीत जन्माला आलात त्याहून महाराष्ट्रात जन्माला आलात. या कोल्हापूरच्या, या खास जागेत जिथे की महालक्ष्मीचा राज्य आहे तिथे तुम्ही जन्माला आलात. किती संत तुम्ही? पण हे जे नरकात राहतात हे जे १४ देशातून आले हे अस्सल नरकात राहतात. त्या नरकातून उठून त्यांची कमळ निघाली तर मग म्हटलं हे काय ? हे तर गंगेच्या किनारीचा नुसता चिखलच आहे ना. त्याच्यात तर कमळ निघणारच. म्हटलं हे काय ? हे तर काहीच नाही. हे तर पुण्यवान आत्मे आहेत. थोडा वेळ असं तसं होतं. चलबिचल होते. हे तर कधीच होणार. तुम्ही कसली काळजी करता आणि तेच मला सांगायचंय की सहजयोग हा अशा परीसीमेला पोहोचलेला आहे की हजारो लोक ह्याच्यात पार होतातच. याबद्दल शंकाच नाही कारण कुंडलिनी शक्ती तुमच्यामध्ये आहे. हे जिवंत कार्य आहे. कुंडलिनी शक्ती तुमच्या मध्ये आहे. जसं प्रत्येक बी मध्ये अंकुर असतं. ते तुम्ही मातीच्या उदरात घातलं तर तुम्हाला काय त्याच्यासाठी आटापिटा करावा लागतो ? की काय भजनं म्हणावी लागतात ? की तुम्हाला काही नामस्मरण करावं लागतं ? की पारायण म्हणावी लागतात ? फक्त ते जमिनीत घातलं पाहिजे आणि ती जमीन मिळायला पाहिजे. जमिनीत घातलं म्हणजे बी रुजतं हे तुम्हाला माहीत आहे अगदी सहज. त्याला जे सहज म्हणजे तुमच्या बरोबर जन्मलेले जे आहे ते तुमच्यामध्ये वसलेली ही कुंडलिनी शक्ती तुमच्या त्रिकोणाकार अस्थित आहेच. त्यात आम्हाला काही करायचं नाही. फक्त तिचं जे अंबे उधो उधो आपण म्हणतो तेवढं आम्ही करतो. ती जी अंबा आहे तिचं जागरण. त्याला कारण आम्ही जर आई असलो तशी तुमची पृथ्वी आहे तर झालं. उदरात घेऊन तुमच्या सुद्धा अंबेला आम्ही जागृत करू शकू की नाही ? ते सोपं काम आहे. त्याला काय कठीण काम ? पण ते हजारोंनी लोक होतील त्याला कारण काय ? पेरणीची वेळ आलेली आहे. ही पेरणीची वेळ आहे. इतकेच नव्हे तर विशेष ज्याला आपण म्हणतो की आता पिकाला यायला लागलंय. लोक पिकाला आले याबद्दल शंकाच नाही. इतके लोक पिकाला आलेले आहेत की आश्चर्य वाटतं की ह्या कलियुगामध्ये जिथे की एकीकडे वाट्टेल ते चाललेलं आहे. रव रव नर्क उभा झालेला आहे आणि दुसरीकडे पिकाला आलेले लोक आहेत. आता फक्त कापणी करायची म्हणजे तयार. ही अशी स्थिती असल्यावरती त्या क्षणी पेरणी आणि त्या क्षणी कापणी असं झालंय. अद्भुत कार्य आहे हे. याबद्दल शंका नाही. पण असं म्हणायचं की ज्या परमेश्वराने आपल्याला बनवलंय, ज्यांनी ही सृष्टी बनवलीय, ज्यांनी हे सबंध आपल्याला आशीर्वादित केलेलं आहे आता त्यालाच मुळी गरज पडली आहे की तुम्हाला त्याच्या साम्राज्यात घेऊन गेलंच पाहिजे नाहीतर हे सगळं जे दिसतय नष्ट होऊन जाईल. त्यांनी केलेली सर्व सृष्टी नष्ट होऊन जाईल. आकाश-आभाळ, सगळं विश्व नष्ट होऊन जाईल. कारण तुम्ही त्याच्या करणीतले सगळ्यात उच्चतम असे कार्य आहात आणि तुम्हाला जर त्यांनी आपल्या हृदयाशी लावलं नाही, तर त्यांच्या प्रेमाला अर्थ राहणार नाही. म्हणून आज त्यांनीच हे कार्य उचललं आहे. तेव्हा त्यांच्या प्रेमाचा, दयेचा सागर जो आज वाहतो आहे, त्यात सर्वांनी हात धुऊन घ्यावं आणि उगीचच बेकारच्या गोष्टींमध्ये स्वतःचा वेळ घालवू नये. म्हणा आम्हाला काही हरकत नाही. मला सर्व तऱ्हांच्या मुर्खांची सवय झाली आहे. पढत मुर्खांची तर फारच झाली आहे. कारण मी ज्या ठिकाणी जाते, लंडनमध्ये, तिथले पन्नास पर्सेंट लोक म्हटलं तरी चालेल. पन्नास टक्के लोक हे मूर्ख आहेत. आपल्याला आश्चर्य वाटेल, आपण या मुर्खांच्या राज्यात कसे राहिलो हेच मला समजत नाही. त्यांनी आपल्यावर राज्य तरी कसं केलं हे आता मला समजत नाही. लहानपणी माझे वडील स्वातंत्र्यवीर होते आणि ते या देशासाठी झगडले आणि मीही पुष्कळ सहन केलं. पण आता त्या लोकांना पाहून वाटतं की ह्या मूर्खांनी