Public Program 1984-03-04
4 मार्च 1984
Public Program
Ichalkaranji (India)
Talk Language: Marathi | Transcript (Marathi) - Draft
महालक्ष्मी आणि त्याचे महत्त्व कोल्हापूर, ४/३/१९८४
कोल्हापूरच्या सर्व भाविक आणि श्रद्धवावान साधकांना आमचा नमस्कार! कोल्हापूरला आल्याबरोबर तब्येत खराब झाली, एक नाटकच होतं म्हटलं तरी चालेल. कारण आमचे सहजयोगी माताजींच्या शिवाय कुठे जायलाच तयार नाही आणि मी त्यांना म्हटलं होतं की सर्वव्यापी शक्ती परमेश्वराची आहे, तुम्ही जाऊन प्रयत्न करा. माझा फोटो घेऊन जा. तुमच्या हातून हजारो लोक पार होतील. पण ते एका ग्रामीण भागात, शहरात नाही, विशेषकरून क्षेत्रस्थळी तर मुळीच होणार नाही. माझे वडील मला सांगत असत की क्षेत्रस्थळी श्रद्धावान फार कमी राहतात. बहतेक क्षेत्रस्थळी लोक पोटभरू, जे देवळावरती पैसे कमवतात किंवा त्यांना बघून बघून परमेश्वरापासून परावृत्त झालेले असेच. त्यांना असं वाटतं की देऊळ थे असून आम्हाला काय फायदा झाला आणि देवळात सुद्धा हे लोक बसून नुसते आपलं पोटं भरून राहिलेत. यांच्यातही आयुष्यात काही विशेष आहे का? त्यांचंतरी आयुष्य काही उज्वल आहे का? त्यांच्यात काही बघण्यासारखं आहे का ? हे एवढं देवीची पूजा करतात, पाच-पाच त्यांच्या आरत्या करतात, तरी यांच्यामध्ये काही बदल होत नाही, पण असा देव आहे तरी काय? आणि अशी देवी जर महालक्ष्मी आहे तर ह्यांची अशी भिकाऱ्यासारखी स्थिती का? त्यामुळे कोणताही बुद्धीजीवी वर्ग याला परमेश्वरापासून परावृत्त करतो. त्यांच्या मनात असा विचार येतो की परमेश्वर म्हणून कोणी शक्ती नाही ठीक आहे, एक देऊळ आहे, चला जाऊन येऊ ! आपले देवळात गेले, दोन पैसे घातले झालं काम! तेव्हा त्याची ती जी सूक्ष्म स्थिती आहे, त्याच्यातली जी सूक्ष्म शक्ती आहे ती कधीही त्यांना मिळत नाही. तसे ते फार भाग्यवान आहेत कारण क्षेत्रस्थळी जन्माला आलेले आहेत हे मोठं भाग्याचं आहे ह्याबद्दल शंकाच नाही. पण क्षेत्रस्थळामध्ये जी इतर गोष्ट व्हायला सुरुवात होते 'अति परिचयात अवज्ञा, संतत गमना तना धरू भवती, प्रयागवासी कृपे स्नानं समाचारं' प्रयागातले लोक आपल्या घरातल्या विहिरीवर नहातात. पण इथून, खेडेगावातून, पायी हजारो पैल चालून लोक गंगेत आंघोळीला जातात. आता गंगा आली तर म्हणे दहा-दहा रुपयांना सगळ्यांना विकली. पण तिथे गंगेत राहणारे लोक, त्यांना जर विचारलं तर म्हणे, 'आम्ही तर एक दिवससुद्धा गंगेत जात नाही. घाण आहे सगळी .' तसंच होतं ! अति परिचयात झाल्यामुळे ज्या ज्या क्षेत्रस्थळी गेले तिथे लोकांना एकतर विश्वासच नाही परमेश्वरावर किंवा दुसरा असला तरी तो श्रद्धावान असतो. तेव्हा कोणत्याही क्षेत्रस्थळी सहजयोग जमवणे कठीणच जाणार आहे. हे आमच्या सहजयोग्यांनीही लक्षात ठेवलं पाहिजे. तिथे डबल मेहनत करावी लागते. सर्वप्रथम जे लोक भाविक आहेत, श्रद्धावान आहेत ते खेडेगावातून येतील, इतर जागेतून येतील, देवीच्या देवळात येतील, महालक्ष्मीला जातील. तिचा आशीर्वाद घेतील, कुंकू घेतील, घरी जातील. पण इथले जे स्थायिक लोक आहेत ते डोळ्याखाली रोज बघत असतात की हे देवीचे प्रकरण काय चाललेले
