Public Program, Prapancha and Sahaja Yoga

Public Program, Prapancha and Sahaja Yoga 1984-11-26

Location
Talk duration
59'
Category
Public Program
Spoken Language
Marathi

Current language: Marathi, list all talks in: Marathi

The post is also available in: English, Italian.

26 नोव्हेंबर 1984

Public Program

Doctor Antonio Da Silva High School, Mumbai (India)

Talk Language: Marathi | Transcript (Marathi) - Draft

सार्वजनिक कार्यक्रम, (पब्लिक प्रोग्राम)

प्रपंच आणि सहजयोग

डॉ. अँटोनियो दा सिल्वा, हाई स्कूल, दादर, मुंबई (भारत).

सोमवार, २६ नोव्हेंबर १९८४.

सत्याच्या शोधात असणाऱ्या सर्व मंडळींना आमचा नमस्कार.

आजचा विषय आपल्याला ह्यांनी सांगितला आहे, की प्रपंच आणि सहजयोग यांचा काय संबंध आहे? तो मी सांगितला पाहिजे. पहिल्यांदा शब्द ‘प्रपंच’ हा काय आहे तो आपण पहिला पाहिजे. ‘प्र’ आणि ‘पंच’. ‘पंच’ काय तर आपल्यामध्ये जी पंचभूत आहेत त्यांनी निर्माण केलेली परिस्थिती. पण ती ‘प्र’ लावून त्याचा अर्थ दुसराच होतो. ‘प्र’ म्हणजे ह्या पंचमहाभूतांमध्ये ज्यानी प्रकाश पडला आहे, तो प्रपंच.

” अवघाचि संसार सुखाचा करेन."

असं जे म्हटलं, ते सुख प्रपंचातच मिळालं पाहिजे. प्रपंच सांडून परमेश्वर मिळवता येत नाही. पुष्कळांची अशी कल्पना आहे, की योग म्हंटला म्हणजे कुठे तरी हिमालयावर बसायचं आणि गारठून मरायचं. हा योग नव्हे. हा हट्ट आहे. हट्टच नव्हे पण थोडासा मूर्खपणा पण आहे. ही जी कल्पना लोकांनी धर्माबद्दल करून ठेवली आहे. ती अत्यंत चुकीची आहे. विशेषकरून महाराष्ट्रामध्ये जेवढे संत-साधू झाले. सगळ्यांनी प्रपंच केला. फक्त रामदास स्वामींनी प्रपंच नाही केला. पण प्रत्येक दासबोधातून प्रपंचच वाहतोय मुळी. “प्रपंच सांडून तुम्ही परमेश्वर मिळवू शकत नाही.” हे त्याचं वाक्य अनेकदा आलेलं आहे आणि म्हणून प्रपंचातून उठून आपण परमेश्वर मिळवायचा ही कल्पना बरेच वर्षांपासनं आपल्या देशात आलेली आहे. त्याला अनेक कारणं आहेत. कारण बुध्दाला उपरती झाली. तो संसार सोडून बाहेर गेला आणि त्याच्यानंतर त्याला आत्मसाक्षात्कार झाला. पण तो जेव्हा संसारात होता, तेव्हाही त्याला झाला नसता अशी गोष्ट नाही.

समजा आम्हाला दादरला यायचं आहे तर आम्ही सरळ, धोपट मार्गाने इथे पोहचू शकतो. पण जर आम्हाला इथून भिवंडीला जायचं, मग तिकडून आणखीन पुण्याला जायचं, आणखीन फिरून चार ठिकाणी, मग परत, परत आम्ही दादरला येऊ शकतो. म्हणजे रस्ता एक सरळ ही असू शकतो आणि दुसरा जो रस्ता आहे तो खूप फिरून-फिरून आला म्हणजे काय, तो खरा मार्ग नव्हे. त्यावेळेला त्यांना सांगायला कोणी नव्हतं. मार्ग सुगम करायला कोणी नव्हता. म्हणून ते दुर्गम मार्गाने गेले. जे सुगम आहे त्याला दुर्गम करून घेतलं. म्हणून आपणही दुर्गम करून घ्यायचं का? अत्यंत सुगम आहे ते. हे सगळ्यांनी सांगितलंय, सहज आहे. “सहज समाधी लागो” सगळ्या संत-साधूंनी सांगितलंय “ सहज समाधी लागो.”

कबीरांनी लग्न केलं होतं. नानकांनी लग्न केलं होतं. जनकापासनं आतापर्यंत परंपरागत जेवढे काही मोठे-मोठे अवधूत झाले, सगळ्यांची लग्ने झाली होती आणि त्यानंतर सुध्दा बरेच असे होते, ज्यांनी लग्न नाही केलं. पण कोणीही लग्न संस्था ही चुकीची आहे किंवा ज्याला आपण प्रपंच म्हणतो तो चुकीचा आहे, असं म्हटलेलं नाही. तेव्हा सर्वप्रथम आपण डोक्यातनं ही कल्पना काढून टाकली पाहिजे, की जर योग मार्गाला तुम्ही आले तर तुम्हाला प्रपंच सोडावा लागेल. उलट प्रपंच जर करायचा असला तर सहजयोगात आलंच पाहिजे.

सुरुवातीला जेव्हा या दादरमध्ये आम्ही सहजयोग सुरू केला, तेव्हा सगळी प्रपंचातलीच गाऱ्हाणी घेऊन लोक येत असतं. माझी सासू ठीक नाहीये. माझा नवरा ठीक नाहीये. माझी बायको ठीक नाहीये. माझी मुलं ठीक नाहीये. अशा रीतीने सगळे प्रपंचातले लहान-लहान जे काही त्यांना प्रश्न होते, त्यासाठी ते सहजयोगात येतात. सुरुवात तशीच होते. आपण देवाकडे सुध्दा प्रपंचाच्या त्रासाला कंटाळून किंवा प्रपंचाच्या दुःखाला निवारण करण्यासाठी म्हणून जातो आणि परमेश्वराजवळ सुध्दा आपण हेच मागत असतो, की बाबा, माझं घर ठीक राहू दे. माझी मुलं-बाळ ठीक राहू दे. आमच्या घरात सुखाचा संसार होऊ देत. सगळे आनंदाने नांदले म्हणजे झालं. इथपर्यंत मनुष्याची कोती वृत्ती आहे आणि त्या कोती वृत्तीने तो बघतो. पण ती कोती वृत्ती सुध्दा फार जरुरी आहे. जर ती नसली तर पुढचं जमणार नाही. पहिल्या पायरी शिवाय तुम्ही दुसऱ्या पायरीवर येऊ शकत नाही.

तर सगळ्यात मोठी सहजयोगातली पायरी म्हणजे प्रपंच हा पाहिजे. आम्ही संन्याशाला आत्मसाक्षात्कार देऊ शकत नाही. देऊ शकत नाही. काय करणार? पुष्कळदा करून पाहिलं, पण जमतच नाही. मग त्याला सांगायच, की बाबा, तू हे कपडे बदल, ते बदलून तू ये. म्हणजे आम्ही तुम्हाला आत्मसाक्षात्कार देऊ. म्हणजे जे जमत नाही त्याच्याबद्दल उगीचच आपण मोठेपणा कशाला द्यायचा. त्याला कारण असं, की आपण जे कपडे घातलेले आहेत संन्याशाचे, हे बह्यातल सगळं आहे. आतमध्ये तुम्ही संन्याशी झाला का? संन्यस्त हा एक भाव आहे. हे काही कपडे घालून दाखविण्याचा भाव नव्हे, की आम्ही संन्याशी आहोत. आम्ही संन्यास घेतला, आम्ही घर सोडलं, आम्ही हे सोडलं, आम्ही ते सोडलं. हे सांगून जे लोक म्हणतात, की आम्ही योग मार्गाला येऊ ही स्वतःची दिशाभूल करून घेतात.

जर तुम्ही पलायनवादी आहात. एस्केपिझम् तुमच्यामध्ये असलं, तर त्याला काहीच इलाज नाही. पण ज्या माणसामध्ये थोडीशी सुध्दा सुबुद्धी असेल त्याने विचार करावा, की ह्या इथे आम्ही प्रपंचात आहोत. तिथून आम्ही निघू जर काय मिळवलं तरी त्याचा उपयोग काय? समजा एखाद्या जंगलात तुम्हाला घातलंय आणि तिथं पाणी नाही, आणि तिथे बसून जर तुम्ही म्हणाला, की बघा, मी पाणी प्यायल्याशिवायच मेलो किंवा राहतो. तर, काय विशेष आहे. पाण्यात राहूनच जर तुमच्यामध्ये अशी परिस्थिती आली, की तरीसुध्दा तुम्हाला काय पाण्याची गरज लागत नाही. तुम्ही पाण्यात राहूनच त्या पाण्यापासानं अलिप्त आहात. अशी जर, तुमची स्थिती आली तर, खरा प्रपंच झाला आणि त्याची आज आपल्याला फार गरज आहे अशा प्रपंचाची.