आपल्यावर राज्य केलं तरी कसं ? अहो महामूर्ख आहेत नुसते. त्यांना आई बहिणी समजत नाही. काही समजत नाही. त्यांच्यापासून काही शिकायचं नाही. आज सकाळी झडकलं सगळ्यांना. म्हटलं, तुम्ही काय बोलता ? तुमच्याजवळ कोणची संस्कृती आहे? कसली संस्कृती? नुसतं युद्धात उतरायचं आणि गॅस चेंबर्स मारायचे. त्याच्या पलीकडे तुमच्याकडे आहे काय ? कशाला गमजा मारता ? सगळ्यांचे गळे कापून आपापसात खाऊन घ्या म्हटलं स्वतःला. दुसरी काही अक्कल आहे का तुम्हाला? कबूल आहे आम्ही भाऊबंदकी केली. आम्ही थोडासा मूर्खपणा केला. पण हा नमुना तुम्ही ऐकला का कुठे ? की लाखो लाख लोक गॅस चेंबर्स मधून मारले. अहो तुम्ही जर त्यांची स्थिती पाहिली, तुम्हाला आश्चर्य वाटेल. इतके भयंकर आणि दुष्ट लोक आहेत की त्या लंडन शहरामध्ये सबंध, इंग्लंड नाही, लंडन शहरामध्ये प्रत्येक आठवड्यात दोन मुलं मारून टाकतात लोक. तुम्ही ऐकलंय का कुठे ? तुम्ही कुठं ऐकलंय का ? की स्वतःच्या पोटची मुलं मारून टाकतात ? आपल्याकडे मी एक सुद्धा आई वडील ऐकले नाहीत अजून तरी की स्वतःच्या पोटची मुले मारून टाकायची. काही कारण नसताना त्रास देतात म्हणून ? इतक्या वाईट रीतीने ? थंडी फार असते तिथे. त्यांना थंडी मध्ये नेऊन आपलं बाहेर गच्चीमध्ये देऊन टाकायचं. मुल रडून-रडून मेलं की सकाळी सांगायचं गारठून मेलं. त्यांना पाण्यात बुडवून मारून टाकायचं. तिथे प्रत्येक आठवड्यात दोन केसेस होतात. काय दुष्ट लोकं आहेत ? काय माणुसकी आहे त्यांच्यामध्ये ? त्यांच्यापासनं हे शिकलेले विज्ञान. त्यांच्यात माणूसकी कुठे ? ओलावा कुठे ? प्रेम कुठे ? आमचा त्यांचा काय मुकाबला ? आम्ही प्रेमाने लोकांना ठीक करतो. तेव्हा अशा रीतीच्या लोक ज्या गोष्टी बोलतात तेव्हा अर्थ आहे की निव्वळ आपण आपली संस्कृती विसरून त्याच्यातला सखोलपणा विसरलोय. हे जेवढं विश्वाचं तुम्हाला एवढं मोठं चित्र दिसतंय, एवढं विश्व दिसतंय आणि त्याच्यातले एवढी जेवढी झाडामध्ये तुम्हाला वाटतं की काय चमकून राहिलंय सगळं ते सगळं कुठं या आपल्या भारतभूमीच्या मुळातनं पोसतंय. जर हा आपला देश नसता तर हे सगळं नष्ट झालं असतं आणि अजून जर हे मुळात उतरले नाहीत तर हे नष्ट होऊन जाणार. ह्यांच्यात काही जीव नाहीये. अगदी बेकार लोकं आहेत. तेव्हा तुम्ही मात्र स्वतःला जागुन राहा. स्वतःच्या संस्कृतीचा अभिमान ठेवायचा आहे आणि ह्याच्या मुळात उतरले पाहिजे. ह्याच्यात खजिन्याचे खजिने भरलेले आहेत. उद्या सारे देश तुमच्या पायावर येणार हे मी तुम्हाला सांगून ठेवते. पण स्वतःबद्दल अभिमान ठेवा आणि जेव्हा आपण आपल्याबद्दल अभिमान ठेवाल तर तुम्हाला हे लक्षात येईल की आमच्यातनं अनेक शिवाजी निघू शकतात, अनेक ज्ञानेश्वर निघू शकतात. ही अशीच विशेष भूमीवर आम्ही जन्माला आलेलो आहोत. त्याचा मान ठेवला पाहिजे आणि त्याच्या मुळात उतरलं पाहिजे. तिकडे धावलं पाहिजे. नसत्या त्या अशा वरवर दिसणाऱ्या चमकणाऱ्या गोष्टींच्याकडे जाण्यासाठी आपण काही थिल्लर लोकं नाही आहोत. परमेश्वराने विशेष घडवलेली आपण मंडळी आहोत. हे समजून जर सर्व लोकांनी सहजयोग स्वीकारला तर तुम्हाला आनंदी आनंद चहुकडे वाटेल. क्रिष्णाने, विठ्ठलाने स्वतः सांगितलेले आहे की जेव्हा योग येईल तेव्हा मी क्षेम घडवीन. स्पष्ट सांगितलंय. योग झाल्याशिवाय क्षेम कसा येणार ? योग हा घटित झाला पाहिजे. मग क्षेम होईल. नित्याभियुक्तानाम् ज्यांनी सातत्याने आपला संबंध त्या परमेश्वराशी ठेवलेला आहे, अशांचा ‘ योगक्षेमं वहाम्यहम् ’. त्यांचं मी क्षेम घडवणार. पण आधी आपलं योग तर घटित होऊ द्या. पातांजल शास्त्रात सुद्धा सांगितलंय की आधी ईश्वरप्रणिधान झालं पाहिजे. आधी ईश्वर बसवला पाहिजे आपल्यामध्ये. बसवलाय का ईश्वर ? बाह्यात नसतो ईश्वर. हृदयात