आहे, देवळात काय प्रकार चाललेले आहेत आणि जरी आपल्या सांस्कृतिक जबाबदारीमुळे आपल्याला देवीबद्दल अपमान वाटत नसला तरीसुद्धा तिच्याकडे लक्ष असावं तितकं आपलं लक्ष असतं. आता महालक्ष्मी म्हणजे काय आहे ? तिचं इथं ........ म्हणून किती मोठी गोष्ट आहे. त्याचं केवढं महत्त्व आहे, ते थोडसं मी तुम्हाला सांगते. म्हणजे मी जे तुम्हाला सांगत आहे ते तुमच्या लक्षात येईल की तेवढी सूक्ष्मता कोल्हापूरच्या लोकांमध्ये नाही. तेवढे श्रद्धावान ते नाहीत. श्रद्धावान असल्याशिवाय माझी गोष्ट तुम्हाला समजणार नाही आणि कुंडलिनीचे जागरण होणार नाही. तेव्हा श्रद्धेने माझी गोष्टी ऐकायची. सर्वप्रथम हे जाणलं पाहिजे की देवीची तीन रूपं आहेत. पहिल्यांदा ती आदिशक्ती म्हणून या संसारात विचरण करते. आदिशक्ती म्हणजे जी सगळ्या शक्त्यांचा समन्वय आहे. तिन्ही शक्त्यांचा समन्वय अशी ती अर्धमात्रा आदिशक्ती आहे आणि तिचं एक रूप म्हणजे महाकालीचं, दसरं महासरस्वतीचं आणि तिसरं महालक्ष्मीचं. महालक्ष्मी सुषुम्ना मार्गात आपल्यामध्ये प्रगट होते. सुषुम्ना मार्ग आहे तिथं महालक्ष्मीचं स्थान आहे. तेव्हा जी आपल्यामध्ये, शास्त्रीय दृष्ट्या म्हणायचं तर ज्याला आपण पॅरासिम्परथॅटिक नव्व्हस सिस्टीम म्हणतो. तिचा कंट्रोल या शक्तीला असतो. आता जे वैद्यकीय शास्त्रात म्हणजे विज्ञानामध्ये फार हुशार झालेले लोकं आहेत, त्यांनी सगळं इंग्रजी शिक्षण घेतलेले आहे, त्यांना जर मी सांगितलं की तुमची पॅरासिम्पथॅटिक नव्व्हस सिस्टीम ही महालक्ष्मी शक्ती कंट्रोल करते. मला मारायला धावतील. कारण त्यांच्यामध्ये देवी म्हणून काहीच नाही. जी देवी- देवता आहे ती म्हणजे इंग्लंडची राणी. ती खरी देवी, बाकी काही देवी म्हणून काही वस्तू असेल, घरात महालक्ष्मीचा फोटो असेल, तिला हार घालतील. पण महालक्ष्मीचा संबंध संपूर्ण पॅरासिम्परथॅटिक नव्हस सिस्टीमशी आहे आणि ती सबंध कंट्रोल करते हे मानायला कधीही तयार होणार नाहीत. आणि जरासं आम्ही म्हटलं तर भांडायला उभे राहतील. ही एक प्रथा आहे. तर दूसरी प्रथा ही की महालक्ष्मी ही गुरू तत्त्वावर आधारलेली आहे. पहिल्यांदा गुरू तत्त्व. गुरू तत्त्वाने काय होते? गुरू तत्त्व माणसामध्ये येण्याचा अर्थ असा की, मनुष्यामध्ये समतोलपणा येते. प्रत्येक गोष्टीमध्ये समतोल असावा लागतो. तुम्ही रस्त्याने म्हणाल की आम्ही एकीकडे तोंड करून चालू तर चालू शकत नाही. म्हणजे प्रॅक्टिकल नाही आहे ते. व्यावहारीक नाही. जर तुम्ही म्हणाला की मोटर आम्ही एका चाकावर एका साईडने चालवू तर! जर तुम्हाला एखाद्या सायकलवरही बसायचं असेल तर तुम्हाला त्याचा तोल सांभाळावा लागतो. जर तुम्ही समतोलात आले नाही, मध्यात आले नाही, तर १ सुषुम्ना मार्गाने तुम्ही जगू शकत नाही. तेव्हा सर्वप्रथम लक्ष्मी तत्त्व आहे. लक्ष्मी तत्त्व हे मधोमध, नाभीवर बसलेले आहे. तुमच्या नाभीमध्ये लक्ष्मी तत्त्व आहे. आता लक्ष्मीचं जे स्वरूप आहे ते आपल्याला माहिती आहे की तिच्या दोन हातांमध्ये कमळंे आणि एका हातामध्ये दान आणि दसऱ्या हातामध्ये आश्रय अशी तिची एकंदर प्रतिमा पूर्वीच्या ऋषीमुनींनी पहिल्यांदाच काढून ठेवलेली आहे, देवकृपेने. कारण आजकाल जर काढली असती