आपल्याला जनकाबद्दल माहितच असेल, की नचिकेताला असं वाटलं, की हा जनक राजा, जो म्हणजे आपल्या डोक्यावर मुकुट धारण करतो. त्याच्याकडे सगळ्या दास-दासी वगैरे, नृत्य, गाणी वगैरे होत असतात. हा आमच्या जेव्हा आश्रमात येतो, तेव्हा आमचे गुरू उठून त्याच्या पायावर कशाला पडतात? असा हा कसा थोर? तर गुरूंनी सांगितलं, बरं बाबा, तू जा आणि बघ हा थोर का आहे. तर नचिकेता जाऊन एकदम उभे राहिले आणि म्हणाले, मला तुम्ही आत्मसाक्षात्कार दया. माझ्या गुरूंनी सांगितलं, तुम्ही आत्मसाक्षात्कार देता. मला दया. त्यांनी सांगितलं, हे बघ, तू सर्व जगाचं ब्रह्मांड मागितलंस तर मी देईन. पण आत्मसाक्षात्कार , मी देऊ शकत नाही. त्याला कारण असं, की त्यानी पृच्छा केली, ज्याच्यातलं तत्वच त्याला समजलेलं नाही, त्या माणसाला आत्मसाक्षात्कार कसा द्यायचा. जो मनुष्य तत्त्वाला समजून घेईल त्यालाच त्याच्या तत्वात उतरवता येतं. तर प्रपंचाच तत्व जे आहे ते ‘प्र’ आहे आणि ते ‘प्र’ जो प्रकाश आहे तो जोपर्यंत आपल्यामध्ये जागृत होत नाही, तोपर्यंत आपण पंचातच आहोत. अजून प्रपंचात उतरलेले नाही.

नचिकेतानी जेव्हा, असा सवाल टाकला तेव्हा त्यांनी सांगितलं. बरं, आता तू माझ्याबरोबर रहा आणि आपल्याला सगळी त्यांची कहाणी माहिती आहे. मला परत सांगायला नको, की शेवटी त्या नचिकेताच्या असं लक्षात आलं, की हा मनुष्याला कोणच्याच तऱ्हेची ओढ किंवा फिकीर नाही किंवा त्याच्याबद्दल आत्मीयता नाही. ज्याला आपण संसार म्हणतो. आणि हा एक अवधूतासारखा राहणारा मनुष्य आहे. फक्त वाटलं तर डोक्यावरती मुकुट घालतो आणि नाही तर आरामात जमिनीवर झोपतो. बादशहा मुळी. त्याला काही आराम नको. वाटलं तर पलंगावर झोपेल. गादया-गिरद्यांवर लोळेल. नाहीतर जमिनीवर म्हटलं तर जमिनीवर राहील. असा हा बादशहा आहे. त्याला कशाचीच फिकीर नाही. त्याला काहीच धरलेलं नाही.

तर जो मनुष्य प्रपंची आहे, त्या माणसाला आराम किंवा कोणत्याही अशा गुलामीची सवय होत नाही. त्याला तुम्ही म्हटलं तर, तो धोंड्यालावर सुध्दा आपलं डोकं ठेवून झोपेल. कोंडा खाऊन राहील आणि नाहीतर मेजवान्या दिल्यातर, मेजवान्या ही खाईल. त्याला, जर उद्या प्रश्न विचारला, की बुवा, आता तुमचं जर आश्रम बांधायचं तर कसं? तर तो सगळे तुम्हाला सिमेंटच्या दरापासून सगळं सांगेल. हे कुठे मिळेल, ते कुठे मिळेल, सगळं सांगेल. पण आतून त्याबद्दल कोणतीही त्याला पकड नाहीये, ही गोष्ट. ही तत्वाची गोष्ट आपण आधी लक्षात ठेवली पाहिजे.

नामदेवांनी एक कविता लिहिलेली आहे आणि ती गुरुग्रंथसाहेबमध्ये नानकसाहेबांनी शिरसावंद्य मानून लिहिलेली आहे आणि अत्यंत सुंदर आहे. तिचं मी नुसतं वर्णन सांगते. त्या कवितेत असं म्हटलेलं आहे, की आकाशात भरारी मारत पतंग उडत आहे आणि एक मुलगा पतंग ती हातात धरून उभा आहे. तो सगळ्यांशी बोलतो, खेळतो, हसतो, पुढे-मागे जातो, इकडे-तिकडे धावतो, पण लक्ष सारं त्या पतंगावर आहे. दुसऱ्या याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे, की पुष्कळशा बायका पाणी भरून चाललेल्या आहेत आणि रस्त्यानी जाताना आपापसात हसत आहेत. काहीतरी थट्टा करत आहेत, मस्करी करत आहेत. काहीतरी घरच्या गोष्टी बोलत आहेत. पण लक्ष सारं त्यांच्या डोक्यावर असलेल्या हंड्यावर आहे, की पाणी सांडलं नाही पाहिजे. नंतर आई बरोबर वर्णन आहे, की आई ही मुलाला घेऊन कडेवर घेऊन सगळं काम करते. चूल पेटवते, स्वयंपाक करते, सगळ्या तऱ्हेची कामं करते आणि त्या कामामध्ये कधी वाकते, कधी धावते. काही जे जमेल ते करावं लागतं तिला. पण लक्ष तिचं सर्ववेळ त्या मुलावर आहे, की तो मुलगा नाही पडला पाहिजे. तसचं संत-साधूंच आहे, की सर्व करायचं ज्यांना ज्ञान असतं ते सर्व कार्य करत असतात आणि ते करत असताना सुध्दा चित्त त्याचं आत्म्यावर असतं. म्हणून, जरी ही मंडळी अगदी आपल्यासारखी, घर गृहस्थातली, त्यांना मुलं-बाळं असतात. सगळं असतानासुध्दा त्यांच्यातल जे वैचित्र्य आहे हे आपण तत्त्वावर येऊन ओळखलं पाहिजे, की त्याचं वैचित्र्य काय आहे? आणि तेच म्हणजे सहजयोग आहे. ते वैचित्र्य आपल्यात आलं म्हणजे आपल्याला ही त्याने काय लाभ होतो ते पाहिलं पाहिजे. कारण प्रपंचात पहिल्यांदा आपण हे लाभ आणि तोटा, पहिल्यांदा बघतो. लाभ किती आहे? आणि तोटा किती आहे?

पैकी सुरवातीला सांगायच म्हणजे असं, की परमेश्वर हा सर्वांच्या पलीकडे आहे असं म्हणतात. पण त्याचा पुष्कळांना अर्थ लागलेला नाही आणि परमेश्वराच्या गोष्टी आजकालच्या जमान्यात करणं म्हणजे सुध्दा लोकांना असं वाटतं, की हया बाईनां अजून काही, आधुनिक शिक्षण वगैरे काही मिळालेलं नाही आणि हया काहीतरी जुन्या आपल्या आजीबाईच्या गोष्टी सांगत बसलेल्या आहेत. पण, परमेश्वर हा आहे आणि तो राहणार आणि तो अनंतात आहे. पण परमेश्वर आपल्याबरोबर प्रपंचात कसा कार्यान्वित होतो ते पाहिलं पाहिजे.

सर्वप्रथम म्हणजे कोणताही प्रश्न घ्या. आता एखाद्याने येऊन मला सांगितलं समजा, की माताजी, माझ्या घरी हा त्रास आहे. मला नोकरी नाही किंवा काहीतरी अगदी अशा गोष्टी, की ज्याला आपण म्हणू, की अत्यंत क्षुद्र वस्तू आहेत, जड वस्तू आहेत. त्या गोष्टींबद्दल मला येऊन सांगितलं. माताजी, हे असं आहे, तसं आहे, आणि तो थोड्या दिवसांनी सांगतो. माताजी, ते तर ठीकच झालं सगळं काही. पण हे होत कसं काय? हे पाहिलं पाहिजे. हे जमतं कसं? ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे.

परवा आमची एक शिष्या आहे फॉरेनर. मी शिष्या वगैरे म्हणत नाही, मुलच म्हणते. दोन मुली होत्या. त्या जर्मनीला एका मोटारीनं चालल्या होत्या आणि जर्मनीला ‘ऑटोबान’ म्हणून फार मोठे रस्ते असतात आणि जोरजोराने गाड्या इकडून-तिकडे जात असतात. तर तिने मला पत्र लिहिलं, की दोन्हीकडनं लॉऱ्या, मोठ-मोठाल्या बसेस, मोठ-मोठाल्या त्यांचे ते कारचे हे असतात डबल लोडर्स ते घेऊन असे हे सगळं चाललेलं होतं आणि मध्ये आमची गाडी आणि माझा ब्रेक ही फेल झाला. आणखीन गाडीही वॉबलिंग करायला लागली. तर मला असं वाटलं आता मी गेले. वाचू शकणारच नाही. काही असलं तर एका परिस्थितीत वाचू शकले असते जर ब्रेक तरी बरा असता तर. तर ते ही जमत नाही. तर त्या एकंदर परिस्थिती मध्ये जी तिच्यामध्ये प्रवृत्ती निर्माण झाली, ज्याला आपण इमर्जन्सीची प्रवृत्ती म्हणतो. त्यावेळेला जे एक तिच्यामध्ये विशेष म्हणजे, आता सगळं सुटलं, आता काही राहिलेलं नाही. शेवटी दशेला आलो आपण. तेव्हा शरणागत होऊन तिने म्हटलं, माताजी, आता तुम्ही काय करायचं ते करा, मी आता डोळे मिटते. आणि तिने डोळे मिटले. तिच्या पत्रात अस होतं, की थोड्या वेळाने मी बघते. माझी गाडी चांगली किनाऱ्याला आलेली आणि माझा ब्रेकही ठीक झाला. आता माताजींनी काही केलेलं नाही. हे तुम्ही बघा. ते होतं कसं? की तुमचा जो परिणाम झालेला आहे. तो कोणच्या तरी कारणाने असतो. म्हणजे कॉज आणि इफेक्ट.