असतो. हृदयाचा आत्माराम जोपर्यंत जागृत होऊन आपल्या चित्तात पसरणार नाही तोपर्यंत उगीचच देवाच्या गोष्टी करून तरी काय फायदा ? भक्तीने तुमची वात तेवत राहील, पण त्याचा प्रकाश जर तुम्हाला आपल्या सर्व शरीर, मन, बुद्धी, अहंकार आदि सर्वातनं जर जायचा असेल तर कुंडलिनीचं जागरण हे झालंच पाहिजे आणि ते जर जागरण नाही झालं तर मात्र हे कार्य होणार नाही. आता सांगायचं म्हणजे असं की पुष्कळ लोकांचे असं म्हणणं आहे की प्रत्येकाने कुंडलिनीबद्दल का लिहिलं ? कारण ही अत्यंत गुप्त विद्या होती. नाथपंथीयांनी विशेषे करून महाराष्ट्रात सर्व लोकांनी फार मेहनत केली. आणि त्या वेळात एक-दोन लोकांनाच फक्त आत्मसाक्षात्कार देत असत. रामाच्या वेळेला नचिकेताहूनने जनका कडे गेला होता. जनक हे नाथ. नाथ होते. दत्तात्रेय. आणि त्यांना म्हणाला मला आत्मसाक्षात्कार द्या. ते म्हणाले, बाबा तू जगात साम्राज्य माग. पण माझ्याकडे आत्मसाक्षात्कार मागू नकोस. बाकी तू पठण कर. हे कर. ते कर. तेव्हा त्यांनी त्याची अत्यंत परीक्षा घेऊन, महाराज सुद्धा परीक्षा घेतात. तसे सगळेजण परीक्षा घेतात. नाथपंथीयांनी म्हणजे एक मनुष्य शोधून काढायचा आणि मग त्याला पार करायचे ही पद्धत. आईचं काम दुसरं असतं. आईचं काम असं झालं पाहिजे असंच. चौदा हजार वर्षापूर्वी तुम्हाला आश्चर्य वाटेल. भृगुमुनींनी लिहून ठेवलंय. हे कार्य होणार आहे. सहज योग येणार आहे. त्याच्यानंतर भगंदर ऋषींनी तीनशे वर्षांपूर्वी लिहून ठेवलंय. तो काळ जो वर्णिलेला आहे, तो १९७० साल आहे आणि सहजयोग १९७० साधी सुरू झाला. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मार्कंडेयांसारखा विल्यम ब्लेक म्हणून कवी इंग्लंडमध्ये झाला. त्यांनी इथपर्यंत, लंडन मध्ये माझं घर कुठे असेल, मी कुठे कुठे राहीन, आमचा आश्रम कुठे असेल, कुठे कुठे जाईन इथपर्यंत की ते घर कसं बांधलं जाईल याचं बारीक-सारीक वर्णन करून अगदी मार्कंडेयांसारखे सर्व वर्णन केलेलं आहे. या सर्व गोष्टी असून सुद्धा ज्या अपेक्षा आणि आशा मनुष्याने कराव्यात त्या भाविकांच्याकडून केल्या जातात. ज्या लोकांना भावनाच नाहीयेत, जे भावनाशून्य आहेत, त्यांना श्रद्धा कशी येणार ? त्यांच्याजवळ हृदयाच नाहीये, ते श्रद्धा कशाशी खातात समजणार ? जर दगड असला, तो त्याच्यात गंगा काय ओतणार ? काहीतरी खोली असायला पाहिजे. तेव्हा आपण काहीतरी परमेश्वरावर विश्वास ठेवत होतो. काही लोक पूर्णपणे ठेवतात, काही अर्धवट ठेवतात. त्याचा आता साक्षात करण्यासाठी आम्ही आलो आहोत. त्याचा साक्षात स्वतःच घ्या. परमेश्वर आहे की नाही हे आम्ही सिद्ध करू. सर्व जे काही सुशिक्षित लोक आहेत, अशिक्षित आहेत त्यांनी जाणून घेतला पाहिजे की सगळ्या शक्त्या आपल्यामध्ये आहेत आणि त्या जर जागृत झाल्या तर आपण समर्थ होतो. कारण आपला आत्मा हा जेव्हा जागृत होतो तेव्हा आपल्याला अर्थ लागतो. ज्याप्रमाणे ह्याला (माइक) आपण मेनला लावल्यावरच ह्या यंत्राला अर्थ लागतो तसेच हे जे आपलं यंत्र ( शरीर) आहे, जोपर्यंत परमेश्वराची संबंधित होत नाही, तोपर्यंत त्याला काहीही अर्थ राहात नाही. तेव्हा ह्याचा संबंध आधी परमेश्वराशी झाला पाहिजे. मग पुढचं काय ते बोलू. जर तुम्ही आता टेलीफोन पाहिला असेल तर टेलिफोनला जर कनेक्शन असलं तर तुम्ही बोलता काय कोणी ऐकत का तुमचं ? तेव्हा शंका-कुशंका काहीही असल्या तरी मी ऐकायला तयार आहे कारण मी आई आहे तुमची आणि मी तुमच्या अगदी जवळची आहे. आई पेक्षा आपल्या जवळचा कोण असतं ? कोणीच नसतं. तेव्हा मी तुमची आई आहे. तुमच्या शंका-कुशंका वेड्यावाकड्या कशाही असल्या तरी मला मान्य आहे पण उगीचच काहीतरी थिल्लरपणा करू नये. आणि स्वतःचं हसं करून घेऊ नये असं आईला वाटतं. त्यादृष्टीने जर काही