तर काय काढलं असतं लोकांनी मला सांगता येत नाही. याचा अर्थ असा, की जो खरा लक्ष्मी पती आहे, त्याच्या हातातून दान झालं पाहिजे. सारखं दान झालं पाहिजे. काही थांबलं नाही पाहिजे त्याच्या हातातून. सारखं, अव्याहत वाहिलं पाहिजे, तर तो लक्ष्मीपती असतो. त्याच्या आश्रयाला पंधरा- वीस तरी मंडळी असायला पाहिजेत आणि त्यांचा आश्रय सुखदायी असायला पाहिजे, तेव्हा तो लक्ष्मीपती आहे. हातामध्ये दोन कमळं गुलाबी रंगाची, म्हणजे त्याच्या राहणीत, त्याच्या बोलण्यात, त्याच्या एकंदर शरीरात, वैभवात एक तन्हेची आर्द्ता असायला पाहिजे. करुणामय असायला पाहिजे. कारण एका कमळामध्ये एक साधारण भुंगा, ज्याच्यामध्ये काटे असतात आणि तो जाऊन झोपतो आणि कमळ त्याला झाकून घेते आणि आरामात त्याला ऊब देते. त्याचे काटे ही बोचत असतील थोडेसे तरी त्याला सांभाळते. असे लक्ष्मीपती असायला पाहिजे. हे लक्ष्मीपतीचं सांगणं झालं. हे आजकालचे जे लक्ष्मीपती आहेत, त्यांना काय म्हणावं समजत नाही. जर तुम्ही गाढवाला पैसे लावले तर तो काही लक्ष्मीपती होणार नाही. पण ही लक्ष्मी जी आपल्याला मिळाली, आता हे बघा, हे बाहेर देशातून, १४देशातून इथे लोक आलेले आहेत. त्यांच्याकडे लक्ष्मीचं राज्य आहे एका अर्थाने, एका अर्थाने ह्यांच्याकडे पैसा आहे. पण लक्ष्मीपती नाहीत. पण तरीसुद्धा माहात्म्य स्वत:च्या आत्म्याचं किती आहे! हे बघा, चौदा देशातून इथे तुमच्या कोल्हापूरात आले आहेत, पण कोल्हापूरचे किती लोक इथे आले आहेत माझ्या भाषणाला! किती लोक व्यवस्थित बसले आहेत? बघ्यासारखे उभे आहेत. श्रद्धा काही दिसते का? मगापासून म्हणतोय 'बसा, बसा,' बसायला देखील तयार नाहीत आणि एक तऱ्हेचा हट्टीपणा. या लोकांमध्ये जर त्यांना सांगितलं की हे असं करून तुमचं भलं होईल, तर त्या गोष्टीला अगदी तयार असतात आणि करतात, इतके श्रीमंत आहेत, सायंटिस्ट आहेत, सगळं काही आहे, पण आपल्या लोकांमध्ये ही अक्कल येणं अत्यंत कठीण आहे. त्याला कारण असं झालेलं आहे की आपण म्हणजे अतिशहाणे! आणि आपल्यासमोर मोठमोठाले आदर्श आहेत. सगळ्यांना सगळे पाठ आहे. पुराणे कोणी वाचली नसणार, का कोणी गीता वाचली नाही, कोणी काही केलेले नाही. सगळे अतिशहाणे! कोणी कोणाच भलं केलेलं असो अथवा नसो, पण मुख्य म्हणजे शहाणपण अती आणि त्या अतीशहाणपणामुळे जे आपल्यातलं सत्त्व आहे, जे आपल्यातलं खरं आहे ते आपण गमावणार आहे. 'तुज आहे तुजपाशी' असं सांगितलं आहे. ते तुमच्याचपाशी आहे. या खेडेगावात आहे, पण खेडेगावात पहिल्यांदा रुजणार, क्षेत्रस्थळी सगळ्यात शेवटी सगळ्यात पहिले खेडेगावात मग मुंबईला सुद्धा रूजेल, पण क्षेत्रस्थळी फार कमी रूजेल असं मला दिसतं. त्याला कारण असं की श्रद्धा जी आहे तिला गहराई आहे. श्रद्धेमध्ये सूक्ष्मता आलेली आहे. श्रद्धा म्हणजे देवीला गेलो, तिला नारळ घातले, हे घेतलं, झालं. नमस्कार, चला आजचं काम देवीचं झालं! पण देवी म्हणजे काय? महालक्ष्मी तत्त्व म्हणजे काय? इकडे लक्ष नाही. आता जेव्हा लक्ष्मीत मनुष्य उतरला तर या लोकांना लक्ष्मी मिळाली. त्याच्यापुढे आता विवंचना लागली की एवढा मला पैसा मिळाला, सगळं काही मिळालं, सगळं ऐश्वर्य मिळालं तरी आमची मुलं