तुमच्या घरामध्ये भांडणं आहेत समजा. त्याला कारण समजा तुमची बायको किंवा तुमची आई किंवा तुमचे वडील. कुणीही एक ‘अ’ असला, मनुष्य आणि त्याचा परिणाम असा, की घरामध्ये सगळी अशांती आहे. परिणामस्वरूप जे आहे, ती म्हणजे अशांती आहे. जर मनुष्य सर्वसाधारण बुध्दीचा त्या परिणांमांशीच भांडत असतो. असं झालं ना त आता याच्याशी भांडायचं. मग दुसरं भांडण मिळेल म् तिसरं भांडण मिळेल. आता त्याच जे कारण आहे म् त्याच्यावर येतात काही लोक. सूक्ष्म बुध्दी, की ह्याच हे कारण आहे. त्या कारणाशी भांडण करायचं. त्या कारणाशी भांडण सुरू झालं म्हणजे तो कारण ही त्यांच्याशी झगडू लागतो आणि कारण आणि परिणाम ह्याच्या चक्करात ते असतात आणि ते दोन्हीही प्रश्न जसेच्या तसे राहून जातात. त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही आणि म्हणून प्रपंच फार कठीण असं सगळे लोक म्हणतात. ह्याच्यावर ताण काय आहे? ह्याच्यावर ताण हे आहे, की ह्याच जे कारण आहे, त्या कारणाच्या पलीकडे गेलं पाहिजे. त्याच जे कारण होतं तिचा ब्रेक तुटला होता. त्या ब्रेकशी ती झुंजत होती आणि तिच्या गाडीला वॉबलिंग आलं, त्याच्याशी ती झुंजत होती. पण ह्याच्या पलीकडे काही तरी आहे, असं जर तिला वाटलं. अशी काही शक्ती आहे आणि त्याला जर ती शरणागत गेली, त्या शक्तीला तर ती कारणांच्या पलीकडे असल्यामुळे कारण ही नष्ट झालं आणि त्याचे परिणाम ही नष्ट झाले. हे असं होतं जरी तुम्ही अविश्वास करा किंवा विश्वास करा, ही गोष्ट होते. पण अंधविश्वासाने होत नाही.

म्हणजे पुष्कळसे लोक माझ्याकडे येऊन म्हणतात, माताजी, आम्ही एवढं देवाचं ध्यान करतो पण आम्हाला कॅन्सर झाला. आम्ही एवढे देवळात जातो. सिद्धीविनायकाला रोज जाऊन उभे राहतो आम्ही, तासन् तास. मंगळवारी तर विशेष करून जातो. पण तरीसुध्दा आमचं काही भलं झालेलं नाही. हया देवाने आमचं काही भलं केलं नाही. अशा देवाला आम्ही कशाला भजायचं? कबूल आहे. अहो, तुम्ही ज्या देवाला बोलवता त्याचा तुमचा काही संबंध झालेला आहे का? काही कनेक्शन घडलेलं आहे का? तुमचं जोपर्यंत कनेक्शनचं नाही, तेव्हा तुमचं, भलं काय होणार?

देवापर्यंत तुमचं टेलिफोनचं कनेक्शन तर जायला पाहिजे. इकडे बसून तुम्ही रात्रंदिवस पूजा करता परमेश्वराची. पण त्या परमेश्वराला ऐकायला आलंय का? तुम्ही काय बोलता ते. वाट्टेल ते धंदे करा. वाट्टेल तसे वागले आणि त्याच्यानंतर, हे परमेश्वरा, तू मला देतोस, की नाही, म्हणून ठिय्या मारून बसले. पण म्हणून त्या परमेश्वराने तुम्हाला कशाला द्यायचं? बरं तुमचं काही असलं तर तुम्ही जाऊन इथल्या भारतीय गवर्नमेंटला जाऊन काहीतरी मागून घ्या. तुम्ही त्यांचे नागरिक आहात. परमेश्वराच्या साम्राज्याचे नागरिक नाहीत. त्याच्या साम्राज्याचे आधी नागरिक व्हा, मग बघा. त्याच्या आधीच तुम्ही परमेश्वर हे नाही करत.

आता समजा इथे बसल्या-बसल्या कुणी जर इंग्लंडच्या राणीला म्हटलं, की ती आमच्यासाठी हे नाही करत, ते नाही करत. तिने कशाला करायचं? पण हा तर परमेश्वर आहे आणि हया परमेश्वरानी तुमच्यासाठी का करायचं? तुम्ही त्याच्या साम्राज्यात अजून आलेले नाहीत. फक्त त्याच्यावरती नुसती दडपशाही किंवा तानाशाही करायची, की अरे, परमेश्वरा जसं काही खिशातच बसलेला आहे. नंतर हा ही आपल्याला विचार असेल, की आता आम्ही परमेश्वराच स्मरण करायचं. सुस्मरण म्हटलेलं आहे, स्मरण काही म्हटलेलं नाही. सुस्मरण करतांना सुध्दा ‘सु’ आहे, की नाही ते पाहिलं पाहिजे ना. ‘सु’ म्हणजे काय? जसा ‘प्र’ शब्द आहे तसाच ‘सु’ शब्द आहे. ‘सु’ म्हणजे जिथे मनुष्याशी संबंध होऊन तुमच्यामध्ये मांगल्याचा आशीर्वाद झालेला आहे. तेव्हाच ते सुस्मरण होणार. नाहीतर बसलेत आपले पोपटपंची करत. त्याचा परिणाम तरुण पिढीवर होतो.

तरुण पिढी म्हणते, की हया परमेश्वराला अर्थ काय आहे? नुसते इकडे ते दोन बुवा आले, त्यांनी पैसे घेऊन गेले आईकडनं. तिकडे कोणी गंडा बांधून गेले, ते चार पैसे घेऊन गेले. अशा परमेश्वराला काय? म्हणून ती ही बाजू बरोबर वाटते. म् त्याच्यात जास्त लोक जाऊ लागतात, की परमेश्वर हा नाही. पण सर्वप्रथम जे आपलं चुकलेलं आहे, ते हे, की आमचा परमेश्वराशी संबंध आहे का? आमचा त्यांच्यावर अधिकार आहे का? आम्ही त्यांच्यासाठी काय केलं हे नको. पण संबंध आधी करून घ्या.

आता सहजयोग म्हणजे परमेश्वराशी संबंध करणे. ‘सहज’ सह म्हणजे तुमच्या बरोबर, ’ज’ म्हणजे जन्मलेला. असा तुमच्यामध्ये जो योगाचा, योगसिध्दीचा जो तुमच्यामध्ये हक्काचा भाग आहे तो म्हणजे सहजयोग आहे. तुमच्यामध्ये परमेश्वराने कुंडलिनी म्हणून एक शक्ती ठेवलेली आहे. ती आहे (अस्पष्ट....) विश्वास करा अथवा नका करू. कारण ढोबळ डोळ्यांना काही सांगायच म्हणजे प्रश्नच असतो. विशेषतः आपल्याकडचे जे साहित्यिक आणि वैचारिक लोक आहेत त्यांच्या डोक्यात तर कधीच घुसणार नाही. कारण वैचारिक लोक म्हणजे विचारांनी चालणार आणि विचार म्हणजे कोणाकडे धावतील सैरावैरा ते काही सांगता येत नाही. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही, वैचारिक लोकांचा, म्हणून एवढी भांडणं. तेव्हा विचारांच्या पलीकडे जी शक्ती आहे, जिच्याबद्दल आपल्या देशात तरी परंपरागत अनादीकाळापासनं सांगितलेलं आहे, तिकडे थोडं तरी लक्ष द्यायला पाहिजे. पण अहंकार इतका आहे या वैचारिक लोकांमध्ये, की तिकडे लक्षच द्यायला तयार नाही. कदाचित त्यांच्या पोटावर पाय येत असेल. पण सहजयोगात आल्यावर पोटावर आशीर्वाद येतो. परमेश्वराशी संबंध झाल्यावर तुमचे प्रश्न असे सुटतात, की तुम्हाला स्वतःलाच आश्चर्य होतं, की असं आम्ही केलं तरी काय? एवढं परमेश्वराने आम्हाला दिलं तरी कसं? एवढी व्यवस्था झाली तरी कशी? असा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारून अगदी स्तंभित होता.

ज्ञानदेवाचं आता आपण ऐकलेलं आहे. त्यांनी जे वर्णन केलेलं आहे ते आजचं सद्य स्थितीतलं आहे. हे सगळं होणार आहे.

“ जो जे वांछील ते लाहो ”

ते सगळं होणार आहे. पण ते करण्यासाठी फक्त कुंडलिनी जागृत आधी करून घ्या. त्याच्याशिवाय मात्र आम्ही कोणतंही वचन देणार नाही, अन् आश्वासन देणार नाही मिनिस्टर लोकांसारखं. जे आहे ते आपल्याच भाषेत, आपल्या तऱ्हेच मी बोलते. काही साहित्यिक बोलत नाहीये. जसं आई घरगुती बोलते तसं आपल्याला मी समजावून सांगत आहे, की आपल्यामध्ये ही शक्ती, ही संपदा आहे. ही मिळवून घेतली पाहिजे.

तुम्ही प्रपंचात गुरफटले असं म्हणता. गुरफटले म्हणजे काय? हा असा आपण विचार केला, अहो, आता मी फार गुरफटलो आहे. गुरफटलो म्हणजे कसे गुरफटले. तर हे, की नसत्या गोष्टींचं मला जास्त महत्त्व झालेलं आहे. आता म्हणजे माझं हे महत्व आहे, की मला नोकरी मिळालीच पाहिजे. नोकरी का मिळत नाही. कारण बेकारी जास्त आहे. बेकारी का जास्त आहे म्हणजे फार बेकार वाढले म्हणून. तर ते वाढतच जाणार. हया कारणापलीकडे जायचं कसं? त्याला इलाज हा, की ही जी शक्ती सगळीकडे वास करते त्या शक्तीचं आलंबन केलं पाहिजे.