तुम्हाला खरोखर असे प्रश्न असले तर विचारा. आता कुंडलिनी जागृत कशी होते ? ती कशी षटचक्रातनं भेदन करून नंतर ब्रह्मरंध्रातनं भेदन करून कशी सहज हातामधून आपल्या चैतन्याच्या लहरी वाहू लागतात आणि कशा आपल्याला सगळीकडे चैतन्याचा आभास होतो. हे सुद्धा आपण प्रात्यक्षिक नंतर करू. नंतर ह्याच्या नंतर ते झाल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल की सगळं काही बदलत जाईल. आयुष्य बदलत जाईल. एक समाधान, समाधाना पलीकडचं क्षेम हे सगळं काही, जसं काही वरून अवतरलं असेल असे वाटेल. आणि कुणी सहजयोगी पत्र लिहितात, माताजी आम्ही आनंदाच्या सागरात पोहत आहोत. सगळे भोग नष्ट होतात. आजार होत नाहीत. दुःख होत नाही. वैमनस्य जातं. मनुष्य कुठल्याकुठे पोहोचतो. हेच नाही, त्याच्यामध्ये इतकं कर्तृत्व वाढतं, व्यक्तित्व येतं की बघून मला कधी कधी वाटतं, अहो यांना परवा पाहिलं होतं, तेच आहेत का हे ? एकदम चमकून निघतं, हे म्हणजे तुमचं स्वतःचं आहे. तुझं आहे तुजपाशी ते आम्ही द्यायला आलो आहोत फक्त. आमचं काही लागत नाही. आईला काय ? माझी मुलं माझ्यासारखी झाली म्हणजे झालं. माझ्या आयुष्याचं सार्थक झालं. दुसरं काही नाही. फक्त त्यांचं माझ्यासारखं झालं पाहिजे भलं. आईला काही दुसरं पाहिजे का तुमच्यापासून ? काही नाही. हे समजून घेतलं पाहिजे आणि प्रेमाचा जो ठेवा आहे तो स्वीकारावा. तो प्रेमाने स्वीकारला जातो. शब्दांनी नाही स्वीकारला जात. प्रेमाला भाषा नसते. मूक असतो, तो स्वीकारावा आणि तो स्वीकारून स्वतःची जी संपदा, स्वतःचे वैभव आहे ते जाणून घेतलं पाहिजे. त्याबद्दल बोलून बोलून काही होणार नाही हे जाणून घेतलं पाहिजे. एवढं मात्र समजून घेतलं तुम्ही तर माझं कार्य झालं. बाकी इतक्या भाविक मंडळी येथे आलेत की मी इतकं बोलू शकेन की नाही याचीच मला शंका होती. आणि आज अगदी हृदय भरून आलेलं आहे. असं प्रत्येक खेडेगावी, गावोगाव तुम्ही सहजयोग पसरवू शकता. एकदा तुम्ही जागृत झाल्यावर दुसऱ्यांना जागृत करू शकता. हे सगळं कार्य होऊ शकतं. जे वैज्ञानिक आपल्याकडे आहेत त्यांनी सुद्धा आपली जी मुळं आहेत ती बघावित. आणि त्यांचा हा वारसा आहे. त्यांना बाहेरच्या लोकांना, आमच्याबरोबर आता कमीत कमी आठ दहा वैज्ञानिक आलेत फार मोठमोठाले यु. एन. मध्ये काम करणारे असे. तर त्यांना गणपती समजवण्यापासनं सुरुवात आहे. तुम्हाला गणपती माहित आहे. तुमचा हा वारसा आहे. तेव्हा फार सोपं काम आहे तुम्हाला सर्वांना. पण त्या गणपतीचा तुमच्या शरीरात काय संबंध येतो तो मात्र तुम्हाला अजून उमगला नाही. तो आम्ही सांगतो आणि तो आहे की नाही तोही सिद्ध करून देतो. तेव्हा आता परमेश्वर सिद्ध होणार आहे. पण परमेश्वराला सिद्ध कराल तुम्ही, जर सिद्ध करून द्याल तर तुम्ही आम्हाला पाच हजार रुपये बक्षीस द्याल तर आम्ही मुळीच करणार नाही. तुमचे पैशे काय आम्हाला काय ? आमच्या ठोकळीच्या बरोबरीने आहेत. त्यावेळेला अशा जर गोष्टी केल्या तर मग आम्हाला दुसरी सुद्धा एक स्वभाव आहे. तेव्हा तुम्ही आम्हाला हे करून द्याल तर आम्ही काय काय शर्यतीत घोडे धावतोय काय ? हीच तुम्ही आमची किंमत केली ? अशा रीतीने जे लोक लिहितात त्यांना बिलकुल अक्कल नाही, भाव नाही आणि कुणाचा मान कितपत ठेवायचा हे काय समजत नाही. जे नुसते पैशाला झुकलेले लोक आहेत, ते गाढवासारखे आहेत. गाढवाला काय ? जो मनुष्य पुढे गेला त्याच्याकडे कान लावायचा, जो मागे गेला त्याला दुगाण्या झाडायच्या. जे लोक नुसते पैशाचाच विचार करतात, ते लोक गाढवाची जात आहेत. आणि मागल्या जन्मी गाढवंच असले पाहिजे. नाहीतर त्या पैशासाठी इतके ते बावचळले की त्यांनी संत साधू सुद्धा आता विकायला त्यांनी काढलेले आहेत. आणि त्यांना असं ते असं म्हणतात की तुम्ही असं केलं