आहेत की जी सुसाईड करताहेत, आत्महत्या करताहेत. म्हणजे पैसा हे काही उत्तर नाही. पैशाने बनवलेली गोष्टी खरी नाही. म्हणजे ह्याच्यापलीकडे काहीतरी असायला पाहिजे. जर पैसा सगळे काही असता, तर ते आम्ही मिळवलेले आहे. मग त्याच्या पुढे काय? त्याच्या पुढे काही दिसत नाही. आम्ही एवढा उपद्व्याप केला, आपली एवढी सुधारणा करून घेतली. आमच्याजवळ एवढा पैसा आला, आम्हाला स्थैर्य नाही, आपापसात मारामाऱ्या. आमच्यात खून पडतात. त्याच्यानंतर काही काही देशांमध्ये तर आई- बहिणींचाच कोणाला पत्ता लागत नाही. इतकं त्यांच्यामध्ये वैमनस्य आलेलं आहे आपापसामध्ये की त्यांना आश्चर्य वाटतं की पैशामुळे एवढं वैमनस्य लोकांमध्ये आलं, तेव्हा पैशात काहीतरी खराबी असली पाहिजे! तर तेव्हा सर्व सोडून आता दूसऱ्या शोधाला लागले. काही लोकांनी आत्महत्या केल्या, काही शोधायला लागले, तर काही इथून आपले भामटे गुरू गेले आणि त्यांनी त्यांना पकडून घेतलं आणि त्यांना लुटून खाल्लं. पण परमेश्वर हा आहे. आणि जे त्याच्या शोधात खरेखुरे फिरतात त्यांना परमेश्वर हा मिळेल. पण जे वरपांगी आहेत त्यांना मिळणार नाही. ह्यांच्यासमोर आपल्यासारखे आदर्श नाहीत. ह्यांनी गुरू गीता ऐकलेली नाही, ह्यांनी गीता ऐकलेली नाही. ह्यांना काही माहीत नाही. आपल्याकडे एक-एक मिनिस्टर जर उभा केला तर तो अशी भाषणं देतो की वाटतं , बापरे बाप, साक्षात हा कुठून उतरला आहे ब्रह्मदेव असा बोलतो आहे. पण आज सगळे कोरडे पाषाण. 'लोकासांगे ब्रह्मज्ञान, स्वत: कोरडे पाषाण'. हे म्हणजे आपल्या इथल्या सर्वच लोकांचे आहे. त्यामुळे होतं काय की वरपांगीपणा येतो. त्यांना आदर्श फार मोठाले, आणि आत काहीच नाही, पोकळ वासा. ह्या पोकळ वासेला आता ठीक कसं करायचं? त्याच्यात श्रद्धा कशी भरायची? 'श्रद्धा करा' असं म्हणून होत नाही. आणि जोपर्यंत श्रद्धा निर्माण होणार नाही तोपर्यंत या लक्ष्मीतून महालक्ष्मी तत्त्व जागृत होणार नाही. लक्ष्मीतूनच महालक्ष्मी तत्त्व जागृत होईल. पण ती लक्ष्मी जी आपल्याला मिळणार आहे, ती लक्ष्मी ह्या लक्ष्मीसारखी असेल तर! समजा जरी ती महालक्ष्मी आपल्याला मिळाली तर जरुरी नाही की आपल्याजवळ पैसे असायला पाहिजे. जरुरी नाही की तुम्हाला लक्ष्मीचे तत्त्व जाणलं पाहिजे. ते जाणल्याशिवायच तुम्ही महालक्ष्मी तत्त्वात उतरू शकता. कारण या अशा विशेष स्थानी आपला जन्म झालेला आहे. हिंदुस्थानात जन्म होणं म्हणजेच लाखो- लाखो योनीतलं पुण्य आहे! मग महाराष्ट्रात होणं तर काय सांगायचं! आणि त्यात क्षेत्रस्थळी जन्मलं म्हणजे केवढं मोठ पुण्यासारखं, जे केवढं संचित! एवढं गाठोड बांधून परत वरपांगीपणा. त्याचा इलाज काय केला पाहिजे? त्याचा इलाज हा आहे की त्याच्याबद्दल थोडा विचार करायला पाहिजे. स्वत:बद्दल विचार करायला पाहिजे. आता मी म्हटलं बसा, तर बसत का नाही ? ते लोकही बघताहेत की किती उद्धट लोक आहेत. बसत का नाही तुम्ही लोक? एकंदरीत माणसामध्ये स्वत:बद्दल एक तऱ्हेचे कुतूहल असायला पाहिजे. आणि विचार असायला पाहिजे की मी या जगामध्ये कशाला आलो आहे? या जगात येऊन मला