सर्व प्रथम ही शक्ती आपल्यामध्ये मूलाधार चक्रावर असते. मूलाधार चक्रामध्ये ही जी शक्ती असते, ती प्रपंचामध्ये कशी कार्यान्वित असते ते बघा. आपलं लक्ष तिकडे असायला पाहिजे आणि विचार हा केला पाहिजे. सर्व प्रथम मूलाधारामध्ये असलेली ही कुंडलिनी शक्ती, श्री गणेश कृपेने तिथे बसलेली आहे. आता या महाराष्ट्राला फार मोठं वरदान आहे म्हटलं पाहिजे, की श्री गणेश येथे अष्टविनायक बसलेले आहेत. हा तुमच्यासाठी फार मोठे परमेश्वराने उपकार दिले आहेत. त्याच्यामुळेच महाराष्ट्रात सगळ्यात जास्त सहजयोग जमतोय मला. कारण गणेशाची जी खोली आहे, जे सखोल त्याच तुमच्यावरती आवरण आहे. त्या आवरणानी खरोखर माझी फारच मदत झालेली आहे. तर हा श्री गणेशच तुमच्या मूलाधारात बसलेला आहे.

आता एखादा डॉक्टर असला. आपल्या घरी फोटो लावून ठेवेल गणेशाचा. वाटलं तर एक देऊळ ही करील. तिथं जाऊन रोज नमस्कार करेल. पण त्या गणेशाचा आणि डॉक्टरीचा काही संबंध आहेत, ते मात्र त्याच्या लक्षात कधी येणार नाही आणि तो ते मान्य ही करणार नाही. पण गणेशाशिवाय डॉक्टरीसुध्दा काही नाहीये. आता ही जी गणेश शक्ती तुमच्यामध्ये वास करते त्या गणेश शक्तीमुळे आपल्यामध्ये जी मुलं-बाळं होतात ती सर्व त्या गणेश शक्तीमुळे होतात.

आता हा विचार करा. की एक आई आणि एक वडील त्यांचे चेहरे-मोहरे जसे आहेत तसाच तो मुलगा जन्माला येतो. हजारो लोक, करोडो लोक हया देशात, तसेच इतर देशात सुध्दा आहेत. पण प्रत्येकाचा मुलगा आणि मुलगी एकतर आई-वडिलांवर किंवा आजोबा-आजीवर कुणावर तरी फॅमिलीच्या एकंदर चेहऱ्या-मोहऱ्यावर जाते. तर ह्याच जे चयन आहे ते कोण करतं? तर आपल्या घरामध्ये जर गणपती असला, तर हे आपलं एक कर्तव्य आहे, की त्याच जे इनोसेन्स आहे, त्याची जी अबोधिता आहे ती आपण स्विकार्य केली पाहिजे. ही आपल्यामध्ये जर अबोधिता आली. घरामध्ये लहान मुलं असतात. लहान मुलं म्हणजे किती अबोध. त्यांच्यासमोर आपण शिव्या देतो, वाईट शब्द, अशा वातावरणात त्यांना वाढवतो. जिथे सगळं अमंगळ आहे. त्यांना वाट्टेल ते करू देतो किंवा त्यांच्याकडे लक्षच देत नाही. हे घरातले गणपती त्यांच्या संवर्धनात, संगोपनात आपल्याला लक्ष नाही.

आजकाल तर इंग्लंडमध्ये मी बघते, की ऐंशी वर्षाच्या बायकासुद्धा लग्न करतात. तेव्हा आता काय बोलावं ते समजत नाही आणि तिथलं इथे आणू नका म्हणजे मिळवलं. तिथली घाण तिथेच राहू द्या. जे सडत आहेत त्यांना सडू दे. तुम्ही ती इकडे घेऊन येऊ नका. ते ‘अति शहाणे त्यांचे बैल रिकामे’ आहेत. तेव्हा त्यांची आपल्यावरती अवकृपा झाली नाही पाहिजे. आधी हा निश्चय केला पाहिजे, जर तुम्हाला आपले प्रपंच टिकवायचे तर. हे सगळे सुशिक्षित लोकांना मला सांगायचं आहे. सुशिक्षित बरं, का. शिक्षित नाही सुशिक्षित. तर हा श्री गणेश आपल्यामध्ये बसून आपल्या मुलांचं संगोपन करतो. पहिल्यांदा जनन म् संगोपन आणि तो जो भोळा गणेश आहे, तो सगळ्या घरांना, घरातल्या लोकांना आनंद देतो. एक घरात मुलं जन्मलं म्हणजे किती आनंद होतो आपल्याला आणि त्या मुलापासनं किती तरी आनंदाच्या लहरी घरात पसरत असतात. पण एखाद्या घरात मुलं नसलं, की कसं ओक्-ओक् वाटतं. किती त्याच्यामध्ये असं वाटतं, की हया घरात येऊच नये. कारण तिथे किलबिल नाही मुलांची. ते हसणं नाही, ते खिदळणं नाही, त्या खोड्या नाहीत. त्याला काही माधुर्य राहत नाही त्या घराला.

पण आजकाल जमाना दुसरा झालेला दिसतोय कारण जितके देश श्रीमंत आपण म्हणतोय (अस्पष्ट....) आहेत. त्या देशामध्ये मुलचं होत नाही मुळी. मायनस. त्यांची लोकसंख्या घटत चालली आहे आणि आपल्या भारत वर्षाला लोकसंख्या वाढत आहे. म्हणून लोकं म्हणतात, की फार वाईट आहे तुमचा भारत. देशाला एवढी लोकसंख्या वाढली नाही पाहिजे कबूल. पण सांगायच असं, की जी मुलं आज जन्माला येत आहेत, त्यांनासुद्धा डोकं असतं. ते काय त्या देशात जन्माला येणार नाहीत. जिथं रोजच नवरा-बायको डिव्होर्स घेतात आणि मुलांना मारूनही टाकतात. ते आमच्या नशिबीच आहे. कारण इथे आई-वडिलांना मुलाच्याबद्दल जी आस्था, जे प्रेम आणि जी सहज सुबुद्धी आहे, ती ह्या लोकांमध्ये मुळीच नाही.

तुम्हाला आश्चर्य वाटेल, की त्या लंडन शहरामध्ये एका आठवड्यामध्ये दोन मुलं आई-वडिल मारून टाकतात. ऐकावं तेवढं थोडं. मला तर रोजच शॉक लागत असतो आणि त्यांना त्याच काहीच वाटत नाही. कारण अहंकारात इतके डूबलेले लोक आहेत, की त्यांना ह्याच्यात काही चुकलयं असं वाटतच नाही. तिथं गेल्यावर कळतं, की इथला माणूस किती चांगला आहे. इथले टेलिफोन्स ठीक नाहीत, कबूल. माईक ठीक नाहीत, कबूल. बाकी गाड्या ठीक नाहीत, कबूल. पण माणसं ठीक आहेत. पण ते जे ठीक आहे, त्या ठीक पणामध्ये जे गहनातलं गहन आहे ते गणेश तत्व आहे. आणि जर ज्या घरामध्ये गणेश तत्व ठीक नसलं तिथे सगळंच चुकलेलं आहे. जिथं मुलं व्रात्य आहेत, उदंड झाली आहेत, वाईट मार्गाला लागले आहेत. त्याचा दोष मी आई-वडिलांना देईन समाजापेक्षा. आजकाल आईसुध्दा नोकरी करते. वडीलसुध्दा नोकऱ्या करतात. तरी सुध्दा जितका वेळ तुम्ही आपल्या मुलांबरोबर घालवता तो किती गहन आहे. हे पाहिलं पाहिजे.

आता सहजयोगात आल्यावर काय होतं हे पाहिलं पाहिजे. म्हणजे सहजयोगाचा संबंध तुमच्या मुलांशी कसा आहे ते पाहिलं पाहिजे. सहजयोगामध्ये जेव्हा गणेश शक्ती तुमच्यात जागृत होते कुंडलिनीमुळे. तेव्हा सर्वप्रथम मनुष्यामध्ये सुबुद्धी येते. आपण त्याला विनायक म्हणतो. आणि तोच सगळ्यांना सुबुद्धी देणारा आहे आणि खरोखर तो सुबुद्धी देतो. मी अशी मुलं पहिली आहेत ज्यांना माझ्याकडे लोक घेऊन आले, की त्यांनी सांगितलं, वर्गात ‘ढ’ आहे नुसता. उद्दामपणा करतो, मास्तरांना बोलतो. मी त्याला विचारलं का रे बाबा, असं का करतोस? म्हणे, मला काही येत नाही. मास्तर मला सारखं बोलत असतात. मग मी काय करणार? तो ‘ढ’ मुलगा फर्स्टक्लास-फर्स्ट पास होतो. असं कसं घडतं?