की तर आम्ही पाच हजार रुपये देऊ. या असल्या लोकांच्याकडे आपण अगदी दुर्लक्ष केलं पाहिजे. खरोखर मला जरा हसायला आलं की बोवा तुम्ही असं छापून द्या की मी कोणालाही बरं करत नाही. म्हणजे माझी संकटं सुटली कारण बहुतेक श्रीमंतच लोकच माझ्याकडे आजारी येतात. गरीब लोक कधी आजारी दिसतच नाही मला बहुतेक. श्रीमंतच पिडलेले, आजारी, हा रोग, तो रोग, लंगडे, पांगळे, अमकं, तमकं, बहुतेक. काही गोर-गरीबही असतात पण सगळ्यात जास्त आजारी श्रीमंत असतात. त्यामुळे असं लिहून टाका की मी कोणाला बरं करत नाही म्हणजे सगळे तुमच्याकडे येतील. मला बरं होईल. मला जरा सुट्टी होईल. मला जरा माझ्या लोकांना बघू दे. फालतूचे लोक माझ्यापासनं सुटतील. तेव्हा लोकांनी ह्या गोष्टीकडे लक्ष देऊ नये. तुम्ही स्वतः कोण आहात ते तुमच्याबद्दल ज्ञानेशांनी सांगितलंय. ज्ञानेशांनी सांगितलय पसायदानामध्ये ब्रम्हाचं एकत्व येईल. पसायदान म्हणजे आमचंच वर्णन आहे. सहजयोगाचंच वर्णन आहे. सबंध सहजयोगाचंच वर्णन आहे. पण तुमच्याबद्दल जे म्हटलं ते मात्र कमालीचे आहे. सहजयोग्यांच्याबद्दल म्हटलेलं आहे - चला कल्पतरूंचे आरव. कल्पतरू आहात तुम्ही. जिथे उभे राहाल, इच्छा कराल, ते होणार. तुमच्याकडे कोणी मागेल ते होईल. चला कल्पतरूंचे आरव म्हणजे वनचे वन. जंगलच्या जंगल उभे राहणार जे म्हणाल ते तुम्हाला देवदूत उचलून धरतील. आणि असा सगळ्यांना अनुभव आहे. बोलते पियुषांचे अर्णव आणि ते म्हणजे पियुष म्हणजे अमृताचे. अर्णव म्हणजे समुद्र. ते बोलते अशे एक एक माणसाला म्हटलेलं आहे. की एक एक माणूस असा की जसा काही तो अमृताचे बोल बोलणारा सागरच असावा. अशे लोक तयार होणार आहेत. चला. अशे तुमच्याबद्दल सांगणारे ज्ञानेश्वर, त्यांची जी वाणी ती काय खोटी होणार आहे का ? सगळ्या साधुसंतांनी काय खोटं काम केलेलं आहे का ? परमेश्वर म्हणजे खोटा, साधुसंत म्हणजे खोटे, आपली संस्कृती म्हणजे वाईट असे जे म्हणतात त्यांना म्हणावं तिथे जाऊन मरा. तिथे राहिलेले तुम्ही बरे. इथे काय करता तुम्ही ? त्यांना तिकडेच पाठवून दिलेलं बरं. म्हणजे त्यांना कळेल की तिथली संस्कृती काय आहे ? तेव्हा आपल्या सर्वांना मला हे सांगायचंय की आज मी फार आनंदात आहे. आणि मला असंच खेडोपाडी घेऊन जा. मला शहरात खरोखर काही काम करायचं नाही. अशी मी सर्व आमच्या सहजयोगी मंडळींना विनंती करते. तिथे माझं खरं हृदय त्या ठिकाणी असे श्रद्धावान असे प्रेमळ भक्त लोक जी माझी मुलं आहेत, त्यांच्या जवळच मला गेलेलं बरं. तुम्हा सर्वांना माझा अनंत आशीर्वाद आहे. आता तुम्हाला काही शंका-कुशंका काही असतील, सर्व विचारून घ्याव्या. पण जास्त वेळ घेऊ नये. कारण मी काही इथे इलेक्शन लढवायला आलेली नाही. पहिली गोष्ट, आम्ही परमेश्वराचं राजकारण घेऊन आलेलो आहोत. ते ह्याच्या पलिकडचं आहे. तेव्हा मला काही इलेक्शन लढवायचं नाही. तुमच्याकडंनं काही पैशे घ्यायचे नाहीत. कारण परमेश्वराला पैशे कशाशी खातात हे काही माहित नाही. तेव्हा कोणी माझ्या पायावर सुद्धा पैशे घालू नयेत. आपल्या खेडेगावात आता इतकी सवय झाली आहे लोकांना साधुसंतांना पैशे देण्याची. त्यांना म्हटलं, अरे बोवा, १० पैशे कशाला घातलेत तर म्हणतील २५ पैशे घालू का माताजींना ? इतका भोळा भाव. तेव्हा मी तुमच्याकडे काय घ्यायला आले -- काही नाही ? द्यायला आले आहे काहीतरी. ते घेऊन घ्यावं. फक्त तुमचं प्रेम हेच घ्यायला आले आहे मी. आणि द्यायला तुमचं सगळं काही, जे आहे ते द्यायला आले आहे मी. तेव्हा असले प्रश्न बेकारचे विचारू नयेत. माझे अनंत आशीर्वाद. अहो, त्यांना म्हणावं प्रश्न असतील तर येथे येऊन विचारा. नाहीतर मला लांबून विचारले तर ऐकायला नाही येणार . बरं... पाणी. प्रश्न-बिश्न असले तर... काही डोकेफिरू असतीलच... नाही का ? काय..काय प्रश्न नाहीत ना का आहेत ?