काय मिळवायचे आहे ? मला जे काही मिळवायचे आहे ते मी मिळवले आहे की मला अजून काहीतरी मिळवायचे आहे ? मला आनंद मिळाला आहे का ? या देशांमध्ये जिथे एवढी प्रगती झालेली आहे त्या देशाच्या लोकांना जाऊन विचारावं की बाबा, तुम्हाला ते मिळालं का? तुम्ही ज्या सौख्याच्या शोधात होता ते तुम्हाला मिळालय का? ते सांगतील की आमच्यापेक्षा दुःखी कोणी नाही. तुम्ही आमच्यापेक्षा सुखी आहात. तेव्हा कारण हे की या भारतभूमीच्या पुण्याईमुळे तुम्ही बचावले. त्याच्यामुळे तुम्ही बचावले. पण ते पुण्यसुद्धा आता अती शहाणपणामुळे कदाचित अपुरे पडणार. मी आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियाला फक्त दोनदा गेले. पण तिथे हजारो सहजयोगी तयार झाले. तुमच्या कोल्हापुरात कितीदा आले मला आठवत नाही, पण पुष्कळदा आलेली आहे आणि तरी इथे किती सहजयोगी आहेत ? मोजून सांगता येतील. म्हणजे लोकांमध्ये श्रद्वा नाही. स्वत:बद्दल श्रद्धा नाही आणि परमेश्वराबद्दलसुद्धा श्रद्धा नाही. जी श्रद्धा आहे ती फार कमी पडते. 'मी परमेश्वराला शोधूनच काढणार.' 'येऱ्यागबाळ्याचे काम नोहे'. 'मी परमेश्वराला आपल्यामध्ये जागूनच सोडणार.' अशी ज्यांनी एकदा आपल्या मनामध्ये धारणा धरली आणि त्याचा हिय्या त्यांनी केला त्याला काहीही नाही. ही वेळ आलेली आहे. आज हजारो लोक हजार ठिकाणी पार होत आहेत आणि क्षेत्रस्थळी राहिलं म्हणून काय झालं ! 'मी महालक्ष्मीला प्राप्त करून राहीन,' असे म्हणणारे जर तुमच्यात असले तर आम्ही त्यांच्यासाठी तयार आहोत. महालक्ष्मी तत्व हे फार मोठे आहे. महालक्ष्मी तत्त्वाशिवाय तुम्ही मानव स्थितीला नसते आला. आज अमिबापासून तुम्ही जे माणूस झालात ते तुम्ही या महालक्ष्मी तत्त्वामुळे आणि या महालक्ष्मी तत्त्वामध्येच जी आपण 'उदो, उदो अंबे' असं म्हणतो तीच ती कुंडलिनी आहे. त्या कुंडलिनीला 'उठ, ऊठ' असे आपण म्हणतो या महालक्ष्मी तत्त्वात. इथे जसे गोंधळी गातात, आणखीन ठिकाणी का गातात ? म्हणजे सुषुम्ना पथ ज्या पथात आहे. कुंडलिनी उठते ते महालक्ष्मीचं स्थळ तुमच्याकडे असतांना काय तुम्ही तिची सेवा केलेली आहे. ती आतमध्येच जागृत आहे तुमच्यात. तिला जागृत करू दे. पुष्कळ सांगायचंय महालक्ष्मीला, पुष्कळ बोलायचंय. आधी सूक्ष्मात उतरून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल की कोणत्या ठिकाणी तुम्ही आलात, काय आहे हे? हे पृथ्वी तत्त्वातून निघालेले आहे. हे स्थळ पृथ्वी त्त्वातून निघालेले आहे आणि त्याच्याकडे तुम्ही हात करून बघितलं तरी तुम्हाला काही नाही लागलं. तरी इथं जेवढे सहजयोगी आहेत, ते फॉरेनर्ससुद्धा जाऊन आले, ते म्हणतात, 'माताजी, केवढं जागृत स्थळं आहे हे!' आता तुम्हाला नाही सांगता यायचं की जागृत आहे की नाही. इथे राहूनही तुम्हाला माहीत नाही की जागृत आहे की नाही. मग तुमच्यापुढे मी काय बोलणार ! तेव्हाही मोदी बोलत होते तर सगळे लोक उठून उठून जात होते. इतक्या कळवळीने ते बोलत होते, इतक्या मेहनतीने बोलत होते. लोक उठून उठून जात होते. त्यांना त्याची कदर नव्हती की आम्ही या फार मोठ्या स्थळी जन्माला आलो, काहीतरी विशेष पुण्य घेऊन आलो असू, भलं मोठ काहीतरी गाठोडं संपदेचं आहे, ते उघडण्यासाठी माताजी आलेल्या आहेत. ते घेऊन त्यात पुढं गेलं पाहिजे. त्याच्यात मेहनत केली पाहिजे. तिकडे लक्ष घालायला पाहिजे. पण तसं नाही. लक्ष कुठय सध्या आपलं हे पाहिलं