तो गणेश आपल्यात जागृत झाल्या बरोबरच, ती शक्ती आपल्यामध्ये वाहू लागल्या बरोबरच मनुष्यामध्ये एक नवीन तऱ्हेचा आयाम, एक डायमेन्शन येतं. त्या डायमेन्शनला आम्ही ‘सामूहिक चेतना’ असं म्हणतो. त्या नवीन चेतनेमध्ये तो ज्या गोष्टी आपल्याला साधारपणे दिसत नाहीत, समजत नाहीत, उमगत नाहीत आणि वळत नाहीत, त्या सहजच करून टाकतो. हा नया आयाम ज्याला म्हणतात किंवा ही एक जी नवीन चेतनाशक्ती आपल्यामध्ये येते त्या शक्तीच्या दमावर मनुष्य खरा समर्थ होतो आणि त्या समर्थतेतच ही मुलं ज्यांना आपण म्हणतो, की बेकार गेलेली आहेत, काही कामाची नाही, दारू पितात.

आजकाल माहिती आहे, की ड्रग्सचं फार सुरू झालेलं आहे. कधी आम्ही जन्मात चरस म्हणजे काय? पाहिलं नव्हतं. आता असं कळतंय, की ते शाळेमधनं, आता आजकाल चरस विकतायत. हया सर्व मूर्खपणाच्या कल्पना, सुबुध्दी नसल्यामुळे येतात. ती सुबुध्दी जागृत झाल्याबरोबर जे चरस पित होते, इंग्लंड मध्ये किंवा अमेरिकेत, ते सोडून शहाणे झाले. ही सहजयोगाची शक्ती आहे.

मुलांमध्ये अदब आहे. अत्यंत अदब आहे. प्रत्येक घरामध्ये मी बघते आजकाल, की मुलांना अदब नाही. कारण आई-वडील सुध्दा आपापसात भांडतात, ताड-ताड बोलतात. मुलांचा मान ठेवत नाही. मुलांना वाटेल तसं वागवयचं म् मुलं ही तशीच प्रतिकृती जी आई-वडिलांची तशीच होऊन ते सुध्दा त्यांना ताड-ताड बोलतात. सहजयोगामध्ये आल्यानंतर आई-वडिलांची कुंडलिनी जर जागृत झाली आणि मुलांची झाली, तर अत्यंत व्यवस्थितपणे आदराने लोक वागतात. पहिल्यांदा आदर जागृत होतो. कोणाला म्हटलं तर आदर जागृत होणार नाही. पण सहजयोगाच्या हया कुंडलिनी जागृतीनी पहिल्यांदा मनुष्यामध्ये आदर येतो. हळू-हळू आपल्या देशामधनं आदर म्हणजे फक्त एखादा मनुष्य सत्ताधीश असला, की त्याचाच करायचा अशी प्रथा पडत चाललेली आहे. पण खरी सत्ता ही गणेशाची आहे. त्याची सत्ता ज्याच्याजवळ असेल त्याच्याच पायावर गेलं पाहिजे. बाकी सगळे बाजार बुणगे, ते अळवावरचं पाणी म्हटलं तशे आहेत. आले आणि उद्या संपणार, त्यांना काही अर्थ नाही, हया लोकांना. तेव्हा त्यांच्या समोर जाऊन मान वाकवली पाहिजे. ज्यांनी गणेशाला आपल्यामध्ये जागृत केलेलं आहे.

गणेश शक्ती जागृत होताच पुरुषांमध्ये फार फरक दिसतो. तो म्हणजे असा, की आजकाल पुरुषांची दृष्टी फार फिरायला लागली आहे. चंचल. आचाचक्र धरलं जातं. सारखं वेड्यापिशासारखं बघत राहायचं इकडे-तिकडे. बघ्या म्हणतात तशे बघ्या. आजकाल बघ्यांची म्हणजे रेलचेल आहे. महाराष्ट्रात सुध्दा सुरू झालं. आमच्या मी, आमचे, आम्ही जेव्हा लहान होतो. शाळेत, कॉलेजमध्ये शिकत होतो. आम्हाला बघे त्यावेळेला आम्ही बघितले नव्हते. पण आता हे नवीन एक आधुनिक लोक निघालेले आहेत. जे बघे आपले डोळे सारखे फिरवत असतात. त्यानी किती आतली आपली शक्ती नष्ट होते आणि त्याच्यामध्ये कोणताही आनंद नाही. जॉयलेस परसुट म्हटलं पाहिजे. त्याच्यामध्ये आपलं डोकं घालायचं आणि डोळे फिरवत राहायचे. सारखे इकडे बघ, तिकडे बघ, तिकडे बघ, तिकडे बघ. म्हणजे जाहिराती बघायच्या. तर एखादी जाहिरात राहिली म्हणजे त्यांना अस वाटतं, की आपल काहीतरी चुकलंच, की काय? की पाप केलं. परत डोळे फिरवून ती जाहिरात वाचायची. प्रत्येक गोष्ट पहिलीच पाहिजे.

असा हा जो डोळ्यांना त्रास आहे तो पार नष्ट होऊन मनुष्य एकाग्र होतो. एकाग्र बिलकुल. अशी दृष्टी वाढत गेली, की गणेश शक्ती जर जास्त जागृत झाली तर कटाक्ष, कटाक्ष, निरीक्षण म्हटलेलं आहे. तुमचा कटाक्ष कुठे पडला तर कुंडलिनी जागृत होणार. कोणाकडे तुम्ही बघितलं तर त्याच्यात पावित्र्य आलचं पाहिजे. इतकं पावित्र्य डोळ्यामध्ये येऊन जातं, की फक्त गणेशाचच कार्य आहे आणि हा आपल्या घरातच गणेश नांदत आहे. आपण आपल्यातला गणेश तेवढा ओळखला नाही. जर ओळखला असता तर आपण पावित्र्याला धरून जे पवित्र आहे ते आपण केलं पाहिजे. पण आपण आपल्या गणेशाची पूजा केली नाही, काय हरकत नाही. आपल्या घरात मुलं आलेली आहेत. त्या गणेशाला बघा. त्यांना पूजनीय करा आणि तुमच्यातलाही गणेश तुम्ही कुंडलिनी जागृत करून. पण सहजयोगाच वैशिष्ट्य असं आहे, की हे सहजच होतं. त्याला काहीही करावं लागत नाही.

कुंडलिनी जागृत झाली म्हणजे सहजच ही गणेश शक्ती आपल्यामध्ये जागृत होऊन, मनुष्याला सुबुध्दी येऊन त्याचं सगळं काही वागणं एक विशेष तऱ्हेचं होऊन जातं. आता साहित्यिक लोक जर असतील तर ते कदाचित असं म्हणतील, की माताजी, काही तरी भ्रामक गोष्टी सांगतात. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, की अहमदनगर जिल्ह्यामध्ये सहजयोगामुळे दहा हजार लोकांनी दारू सोडलेली आहे. दहा हजार लोकांनी. मी काही दारूबंदी करा वगैरे काही म्हणत नाही. मी काहीच म्हणत नाही. तुम्ही काही असलं तरी या आधी. आधी तुम्ही कसे तरी या. आल्यावर तुमचा दिवा पेटवून घ्या. दिवा पेटला म्हणजे त्याच्यात काय दोष आहे ते तुम्हालाच दिसणार. जोपर्यंत दिवा पेटला नाही, तो पर्यंत साडीला काही लागलेलं आहे का ते दिसणार नाही. एकदा दिवा पेटला कसाही अगदी थोडासा जरी पेटला तरी तुमच्या नजरेत येईल आमचं काय चुकलेलं आहे आणि तुम्हीच तुमचे गुरू होऊन घ्या आणि स्वतःला बरं करून घ्या. स्वतःला पवित्र करून घ्या आणि जे लोक पवित्र असतात त्यांच्या आनंदाला काय परीवार आहे. पारावार राहत नाही.

त्यांनी सांगितलं, ‘की जब मस्त हुए, फिर क्या बोले’, मस्तीत आलो आम्ही. त्या मस्तीत आम्ही आता बोलायचं तरी काय? अशी स्थिती होऊन जाते. पवित्रता हे आनंददायी आणि आनंददायीच नाही आहे, सबंध व्यक्तित्वाला एक तऱ्हेचा सुगंध येतो. असा मनुष्य कुठेही उभा राहिला तर लोक म्हणतील, की आहे बुवा, काही तरी विशेष आहे या गृहस्थामध्ये. ह्याच्या चेहऱ्यावरनं दिसतंय. ह्याच्या एकंदरीत वागण्यावरनं दिसतंय. ह्याच्या बोलण्यावरून दिसतंय, की हा मनुष्य काही तरी विशेष आहे. ज्यांना विशेष नाही व्हायचं त्यांच्यासाठी सहजयोग नाही. ज्यांना विशेष व्हायचंय आहे, कारण तुम्ही आहात. तुम्ही विशेष आहात. तुमच्यातच हे सगळं काही निहित आहे. ते तुम्हाला मिळवायचं आहे. ज्यांना विशेष व्हायचं आहे, त्यासाठी त्या प्रपंची लोकांसाठी, प्रपंचात राहणाऱ्या लोकांसाठी सहजयोग आहे. ज्यांना काहीही व्हायचं नाही, आम्ही अगदी अत्यंत ठीक आहोत. आम्हाला काहीच नको माताजी. बरं, नमस्कार! तुमच्यावर काही आम्ही जबरदस्ती करू शकत नाही. अहो, जर तुम्हाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळवायचं असलं तर तुमची स्वतंत्रता आम्हाला बघायची आहे. तुम्हाला जर नरकात जायचं असलं तर जा व्यवस्थित आणि जर स्वर्गात जायचं असलं तर या. बाकी आम्ही तुमच्यावरती जबरदस्ती करू शकत नाही.