प्रश्न : ग्रामीण भागामध्ये रात्री स्वप्न पडतात. त्याला आत्मज्ञान म्हणतात का ?
श्री माताजी : आत्मज्ञान. हा प्रश्न विचारलाय की ग्रामीण भागामध्ये स्वप्न पडतात, त्याला आत्मज्ञान म्हणतात का ?
नाही, स्वप्नात दिसतं ते काही आत्मज्ञान नाही. जे सबंध शुद्ध, प्रत्यक्षात, वर्तमान काळात घटतं, ते आहे आत्मज्ञान. स्वप्न हे आपल्यामध्ये सुप्तचेतन आहे. त्याच्यामध्ये जेव्हा आपलं चित्त जातं, त्यावेळेला स्वप्न पडतं. आणि त्यावेळेला जे आपण बघतो, कधीकधी अत्यंत सुषुप्ति स्थितीत गेल्यावरती जे काही पुढे होणार असेल ते खरं खरं समजतं. सहजयोग्यांना बहुतेक सुषुप्तिमध्ये स्वप्न पडतात आणि त्यात त्यांना इशारे येतात. पुष्कळ लोकांना इंग्लंडलासुद्धा, हिंदुस्थानात सुद्धा मी यायचे असले म्हणजे स्वप्न पडतं की श्री माताजी आल्या म्हणून. जरी त्यांना कळलं नाही तरी स्वप्नातनं तसं कळवू शकतो. जसं आपण रेडिओमध्ये एक इथर वापरतो, जो सर्वीकडे पसरलेला आहे. तसंच स्वप्नांमध्ये एक इथर असतो, तो सुद्धा वापरता येतो. आणि त्या इथरमधनं पुष्कळांना खबर जाते. ते करणं दुसरी गोष्ट आहे, पण बहुतेक ज्या माणसाला अजूनपर्यंत आत्मज्ञान झालेलं नाही त्याला जी स्वप्न येतात ती अत्यंत विक्षिप्त आणखी त्याला काही अर्थ लागत नाही. पण एखादा गहन मनुष्य असला तर त्याला मात्र असं स्वप्न पडू शकतं की जे स्वप्न खरोखर परमेश्वराकडून त्या गहनावस्थेमध्ये ज्याला अचेतन म्हणतात तिथून आलेलं आहे...............ज्यांना कुणाला शंका असतील त्यांनी विचारायचं आहे. पण एकदा हे सांगते ना मी की हे आत्मज्ञान म्हणजे काय आहे ? समजलं म्हणजे तुमच्या शंका दुरुस्त होतील. आत्मज्ञान म्हणजे काय ? आता आत्म्याचं ज्ञान येण्यानी होतं काय हा प्रश्न असायला पाहिजे. आणि कारण त्याच्यावर मी प्रकाश एवढा टाकलेला नाही. तर आत्मज्ञान म्हणजे आत्म्याचं ज्ञान. म्हणजे स्वतःबद्दलचं ज्ञान. आता आपण असं म्हणतो की हे माझं घर, हे माझं गाव, ही माझी साडी, हे माझं तोंड. पण माझं ते मी नाही. मग मी कोण आहे ? मी कोण आहे ? जो मी आतमध्ये आहे तो कोण आहे ? म्हणजे तो अजून हाताला लागलेला नाही. तो कुठे दडलेला आहे ? तो मी म्हणजे तो आत्मा. त्याचं ज्ञान झालं म्हणजे काय होतं ? त्याचं ज्ञान झालं म्हणजे आपल्यामध्ये एक नवीन चेतना उत्पन्न होते. कारण आत्मा जो आहे तो सर्वव्यापी अशा परमेश्वराचा अंश आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे आणि जर तुम्हाला आत्मज्ञान झालं तर दुसरा जो आहे त्याच्याबद्दलही तुम्हाला ज्ञान होतं. तर ते कसं होणार ? ज्ञान कसं होतं ? बुद्धीने होतं का ? नाही, तर जाणिवेनं होतं. हा विषय समजून घ्या. जाणीव. म्हणजे जाणीव कशी ? आता आपण समजा एखाद्या कुत्र्याला सांगितलं. विषय जरा समजून घ्या. जर कुत्र्याला सांगितलं की बोवा तू या घाणीतनं जा. तो आपला निघून जाईल. त्याला घाण येईल का ? नाही येणार. पण एखाद्या मानवाला सांगितलं की तू या घाणीतनं निघ, तर तो म्हणेल मी नाही जाणार. त्याला जाणीव आहे. ही घाण आहे. पण जेव्हा आत्मज्ञान होतं माणसाला, तेव्हा त्याला जाणीव होते. त्याच्या बोटांवर जाणीव होते की स्वतःमध्ये काय दोष आहे माझ्यात. माझ्या कोणच्या चक्रामध्ये दोष आहे ? म्हणजे आता मला सात चक्र आहेत ना ? ही पाच, सहा आणि सात. ही डाव्या हाताची चक्रं आणि ही उजव्या हाताची चक्रं. डाव्या हाताच्या चक्रामध्ये जी काय माझी भावना शक्ती आहे किंवा जे काही माझं गत आहे. जे माझं भूतकाळातलं आहे, ते सगळं डाव्या हाताने जाणलं जातं. जे काही माझं भविष्यातलं आहे, ते माझं उजव्या हाताने जाणलं जातं. म्हणजे जे काही मी विचार करतो, ज्या काही मी चढाया करतो, जे मी लोकांच्यावरती