पाहिजे. आपलं लक्ष जे आहे ते वरपांगी आहे. त्यात खोल ते लक्ष गेलं पाहिजे आणि ते जाण्यासाठीच ही 'अंबे , उदो, उदो'. अंबेला उठवलं पाहिजे. अंबा म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून तुमची कुंडलिनी आहे. तीच अंबा आहे. ही म्हणजे सबंध सृष्टीला बनवून, इथं थांबलेली आदिशक्ती आहे, ती अंबा आहे, म्हणजे अर्धमात्रा. आपल्याला माहिती आहे की साडेतीन मात्रा या संबंध महाराष्ट्रात आहेत. हे त्रिकोण जे आहे महाराष्ट्राचं, पठार, हे सर्व विश्वाच्या कुंडलिनीचे स्थान आहे. त्यातली महालक्ष्मी इथे आहे. आता इथल्या लोकांची ही स्थिती म्हणजे आम्ही काय बोलायचं पुढे सांगा! ही महालक्ष्मी. आणि महाकाली आपल्याला माहीत आहे कुठे आहे. तुळजापूरला, भवानी आहे, आणखीन माहूरला महासरस्वती आहे, पण अर्धमात्रा मात्र आदिशक्ती, नाशकाजवळ वर्णीला आहे. ते सगळे बघायला हे लोक जातात. इथे बघायला आले, तुळजापूरला जाऊन आले. पण ते जाणून की हे काय आहे. सबंध विश्वाची कुंडलिनी, ती त्यातली महालक्ष्मी तुमच्याकडे ज्याच्यातून सर्वांचे उत्थान होणार आहे, ज्याच्यातून कुंडलिनी चढणार आहे. म्हणजे इथल्या लोकांनी काय असायला पाहिजे हे मला तुम्ही सांगा! म्हणजे परमेश्वराची काय इच्छा आहे ? तुम्हाला इथे काय घेऊन पाठवलं असेल परमेश्वराने? हा विचार करून ही जेव्हा वेळ येईल, जेव्हा सर्वांची अशी सामूहिक कुंडलिनी उचलायचा समय येईल त्या वेळेला, विशेष त्या वेळेला कशी मंडळी इथं जन्माला घातली असतील देवाने, काय विचार करून, कोणत्या पट्टीचे लोक इथं घातले असतील ? तेच मी शोधतेय. कुठे गेले ते ? काहीतरी विशेष मंडळी जन्माला घातली असतीलच, ती अजून हाताला लागली नसतील आम्हाला किंवा असतील ही तुमच्यात काही मंडळी त्याच्यात बसलेली. तर सांगायचंय की जाणून घ्या. तुमच्यातल्या प्रत्येकाला मंडळीला परमेश्वराने काही तरी विशेष देऊन पाठवलेले आहे. तेव्हा ते जे विशेष आहे ते तुम्ही वाढवलं पाहिजे. बाकी बेकार गोष्टीत लक्ष घालून तुमचं जे इथे जन्माचे कारण आहे, जे मूळ कारण इथे जन्म होण्याचं आहे आणि इथे राहण्याचे कारण आहे त्याचे सार्थक करून घ्या. सर्व जगाला तुमच्यापुढे वाकावं लागेल, ज्या दिवशी तुम्ही स्वत:ची संपदा जाणून घ्याल. जसं पसायदान लिहिलेले आहे. आपण ऐकलेच असेल. ह्यातली वाक्य लोकांना समजतात की नाही मला माहीत नाही. त्यांनी वर्णन केलेले आहे की कसे कसे लोक इथे जन्माला येतात. त्या वेळेला काय होईल. ब्रह्मा जर एकत्व झाले ते पसायदान, ते आता, हे पसायदान आहे. हे घ्यायला पाहिजे. आणि ह्या लोकांचे काय? 'चला कल्पतरूचे आरव'. कल्पतरू! तुमचे कल्पतरू बनणार. आता मोदी मला म्हणाले, 'माताजी, कमाल आहे. मी नुसता तुमचा फोटो घेऊन गेलो. तिथे दोन-तीन हजार लोक होते पण तिथे जवळजवळ ८०% लोक पार झाले.' म्हटलं, 'काय कमाल आहे. तुम्ही कल्पतरू झालात. तुम्ही कल्पतरू झालात.' तुम्ही कल्पना करा आणि ते पूर्ण होणार. तुम्ही इच्छा करा आणि ते पूर्ण होणार. असे तुम्ही कल्पतरूंचे आरव तयार करायला पाहिजे. एकट्यादकट्याने नाही चालायचं. आरव म्हणजे वनच्या वन. 'बोलते पियुषांचे आर्णव.' जे अमृताचे सागर आहेत असे बोल. आता ते बोलत होते कोणाचे लक्षही नव्हते. ते आहे नां, 'वाचली गाथा', तसला प्रकार. १