तर सर्वात पहिल्यांदा आपल्या प्रपंच्यामध्ये सुखाचं निधान म्हणजे मूल हे (अस्पष्ट....). इथपासून, की त्या मुलाच्या जन्मापासून गरोदर बाईच्या त्रासापासून, सगळ्यापासनं सुटका होऊन एक उत्तम मुलगा जन्माला येतो आणि आजकल मी पाहिलेलं आहे, की जी मंडळी पार झालेली आहेत कुठे असोत. त्यांची जर लग्न झाली तर त्यांच्यापासून जी मुलं जन्माला येतात ते जन्मापासूनच पार आहेत. म्हणजे केवढे मोठे-मोठे आत्मपिंड जन्माला यायचे आहेत. सगळे मी बघते उभे आहेत, की कोण असा माई का लाल आहे, की जो आमच्या आत्म्याला धरून ठेवलंय. अहो, अशा-तशा माणसाच्या घरी साधू-संत जन्माला येत नाहीत. असे मोठ-मोठाले आत्मपिंड आज जन्माला येणार आहेत आणि त्याच्यासाठी अशा लोकांची गरज आहे, की त्यांचे प्रपंच हे खरोखर प्रकाशित आणि असे प्रकाशित प्रपंच करण्यासाठी तुम्ही सहजयोग घेऊन आपली कुंडलिनी जागृत करून घ्या.

ते झाल्यानंतर दुसऱ्या चक्रावर ज्याला आम्ही स्वाधिष्ठान चक्र म्हणतो. प्रपंचामध्ये फार लाभ होतो. स्वाधिष्ठान चक्राच पहिलं कार्य हे आहे, की तुमची गुरू शक्ती वाढते. घरामध्ये मी पाहिलेलं आहे पुष्कळशी. वडील म्हणजे काहीच नाही. आई म्हणजे काहीच नाही. लहान-लहान मुलं १५-१६ वर्षाची ती विशेष आहेत. आजकाल तर मी बघते बाजारात गेले बुवा, एखादया आमच्या म्हाताऱ्या बाई सारख्याला साडी घ्यायचा म्हणजे प्रश्नच आहे. कारण आजकाल सगळे तरूण मुलींसाठी साड्या. म्हाताऱ्या लोकांसाठी काही साड्या-बिड्या बनवायची आजकाल काही पद्धत राहिली नाही. पूर्वीच्या काळी म्हाताऱ्या लोकांच्या जवळ पैसे असायचे तर त्यांच्यासाठी सगळं असायचं. आता म्हाताऱ्याना कोणी विचारतच नाही. तेव्हा त्यांच्यासाठी एखादी साडी जरी घ्यायची म्हंटली, व्यवस्थित तरी लग्नासाठी तर, ती मिळणं कठीण.

तर त्या वेळेला जी गुरू शक्ती आपल्यामध्ये येते तेव्हा हे म्हातारपण, हे वयोवृध्द आपण झालेलो आहोत, त्याच्यातली जी तेजस्विता आहे ती जागृत होते. त्याने एक मोठा मनुष्य आता आपण बघतो का, की आपले वडील सुध्दा काहीतरी मूर्खासारखे वागतात. आई महामूर्खासारखी वागते. तिला काय बोलायचं याच ताळतंत्र नाही. अशिक्षित आहे. जंगलासारखी वागते. बाहेरून लोक आले, की त्यांच्यासमोर कसं वागायचं तिला येत नाही. सारखी ओरडत असते. तिला आपल सारं लक्ष तिचं किल्ल्यांकडे, नाही तर जात-पात घेऊन त्याच्यावर भांडण. कोकणस्थाच लग्न कोकणस्थाशीच झालं पाहिजे. देशस्थाचं देशस्थाशीच झालं पाहिजे. त्यातल्या ही पोट जातीतल्या, पोट जातीतल्या, पोट जातीतच झालं पाहिजे. नाही झालं तर सासू लागली त्रास द्यायला सूनेला. हे जे सगळे प्रकार आहेत. म्हातारपणचे ते सगळे जाऊन त्या म्हातारपणामध्ये एक तऱ्हेची तेजस्विता येते. राजेबिंडापणा येतो. आपल्या गौरवात असा मनुष्य उभा झाला म्हणजे तुम्हाला असं वाटतं, अरे बापरे, आमच्या वडिलांना झालं काय? तेव्हा पूर्वीचे जे दादा कोंडदेव वगैरे पद्धतीचे जे लोक होते तेच उभे झाले की काय? असं वाटायला लागतं आणि लगेचचं त्यांच्यासमोर आपल्या माना झुकतात.

मग तरूण मंडळींमध्ये आज जी विशेष खळबळ चाललेली आहे. उठल्या-सुटल्या घटस्फोट. बायकोशी पटत नाही. आईशी पटत नाही. वडिलांशी पटत नाही. घरात राहता येत नाही. परत घर सोडून बाहेर जायचं. लहान-लहान गोष्टींवरून भांडण-तंट्टे, हे असल्या गोष्टी चालतात. नोकऱ्या नाहीत. पैशे नाहीत. व्यसनं लागले. सर्व तऱ्हेनी आजची तरुण पिढी एका मोठ्या संक्रमण कालामध्ये पदार्पण करत आहे. त्यांची पार्श्वभूमी फार मोठी आहे. मी सांगते महाराष्ट्राची तर पार्श्वभूमी फारच मोठी आहे. पण ते सगळं विसरून ते वाचायचं नाही, ऐकायचं नाही. आता संगीताचच आपल्याकडे केवढ दान आहे महाराष्ट्रात. संतांचं केवढ दान आहे आपल्याह्याच्यात. पण ही सगळी पुस्तकं कोण वाचतं? काहीतरी घाणेरडी पुस्तकं रस्त्यावरनं घ्यायची. ती वाचायची. काहीतरी अत्यंत कृत्रिम आणि सुपरफिशियल अशा रीतीनी आजची तरुण पिढी चाललेली आहे. त्या तरुण पिढीला जर असं ठेवलं तर वाऱ्यावर विरून जाणार, बेकार जाणार. काही कामाची राहणार नाही. मला विचारा तुम्ही.

मी अमेरिकेला गेले होते. तर ६५% पुरुष बेकार झालेले आहेत. तिथले जे लोक आहेत आता त्यांना ही भीती बसली आहे, की एड्स म्हणून एक आजार आलेला आहे, तो सगळ्या तरुण लोकांना खात सुटलाय आणि त्यांना समजत नाही, की ह्या आजारातनं निघायचं कसं? त्याला कारण असं, की ह्याच्यात काय आहे वाईट? हे केलं तर काय वाईट? हो असतील, रामदास स्वामी ते पुराणातील वांगी पुराणात ठेवा. आम्हाला काय करायचंय? आम्ही आता मॉर्डन झालो. निघाले मोठे मॉर्डन व्हायला. पण ते मॉर्डन कुठे गेले ते जाऊन बघायला पाहिजे ना. त्या देशाला जाऊन बघा त्या तरुणांची काय स्थिती आहे. जर तुम्ही नॉर्वे आणि स्वीडन देशांमध्ये जाऊन बघितलं. आपल्या इथले साहित्यिक इथेच बसून खर्डेघाशीत असतात. तिथे जाऊन जरा बघायला पाहिजे. तर तिथले तरुण लोक रात्रंदिवस हाच विचार करत असतात, की आम्ही कसं, आम्ही कशाप्रकारे आत्महत्या करावी? एकच विचार आहे त्यांच्या डोक्यात, की आता आत्महत्या हाच आम्हाला एक मार्ग आहे. तर वाऱ्यावर जे विरून गेलेले लोक आहेत, तसलं मॉर्डन व्हायचं असलं तर आमचा नमस्कार.

पण जर तुम्हाला आतल्या शक्तीवर उभ रहायचय. त्याच्यावर जी इमारत बांधायची आहे, कारण तुम्ही विशेष आहात. तर मात्र तुमचं जर असं जे वागणं चालेललं आहे. ते थोडं थांबवायला लागेल. थोड शांत होऊन विचार केला पाहिजे. हे जे सगळे वेड्यासारखे धावत सुटलेले आहेत. ती जी रॅट-रेस आहे, त्याच्यात मी धावतो आहे का? एक मिनिट शांत उभ राहून विचार केला पाहिजे, की आमचा वारसा काय आहे? अहो, बापाचं जर एक एवढंस चिरगुट जरी राहिलं तरी मुलं जातील कोर्टात भांडायला. पण ह्या देशाची, आपल्या देशाची जी इतकी मोठी परंपरा आहे. तिकडं मात्र कोणाचच लक्ष नाही, की ती वाहत चालली ती गेली, संपत चाललेली आहे. तिचा आम्ही काय फायदा करून घेतलेला आहे. त्याची जाणीव सहजयोगात आल्यावर तरुण मुलांना होते. कारण सर्वप्रथम त्यांना कळतं, की आम्ही आहोत. त्याच्यापेक्षा काहीतरी विशेष आहोत.

मी लहान असताना माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं, की सर्वात पहिल्यांदा त्यांची जागृती झाली पाहिजे. कारण जे दहव्या मजल्यावर लोक राहतात सगळे साधू-संत दहव्या मजल्यावर, त्यांना हे माहिती नाही, की ह्यांनी एकही मजला अजून पाहिलेला नाही बाकीच्यांनी. त्यांना जे सांगितलं ते यांच्या डोक्यात तरी जातं का? आपली भजनं म्हणायची, टाळ कुटून-कुटून म्हणायचं. पण त्याच्यातल काही डोक्यात येतं, की नाही हा विचार नसतो. तर ह्या लोकांना कमीत-कमी एक मजला जरी चढवलं गेलं तर कळेल, की ह्याच्या पलिकडे काहीतरी आहे.