आपला अहंकार दाखवतो वगैरे ह्या सर्व गोष्टी म्हणजे आपल्या शारीरिक आणि मानसिक जेवढ्या क्रिया आहेत त्या उजव्या हाताने आणि डाव्या हाताने आपल्या भावनेतल्या क्रिया अशा रीतीने आपण जाणू शकतो. त्यामुळे हे जेव्हा सात आणि हे सात चक्र मिळून जेव्हा बरोबर असे मिळतात या ठिकाणी समजा डावीकडनं, उजवीकडनं, मधोमध हे चक्र तयार झालं. आणि ह्या चक्राला डावीकडे आणि उजवीकडे अशा दोन शक्त्या वाहात आहेत. ह्या इडा आणि पिंगला. इडा आणि पिंगला या दोन शक्त्या. आता मधली जी शक्ती जिला पॅरासिम्पाथेटीक नर्वस सिस्टम म्हणतात, तिच्याबद्दल आपल्याला अगदी ज्ञान नाही. आपण त्याला कंट्रोल करू शकत नाही. म्हणजे समजा उद्या तुम्हाला जर धावायचं असलं तर तुमचं हृदय जोरजोरानी धक-धक धक-धक करेल. आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही आपलं जोराने हृदय धकधक करवू शकता. पण ते जेव्हा हलकं होतं, ते मात्र या मधल्या शक्तीने होतं. ह्या महालक्ष्मीनी, ह्या सुषुम्ना नाडीने होतं. तर तिच्यावरती कसा आपला संबंध लावायचा तर, ती पहिली गोष्ट म्हणजे कुंडलिनी जेव्हा जागृत होते तर सर्वप्रथम तुम्हाला म्हणजे स्वतःच्या सर्व अवयवांवर, आपल्या सर्व जितकी काही इंद्रिये आहेत त्यांच्यावरती कम्प्लीट कंट्रोल येतो. त्याच्यावरती तुम्हाला पूर्ण कंट्रोल येतो. ही पहिली गोष्ट. त्याच्यानंतर तुमच्या हाताला जाणीव होते. तर मुलांना तो विषय आवडणार नाही विशेष. त्यांना याच्याशी काय मतलब ? त्यांना पार होण्याची मतलब. तर तुमच्या हाताला ही जाणीव येते की दुसरा मनुष्य, त्याला काय त्रास आहे ? त्याची कोणची चक्रं. धरलित ? आता बोलायचं म्हणजे सूक्ष्मात सगळं बोलतेय. अहो माताजी, यांचं आज्ञाचक्र धरलंय. म्हणजे त्याचा अर्थ काय ? ह्याचा अर्थ ह्याला ग ची बाधा झाली आहे खरं म्हणजे. पण आपण असं कोणाला म्हटलं, बाबा याला ग ची बाधा झाली आहे म्हणजे झालं. तो मारायला उठेल आपल्याला. पण मनुष्य स्वतःबद्दल असं हे बोलू लागतो. माताजी माझा आज्ञाचक्र धरलंय. हे स्वच्छ करा म्हणजे मला ग ची बाधा झाली आहे की काय ? स्वतःबद्दल बोलायला काही वाटत नाही. कारण आपण आपल्यापासनं दूर होतो आणि आपल्याला बघतो साक्षी स्वरूपाने. आणि आपण म्हणतो हे बघा हे चक्र माझं धरलंय. हे स्वच्छ केलं पाहिजे. ते चक्र त्याचं धरलंय त्याने. मग हे चक्र स्वच्छ करण्याची किमया जी आहे तिला शुद्ध विद्या असं म्हणतात. शुद्ध विद्या म्हणजे शुद्ध करण्याची विद्या. आता ही कुंडलिनी तुमच्यामध्ये शुद्ध इच्छा आहे. शुद्ध इच्छा म्हणजे बाकी जितक्या तुमच्या इच्छा आहे त्या अशुद्ध आहेत. जर अशुद्ध नसत्या तर समजा एखादी इच्छा पूर्ण झाली, तर मग तुम्ही दुसऱ्या इच्छेकडे कशाला धावता ? आता पाटील साहेब म्हणाले की एकदम समाधान झालं मला. झालं. एकदा मिळालं म्हणजे झालं. तेव्हा म्हणजे काय आहे की जी शुद्ध इच्छा तुमची होती. परमेश्वराशी एकाकार होण्याची शुद्ध इच्छा आहे. योग मिळवण्याची शुद्ध इच्छा होती. ती जागृत झाली, संपूर्ण फलद्रूपता आली म्हणजे तुम्ही समजले की आम्ही झालो आहोत. आता आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना. हे जे सांगून गेले की आमचं बी घडलंय. बी घडलंय त्यात तुमचं बी घडून घ्या. आणि ते एकदा झालं म्हणजे मग काय ? समाधानात बसलो. तुका म्हणे ‘ मज अवघ्याचा कंटाळा , तू एक गोपाळा , आवडीसी ’ ही स्थिती होऊन जाते. ती स्थिती येण्यासाठी अवघ्याचा कंटाळा येण्यासाठी, तो एक गोपाळा आधी भेटला पाहिजे ना ? तर तशी ती कुंडलिनी जागृत झाल्याबरोबर तुमच्यामध्ये सामुहिक चेतना येते म्हणजे त्याची जाणीव येते म्हणजे तुम्ही म्हणता. लहान लहान मुलं म्हणतात, माताजी, ह्याची आज्ञा धरली आहे. याचं हे धरलंय. मुलं लहान लहान. त्यांनासुद्धा