तेव्हा स्वत:ची किंमत ओळखा, स्वतःला समजून घ्या. ह्या अशा क्षेत्रस्थळी, या महत्त्वाच्या, विश्वाच्या महत्त्वाच्या क्षेत्रस्थळी आम्ही जन्माला आलो तर आम्हाला काय कराव लागेल. दंडवत घालायला सांगितलं तर चालले दंडवत घालायला. अहो, पण कुंडलिनीची जागृती करून तुम्ही पार का होत नाही. त्याच्यात ऊहापोह, त्याच्यात भांडणं, त्याच्यात वाद-विवाद. वाद-विवाद करून कधीही कुंडलिनी चढणार नाही. काही सोप्प काम नाही कुंडलिनीचं चढवणं. पाऱ्यासारखी कुंडलिनी असते आणि विशेषकरून क्षेत्रस्थळी. तेव्हा मेहरबानी करून आपल्या संपदेला ओळखून घ्यायचे आहे. स्वत:ला ओळखून घेतले पाहिजे. मग कुंडलिनीचं जागरण फार सोपे काम आहे. फारच सोपे काम आहे. स्वत:ची पहिल्यांदा इज्जत करा, स्वत:चा पहिल्यांदा आदर करा. स्वत:ला समजून घ्या की आम्ही का या क्षेत्रस्थळी जन्माला आलो. काहीतरी विशेष असायला पाहिजे. बरीच तरुण मंडळी आलेली आहेत ते पाहन मला आनंद वाटला. कारण तरुण मंडळी फार पटकन पार होतात आणि त्यात लाभतात ही. तसेच पुष्कळ वयस्कर लोकसुद्धा. ज्यांना शहाणपण असेल ते सगळेच याच्यातून पार होतात, पण तरुण मंडळीना पटकन हे लक्षात येतं. पण त्यांनी त्याच्यात थिल्लरपणा केला नाही पाहिजे. तुमचं विशेष आहे की कोणत्याही वयाला सहजयोग लाभ देतो. पण त्यातली मेहनत करण्याची जी शक्ती आहे ती तरुणपणी असते. म्हणून त्या लोकांनी मेहनत करून त्याच्यात रमलं पाहिजे आणि जमलं पाहिजे. जर त्याच्यात जमले नाही, तर तुम्हाला माहितीच आहे की या देशाचाच काय पण सर्व जगाचाच नाश समोर दिसत आहे. त्या नाशाला जर तुम्हाला परतवून पाठवायचं असलं तर स्वत: समर्थ झालं पाहिजे. सम अर्थ झालं पाहिजे आणि सम अर्थ म्हणजे तुम्ही जे आत्मा आहात त्याच आत्म्याला प्राप्त होणे. तुम्ही आत्मा आहात, बाकी सगळ मिथ्या आहे. मन, बुद्धी, अहंकार आदि या उपाधी आहेत, तुम्ही फक्त आत्मा आहे आणि आत्म्याला प्राप्त झाल्याबरोबर तुमच्या हाताला चैतन्य लाभेल. ते चैतन्य म्हणजे तीनही शक्तींचा समन्वय आहे. एक शक्ती नाही. प्राणशक्ती, इच्छाशक्ती आणि धारणा शक्ती म्हणजे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, तीनही शक्त्यांचं समन्वय झालेला आहे अश्या ह्या ज्या चैतन्य लहरी आहेत. त्यामधून तुम्ही सुद्धा दुसर्यांचं भलं करू शकता आणि स्वत:ला एका नवीन वातावरणात, साम्राज्यात प्रवेश करू शकता. हे सर्वांचं व्हावं , सर्वांचं कल्याण व्हावं, म्हणून आमची रात्रंदिवस धडपड परमेश्वराच्या चाललेली आहे. त्यात पैसे घेणे वरगरे या गोष्टींचा काही प्रकार नाही. अर्थात पोटभरू लोकांना राग येणारच. मग ते देवाच्या नावाने घेत असतील, कोणाला बरं करण्याच्या नावाने घेत असतील किंवा काहीही असेल, त्या लोकांना हे समजत नाही की माताजी एक पैसा ही न घेता लोकांना बरं कसे करतात? आम्ही करतो, आमची मर्जी. ज्याला करायचं त्याला करू नाही करायचं त्याला नाही करणार. तुम्ही कोण आम्हाला म्हणणार! का बरं करता ? आणि मला आवाहन दिलं की तुम्हाला आम्ही पैसे देऊ, जर तुम्ही एकाला बरं केलं. आम्ही कशाला आवाहन तुमचे ऐकणार. आमची मजी. आम्हाला करायचं असेल तर करू नाहीतर नाही करणार. आम्ही काही तुमच्यासारखे पाट्या लावून कोणाला बरं करीत नाही. आमच्या मर्जीवर जर आलं तर बरं करू लोकांना आणि करतोच. त्यात तुमच्या पोटावरती का पाय