तेव्हा ह्या मानवीय चेतनेच्या पलिकडे एक फार मोठी महान चेतना आहे. जिला ऋतंभरा प्रज्ञा म्हणतात. की तुम्हाला सहजच सुगमच मिळते. ती मिळवून तुम्ही काय आहात तिकडे आधी तुमचं दर्शन व्हायला पाहिजे. तुम्ही किती महान आहात, किती मोठे आहात आणि तुम्ही आपल्या आयुष्याचा जो खेळ खंडोबा मांडलेला आहे तो तुम्हाला शोभतो का? किती तुमच्याजवळ संपत्ती आहे तुम्ही आपली काय इज्जत केली. तुम्हाला आपल्याबद्दल काही कल्पनाच नाही. हा विचार थोडासा आपण लक्षात घ्यावा आणि सहजयोगात येऊन आपली जागृती करून घ्यायची. ह्याप्रमाणे जी आजची तरुण पिढी आहे, ती सुध्दा परमेश्वराच्या साम्राज्यात फार सहज उतरू शकते. तरुण लोकांना पार करणं फार सोपं काम आहे, खरं पाहिलं तर. कारण सगळं भोळेपणाच करतात. त्यांच काय आहे सगळं भोळेपणात. एक मुलगा सिगारेट पितो, म्हणून मी पितो, चला. त्यानी काही विशेष तऱ्हेचे कपडे घातले, की मी ही घालतो. त्याच्या पलिकडे काही नाही. भोळेपणा आहे. पण त्या भोळेपणात सुध्दा कधी-कधी विपर्यास होऊ शकतो. पण ती तरुण मंडळी आज कुठल्या कुठे पोहचू शकतात.

आज आपल्या देशात कमतरता कशाची आहे? कोणी म्हणेल जेवणाची आहे, खाण्याची आहे. तसं काही दिसत नाही मला. उलट मला वाटतं जास्तच आपण खातो नेहमी आणि दुसऱ्यांनाही देतो. मी इथे आले म्हणजे सगळे हात जोडून म्हणत होते बाबा, आता जेवणाचं बंद करा, बंद करा, बंद करा मला नको. प्रत्येक मनुष्य इथे येऊन सांगतो, की हिंदुस्तानात कमतरता काही दिसत नाही. कारण इतकं खायला देतात, आग्रह करून-करून, की अगदी असं वाटतं नको रे बाबा. तर कमतरता कसली आहे आपल्याकडे, डोकही पुष्कळ आहे. वाद-विवाद करण्यामध्ये नंबर एक. जर उभ केलं तर माझ्याही पेक्षा जबरदस्त भाषण देतील. फार हुशार आहोत आपण.

सगळ्या गोष्टीत हुशार आहोत. सगळं काही आहे आपल्याकडे. सोनं, चांदी, नाण सगळं काही आहे. कमतरता कसली आहे? हा विचार करून बघा, की आपल्यामध्ये कसली कमतरता आहे. आणि एकच कमतरता आहे, की अजून आपल्याला ही जाणीव नाही, की आपण आहोत कोण? मी कोण आहे? ह्याची जाणीव अजून आपल्याला झालेली नाही आणि ज्यावेळेला ही जाणीव होईल त् सबंध शरीर अगदी पुलकित होऊन तुमच्या अंगातनं प्रेमाच्या नुसत्या अशा सरी, असे चैतन्याच्या लहरी वाहायला लागतील. नुसता हा एकदा तुमच्यामध्ये कार्यक्रम घडला पाहिजे. हा कार्यक्रम घडणं, ह्याची कोणी गॅरंटी देऊ शकत नाही. घडला तर घडेल, नाहीतर नाही घडणार. आज नाही घडेल तर उद्या घडेल. पण एवढी गॅरंटी मात्र खरी, जर तुम्ही आलात वारंवार तर अगदी घडणार आहे. पण दुसरी गॅरंटी मात्र तुम्ही द्यायला पाहिजे, की हा कार्यक्रम घडल्यानंतर, की मी मात्र जमलो पाहिजे.

आताएक हजारो मंडळी इथे आलेली आहेत. सगळे पार होतील बहुतेक, परमेश्वरी कृपेने. त्याच्यानंतर मग झालं, आता आम्ही पार झालो (अस्पष्ट....). एका लहान ‘बी’ ला जसं रोपं येतं. तसच तुमची कुंडलिनी सुध्दा अगदी आतून ब्रह्मनाडीतनं धावते. एक केसासारखी फक्त उठवते मी. पण ती पुढे वाढवायची कशी? तिला पाणी कसं द्यायचं? तिला संभाळून कसं न्यायचं? तिचा वृक्ष कसा करायचा? हे सगळं तुम्ही शिकलं पाहिजे. तिकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि त्याच्यासाठीच आपल्यामध्ये अजून ती सखोल प्रवृत्ती आलेली नाही. म्हणजे ज्याला म्हणतो आपण सिरीयसनेस नाही आहे. त्याच गांभीर्य आपल्यामध्ये नाही आहे. आणि ते गांभीर्य सुटलेलं आहे. ते गांभीर्य मात्र आपल्याला परमेश्वरी कृपेने अत्यंत (अस्पष्ट....) आणि ते ह्या एका पन्नास वर्षांमध्ये अस कुठे लोप होऊन गेलं ते समजत नाही.

हया प्रपंच्यामध्ये जे तुमचे आर्थिक प्रश्न आहेत. महाराष्ट्रामध्ये पहिला म्हणजे माताजी, तुमच्यामुळे गरिबांना काय फायदा होईल? अहो, तुम्ही गरीब आहात, की श्रीमंत? मध्यम आहोत म्हणे. बरं, मगं काय तुमचा, काय फायदा पाहिजे. तुम्ही मध्यम असा, नाहीतर श्रीमंत असा, नाहीतर अति श्रीमंत असा, नाहीतर गरीब असा, कोणालाही समाधान नाही. एक रेडिओ आला तर, आता त्याचा तो व्हिडिओ आला पाहिजे. व्हिडिओ आला तर, अमुक यायला पाहिजे. मग त्याच्यानंतर मग एरोप्लेन यायला पाहिजे. त्याने आणखी पुढे काय आणतील देवाला ठाऊक. म्हणजे एक साधारण इकॉनॉमिक्सच शास्त्र आहे, की इन जनरल, सर्व साधारणपणे वॉन्टस् कधीच पूर्ण होत नाही. तुम्हाला एक इच्छा झाली ती पूर्ण होईल. इन पर्टीक्यूलर. पण सर्वसाधारण होत नाही. आज एक झाली, तर दुसरी. दुसरी झाली, तर तिसरी. म्हणजे एक गोष्ट स्पष्ट आहे, की जी आम्ही इच्छा केली ती शुध्द इच्छा नव्हती. जर ती शुध्द इच्छा असती, तर आमची जी इच्छा पूर्ण झाली त्याच्यामध्ये आम्हाला पूर्णपणे समाधान झालं असतं. पण झालं नाही ना. झालं का? आता तुम्हाला काही पुढे नको? पाहिजे ना, म्हणजे तुमची शुध्द इच्छा नव्हती. जी तुम्ही इच्छा केली ती शुध्द नव्हती. अशुध्दच इच्छेत राहिला म्हणून एक गेली तर दुसरी, दुसरी तर तिसरी, तिसरी तर चौथी. अशा चक्करात तुम्ही फिरू राहिलात.

आता शुध्द इच्छा ही, साक्षात कुंडलिनी आहे. कारण ती परमेश्वरी इच्छा आहे. ही जागृत झाल्याबरोबर जी तुम्ही इच्छा कराल. ‘जें जो वांछील, तें तो लाहो’ म्हणजे इतकचं नाही, की तुम्हाला असं वाटतं, की आता झालं बुवा, आता आपल्याला काही नको. पण तुमच्यात ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतात. पण त्या इच्छा अशा जड वस्तूंच्या नसतात. अशा मोठ्या प्रगल्भ होऊन जातात आणि तुमचं जे काही आहे, लहान-सहान ते कृष्णाने सांगितलंय, की ‘योगक्षेमं वहाम्यहम्’ जेव्हा तुमचा योग घाटीत होईल तर क्षेमं हे होणारच. पण योग आधी सांगितला. क्षेमं योग नाही सांगितला कृष्णाने सुध्दा ‘योगक्षेमं वहाम्यहम्’ आधी योग झाला पाहिजे.

सुदाम्याला आधी जाऊन कृष्णाला भेटाव लागलं. तेव्हाच त्याची द्वारिका सोन्याची झाली. तुम्ही, तुमचं म्हणणं असं आहे, की नाही, आम्ही इथेच बसू आणि इथेच करा. का म्हणून? तुम्ही एवढे अधिकार लावता परमेश्वरावर. ते एवढ्यासाठीच, की चार पैशाची फुलं घेतली, परमेश्वराला देऊन आले म्हणून? उलट फार चुकतं आहे त्याच्यामध्ये. पुष्कळ लोकांना मी पाहिलेलं आहे, की जे शिवभक्त आहेत. शिव, शिव, शिव करतात, त्यांना हार्ट अटॅक येतो आणि शिव तुमच्या हृदयात बसलेले आहेत. मग असं कसं? त्यांना हार्टचा अटॅक कसा आला? कारण शिवच नाराज झाले. तुम्ही कोणालाही असं बोलत राहिले सारखं तर माणसाला हे वाटायचं, की हा मनुष्य मला कशाला एवढा त्रास देतोय! अहो, उद्या तुम्ही जर जाऊन ह्या राजीव गांधीच्या तिथं जाऊन राजीव, राजीव, राजीव म्हटलं तर तुम्हाला अरेस्ट करतील लोक. तसचं झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला ना धड परमेश्वर मिळत आहे. ना प्रपंच मिळत आहे. तर मध्यमार्गात यायला पाहिजे आणि मध्यमार्ग ह्याला सुषुम्ना नाडीचा मार्ग म्हणतात. तिथून जेव्हा कुंडलिनीच जागरण होतं, तेव्हा मनुष्य मधोमध येऊन संतोषात येतो. संतोषात येतो.