समजतं. तेव्हा ही एक उच्चतर स्थिती माणसाची होते. ती झालेली नाहीये. अजून आपण अर्धवट आहोत. अजून आपलं कनेक्शन लागलेलं नाही. हे एकदा कनेक्शन लागलं म्हणजे झालं. साधी गोष्ट. अहो जर तुम्हाला टेलिव्हिजनच्या गमती सांगितल्या. समजा जर तुम्ही टेलिव्हिजन पाहताय, तुम्ही म्हणाल काहीतरी सांगता माताजी ? असं कसं शक्य आहे ? की त्याच्यात रंगीत अगदी संबंधच्या संबंध चित्रपटासारखे चित्रपट सगळं काही तुम्हीच बघता. इथल्या बसल्याबसल्या लंडनचे काय, ऑस्ट्रेलियाचे काय कुठूनही दिसतात. तुम्ही म्हणाल हे असं कसं ? ते डबडं दिसतंय नुसतं. ते डबडं आणून इथे लावलं कनेक्शनला तर दिसेल की नाही ? कारण तुम्ही म्हणजे मोठे भारी एक टेलिव्हिजन आहात. कंप्यूटर आहात. सगळं काही तुम्ही आहात. आता अहो आलं कुठे कम्प्यूटर आणि टेलिव्हिजनच्या कल्पना ? हे आपण आहोत म्हणून आपल्यातनच आलं. पण असलं कम्प्युटर तुम्ही पाहिलंय का ? की विचार न करताना सुद्धा सगळं काही कार्य करीत असतं. फक्त याचं कनेक्शन त्या परमेश्वराशी लावून बघा. म्हणजे पहिल्यांदा सर्वात पहिल्यांदा सामूहिक चेतना येते. तेव्हा किती होतं ते सांगता येत नाही एवढ्या ह्याच्यात, पण आत्मज्ञानानी पहिल्यांदा स्वतःच्या शरीराबद्दल, मनाबद्दल, अहंकाराबद्दल सगळं ज्ञान होतं. इतकंच नव्हे तर दुसऱ्याच्याबद्दल सुद्धा ज्ञान होतं आणि आत्मज्ञानानी मी परमेश्वराचा एक अंग आहे ह्याची जाणीव होते. विराटातल्या अंगातला एक मी प्रत्यंग आहे ह्याची जाणीव होते. जाणीव होणंच म्हणजे विद होणं. त्याच्यापासनं वेद लिहिला गेला. नुसतं वाचन करणे म्हणजे वेद नव्हे. ज्यांनी विद होते म्हणजे हातामध्ये जाणीव झाली पाहिजे. तुमच्या नसानसात जाणीव झाली पाहिजे. ज्याला सेंट्रल नर्वस सिस्टम म्हणतात. त्याच्यामध्ये जाणीव झाली पाहिजे तर. कळलं का ? याला म्हणायचं आत्मज्ञान. मग असा आत्मज्ञानी मनुष्य जेव्हा त्रिकालज्ञानी होऊन जातो तेव्हा त्याला बसल्याबसल्या सर्व काही समजतं. कोणाबद्दल काही सांगायचं असलं की सर्व बरोबर समजतं. सगळं माहिती असतं त्याला कारण तो त्रिकालज्ञानी आहे. त्याच्याही वर त्यांनी परमेश्वरी तत्वात सगळं काही जाणलेलं आहे. त्यांना सगळं माहित आहे. मी गगनगड महाराजांना कधी पाहिलं नव्हतं. त्यांनी मला कधी पाहिलेलं नव्हतं. त्यांना काही माहीत नाही. मी कोण ? काय ? तिथे बसल्याबसल्या त्यांनी सगळं माझं वर्णन करून सांगितलं कसं सांगितलं ? मी कोण ? कसला जन्म आहे ? मी काय आहे ? सगळं काही कसं सांगितलं ? आणि आहे खरी गोष्ट. सिद्ध आहेत ते ? त्यांना कदाचित माझा पत्ता नसेल माहित ? लौकिक पण अलौकिक सगळे पत्ते दिले त्यांनी. ते कसं कळलं त्यांना ? म्हणजे काहीतरी द्रष्टा असल्याशिवाय का होईल का ? पण असे द्रष्टे आहेत आणि तुम्हीही होऊ शकता. सहजयोगाची ही कृपा आहे आणि सहज. अहो दिसायला साधं बी सुद्धा उद्या वृक्ष होतं. पण ह्याच्यात खटाखट. आता बघा हे म्हणतात ना की आम्ही मागल्या वर्षी पार झालो. एका वर्षात बघा तर. हे कल्पतरूंचे आरव. उभे झाले की नाही तुमच्या समोर तुमच्यातलेच. तेव्हा तुम्ही का नाही येऊन घ्यायचं ? त्याला कसला प्रश्न ? हं. काय दुसरा प्रश्न ? आता आत्मज्ञानाबद्दल थोडक्यात सांगितलं मी. पण तसं समजायला लागलं की आपोआप तुमच्या लक्षात येईल किती ज्ञान आहे ते.
प्रश्न : ग्रामीण भागात देवीचा संचार होतो यावर आपले मत काय आहे ? हे सत्य आहे की ही अंधश्रद्धा आहे का ? या अंधश्रद्धेमुळे मानवाचे पुढे काय होईल ?
श्री माताजी : पाणी द्या जरा.( पाणी पितात)
आता या लोकांनी एक फार प्रश्न विचारलाय मार्मिक आणि तो मी आता सांगणार आहे आणि सत्य जे आहे ते आहे. ते बदलू शकत नाही आपण. जे खरे आहे ते ऐकून घ्यावं पण त्याबद्दल वाईट नाही वाटून घ्यायचं.