यावा? जगामध्ये पुष्कळ आजारी लोक आहेत. आम्ही काही सगळ्यांना बरं करीत नाही. फक्त ज्याच्यात पुण्यसंचय असतो त्यालाच बरं करतो. पाट्या लावून काही आम्ही बरं करणार नाही. त्यांच्यासाठी तुम्ही आपल्या पाट्या लावाव्या. त्याला पाठवू तुमच्या हॉस्पीटलला डॉक्टरांकडे. त्यांच्याकडून पैसे उकळा आणि त्याला बरं करा. फक्त जे साधु-संत आहेत, जे धार्मिक आहेत, मग ते गरीब असोत, कसेही असोत आम्हाला ते प्रिय आहेत, त्यांना आम्ही बरे करणार. तुम्ही त्याची चिंता करू नये. कोणत्याही श्रीमंत माणसाला आम्ही बरं करीत नाही. श्रीमंत लोक म्हणजे परमेश्वराच्या साम्राज्यात जातच नाही. एक- दोघांना बरं केलं तर मला डोकंदुखी झाली. एक-दोघांना, कुठून ते मला चिकटले आणि त्यांना बरं केलं तर ते आणखीन दहा श्रीमंत घेऊन आले. म्हटलं, 'बाबा, तुमच्या घरी डॉक्टर आहेत, मला क्षमा करा. मला वेळ नाही.' पळत असते त्यांच्यापासून, पण तरी माझ्या डोक्याला चिकटतात. गरीबांसाठी मला वेळ आहे. एवढंच सांगायचंय की स्वत:, ज्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत त्याबद्दल उगीच उहापोह करण्यात काही अर्थ नाही. ज्या लोकांना असं वाटतं की सहजयोगामध्ये काहीतरी आम्हाला लाभ होईल त्या लोकांनी सहजयोगात येऊ नये. कोणावर जबरदस्ती नाही. कोणावरही जबरदस्ती नाही. परमेश्वराला मिळवणं ही काही जबरदस्तीची गोष्ट आहे का ? तुम्हीच सांगा. ढकलून का तुम्हाला परमेश्वराच्या साम्राज्यात पाठवता येईल? अहो, तिथे सिंहासनावर बसायचंय तुम्हाला? तिथे असे ढकललेले लोक, मेलेले, मुर्दाड लोक तिथे जाऊन बसणार आहेत का ? तुम्हीच सांगा बरं! तिथे बसणारी मंडळी ही राजेशाही पाहिजेत. तेव्हा असे जे लोक, जे स्वत:ला समजतात की काहीतरी जबरदस्तीने सहजयोग करता येईल किंवा पैसे देऊन सहजयोग करता येईल त्यांनी समजलं पाहिजे की हा सडेतोड योग आहे. जे तुमचं पुण्यसंचित असेल त्याच्यात हजार पटीने जास्त असेल, पण अगदीच पुण्य नसलं समजा, अगदीच महापापी असलात तर काही आम्ही ठेका घेतलाय का तुम्हाला ठीक करण्याचा. तेव्हा लक्षात असायला पाहिजे की परमेश्वरी त्त्व हे आहे तेच आहे, बाकी काही नाही. बाकी सगळे खोटं आहे. जोपर्यंत तुम्हाला हातालाच लागलेलं नाही, जोपर्यंत ती शक्ती तुमच्या हाताला लागलेली नाही तोपर्यंत तुम्ही असं कसं म्हणता की आहे किंवा नाही. जोपर्यंत इतरांना मिळाला नव्हता, जोपर्यंत रेडिओवरती झाले नव्हते, तोपर्यंत ते म्हणत होते हे नाही आहे. मी जर म्हणते आहे तर बघायला हरकत काय आहे ! जर तुम्ही सायंटिफिकली बघता तर सायटिस्ट माणसाचं डोकं उघडं पाहिजे, येऊन बघायला पाहिजे आहे की नाही आहे. ज्या लोकांना आज लाभ होईल त्यांनी गहनतेत उतरलं पाहिजे. एवढं मात्र आज मला वचन पाहिजे तुम्हा लोकांकडून की 'आज जर आम्हाला माताजी लाभ झाला तर आम्ही गहनतेत उतरू.' वरपांगीपणाने सहजयोग घटित होत नाही. त्याचा काही फायदा होत नाही. एखाद्या बी ला अंकुर फुटून ते वाया जातं तसे तुम्ही वाया जाणार. तर मला तुम्हाला वाया घालवायचं नाही. तेव्हा कृपा करून, मनाचा हिय्या करून ध्यानात जायचं आणि परमेश्वरी कृपेने हे घटित होईल अशी मला पूर्ण आशा आहे.