सांगायचं म्हणजे एक थोडंसं पर्यायाने सांगते, की आजकाल हे संतोषी देवीच व्रत निघालयं. अहो, संतोषी म्हणून कोणी देवीच नाहीये. सिनेमावाल्यांनी काही खूळ काढलं, की लागले त्याच व्रत करायला. जे संतोषाच जे सगळं स्त्रोत आहे ती कशी संतोषी होणार हो आणि अशा रीतीने काही तरी भलत काढायचं, उपास करायचा. आज तर म्हणे आंबट नाही खायचं, अमूक करायचं, तमूक करायचं. कसले तरी धतींग करत बसायची आणि मग परमेश्वराला दोष लावायचा, की आम्ही एवढं केलं तरी आम्हीच आजारी आहोत. त्याचा सांगोपांग विचार केला पाहिजे आणि परमेश्वराचे जे नियम आहेत त्याच जे सायन्स आहे ते तर शिका आधी. ते शिकल्याशिवाय भलतं-सलतं करता आणि म् त्याच काही वाईट झालं, की त्या परमेश्वराला कशाला दोष द्यायचा.

परमेश्वर आहे किंवा नाही तेच सिद्ध करायलाच आम्ही आलेले आहोत. अगदी सिद्ध करायला. तुमच्या हातातनचं वाहणार आहे. हाताच्या बोटावर परमेश्वर तुम्हाला मिळणार आहे. पण त्याला तयारी आहे का तुमची? आधी डोकंच जास्त चालणार माताजी, काय बोलतात हे. थोडं डोकं थंड करा म्हणजे, हे होईल कारण तुमचे प्रश्न तुमच्या डोक्याने जर सुटले असते तर आम्हाला एवढी मेहनत करायला नको होती. पण ते तुमच्या डोक्याने सुटण्यासारखे नाहीतच. तुमचे राजकीय प्रश्न सुटणार नाहीत. सामाजिक सुटणार नाहीत आणि तुमच्या प्रपंचातले तर प्रश्न मुळीच सुटणार नाहीत. कारण राजकीय प्रश्न तरी काय आहेत? आता म्हणे आम्ही म्हणे कॅपिटलिस्ट आहोत तर त्याच्यासाठी भांडत बसले. काय सुखी आहेत का लोक तिथे? स्वतंत्रता तरी झेपता येते का त्यांना. दुसरे म्हणे आम्ही म्हणे कम्युनिस्ट आहेत. अहो, आम्ही खरे कॅपिटलिस्ट. कारण आमच्याजवळ शक्त्या आहेत आणि आम्ही सगळं कम्युनिस्ट (अस्पष्ट....) दिल्याशिवाय राहत नाही. आम्ही खरे आहोत बाकी हे जे वरवरच्या गोष्टी आहेत त्या गोष्टींमध्ये तुम्ही रमू नका.

तुम्ही परमेश्वराच साम्राज्य मिळवा आपल्यामध्ये आणि त्याचे नागरिक व्हा. मग बघा तुम्ही काय होता. त्याला प्रपंच सोडायला नको. पैसे द्यायला नको. ह्याला कसले पैसे द्यायचे? अहो, ही जिवंत शक्ती तुमच्यामध्ये, जिवंत प्रक्रिया आहे. तुम्ही जर एखाद्या झाडाला पैसे दिले तर तो काय तुम्हाला काही फूल देईल का? त्याला समजतं का पैसे-बिशै काही. तसचं परमेश्वर आहे. त्याला काही समजत नाही पैसे-बिशै. एका बुवाबाजी आणायची, बुवाला बसवायचं. अरे, तू पैसे घे. खेडेगावात तर म्हटलं अरे, माताजी पैसे घेत नाही. बरं दहा पैसे नाही, तर २५ पैसे घ्या माताजी. पण कशाचे देता पैसे? तुमचं, तुमचंच आहे. ते का आम्ही घेणार आहोत. प्रेमाच्या पाठी सगळं काही कार्य निघालेलं आहे ते प्रेम मिळवलं पाहिजे. प्रपंच्यामध्ये जे नाही ते म्हणजे प्रेम आणि प्रेम जे आहे ते सुकलेलं प्रेम.

एखाद्या झाडामध्ये तुम्ही पाहिलं असेल, की त्याच्यातला रस वर येतो आणि प्रत्येक ठिकाणी जसं लागेल ते देत परत आपल्या ठिकाणी पोहचतं. तो जाऊन एखाद्या फुलावर अटकत नाही. एखाद्या पानावर अटकत नाही. अटकला, की झालंच ते झाडही मरायचं आणि ते पान ही मरायचं आणि फुलही मरायच. तसचं आपल होतं. आपल प्रेम म्हणजे माझा मुलगा, मग तो जगातला नवाबशहा झाला पाहिजे. माझी मुलगी ते अमकं झालं पाहिजे. माझं, माझं, माझं जे चालतं ते तुमचं आहे काय? माझं म्हणजे तुम्ही नाही ते. पण हे बोलून होणार नाही. सांगून होणार नाही. मी कितीही म्हटलं, की सोडा हे माझं, माझं सुटणार नाही. त्याला सोडवायला तुमची कुंडलिनीच उठायला पाहिजे. ती उठल्यानंतर आणि तुम्ही पार झाल्यावर. मगं तुझं, तुझं सुरू होतं.

कबीरांनी म्हटलेलं आहे, की जेव्हा शेळीला आपण जिवंतपणी बघतो तर ती सारखं मीऽ मीऽ मीऽ मीऽ करत असते. मैंऽ मैंऽ मैंऽ मैंऽ करत असते. मग ती मेल्यावर तिची जेव्हा आतडी काढून तिची तार बांधून जेव्हा धूनके फिरतात तेव्हा तूहीऽ तूहीऽ तूहीऽ तसचं माणसाचं आहे, की एकदा तुम्ही कुंडलिनी जागृत झाला म्हणजे सगळं वाटतं तुझंच आहे सगळं. अकर्मात मनुष्य जन्माला येतो. मग ही मुलं काय? बाळं काय? सगळी तुझीच आणि आश्चर्य वाटतं लोकांना हे सगळं बघून. कसं होतंय कसं? घडतंय कसं? बनतंय कसं? इतके कौटुंबिक, कौटुंबिक स्थिती, इतक्या लोकांची ठीक झालेली आहे, हया तुमच्या मुंबई शहरात, की तुम्हालाच आश्चर्य वाटेल. पण आम्ही बघतच नाही. आम्हाला विश्वासच नाही. नका करू. तुमचा तुमच्यावर तरी विश्र्वास आहे, की नाही देवाला ठाऊक. तर आता ह्या नसत्या वर्तमानपत्र वादीपणाला सोडून काही तरी खरोखर वर्तमानात जे होतंय ते बघितलं पाहिजे.

आता कृष्ण झाले ते काही तरी एक संपदा घेऊन , एक परंपरा घेऊन आले. त्यांनी एक कृषीच कार्य केलं. जगामध्ये हे ‘बी’ परलेलं आहे आणि आज ती संपदा तुम्हाला ह्या स्थितीला आणते, की तुम्ही जसे काही फुलातनं फळं होणार आहात. ती तुम्ही मिळवून घेतली पाहिजे. ह्यावेळेला जर तुम्ही चुकलात , तर नेहमीसाठी चुकाल आणि अशा रीतीने प्रपंचातले सगळे प्रश्न सुटून तुम्ही परमेश्वराच्या प्रपंचात येता. त्याच्या प्रपंचात आल्याशिवाय सुखाचा तुम्हाला धागा-दोरा सुध्दा मिळणार नाही. सगळे जगातले क्लेश हे परमेश्वराच्या चरणी जातात असं म्हणतात. पण त्याचा अर्थ असा नाही, की तुम्ही जाऊन विठ्ठलाच्या ह्याच्यावर डोकं आपटायचं.

विठ्ठल हा आपल्यामध्ये जागवला पाहिजे आणि तो कसा जागवायचा त्याला काहीही करावं लागत नाही. तो साक्षात तुमच्यात आहे. फक्त कुंडलिनीचं जागरण झालं म्हणजे जसा दिवा पेटवावा, तसा तो पेटतो. त्या घरामध्ये परमेश्वराचा दिवा तेवत राहील, तिथं कसलं दुःख आणि (अस्पष्ट ....), कसली गरिबी आणि कसले आपण. असा हा सुखाचा संसार झाला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही खेडोपाडी सगळीकडे फिरत असतो.

आपण नम्रपणे माझी ही विनंती आहे, की कोणत्याही गोष्टीचा आक्षेप न घेताना, स्वतःकडे लक्ष देऊन आणि विचार करून ही जी आपल्यामध्ये शक्ती आहे, ती जागृत करून घ्यावी आणि स्वतःच्या प्रपंचाचा आणि सर्व संसाराच्या प्रपंचाचा उद्धार करावा. अशी मी तुम्हाला हात जोडून विनंती करते.

Doctor Antonio Da Silva High School, Mumbai (India)

Loading map...